Friday, July 3, 2015

मुन्नाभाईच्या सर्किटसारखे पुरोगामीत्व



शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदवीचा व ती देणार्‍या ज्ञानेश्वर विद्यपिठाचा विषय अजून शिळा झालेला नाही, इतक्यात मदरश्यांचा मामला पटलावर आलेला आहे. पण अवघ्या आठवड्याभरात आपल्या बुद्धीमंतांची भाषा कशी कोलांट्या उड्या मारू लागली, ते फ़ार मनोरंजक चित्र आहे. आठवडाभर आधी कुठल्याही शिक्षण संस्थेची मान्यता व तिथे शिकवल्या जाणार्‍या विषयांचे महत्व निखालस महत्वाचे होते. पण मदरश्यांचा विषय निघाला आणि विनाविलंब शासकीय मान्यता वा तिथे शिकवले जाणारे विषय दुय्यम होऊन गेले. या मानसिकतेला आजकाल सेक्युलर म्हणून ओळखले जाते. कारण साधे सोपे सरळ आहे. ज्ञानेश्वर हे नाव हिंदू असावे आणि मदरसा हे इस्लाम विषयक नाव आहे. इस्लाम म्हटला की आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता, पुरोगामीत्व अशा शब्दाच्या व्याख्या व निकष क्षणात बदलून जातात. इस्लाम वा त्या धर्माच्या संबंधित कुठल्याही गोष्टीला कुठले नियम वा कायदे लागू होत नाहीत, अशी ठाम समजूत असलेल्या भूमिकेला पुरोगामी म्हणतात. तसे नसते तर तावडे प्रकरणात उफ़ाळून आलेले पुरोगामीत्व असे ‘पक्षाघात’ होऊन कशाला मरगळले असते? सर्वात प्रथम त्याच लोकांनी त्याच शिक्षणमंत्र्याला सवाल करायला हवा होता, की मदरशांचाच निकष ज्ञानेश्वर विद्यापिठाला कशाला लावत नाही? पण तसे विचारण्याची सोय नाही. कारण ते विद्यापिठ न्यायालयाचा आदेश आल्यावर विनाविलंब बंद झाले आहे आणि कुठल्याही कायद्याची मान्यता पात्रता नसताना मदरसे चालू आहेत. इतकेच नाही तर त्याला सरकारी अनुदानाची खिरापत सुद्धा दिली जात असते. ती खिरापत हवी असेल, तर शालेय पाठ्यक्रमातले अन्य विषयही शिकवायला हवेत, अशी सक्ती करण्याचा पवित्रा नव्या सरकारने घेतल्यावर पुर्गामीत्वाला धक्का बसला आहे. जणू इस्लाम म्हणजे पुरोगमीत्व अशी व्याख्या करावी, अशीच स्थिती नाही का?

मदरसा ही शालेय शिक्षण पद्धती नाही. तिथे धर्मशिक्षण दिले जाते. म्हणजे इस्लामची शिकवण, धर्मग्रंथाचे पठण हे तिथले अभ्यासक्रम आहेत. त्यातून उद्या मुलांच्या जीवनात रोजगार वा उद्योग करण्याची कुठलीही क्षमता निर्माण होऊ शकत नाही. मग मौलवी वा धर्ममार्तंड होण्याचा मार्ग शिल्लक उरतो. खरे तर अशा शिक्षणाला सरकारने कुठलीही मदत करता कामा नये. कारण तिथे जीवनोपयोगी कुठले शिक्षण दिले जात नाही. पण त्याचे समर्थन करायला तेच लोक पुढे उभे रहातात, जे डॉ. दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा झेंडा खांद्यावर मिरवून विज्ञानवादी व्हायचा आग्रह धरत असतात. मग अशा मदरश्यांमध्ये विज्ञान शिकवले जाते असा या पुरोगामींचा दावा आहे काय? इश्वराने काही वेळात अवघे विश्व निर्माण केले अशी धर्मग्रंथांची शिकवण आहे. त्याचेच पाठ घोकण्यात मुलांना जुंपले, तर त्यांच्यावर कुठले वैज्ञानिक संस्कार होतात? त्यासाठी सरकारने अनुदान द्यायला हवे आणि अन्य गणित, विज्ञान असे विषय शिकवण्याची सक्ती मदरश्यांवर करू नये, यासारखी पुरोगामी भूमिका दुसरी कुठली असू शकते? पण त्याबद्दल बोलायचे कोणी? मदरश्यांच्या जागी वेदपाठशाळेचा विषय असता, तर विनाविलंब हेच पुरोगामी अनुदानच देऊ नका आणि अशा शाळांवर बंदी घाला, म्हणून हिरीरीने पुढे सरसावले असते. ही आपल्या देशातील पुरोगामीत्वाची शोकांतिका होऊन बसली आहे. त्याचा अर्थ असे पुरोगामी मुस्लिमांचे पक्षपाती आहेत असेही मानायचे कारण नाही. त्यांना हिंदू, मुस्लिम वा ख्रिश्चनांच्या कुठल्याही भवितव्याशी काडीचे कर्तव्य नाही. त्यांचे पुरोगामीत्व द्वेषातून उदभवले आहे. संघ वा भाजपाचा द्वेष हे त्याचे उगमस्थान आहे. जे काही संघ वा भाजपा वा तत्सम लोक करतील, त्याच्या विरोधात बोलावे व वागावे याला आता पुरोगामीत्व म्हटले जाते. त्याचा हा परिपाक आहे.

