Tuesday, December 2, 2014

शिवसेना अजून फ़ुटली कशी नाही?



विधानसभा निवडणूकीच्या निकालांना परवाच्या रविवारी सहा आठवडे पुर्ण झाले. पण अजून शिवसेना फ़ुटली कशी नाही. खरे म्हणजे याचे अनेक राजकीय जाणकारांना व विश्लेषकांना नवल वाटायला हवे. कारण निकाल स्पष्ट होऊन भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला तरी त्याचे बहूमत हुकले होते. मग अपक्ष व अन्य आमदारांच्या मदतीने सरकार स्थापण्याच्या गर्जना झाल्या होत्या आणि कुठल्या मोठ्या पक्षाच्या मदतीची गरज भाजपाला नसल्याचेही ठामपणे सांगितले जात होते. कुठल्याही मार्गाने भाजपाला १४५ चा आकडा दाखवता येत नव्हता, तेव्हा मोठ्या अन्य पक्षातले आमदार आपल्या संपर्कात असल्याचे तितक्याच ठामपणे सांगायला भाजपाचे नेते प्रवक्ते कचरत नव्हते. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेसने परस्पर दिलेला पाठींबाही भाजपा नाकारत नव्हता. त्याचे पितळ मग विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याच्या वेळी उघडे झाले. तोपर्यंत सत्तेसाठी ‘अगतिक’ झालेल्या सेनेत सत्तासहभागाच्या कारणाने फ़ुट पडण्याच्या अफ़वांचे रान पिकले होते. पण प्रत्यक्षात सेनेने विरोधी पक्षावर दावा करून ते पद आपल्याकडे घेतले. तरीही कोणी सेनेवर विश्वास ठेवायला राजी नव्हता. सेनेच्या अगतिकतेचे हे नाटक इतके अतिरंजित झाले, की शेवटी कोण अगतिक आहे त्याचा मुखवटा फ़ाटला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तावाटपाची बोलणी व्हायची, तर आपल्याशीच होऊ शकतील आणि तीही मातोश्रीवर असे ठामपणे सांगून टाकले. त्यानंतर ‘अगतिक’ पक्ष भ्रमाच्या बिळातून बाहेर आला. मातोश्रीवर दिल्लीच्या भाजपा नेत्यांचा प्रतिनिधी पाठवून त्याचा पुरावाही देण्यात आला. आधी सेनेतून भाजपात गेलेले सुरेश प्रभू मातोश्रीवर गेले आणि दोनतीन दिवसातच धर्मेश प्रधान हे भाजपाचे केंद्रीय मंत्री मातोश्रीवर येऊन थडकले. त्यांनी म्हणे हिंदूत्वाच्या अजेंड्यावर शिवसेनेशी चर्चा केली. पण शिवसेना फ़ुटण्याचे काय झाले?

पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहिलेली शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचे महिनाभर चित्र रंगवण्यात गर्क असलेल्या रंगार्‍यांचे चित्र अजून पुर्ण कशाला होऊ शकलेले नाही? सेना  गेली पंधरा वर्षे सत्तेत नाही हे वास्तव आहे. पण सत्तेविना ‘अगतिक’ व्हायला शिवसेना त्यापुर्वी किती वर्षे सत्तेत होती? ४८ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडात शिवसेनेच्या वाट्याला सत्ता आलीच किती काळ? अवघी साडेचार वर्षे ज्या पक्षाला सत्तेचा अनुभव घेता आला, तो पक्ष पंधरा वर्षात सत्तेसाठी इतका अगतिक लाचार होत असेल, तर शेकाप, जनता दल किंवा कम्युनिस्ट पक्षांनी काय करायचे? त्यांच्या वाट्याला चारपाच दशके सत्ता कधीच येऊ शकली नाही. त्यांनी तर सत्तेसाठी रांगत कुठल्याही बलदंड सत्ताधारी पक्षाच्या पायर्‍याच झिजवायला हव्यात ना? अशा पक्षांची हयात विरोधात व सत्तेला वंचित होऊन बसण्यात केली. शेकापचे गणपतराव देशमुख अकराव्या वेळी विधानसभेत निवडून आलेत आणि १९७८ सालात त्यांनी तेव्हाच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भुषवले होते. पुढली २१ वर्षे ते सत्तेबाहेर होते. म्हणून त्यांना कोणी सत्तेला ‘अगतिक’ झाल्याचे बघितले आहे काय? विलासरावांच्या मंत्रिमंडळात वाद झाले आणि २००१ च्या आसपास शेकाप सत्तेतून बाहेर पडला. गणपतरावांनी तेव्हा मंत्रीपद सोडले होते. मग आज त्यांच्याबद्दल काय म्हणायचे? दिर्घकाळ सत्तेबाहेर राहिल्याने शेकाप किंवा त्याचे नेते सत्तेला लाचार झालेत असा निष्कर्ष निघू शकतो काय? त्यासाठी शेकाप फ़ुटणार अशा बातम्या कशाला येत नाहीत? गेला महिनाभर सत्तेसाठी ‘लाचार’ झालेल्या शिवसेनेत विरोधी बाकावर बसायची वेळ आल्यास फ़ुट पडणार; ह्या बातम्या लोकांच्या गळी उतरवल्या जात होत्या. त्यामागचा तर्क काय होता आणि त्या बातम्यांचे जननकेंद्र कुठले होते? अफ़वांचे रान उठवून एखाद्या पक्षात माध्यमांना हाताशी धरून फ़ुट पाडण्याचा तो डाव नव्हता काय?

