गेल्या महिन्याच्या मध्याला सुरू झालेला मान्सुनचा पाऊस सलग असा कोसळला, की मुंबईसह अनेक मोठ्या शहरात जनजीवन अस्ताव्यस्त होऊन गेले. मग सगळीकडे पावसाचा हाहा:कार दाखवण्यात माध्यमे रममाण झालेली होती. त्याखेरीज राजकारणी एकमेकांवर गैरकारभाराचे आरोप करीत रस्त्यातले खड्डे व तुंबलेले रस्ते नाले गटारे यातच डुंबण्यात गर्क झाले होते. पण त्याच कालखंडात बहुतेक इंग्रजी वाहिन्या व माध्यमे एका भलत्याच वादळाचे थैमान घालत होती. तो मान्सुन नव्हता तर ललित मोदी नावाचा ढग वृत्तवाहिन्यांना झुलवत होता. रोजच्या रोज ललित मोदीच्या गोष्टी व कृष्णलिला सांगून विविध भाजपा मंत्री व मुख्यमंत्र्यांना धारेवर धरायचा सपाटा चालू होता. आणि हे प्रकरण आपणच कसे उकरून काढले, त्यासाठी ‘टाईम्स नाऊ’चे संपादक अर्णब गोस्वामी स्वत:ची पाठ नित्यनेमाने थोपटून घेत होते. हळुहळू त्यात ललित मोदीनेही सहभागी व्हायला आरंभ केला आणि मजल अनेकांचे राजिनामे मागण्यापर्यंत गेली होती. नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकेकाला ढुंगणावर लाथ मारून कसे हाकलले पाहिजे, त्याचे इशारेही दिले जात होते. त्या ललित मोदी वादळाचा रोख असा होता, की आता जवळपास मोदी सरकार गडगडत कोसळून पडण्याला थोडाच अवधी शिल्लक राहिला होता. इतक्यात क्रमाक्रमाने मान्सुनचे ढग आभाळातून विरळ होत गेले आणि त्याच्याच जोडीने उपग्रह वाहिन्यांवर घोगावत धुमाकुळ घालणार्या ललित नावाच्या वादळाचीही हवाही बदलत गेली. जुलै महिन्याचा आरंभ होताना ललित प्रकरणातील अखेरचा मोठा गडगडाट झाला आणि सगळीकडे शुकशुकाट होत गेला. आता तर कुणाला ललित मोदी आठवेनासा होऊन गेला आहे. मग कुठल्याही चिकित्सक माणसाला शंका येईल, की ललित मोदी हा कोणी माणूस आहे, की मान्सुनचा घोंगावणारा ढग होता?
ललित प्रकरणात नित्यनेमाने खुलासे होत असताना शेवटचा महत्वाचा खुलासा कुठला आला कोणाला आठवतो? जुनअखेरीस खुद्द ललित मोदीने केलेला गौप्यस्फ़ोट, हाच त्यातला मोठा व शेवटचा खुलासा होता. आपल्याला भाजपाचे तरूण खासदार वरूण गांधी लंडनला येऊन भेटले होते आणि आयपीएलच्या सर्व भानगडी सोनिया काकू मिटवून देतील, असा वरूणने निरोप दिला होता. असा ललितचा तो गौप्यस्फ़ोट होता. तिथेच न थांबता ललितने आणखी पुढची माहिती दिलेली होती. वरूणमार्फ़त सोनियांनी दिलेल्या ऑफ़रनुसार आपण इटालीतील सोनियांच्या भगिनीशी संपर्क साधला होता. पण त्यांनी भानगडी मिटवण्यासाठी तब्बल ३६० कोटी रुपयांची मागणी केली आणि आपण तिकडे पाठ फ़िरवली, असा तो खुलासा होता. ही शेवटची माहिती. एकूण ललित प्रकरणातली ती सर्वात मोलाची माहिती होती. कारण ज्या आर्थिक घोटाळ्याचा ललित आरोपी आहे, त्यातून त्याला तात्कालीन युपीए सरकार कोणत्या मार्गाने