Thursday, July 2, 2015

‘ललित’ कला अकादमीचे नाटक



इथे देशात कॉग्रेसने बुडत्याला काडीचा आधार म्हणून सुषमा व वसुंधरा यांच्या राजिनाम्यासाठी ललित मोदी नावाची काडी घट्ट पकडून ठेवली असताना, तिकडे त्याच मोदींनी थेट कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर बॉम्बगोळाच टाकला आहे. आयपीएल या भारतातल्या पैशाचा खेळ असलेल्या क्रिकेट स्पर्धेतल्या आर्थिक घोटाळ्याचा आरोपी म्हणून मागली पाच वर्षे ललित मोदीच्या मागे शासकीय यंत्रणा लागलेली आहे. मात्र त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन कारवाई करण्याचे धाडस आधीच्या युपीए सरकारने केले नव्हते, की आजच्या एनडीए सरकारने केलेले नाही. मग हा इसम परदेशात कशासाठी दडी मारून बसला आहे? त्याच्यासह त्याच्याशी संबंध असलेल्यांवर इथे माध्यमातून भडीमार होत असताता, ललितने तिथे लंडनमध्ये बसून शरसंधान चालविले आहे. आता त्याने सोनिया गांधींनी आपल्याला आर्थिक घोटाळ्यातून सोडवण्याची ऑफ़र दिल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. पुतण्या व भाजपा खासदार वरूण गांधी याच्या मार्फ़त अशी ऑफ़र आपल्याला देण्यात आली होती, असा ललितचा आरोप आहे. त्याचा अर्थातच वरूण गांधी इन्कार करतील. पण त्यापुर्वीच ललितने त्या संभाषणाचे चित्रणही आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. म्हणजे इन्कार होऊन वा त्याविषयी शंका व्यक्त होईपर्यंत हा माणुस माध्यमांशी खेळ करणार आहे. पण त्याहीपेक्षा मोठा गंभीर आरोप त्याने सोनियांच्या थेट माहेरच्या नातलगांवर केला आहे. सोनियांच्या इटालीतील बहिणीला ३६० कोटी रुपये देण्याच्या बदल्यात आपल्याला सोनिया आर्थिक घोटाळ्यातून सोडवायला तयार होत्या, असा त्याचा दावा आहे. त्याचा कुठला पुरावा ललितने दिलेला नाही. पण तशी सूचक भाषा मात्र वापरलेली आहे. आपण वरूणच्या सल्ल्यानुसार सोनियांच्या भगिनीशी बोललो होतो, असाही तपशील ललितने ताज्या बातमीत जोडला आहे.

जो माणूस वरूण गांधी यांच्याशी झालेल्या ऑफ़रच्या संवादाचे चित्रण असल्याचा दावा करतो, त्याने सोनियांच्या भगिनीशी व्यवहाराची केलेली बातचित मुद्रित केलीच नसेल, अशी हमी कोणी देऊ शकतो काय? ज्याप्रकारचे मुद्दे व आरोप ललित प्रकरणातून समोर येत आहेत, त्याकडे बघितले, तर त्याची फ़ार मोठी पटकथा लिहूनच मग नाट्यप्रयोग सुरू झालेला असावा, अशी शंका येते. म्हणजे असे की आरंभी सुषमा स्वराज यांनी ललितला प्रवासी कागदपत्रे मिळण्यास मदत केली, म्हणून त्यांनी गुन्हा केल्याचा दावा होता. मग तसेच केलेले अनेकजण उघड झाले आणि त्यात नरेंद्र मोदींची कोंडी करायची संधी म्हणून कॉग्रेसने विनासायास उडी घेतली. की सोपी शिकार असे भासवून कॉग्रेसला या जाळ्यात ओढण्याचाच मुळ डाव होता. कारण आयपीएल हा देशातील क्रिकेटचा खेळ असण्यापेक्षा बेहिशोबी व काळ्यापैशाचा सर्वात मोठा जुगार होऊन बसला आहे. त्याच्या जाहिराती, तिकीटविक्री व उलाढालीतून अब्जावधी रुपयांना व्यवहार होत असतो. २००९ सालात इथे निवडणूकांमुळे आयपीएल स्पर्धेला संरक्षण देता येत नाही, असे गृहमंत्री चिदंबरम यांनी स्पष्ट केल्यावर, हाच ललित मोदी संपुर्ण स्पर्धाच दक्षिण आफ़्रिकेला घेऊन गेला होता. त्यातले काही सामने सोयीसाठी झिंबाब्वेमध्ये खेळले गेले. त्यातून त्या दिवाळखोर देशाच्या अर्थकारणाला काहीकाळ उभारी येऊ शकली. त्यांनी तर दरवर्षी तिथे आयपीएल भरवण्य़ाची मागणी केली होती. त्यातून ही स्पर्धा म्हणजे कशी अब्जावधी डॉलर्स व रुपयांची उलाढाल आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. त्याचा यशस्वी धंदा करून दाखवलेल्या ललित मोदीकडे किती बेहिशोबी पैसा असू शकेल? त्याला सोडवण्य़ासाठी ३६० कोटी मागितले जातात, मग हडपलेला काळापैसा किती? ही रक्कम व्हाईटमनी म्हणून नक्कीच मागितली जाऊ शकत नाही. मग त्याला इतकी वर्षे लंडनमध्ये सुखरूप कोणी राहू दिला?

