Monday, December 8, 2014

पुन्हा निवडणूकपुर्व युती नकोच



शनिवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या एका विधानाचा उहापोह इथे केला होता. त्यालाच जोडून अणखी एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. जोपर्यंत फ़िसकटलेली युती पुन्हा सांधण्याचे प्रयत्न फ़सत होते, तेव्हा दोन्ही बाजूंनी आगीत तेल ओतणारी विधाने चालू होती. त्यापैकी शिवसेनेच्या बाजूने असे आगलावे बाजूला करण्यात आले आणि मग कुर्‍हाड कोसाळली, ती भाजपाच्या वाचाळ ज्येष्ठ नेत्यांवर. यातले सर्वात ज्येष्ठ असलेले अनुभवी नाथभाऊ खडसे, यांना जणू तोंडात बोळा कोंबून भाजपाने गप्प केले आहे. खरे तर मुंडे यांच्या अकाली निधनानंतर खडसेच सर्वात ज्येष्ठ नेता होते आणि गडकरी दिल्लीत गेल्याने ज्येष्ठतेनुसार त्यांचाच मुख्यमंत्री पदावर दावा होता. त्यासाठी त्यांनी जमवाजमव सुद्धा झकास केलेली होती. गेल्या काही वर्षात विरोधी नेता म्हणून त्यांनी इतके साटेलोटे राष्ट्रवादीशी केलेले होते, की त्यांना हवे तसे राजकीय डाव शरद पवारही खेळत होते. इथे २५ सप्टेंबरला खडसे यांनी युती मोडल्याची घोषणा केली आणि तासाभरात तिकडे राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडल्याची गर्जना केली. त्याच्याही आधी भाजपाला उमेदवारांची वानवा भासू नये म्हणून, आपले दांडगे व स्वबळावर निवडून येऊ शकणारे डझनावारी नेते पवारांनी भाजपामध्ये पाठवले होते. त्यांना पायघड्या घालण्याचे काम इथे नाथाभाऊ करतच होते. म्हणजेच त्यांनाच भाजपा-राष्ट्रवादीचा ‘संयुक्त’ उमेदवार ठरवून निवडणूकपुर्व राजकारण खेळले गेले होते. तिथपर्यंत पक्षाचा लाभ बघून दिल्लीतले भाजपाश्रेष्ठी गप्प होते. पण प्रत्यक्ष मुख्यमंत्री ठरवायची वेळ आली, तेव्हा मात्र नाथाभाऊना पक्षाने खड्यासारखे बाजूला केले होते. राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठींब्याची तरतुद करूनही आपला दावा नाकारला गेल्यावर त्यांनी खुश रहावे, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. मग त्यांनी आपल्या वक्तव्यातून नव्या मुख्यमंत्री व सरकारला गोत्यात आणायचे डाव सुरू केले होते.

गेल्या दिड महिन्यातले किंवा निकालानंतरचे नाथाभाऊ व राष्ट्रवादीचे राजकारण बघितले, तर नैसर्गिक मित्र कोण कोणाचे होते, त्याची पदोपदी साक्ष मिळते. नाथाभाऊ मुख्यमंत्री होत नसतील तर देवेंद्रना कायम ‘पवारावलंबी’ ठेवण्याचाही डाव होता. पण पडते घेत युतीमध्ये दाखल होण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या खेळीने तोही फ़सला आहे. त्याच्याही आधी विरोधात बसून नाथाभाऊंच्या डावपेचांना उद्धवनी चांगला शह दिला. अनेकांना उद्धवची भूमिका धरसोडवृत्ती वाटू शकते. पण राजकारणात कुठलीही भूमिका अंतिम नसते. एक एक खेळी आपल्या प्रसंगानुसार खेळावी लागत असते. त्याचे अंतिम परिणाम मोलाचे असतात. नुसतेच अभिमान अहंकार कामाचे नसतात. अहंकाराचे अवडंबर माजवून सवाल करणारे तेच असतात, जे त्याच अहंकारात फ़सल्यावर फ़िदीफ़िदी हसतही असतात. अंतिमत: काय साध्य केले, याला सर्वात जास्त महत्व असते. राष्ट्रवादीच्या पाठींब्याचा बागुलबुवा करून सेनेला नमवण्याची खेळी केली गेली, ती उधळून लावताना उद्धवनी भाजपाचे राजकीय चारित्र्य पावित्र्य लोकांसमोर उघडेनागडे केले. ही जमेची बाजू आहे. त्यातून भाजपाला मतदाराच्या मिळालेल्या सदिच्छांची चकाकी उतरवण्यात उद्धव यशस्वी झाले आहेत. त्याच्याच परिणामी मग यापुढे युतीशिवाय एकटे लढायची हिंमत देवेंद्र गमावून बसले आहेत. भाजपाच्याच तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणुन घेतल्या, तर भाजपाने काय गमावले त्याचा अंदाज येऊ शकतो. दिड महिन्यानंतर युतीत सहभागी होऊन सेनेला कुठली खाती वा किती मंत्रीपदे मिळाली, त्यापेक्षा तिथेही भाजपाने स्वपक्षाचे किती नुकसान करून घेतले बघण्यासारखे आहे. युती तुटल्यापासून सोबत असलेले चार छोटे पक्ष भाजपावर नाराज आहेत आणि निकालानंतर भाजपाच्या पाठींब्यासाठी धावून आलेले अपक्षही अस्वस्थ आहेत. स्वार्थापुढे भाजपा मैत्रीची पायमल्ली करतो, हे त्यातून सिद्ध झालेले नाही काय?

