Sunday, December 28, 2014

शिवसेना हातपाय पसरू लागलीय?



दोन महिन्यापुर्वी संपलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला, तो राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. त्यातून तो पक्ष अजून सावरलेला दिसत नाही. प्रथम त्याला लोकसभेत धक्का बसला होता. त्यापासून धडा घेतला असता, तर विधानसभेचे डावपेच योग्यरित्या खेळले गेले असते. शिवसेना भाजपा युती तुटल्याचा ताबडतोब लाभ उठवायचा प्रयास तेव्हाच व्हायला हवा होता. राजकारणात कुठे अडून बसायचे आणि केव्हा माघार घ्यायची, याचे प्रसंगावधान आवश्यक असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांनी कधीच आपल्या अहंकारासाठी संघटनात्मक बळ पणाला लावले नव्हते. उलट अनेकदा व्यक्तीगत प्रतिष्ठा बाजूला ठेवून असे राजकीय डाव खेळले, की त्यातून संघटनेला लाभच झालेला होता. १९८० सालात शिवसेनेला लागोपाठच्या पराभवानंतर मरगळ व वैफ़ल्य आलेले होते. तेव्हा कार्यकर्त्यांना नव्या लढाईत उतरवण्यापेक्षा त्यांनी कॉग्रेसला बिनशर्त पाठींबा देण्यापर्यंत माघार घेतली होती. विधान परिषदेतल्या दोन आमदारांच्या बदल्यात त्यांनी इंदिरा कॉग्रेसला पाठींबा देऊन टाकला होता. पण पुढल्या पाच वर्षात स्वबळावर महापालिका जिंकण्यापर्यंत आपले संघटनात्मक बळ त्यांनी वाढवले होते. या काळात शाखा व संघटना बळकट बनवताना नव्या पिढीचे नेतृत्व पुढे आणले होते. त्यांनीच मग नव्या शिवसेनेचा पाया घातला होता. ज्याच्या बळावर शिवसेना राज्याव्यापी पक्ष बनली होती. १९८० सालात विधानसभा लढाईकडे पाठ फ़िरवणार्‍या शिवसेनेने मग दहा वर्षात थेट विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली होती. आज ज्यांना शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून बघितले जाते, ती नवी नेत्यांची पिढी त्याच कालखंडात उभी राहिली. १९७५ ते १९८० या कालखंडातल्या सततच्या पराभवातून शिवसेना नव्या दमाने उभी राहिली, त्यामागे त्या माघारीचे महत्व खुप मोठे होते.

राज ठाकरे यांना मे महिन्यात लोकसभा निवडणूकीत दणका बसला, तेव्हा त्यांनी आपल्या राजकारणाचा नव्याने विचार करण्याची वेळ आलेली होती. पण परिस्थितीचे गांभिर्य त्यांना ओळखता आले नाही. म्हणूनच मग विधानसभा निवडणूकीतल्या परिस्थितीचा पुरेसा लाभ त्यांना घेताच आला नाही. किंबहूना नियतीने त्यांना अपुर्व संधी बहाल केली होती. २५ वर्षाची जुनी शिवसेना भाजपा युती तुटणे, ही मनसेसाठी सावरण्याची अप्रतिम संधी होती. ज्या दिवशी युती तुटली वा तशी घोषणा भाजपा नेत्यांनी केली; त्याच रात्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजना अस्वस्थ होऊन फ़ोन केला होता. तीच अपुर्व संधी होती. खुद्द राज यांनीच एका वाहिनीवर झालेल्या गप्पांच्या कार्यक्रमात त्याची ग्वाही दिलेली होती. आणि युती तुटल्यानंतरच्या दोन भावातल्या त्या संवादाने दोघे एकत्र येतील, अशी चर्चाही सुरू झालेली होती. पण पुढे काहीच झाले नाही. राज त्या संवादाबद्दल जे काही सांगतात, त्यावर विश्वास ठेवायचा, तर उद्धव तेव्हा कमालीचे अस्वस्थ व विचलीत झालेले होते. म्हणूनच त्याचवेळी एकत्र येण्याच्या दिशेने राजनी पुढाकार घ्यायला हवा होता. आपला भाऊ हळव्या मनस्थितीत असताना राजनी दोन पक्षांनी एकत्र येण्याच्या दिशेने पाऊल टाकले असते तर? कारण शिवसेनेकडे सर्व जागा लढवण्याची क्षमता नव्हती. भाजपाच्या जागी मनसे तितका शक्तीमान पक्ष युतीत येऊन भरपाई होऊ शकली नसती. पण निदान उद्धवना धीर मिळाला असता आणि लोकसभेच्या दणक्यातून मनसेला सावरण्याची प्रक्रिया सुरू झाली असती. हळव्या क्षणी उद्धवही लवकर प्रतिसाद देऊ शकले असते. थोडक्यात सेनेशी विधानसभा निवडणूकपुर्व युती झाली असती, तर दोघांना आजच्यापेक्षा अधिक यश मिळू शकले असते. राज्यातील गणिते बदलली असती. पण राज यांनी ती संधी गमावली. आज त्याचेच दुष्परिणाम दिसत आहेत.