आता ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत आणि जी मंडळी पुन्हा युतीसाठी धावाधाव करीत आहेत, त्यातून सगळे नाटक कोण लिहीत व रंगवत होता, त्याचे स्पष्टीकरण होऊ शकते. हुकलेले बहूमत अन्य पक्षात फ़ुट पाडून वा नेतृत्वाला भयभीत करून साधण्याचा सगळा बनाव होता. सेनेत मुठभर लोक सत्तेसाठी लाचार झाले असतील यात शंका घ्यायचे कारण नाही. तसे लोक प्रत्येक पक्षात असतातच. अगदी भाजपामध्येही अशा लोकांची कमी नाही. खुद्द गोपिनाथ मुंडे यांच्यासारखा दिग्गज नेताही २०११ सालात भाजपा सोडायच्या मनस्थितीत कशाला होता? तेव्हा त्याची समजूत कोणी काढली होती? भाजपा सोडून किती आमदार खासदार कॉग्रेस वा अन्य पक्षात सत्तेसाठी आजवर गेले? सत्तेसाठी हाव सुटलेल्या लोकांचा भरणा सर्वच पक्षात असतो. तो फ़क्त शिवसेनेतच आहे असे भासवण्याचे काय कारण होते? त्यामागचा डाव नेतृत्वाला फ़ुटीचे भय घालून आपल्या अटीवर पुन्हा युतीत येण्यास भाग पाडणे, हाच होता. त्यासाठी मग सेनेतल्या अशा हावर्‍या सत्तालंपटांना प्याद्याप्रमाणे वापरले जात होते. पण उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आपल्या पित्याला शोभेसा ठामपणे दाखवून सेनेचे नेतृत्व करायला आपण पात्र असल्याची साक्ष दिली आणि विरोधी नेतेपद घेत सत्तेबाहेर बसण्याचा संयम दाखवला. त्यातून बाकी काय साधले माहित नाही. पण शिवसेनेवर आपली पक्की हुकूमत असल्याचे व सेना फ़ुटण्याच्या सर्व वावड्या अफ़वा असल्याचे, त्यांनी आपल्या ठामपणातून सिद्ध केले. तिथून मग भाजपाच्या आगावू नेत्यांचा व तथाकथित चाणक्यांचा धीर सुटत गेला. कारण ज्या राष्ट्रवादी विरोधात प्रचाराची चिखलफ़ेक करून हे यश मिळवले, त्याच्याशीच साटेलोटे असल्याच्या वास्तवाने भाजपाचे समर्थक कार्यकर्ते दिवसेदिवस विचलीत होत गेलेले आहेत. आणि आज ज्या यशाची मस्ती चढली आहे, तेवढेही यश अशा नाराज पाठीराख्यांच्या बहिष्काराने टिकवता येणार नव्हते.