वाचवू बघत होते, त्याचा तपशीलच ललितने दिलेला होता. मात्र अर्णबच्या ‘टाईम्स नाऊ’सह कुठल्याही वाहिनीने त्याचा पाठपुरावा केला नाही. ललितच्या खुलाशातील खरेखोटेपणा तपासण्याचे कष्ट कोणी घेतले नाहीत. खर्या गुन्ह्याचा गुन्हेगारच तपशील देतो, त्याविषयी सगळे चिकित्सक विश्लेषक एकदम अवाक झाले. त्या गुन्हेगाराला आश्रय मिळावा म्हणून ज्यांनी मदत केली त्याच्यावर दोन आठवडे सलग तोफ़ा डागणार्यांची बोबडी एका ललित खुलाश्याने कशाला वळली? सोनियांच्या भगिनीचा त्यात सहभाग असल्याचा नुसता उल्लेख होताच सर्व वाहिन्यांच्या बुद्धीमान पत्रकारांची अशी गाळण कशाला उडाली? त्यानंतर ललित अधुनमधून ट्वीटरच्या माध्यमातून खुलासे करतो आहे, पण सत्याची लढाई लढणारे अर्णबसह बहुतांश पत्रकार कुठल्या कुठे बेपत्ता झालेत. कोणी म्हणून ललितविषयी अवाक्षर बोलायला राजी नाहीत.
ही काय भानगड आहे? अकस्मात देशासमोरील सर्वात मोठा घोटाळा एकदम अदखलपात्र कसा होऊन गेला? तसे बघितले तर भाजपा व नरेंद्र मोदी यांना गुंतवायला उत्तम संधी होती. कारण ललित मोदीला भानगडीतून सोडवायची ऑफ़र देणारा वरूण गांधी भाजपाचा खासदार होता. पण तो ललितला जाऊन भेटल्याचे कुठल्या शोध पत्रकाराने शोधायचे आधीच कष्ट का घेतले नाहीत? उलट आरोपी ललितनेच त्याचा खुलासा केला. पण तरीही कोणी वरूण गांधीला गाठून वा अन्य मार्गाने हे ललित-वरूण संबंध शोधायच्या फ़ंदात पडला नाही. हा काय चमत्कार आहे? सुषमा स्वराजपासून वसुंधरा राजे यांच्या बारीकसारीक गोष्टी शोधून त्याचा कल्लोळ करणार्यांना वरूण-ललित संबंधांचे वावडे कशाला असावे? त्यात सोनिया व त्यांच्या भगिनीचे नाव आले, ही एक गोष्ट वगळता अन्य कुठले कारण दिसते का? नसेल तर ललितने अर्णबसह सर्व पत्रकारांची व वाहिन्यांची बोलती एका ट्वीटने बंद केली, असेच म्हणायला हवे ना? आणि तेच तर खरे कारण आहे. गुन्हेगारी वा लांडीलबाडी करणारे कधीही आपल्यावर डाव उलटला तर आपल्याला गुंतवणार्यांना फ़सवण्याचे मुद्दे बाजूला राखून ठेवत असतात. ललित मोदी त्यातला अतिशय चतुर खिलाडी आहे. म्हणूनच त्याने वरूणने ऑफ़र दिल्याचा तपशील अशाच मुहूर्ताची प्रतिक्षा करत जपून-झाकून ठेवला असणार आणि नेमकी संधी आली तेव्हा त्याचा बोळा करून काहुर माजवणर्यांच्या तोंडात अलगद कोंबला. अन्यथा ललित प्रकरणाचा पाठपुरावा अकस्मात तमाम वाहिन्यांनी सोडण्याचे काहीही तार्किक कारण दिसत नाही. किंबहूना त्यातून एकूणच ललित या प्रकरणाचा अकस्मात गदारोळ माजवण्यामागचा बोलविता धनी कोण होता व आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. आपल्यावरच बाजू उलटताना दिसते तेव्हा माघार घेतो, तोच बोलविता धनी असणार ना? सोनियांच्या भगिनीचा उल्लेख त्याच कारणास्तव महत्वाचा ठरतो.