युती तुटल्यानंतर सेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकरित्या हाती घेतला. त्यामुळे एकप्रकारे अटीतटीची लढाई सुरू झाली होती आणि त्यात शिवसेना हाच मराठी माणसासाठी प्रतिष्ठेचा विषय बनून गेला. सहाजिकच मराठी मते पक्षाच्या निष्ठा बाजूला ठेवून शिवसेनेच्या बाजूला झुकणे स्वाभाविक होते. पर्यायाने मनसेला आपल्या मतांना टिकवणेही कठीण होते. पण हेच भाऊ दोघे एकत्र येऊ शकले असते, तर निदान २०-३० जागांवर फ़रक पडला असता. आणि तेवढ्याच जागांनी राजकारणात मोठी उलथापालथ घडवली आहे. शिवसेनेला ८०-९०चा पल्ला गाठू शकली नाही आणि मनसेला सर्वच जागा गमवाव्या लागल्या. मराठी मतांच्या धृवीकरणाचा लाभ सेनेला मिळाला आणि मनसे समोर अस्तित्वाची समस्या उभी राहिली. आज त्याच समस्येशी राज ठाकरे यांना झुंजावे लागत आहे. अपयशामुळे अनेक सोबती आणि सहकारी त्यांची साथ सोडून जात आहेत. राम कदम वा हर्षवर्धन जाधव यासारखे आमदार तर निवडणूकीपुर्वीच मनसे सोडून गेले होते. निकालानंतर दोन महिन्यात अनेक नेते काढता पाय घेत आहेत. त्यापैकी उघड नाराजी बोलून दाखवणारे प्रविण दरेकर हे नाव मोठे आहे. त्यांनी नुसती नाराजी बोलून दाखवलेली नाही, तर पराभवानंतर सभा घेऊन आपल्या व्यथा मतदारांपुढे मांडल्या. मग ते भाजपात जाण्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता दरेकर थेट मातोश्रीवर पोहोचल्याच्या बातम्या आहेत. त्यामध्ये नवल नाही. जुना शिवसैनिक माघारी येण्यात आश्चर्य नाही. पण त्यातून मनसेच्या कार्यकर्त्यांची मानसिकता स्पष्ट होते. ज्यांनी ह्या पक्षाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला, त्यातले बहुतेक नाराज शिवसैनिकच होते. त्यांनी पुन्हा सेनेते दाखल होणे चमत्कारिक नक्कीच नाही. पण दरेकर त्याला अपवाद म्हणावा लागेल. कारण राज सेनेतून बाहेर पडण्यात मोठे कारण दरेकर हेच होते.

राजनिष्ठ असलेले दरेकर दिर्घकाळ विद्यार्थी सेनेचे सरचिटणिस होते आणि केवळ त्यांच्या राजनिष्ठेमुळेच त्यांना दोनदा पालिकेचे तिकीटही मिळू शकले नव्हते. अशा एका प्रसंगी नाराज दरेकर यांनी माजी नगरसेवक आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर हल्लाही केलेला होता. २००९ सालात मनसेचा आमदार म्हणून निवडून येण्याची क्षमता असलेल्या दरेकर यांना, सेनेत असताना पालिकेचेही तिकीट मिळू नये, यातून त्यांच्यावरचा अन्याय स्पष्ट व्हावा. तशीच त्यांची राजशी असलेली जवळीक स्पष्ट व्हावी. असा निकटवर्ति मनसेतून बाहेर पडत असेल, तर पक्षात सर्वकाही आलबेल आहे असे मानता येत नाही. दुसरीक्डे मनसेतील बहुतेक नेते व कार्यकर्ते साहेबांचे भक्त आहेत. त्यामुळेच त्यांचे सेनेविषयी आकर्षण कधीच संपलेले नव्हते. अशा राज यांनी खुप आधीच म्हणजे लोकसभेनंतर आणि युती फ़ुटल्यानंतर सेनेशी जुळवून घेण्याचा प्रयास करायला हवा होता. विसर्जन नाही तरी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला काहीच हरकत नव्हती. ती तडजोड सन्मानजनक झाली असती आणि आज मनसे समोर जो अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, तशी वेळ आली नसती. दरेकर शिवसेनेत जाणार हे वेगळे सांगायला नको. त्याची रितसर घोषणा पुढल्या कालावधीत होईल. किंबहूना त्यांच्या सोबत मनसेचा मोठा गट समारंभपुर्वक सेनेत दाखल होईल. ती शिवसेनेच्या बळकटीची सुरूवात असेल. युतीच्या तुटण्यापासून उद्धव ठाकरे ज्या अनुभवातून गेले आहेत, त्यानंतर त्यांनी सत्तेत सहभागी झाल्यावरही पक्ष अधिक बळकट बांधण्याचे काम हाती घेतल्याचा हा पुरावा मानायला हवा. जुने कार्यकर्ते जमा करणे आणि संघटना मजबूत करण्याचा हा प्रयास, राज्यव्यापी पक्ष म्हणून प्रत्येक जिल्हा तालुक्यात भक्कम पायावर उभे रहाण्याची तयारी आहे. म्हणूनच दरेकर मातोश्रीवर आले की आणले गेले? संघटना बांधू शकणारे मोहरे गोळा करण्याची ही खेळी, म्हणूनच पक्षाचा पाया राज्यात विस्तारण्याची मोहिम असू शकते.

No comments:

Post a Comment