उद्धवनी पहिल्याच दिवशी निकालानंतर परस्पर पाठींबा देऊन टाकला असता, तर भाजपाची प्रतिमा उजळ राहिली असती. त्याला अन्य मित्रांना सोबत घेऊन आश्वासने देण्याची धावपळ करावी लागली नसती आणि आज त्यापैकी कोणाचा रोष पत्करावा लागला नसता. अधिक त्यात भाजपा विजयीवीर असल्याला मान्यता दिल्यासारखे ठरले असते. पाठींबा रोखून व नंतर देण्यात उशीर करून उद्धवनी भाजपाची निवडणुक निकालांनी उंचावलेली प्रतिमा पुरती ढासळून टाकली आहे. राजकारणात आजच काय कमावले, त्यापेक्षा आपल्या प्रतिस्पर्ध्याला किती जायबंदी केले, त्यालाही खुप महत्व असते. मोदींची लोकप्रियता व भाजपाविषयी असलेल्या प्रचंड अपेक्षांनी मतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे वळला होता. त्यातला जो अधिकचा व अपेक्षेने आलेला नवा मतदार आहे, त्याचा गेल्या दिड महिन्यात झालेला भ्रमनिरास, ही शिवसेनेसाठी मोठी कमाई आहे. नेमक्या ह्याच चुका १९९० च्या दशकात भाजपाने उत्तर प्रदेशात केल्या आणि प्रतिस्पर्धी असलेल्या मायावती व मुलायम यांना मोठे होण्यास हातभार लावला होता. त्याचे परिणाम लगेच दिसले नव्हते. पण पुढल्या सहासात वर्षात भाजपा पहिल्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला होता. तेव्हा कल्याणसिंग, कलराज मिश्रा, लालजी टंडन इत्यादींच्या ‘पराक्रमांचे’ अवलोकन केल्यास आजच्या महाराष्ट्रातील अनेक भाजपा नेत्यांना तीच भूमिका वठवताना आपण बघू शकतो. मग त्याचे नजिकच्या राजकारणातील परिणाम किती ‘फ़लदायी’ असतील, ते वेगळे सांगण्याची गरज आहे काय? तेव्हा मायावती मुलायमना खेळवण्याचा जुना डाव आजच्या शिवसेना राष्ट्रवादीला खेळवण्यापेक्षा नेमका कितीसा वेगळा आहे? नसेल तर परिणाम तरी कशाला वेगळे असतील? काहीही असो, स्वबळावर निवडणूका लढवण्यासाठी जनतेच्या ज्या सदिच्छा पाठीशी लागतात, त्या गेल्या दिड महिन्यात भाजपाने गमावल्या आहेत.

म्हणूनच मग देवेंद्र फ़डणवीस यांनी सेना सत्तेत सहभागी व्हायची घोषणा करताना, सर्व निवडणूका युती एकत्र लढवण्याची घोषणा करून टाकली आहे. परंतु शिवसेनेने मात्र यापुढे भाजपाच कशाला कुठल्याही प्रमुख पक्षाच्या सोबत निवडणूकपुर्व युती करणे आत्मघातकी ठरेल. सेनेने आता मायावती यांचे अनुकरण करावे. निवडणूक स्वबळावरच लढवावी. सोबत फ़ारतर रिपाई, शेतकरी संघटना किंवा शेकाप-रासप अशा छोट्या पक्षांना सोबत घ्यावे. पण भाजपाशी कुठलीही निवडणूकपुर्व युती करू नये. नंतर सत्तेत भागी करावी किंवा त्यांना सत्तापदांमध्ये भागी द्यावी. कारण या निकालांनी शिवसेनेला प्रथमच आपले बळ उमगले आहे. ते बळ अतिशय विपरीत परिस्थितीत कसोटीला लागले आहे. वाईट परिस्थितीत व एकाकी लढताना मिळालेली मते व जनतेचा प्रतिसाद; ही शिवसेनेची पक्की भूमी आहे. त्यावर मोठ्या यशाची टोलेजंग इमारत बांधणे शक्य आहे. मात्र भाजपाची स्थिती तशी सुखरूप नाही. सर्वस्व पणाला लावून व उधार उसनवारी करून मिळालेले आजचे यश, भाजपाने गेल्या दिड महिन्यातच मातीमोल केले आहे. मतदारापासून मित्र पक्षांपर्यंत भाजपाने सर्वांच्या सदिच्छा गमावल्या आहेत. त्यामुळेच इतके नाही, याच्या निम्मे यश मिळवणेही नजिकच्या काळात भाजपाला अशक्य आहे. म्हणूनच यापुढे शिवसेनेने भाजपाशी कुठलीही निवडणूकपुर्व युती करणे आत्महत्या असेल. यावेळी भाजपाने सेनेला आपली शक्ती आजमावण्याची अपुर्व संधी दिली. पुढल्या प्रत्येक निवडणूकीत भाजपाला त्यांचे बळ ‘कायम’ राखण्याची संधी नाकारण्याचा करंटेपणा शिवसेनेने करू नये. अगदी लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच निवडणूका आपल्या बळावर लढवाव्या आणि निकालानंतर परिस्थिती असेल, तसे सत्तावाटप करावे. शत प्रतिशत व्हायचे भाजपाचे स्वप्न मोडायची मोकळीक उद्धवनी मुख्यमंत्र्यांना देऊ नये.

1 comment:

  1. आता भाजप बरोबर युती करणे म्हणजे विश्वास घातकी मित्रावर परत विश्वास ठेऊन स्वतःचा आत्मघात करून घेणे होईल.

    ReplyDelete