ललित मोदीलाही त्याची कल्पना होती. म्हणूनच त्याने दिड वर्षापुर्वी भेटलेल्या वरूणचे चित्रण करून ठेवलेले आहे आणि तसे सांगूनही टाकले आहे. म्हणून तर वरूण गांधी ललित भेटीचा इन्कार करू शकलेला नाही. पण त्याच गौप्यस्फ़ोटासोबत ललित मोदीने आणखी एक गर्भित धमकी दिलेली आहे. चतुर वाचकाच्या ती लक्षात येऊ शकेल. कारण नेमके शब्द वाचले तर त्यात धमकावण्यासारखे काहीच नाही. पण ज्यांना एकूण ललित प्रकरणाची जाण आहे व आपण त्यात फ़सण्याची शक्यता कळते, त्यांना ललितच्या शब्दातील धमकी कळू शकते. एका बाजूला ललित मोदी वरूणच्या भेटीचे चित्रण केल्याचे म्हणतो आणि दुसरीकडे सोनियांच्या भगिनीशी व्यवहाराची बोलणी केल्याचेही सांगतो. याचा अर्थ ज्या कुणा भगिनीशी अशी चर्चा झाली, तिचे संभाषण वा चित्रणही आपल्याकडे आहे; असे तो संबंधितांना सुचवतो आहे. सहाजिकच ज्यांच्या मनात तशी पाल चुकचुकते आहे, त्यांच्यासाठी ललितने दिलेली ती धमकीच असू शकते. ती धमकी उमगल्यानेच पळापळ झाली आणि वाहिन्यांवर प्रामुख्याने ‘टाईम्स नाऊ’वर चालू असलेली ललित वादळातली हवा काढून घेतली गेली. आयपीएलच्या व्यवहारातील गफ़लती जाहिर करण्याची धमकी दिली, तर संशयास्पद रितीने सुनंदा पुष्कर या मंत्रीपत्नीचा मृत्यू झालेला आहे. यातून हे प्रकरण किती खोलवर रुतलेले आहे आणि त्यात किती भलेभले लोक गुंतलेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. मग ललितने सोनियांच्या नावाचा उल्लेख केल्यावर वादळ शांत होण्याची कारणे लक्षात यायला मदत होते. सगळ्या वाहिन्यांवर अशी स्मशान शांतता पसरली, की जणू ललित मोदी नावाची काही भानगडच नव्हती. एक मान्सुनचा ढग आला आणि नुसताच गडगडाट करून निघून गेला. सोनियांच्या भगिनीचा उल्लेख भारतीय वाहिन्यांना इतका भयभीत करीत असेल, तर या भगिनीची ओळख करून घेणे अगत्याचे नाही काय?
भाउ मस्त. तुम्हाला सलाम
ReplyDeleteअर्नब हा एक मुर्ख माणूस आहे... आपण जोराने बोललो कि ते सत्य होवू शकते हा ह्याचा समाज आहे... (निखिल) पण ह्याच कुळातला.
ReplyDeleteएक चुटकुला आठवला...
एकदा गंपू विनीत जैन ला फोन करतो, "हलो..मला तुम्ही anchor म्हणून घेणार का? त्या अर्नब सारखा?"
विनीत जैन, "तू मुर्ख आहेस का?"
गंपू, "हि पूर्व अट आहे का?"
जैन फोन ठेवून देतो...
नंतर गंपू, दर्डाला फोन करतो, ""हलो..मला तुम्ही anchor म्हणून घेणार का? त्या निखिल सारखा?"
दर्डा, "तू मुर्ख आहेस का?"
गंपू, "हि पूर्व अट आहे का?"
दर्डा विचार करतात...
next day...
Nikhil was out from ...
ह्याच अर्णब चा माज राज ठाकरेंनी मात्र मस्त उतरवला होता .
ReplyDeleteराज समोर अगदी शेळपटासारखी अवस्था झाली होती याची .
Apratim lekh
ReplyDeletePerfect interpretation of the last fact. I am now 100% sure of this same reason for stopping that turmoil.
ReplyDelete