Wednesday, July 1, 2015

सत्याचा शोध चालू आहे की शहाजोगपणा?



‘सर्वसाधारणपणे फ़क्त राजकारणी भ्रष्टाचारी असतो आणि इतर व्यवसाय तुलनेत अधिक पवित्र असतात असा अनेकांचा समज असतो. न्यायालये, वकील मंडळी, पत्रकार, लेखक-कवि-नाटककार, कलावंत, विचारवंत, नोकरशहा, उद्योगपती, लष्करी अधिकारी, असे समाजातील अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात.’... ‘सध्या तरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे की, जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले की, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत, असेही मानण्य़ाची प्रथा पडली आहे. "शोध पत्रकारिता" हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मापदंड निर्माण करू शकलेले नाहीत’

उपरोक्त प्रव़चन खुद्द नरेंद्र मोदी वा त्यांच्या कुणा भक्ताचे नाही. ते निरूपण मोदींवर कुठलाही बेछूट आरोप करण्याची प्रत्येक संधी शोधणार्‍या महान विचारवंताचे व जाणत्या संपादकाचे आहेत. मात्र त्यांनी हे निरूपण केले, तेव्हा नरेंद्र मोदींचा देशाच्या काय कुठल्याच राजकीय क्षितीजावर उदय झालेला नव्हता. अगदी गुजरातमध्येही मोदी साधी कुठल्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवलेले नेता नव्हते. तेव्हा पत्रकारिता भरकटू लागली आहे आणि तिच्या नादाला लागून समाजाचे अनेक मान्यवर घटकही शहाजोगपणा करीत कोणाही राजकारण्याचा हकनाक बळी घेत आहेत, असे नेमके विवेचन करणार्‍या या महानुभावाचे नाव कुमार केतकर असे आहे. १५ नोव्हेंबर १९९६ रोजी ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक म्हणून त्यांनी समस्त जगाला उद्देशून केलेला तो ‘हितोपदेश’ होता.

आजकालच्या वर्तमानपत्रे, पत्रकारिता वा माध्यमांनी जे रान उठवले आहे, त्याचे एकोणिस वर्षापुर्वी निदान करणारे कुमार केतकर किती ‘दूरदृष्टी’चे असतील त्याची थोडी कल्पना यावी, म्हणून त्यांच्याच शब्दातला हा उतारा इथे नमूद केला आहे. अर्थात जो ‘हितोपदेश’ पुढल्या काळात खुद्द केतकरांनी पाळला नाही आणि आपल्याच त्या उपदेशाला हरताळ फ़ासण्यात धन्यता मानली. मग त्यापासून अन्य माध्यमांनी शिकवण घ्यावी अशी अपेक्षा कोण करणार? पण ज्याप्रकारे विविध भाजपा नेते, मंत्र्यांवर सध्या आरोपाचा भडीमार चालू आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन राजिनामे मागितले जात आहेत, त्यामुळे आम्हाला केतकरांच्या या हितोपदेशाची आठवण झाली. मागल्या दोन दशकात क्रमाक्रमाने माध्यमांची विश्वासार्हता कशामुळे घसरत गेली, त्याचे हे निदान आहे. जितक्या टोकाला जाऊन बेछूट आरोपांची चिखलफ़ेक चालते, त्यातून कुठले प्रबोधन होऊ शकलेले नाही, की समाजातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकलेले नाही. कारण त्याचा उद्देशच मुळात प्रबोधन वा सुधारणांचा नाही. शिकारी हेतूने चाललेले हे शरसंधान आहे. त्यातून कुठले प्रबोधन होऊ शकेल? केतकरच म्हणतात, की गदारोळ उडवून द्यायचा आणि त्यासाठी कुठली संस्था वा व्यक्तीला लक्ष्य करायचे. लक्ष्य करणे आणि प्रबोधन यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. पण केतकर म्हणतात, त्याच्याही पुढे आता पत्रकारितेने झेप घेतली आहे. तेव्हा जामिन मिळाला नाही म्हणजे आरोप सिद्ध झालेत, असा समज पसरवून दिला जायचा. आता जामिनाची गोष्ट दूर, साधा कायदेशीर आरोप कोर्टात वा पोलिसात दाखल झाला नसला, तरी आरोप सिद्ध करण्यापर्यंत माध्यमांनी मजल मारली आहे. नुसता आरोप करायचा की तो सिद्ध झालाच इथपर्यंत आता मजल गेली आहे. न्यायालयाचीही आजच्या पत्रकारांना गरज वाटेनाशी झाली आहे. तेच न्यायाधीश झाल्यासारखे न्यायनिवाडा करू लागलेत.