मागल्या दोन तीन दशकात क्रमाक्रमाने पुरोगामी संबोधल्या जाणार्‍या पक्ष संघटना व चळवळी यांचे वर्तन त्याची साक्ष देईल. एक काळ असा होता, की समान नागरी कायदा हा विषय संघ वा भाजपावाले कधी बोलतही नसत. तेव्हा पुरोगामी चळवळी व पक्ष समान नागरी कायद्याची मागणी करीत आंदोलन चालवायचे. स्वर्गिय हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हा विषय रेटून त्यावर अखंड जनजागृती केलेली होती. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरणारे अनेक तरूण आजकाल विविध वाहिन्यांवर विचारवंत किंवा विश्लेषक म्हणून मिरवत असतात. त्यांचा उमेदीचा काळ समान नागरी कायद्याची मागणी करण्यात खर्ची पडलेला आहे. पण तेच लोक आज त्याच मागणीला जातियवादी वा प्रतिगामी ठरवण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालताना दिसतील. त्याचे कारण काय? तुमचीच मागणी भाजपाने वा संघाने उचलून धरली, मग प्रतिगामी कशी होऊ शकते? तुम्ही ज्याला पुरोगामी ठरवून लढत होता, त्यालाच आता प्रतिगामी म्हणून कशाला हिणवता? निकष काय अशा परिवर्तनाचा? पुर्वीच्या काळी अस्पृष्यता होती, तेव्हा दलिताचा स्पर्श झाला, मग एखादी गोष्ट विटाळली गेली असे म्हटले जाई. तशी ही पुरोगामी अस्पृष्य़ता आहे काय? संघाने वा भाजपाने स्पर्श केला मग पवित्र पुरोगामी मागणी विटाळली जाते, असा काही दावा आहे काय? असेल तर तेही स्पष्टपणे मांडायला काही हरकत नाही. नसेल तर याच पुरोगाम्यांनी संघाची पाठ थोपटून भाजपाला त्यात साथ द्यायला हवी ना? पण उलट ही सगळी मंडळी भाजपाने अनेक मुद्दे सोडावे असा आग्रह धरतात, त्यात समान नागरी कायदा असा एक मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे कुठलाही मुद्दा वा विषय पुरोगामी नसतो, तर संघाने स्पर्श करण्यावर पुरोगामी अथवा प्रतिगामी ठरवला जात असतो ना?

इथे आज मदरश्याचा विषयही तसाच आहे. कुठल्याही शाळेला वा संस्थेला सरकारची मान्यता असायला हवी असा आग्रह आहे. तिथल्या शिक्षणक्रमाला मान्यता हवीच. पण तसे भाजपा बोलला, तर गुन्हा असतो आणि पुरोगामीत्व विटाळले जाते. पण तोच मुद्दा वा आग्रह भाजपाच्या विरोधातला असेल, मग लगेच ती मागणी पुरोगामी होऊन जाते. चार वर्षे ललित मोदीला लंडनमध्ये सुखनैव युपीए सरकारने वास्तव्य करू दिले तर गुन्हा नसतो. त्याच्यावर कुठली कारवाई चार वर्षे केली नसली तरीही बिघडत नाही. पण भाजपाचे सरकार आल्यावर विनाविलंब त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. अन्यथा भाजपा सरकार गुन्हेगार असते. ललित मोदीला भारतातून निसटायची संधी देऊनही युपीए सरकार निर्दोष असते. आणि त्याला मायदेशी आणले जात नाही, हा मोदी सरकारचा गुन्हा असतो. हे कुठले निकष असतात? त्याला पुरोगामी निकष म्हणतात. पुर्वाश्रमीच्या ब्राह्मणांना शिव्याशाप देणारा हा पुरोगामी वर्ग, आजकाल त्याच पद्धतीने वर्तन करताना दिसेल. आम्ही सांगू तेच वेद आणि आम्ही सांगू तोच त्याचा अर्थ! कोणी त्याची चिकित्सा करू नये, की त्याबद्दल अडचणीचे प्रश्न विचारू नये. किंवा त्या मुन्नाभाई चित्रपटातल्या ‘सर्किट’सारखी पुरोगामी मानसिकता झालेली आहे. तो कोणाला तरी दम देतो ना? ‘भाईने बोला है, तो गांधीबाबाको वहीच बोलना पडेगा’. त्यापेक्षा आजचे मदरश्यांचे पुरोगामी समर्थन भिन्न आहे काय? कोणी एक पुरोगामी ढुढ्ढाचार्य संघावर वा भाजपावर आरोप करणार, की बाकीचे अंधश्रद्ध तितक्याच हिरीरीने त्या खुळेपणाचा आग्रह धरताना दिसतील. मदरश्यांच्या निमीत्ताने तो खुळेपणा पुन्हा एकदा समोर आला इतकेच. आजकाल पुरोगामीत्व हे ‘सर्किट’ गांधीगिरीच्या पातळीपर्यंत घसरत गेलेले आहे. त्यात विवेकाचा बळी पडला आहे आणि टोकाचा मुर्खपणा अगदी निष्ठेने पार पाडला जात असतो.

1 comment:

  1. "ज्ञानेश्वर विद्यापीठाची मान्यता अवैध व मदरशांतील शिक्षणाची मान्यता वैध" तुम्हीच हा विरोधाभास अधोरेखीत केलात हे एक बंर झाल. म्हणजे सोनाराने कान टोचलेले बरे.

    ReplyDelete