सक्तवसुली संचालनालय त्याच्या मागावर होते, तर इंटरपोलशी संपर्क साधून त्याला भारतात आणायची कारवाई कशाला करत नव्हते? ३६० कोटीचा सौदा निकालात काढण्यापर्यंत कोणी त्या सरकारी खात्याला लगाम लावला होता काय? विरोधी नेता असताना सुषमांनी मदत केली, तर त्याबद्दल तेव्हाचे युपीए सरकार गप्प कशाला बसले होते? आणि खरेच इतके पैसे खेळायला असताना, ललितला भारतीय नेत्यांच्या शिफ़ारशीची गरज होती काय? गुलशनकुमार खुनाचा आरोप असलेला संगीतकार नदीम सैफ़ी किंवा बॉम्बस्फ़ोटातला आरोपी अबु सालेम ज्या देशात बिनधास्त वास्तव्य करू शकतात, तिथे ललितला सुषमा वा वसुंधराचे पाय धरायची गरज असते काय? ज्याप्रकारे अकस्मात मोदी सरकारच्या विरोधात हे प्रकरण सुषमा स्वराज यांना लक्ष्य करून पुढे आणले गेले, तोच एक सापळा होता की काय, अशी आता शंका येते. कारण त्यातले पुरावे अजिबात नवे नाहीत आणि त्यासाठी खुप आधी गौप्यस्फ़ोट करता आले असते. पण ते अशावेळी केलेत, की त्यात कोलित सापडले म्हणून कॉग्रेस पक्षाने उडी घ्यावी आणि पुढे धागेदोरे उलगडत गेले, की कॉग्रेसच्याच बड्या नेत्यांना गोवता यावे. स्पष्टच सांगायचे, तर मोदी सरकारनेच माध्यमांच्या हाती सुषमा व वसुंधरा यांच्यासंबंधी निरर्थक पुरावे देऊन ललित मोदी नावाचा ट्रोजन हॉर्स उभा केला असावा, अशी शंका येते. कारण सुषमा वा वसुंधरा यांच्या विरोधातले पुरावे कुठे कोर्टात सिद्ध होणारे नाहीत, की चौकशीत त्यांना फ़सवणारे नाहीत. पण ललित मोदीकरवी आता समोर येणार्‍या गोष्टी मागल्या दशकातील मोठमोठ्या काळापैशाच्या व्यवहाराचे पर्दाफ़ाश करणार्‍या असू शकतील. त्याची ही सुरूवात आहे काय? म्हणूनच त्यातला सोनियांच्या भगिनीचा उल्लेख अतिशय गंभीर बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याच बाबतीतले मौन, त्याच प्रतिक्षेतले असेल काय?

आयपीएल स्पर्धेत मॅच फ़िक्सींग व स्पॉट फ़िक्सींगचा आरोप झाल्यावर त्यात आपला जावई अडकला, तेव्हा श्रीनिवासन यांनी थेट शरद पवार यांच्यावर संशय घेतला होता. महाराष्ट्रातच तसा संशय घेऊन गुन्हा नोंदला गेला, त्यामागे राजकारण असल्याचा त्यांचा आरोप होता आणि राज्यात गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्याचा संदर्भ त्यांनी दिला होता. एकूणच इथले राजकारण, काळापैसा व बोगस धंदे हे आयपीएलशी जुळलेले आहेत. पुढे ललित मोदींना बाजूला केल्यावर त्याची सगळी सुत्रे राजीव शुक्ला या सोनियानिष्ठाकडे आलेली होती. आजही तशीच आहेत. ह्याचे सगळे संदर्भ संबंध सहजासहजी उलगडणारे नाहीत. सुनंदा पुष्कर यांनी संशयास्पद मृत्यूपुर्वी आपण आयपीएलची पापकर्मे जगासमोर उघडी करू, अशी धमकी दिल्याचेही जगजाहिर आहे. त्यांची गुंतवणूक असलेल्या कोची संघाच्या खरेदीविक्री संबंधाचा गदारोळ झाला आणि सुनंदाचे पति शशी थरूर यांना केंद्रिय मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. असे अनेक पदर ललित मोदीच्या शब्दांना आहेत. हातातले पत्ते व मुद्दे अतिशय चतुराईने हा इसम उलगडतो आहे. सुनंदाचा संशयास्पद मृत्यू आणि ललितला दाऊदकडून हत्येची असलेली धमकी, वेगवेगळ्या गोष्टी म्हणून बघता येणार्‍या नाहीत. अशा अनेक तुकड्यांची योग्य सांगड घातल्याशिवाय ललित मोदी प्रकरणाचे रहस्य उलगडू शकत नाही. सुषमाच्या पुतण्याला परदेशात कॉलेज प्रवेश वा वसुंधरा राजे यांच्या कुठल्या कंपनीतले शेअर्स, इतक्या क्षुल्लक गोष्टी यात सामावलेल्या नाहीत. ही एकूण खंडकाव्यातील किरकोळ उपकथानके आहेत असेच वाटते. जसजसे त्याचे पुढले पदर उलगडले जातील, तशी थक्क करून सोडणारी माहिती समोर येत जाईल. ‘ललित’ कला अकादमीचे हे रहस्यमय नाटक किती अंकाचे असेल आणि किती काळ रंगत जाईल, त्याचा इतक्या लौकर अंदाज बांधणे म्हणूनच अवघड आहे.

No comments:

Post a Comment