थोडक्यात महिनाभर सेना सत्तेसाठी फ़ुटण्याचे जे नाटक रंगवण्यात आले. त्याचा लाभ होण्यापेक्षा भाजपातच नेते विरुद्ध सामान्य कार्यकर्ता-पाठीराखा अशी दरी वाढू लागली आहे. त्यातून मग सेनेला काहीही करून सत्तेत आणायची घाईगर्दी सुरू झाली. मात्र हे काम आरंभी निकालानंतर जितके सोपे होते, तितके आज सहजसाध्य राहिलेले नाही. निवडणूक प्रचारात सेनेने चुकीची भाषा वापरली आणि निकालानंतर भाजपाच्या नेत्यांनी दाखवलेला आगावूपणा, उर्मटपणा आताच्या बोलण्यातला मोठाच अडसर होऊन बसला आहे. कारण सेनेला तिची जागा दाखवण्य़ाच्या धुंदीत आपल्याला सेनेच्या पाठींब्याची गरजच उरलेली नाही, असे इतक्या तर्काने पटवण्याचा महिनाभरात आटापिटा झाला, की आता आपल्याच तोंडाने सेनेच्या पाठींब्याची गरज कबुल करणे भाजपाच्या नेत्यांना अवघडल्या जागीचे दुखणे होऊन बसले आहे. सेनेशिवाय सरकार स्थीर व भक्कम होऊ शकत नाही, हे मान्य केले तर महिनाभर थापा मारल्या, अफ़वा पसरवल्या हे मान्य करावे लागेल. आमदार संपर्कात किंवा सेना फ़ुटेल, असल्या बातम्या पसरवून ज्या माध्यमांना खेळवले, त्यांना तर जाब द्यावाच लागेल ना? आणि तसे करायला गेल्यास तीच माध्यमे वाभाडे काढू लागण्याचे भय आहे. त्यामुळे सेनाच स्वत: सत्तेत सहभागी झाली, असे भासवायचे आहे. पण उद्धव तर विरोधात बसायचा हट्ट धरून भाजपाला गरज असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावे, अशी अट घालून बसले आहेत. सहाजिकच आपलीच पापे जाहिरपणे कबुल करायची नामुष्की भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आली आहे. मात्र महिना उलटून गेल्यावर आणि विरोधात बसल्यावरही शिवसेना आहे तशीच आहे. तिच्यात फ़ुट पडायची गोष्ट सोडा, साधी भेगही पडलेली नाही. मात्र असल्या आवया उठवणार्‍यांचे थोबाड फ़ुटले आहे. कारण सत्तेत सहभागी होण्यासाठी उलट सेनाच अटी घालू लागली आहे.

3 comments:

  1. सेनेकडून घोर निराशा होवू नये हीच अपेक्षा आहे.
    सत्तेत सहभागी होण्यात काही गैर नाही...कारण सेना सरकारमध्ये सामील तर "सत्ता-लोभी" आणि विरोधात बसली तर "आडमुठी" असे विचित्र तर्क-वितर्क तर होतच राहणार. पण भाजपू कडून झालेला अपमान हा एक ठाम तर्क होवू शकला असता...
    असो, जनतेची सेवा दोन्ही मार्गाने होवू शकते...सरकार किवा विरोधी पक्ष !...म्हणूनच म्हटलं की उद्देश चांगला असेल तरच सेनेचा नवीन मार्ग सहन होईल.
    शेवटी जनता कुणाला बांधील नाही...सेना विरोधी पक्षात न बसल्यामुळे आज एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे...तेव्हा राज ठाकरेंनी कंबर कसावी...आमच्या शुभेच्छा !
    उद्या महाराष्ट्राविरोधी राजकारण केल तर भाजपू ला जो "कानपडवेल", जनता त्याच्याच बाजूने उभी राहील.
    जर ह्यांचं "सत्तेसाठी कायपण"...तर आमचं पण..."अस्मितेसाठी कायपण" !
    ll जय महाराष्ट्र ll

    ReplyDelete
  2. शिवसेना हा खुप जस्ट केदारबेस पार्टी आहे,शिवसेनेचे असे बरेच वोट पॉकेट आहेत जिथे शिवसेना कधीच पडत नाही जसे की परभणी , औरंगाबाद
    तिथल्या शिवसेना नेत्यांना माहित आहे की शिवसेनेशिवाय् आपले डिपाजिट वांचू शकत नाही, ते लोक कशाला पार्टी सोडून आपल्या पायावर दगड मारून घेतील
    मी परभनीचा आहे , मनसे चा पदाधिकारी आहे, मागील विधानसभेच्या निवाडणुकीवेळी आम्ही एका गावात गेलो, तिथे एक 40-45 वयाच्या मानुस होता, त्याला आम्ही समजून सांगितले की तुम्ही मागील 25 वर्षापासून तुम्ही शिवसेनेला निवडून देता, तुम्हाला काय भेटले , तुमच्या गावकडे जायला गुड़ग्या एवढे खड्डे आहेत
    त्याने माला एका वाक्यात उत्तर दिले
    साहेब आज गुड़ग्या एवढ्या खड्यातून येतो, उद्या कमरे एवढ्या खड्यातून येवू पण मतदान शिवसेनेलाच करणार

    अशी लोकांच्या रक्तात भिनलेली शिवसेना संपने शक्य नहीं

    ReplyDelete