अडवाणी यांच्या राजिनाम्याचा हवाला देणार्‍यांना तेव्हा निदान एफ़ आय आर दाखल झाल्याचे स्मरण आहे काय? न्यायासाठी साक्षीपुरावे लागतात आणि तेही कायद्यानुसार मान्य होणारे आवश्यक असतात, याचे तरी भान कुणाला उरले आहे काय? कोणीही उठावे आणि आरोप करावा, की लगेच संबंधिताला फ़ासावर चढवायला आजचे संपादक कटीबद्ध असल्यासारखे सज्ज असतात. थोडक्यात आता पत्रकारिता शहाजोगपणाच्याही पुढे जाऊन खुनी वा रक्तपिपासू होऊ लागली आहे. रक्ताला चटावलेले जनावर म्हणतात, त्यातली स्थिती येत चालली आहे. कुठलाही कागद फ़डफ़डवायचा आणि आपल्याकडे कागदपत्रे आहेत म्हणून समोरच्याला फ़ाशी फ़र्मवायची, अशी एकुण पत्रकारितेची अवस्था आहे. मात्र सुदैवाने सामान्य माणूस त्यात वहावलेला नाही. बहकलेला वा शेफ़ारलेला माणुस भरकटत जातो, म्हणून समाज त्याला दाद देत नाही, तशी आजची अवस्था आहे. एकामागून एक माध्यमांना आपल्या पायावर उभे रहाणे अशक्य होत चालले असून, कुणाच्या तरी काळ्या पैशाच्या खिरापतीवर आजची पत्रकारिता पातिव्रत्याचा वसा चालविते आहे. ज्या मालकाकडे उधळायला काळा पैसा आहे, त्याच्या जीवावर अशा सावित्र्या सत्यवानाचे सौभाग्य जपायचे आव आणत असतात. मग आपल्या अधिकाराला पाठींबा असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी समाजाच्या विविध मान्यवर घटकातील लोकांच्या साक्षी काढल्या जातात. केतकरांनी ज्या घटकांची नामावली वर दिलेली आहे, त्यातलेच नमूने आपण रोजच्या रोज वाहिन्यांच्या चर्चा व वादविवादात बघत असतो ना? कोण असतात ही माणसे? त्यांच्या शब्दाला प्रमाण मानण्याचे कारण काय? अन्य कुणाला दोषी ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? समाजातील किती लोकांची मान्यता अशा लोकांनी मिळवलेली असते? नुसता शहाजोगपणाच नाही काय?

मागल्या आठवड्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह लावून जो आटापिटा चालला होता, त्यात काही ‘तालेवार’ संपादक शिरा ताणून तावडे यांच्या पदवीची भिंगातून तपासणी करीत होते. त्यासारखा शहाजोगपणा जगाच्या पाठीवर सापडणार नाही. तावडे यांनी कधी आपल्य पदवीचे भांडवल करून इंजिनीयर म्हणून मिरवल्याचे कोणी बघितले नाही. पण तावडेंना ‘महिषा’सूर ठरवायला निघालेल्या त्याच ‘तालेवारां’ना आपल्या डोळ्यातला ‘मोती’बिंदू ज्या ‘डॉक्टर’मुळे बघायची शक्ती मिळाली, त्याची डॉक्टरेट कुठल्या विद्यापिठाची आहे, त्याचा तपास करायची दूर-बुद्धी कशाला होऊ नये? तावड्यांचे ‘आंबे’ चोखत बसलेल्यांना आपल्याच शिंपल्यातले ‘मोती’ कुठल्या विषयात प्रबंध लिहून डॉक्टर झाले, त्याचा शोधनिबंध लिहावासे कशाला वाटू नये? याला म्हणतात शहाजोगपणा. कालपरवाच ज्यांच्या पैसा व व्यवहारावर कायद्याची वक्रदृष्टी वळलेली आहे, त्यांच्या खिरापतीवर जगणार्‍यांनी इतरांचे पाप उघडे पाडण्याचा चंग बांधण्यात कुठली पत्रकारिता असते? मजेची गोष्ट म्हणजे असल्या ‘मोत’द्दाराच्या हाती आपलाही लगाम सोपवून तेच कुमार केतकर खिंकाळत उभे असतात. तेव्हा सामान्य माणसांनी काय समजावे? काळाच्या टापा दोन दशकापुर्वी ऐकू शकणारा इतका बुद्धीमंत व्यासंगी माणुसच शिंगे मोडून वासरात रमायला लागला, मग वैचारिक दिवाळखोरी अपरिहार्यच नाही काय? केतकरांना तरी आपलेच उपरोक्त एकोणिस वर्षापुर्वीचे शब्द आठवतात काय? स्मृतीभ्रंश व बुद्धीभ्रंश झालेल्यांना त्यांच्याच पुर्वायुष्यातील आठवणी वारंवार सांगाव्या लागतात. म्हणून हा उपदव्याप करावा लागतो. अन्यथा अशा लोकांना ‘माणसात’ आणण्याचा अन्य कुठला मार्ग नसतो ना? केतकरांचाच तेव्हाचा प्रश्न त्यांना विचारतो, ‘पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो कोण ठेवणार?’

2 comments:

  1. भाऊ, मस्त खिंडीत सापडवून चापटवले आहे.. जोरदार, सडेतोड प्रहार.. असल्या शूचितेच्या गप्पा ठोकणार्या भोंदू पत्रकारांना नाहीतरी तुमचाच चाबुक आवडतो म्हणा..!!

    ReplyDelete
  2. Great Bhau !!!

    Because of your articles people are getting a new dimension to look at politics.
    Thanks a lot Bhau !!
    .... Your well wisher :-)

    ReplyDelete