Friday, July 17, 2015

नारायण मुर्ती? काय वाटेल ते बरळताय?भारतात माहिती तंत्रज्ञान उद्योगाची क्रांती घडवून आणणारे म्हणून नारायण मुर्ती यांची ओळख आहे. त्यांना लोक खुप मानही देतात. त्यांचे शब्द गंभीरपणे ऐकून घेतले जातात आणि त्याचा उहापोह सुद्धा होत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती अशा स्तरावर जाऊन पोहोचते, तेव्हा त्याने अतिशय मोजूनमापून शब्द वापरावेत अशीही अपेक्षा असते. पण अलिकडे आपल्या देशातील अनेकांना त्याचे भान राहिलेले नसावे. कदाचित मागल्या दोन दशकात प्रसार माध्यमांचे जे पेव फ़ुटले, त्यामुळे पत्रकार व माध्यमांचे पोटपाणी आपल्या बेताल बोलण्य़ावर अवलंबून असल्याची चिंता अनेकांना ग्रासू लागलेली आहे. त्यातून मग जमेल तितके जास्त बोलावे आणि त्यासाठी विचारही करू नये, अशा सवयी थोरामोठ्यांना जडत गेल्या असाव्यात, अशी शंका येते. अन्यथा अमर्त्य सेन, अनंतमुर्ती, गिरीश कर्नाड इत्यादिकांना सतत कुठल्यातरी वादग्रस्त विधानाचे जनन करण्याची कशाला गरज पडली असती? एका बाजूला अशी विधाने समोर येत असतात आणि दुसर्‍या बाजूला सोशल माध्यमात कुणालाही आपले बहुमोल मतप्रदर्शन करण्याची सोपी सोय उपलब्ध झाल्याने, प्रत्येक दिवशी प्रत्येक बातमी, घटना वा विधान वादग्रस्त ठरू लागले, तर आश्चर्य कसले करायचे? नारायण मुर्ती यांचे ताजे विधान मग तसेच भरडले जायला पर्याय शिल्लक उरतो काय? ते काय बोलले व त्यामागचा हेतू काय, याची फ़िकीर कोणी कशाला करावी? त्यामागचा मुद्दा तरी कोण कशाला तपासून बघणार? आपल्याला पटणारे आवडणारे बोलला नाही, की त्याची खांडोळी करायला सोशल माध्यमातील मंडळी हातात धारदार शस्त्रास्त्रे परजून कायम सज्ज असतातच. बिचारे नारायण मुर्ती त्यातच फ़सले आहेत. त्यांचे दुखणे खरे असले, तरी त्यांच मूळ विधान अर्धवटपणे माध्यमातून झळकले आणि लाखो लोकांनी सोशल माध्यमात अक्षरश: त्याची खांडोळीच केली.

मागल्या अर्धशतकात भारतात कुठले मूलभूत संशोधन झाले नाही, हे मुर्तींचे दुखणे रास्त आहे. ज्या काळात संशोधन विस्तारले व तंत्रज्ञान जगाला कवेत घेत गेले, त्याच काळात सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने जगाला काय दिले, असा मुर्ती यांचा सवाल रास्त आहे. पण तो सवाल त्यांनी कोणाला केला आहे? सरकार, राज्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार की देशाचे धोरणकर्ते व राजकारणी? कोणाला हा सवाल केला आहे? की सामान्यपणे शिक्षण घेऊन आपले व्यक्तीगत आयुष्य उर्जितावस्थेला आणायला धडपडणार्‍या तरूण पिढीला त्यांनी हा सवाल केला आहे? की ज्या उद्योगांनी मागल्या दोन दशकात जगाला गवसणी घालण्याचा पराक्रम केला, अशा भारतीय उद्योग व्यापार जगताला मुर्तींनी हे खडे बोल ऐकवले आहेत? मुर्तींचे विधान चुकीचे नाही, पण ते कोणाला उद्देशून उच्चारले आहे, त्याचा कुठलाही संदर्भ बातम्यातून मिळाला नाही. मग प्रत्येकाला त्यात आपला हेतू साधून घेण्याची संधी सापडली. कोणी जुन्या सरकार वा कुणी आजच्या राज्यकर्त्यांवर तोफ़ा डागून घेतल्या. तर ज्यांना आपल्या भारतीय मानसिकतेचा कायमस्वरूपी न्युनगंड सतावत असतो, त्यांना लगेच इथल्या अंधश्रद्धा व धर्मश्रद्धांवर टिप्पणी करायला हत्यार सापडले. कोणी खुद्द मुर्तींनाच जाब विचारण्यापर्यंत मजल मारली. याच विधानाला जोडून मुर्तींनी एम. आय. टी. या अमेरिकन शिक्षण संस्थेचा उल्लेख केला. तिथल्या विद्यार्थ्यांना नेहमी अज्ञाताचा वेध घेण्याचे आकर्षण राहिले आहे आणि त्यांनीच कशा नवनव्या अविष्काराने जगाला मानवजातीला संमृद्ध केल्याचाही दाखला मुर्तींनी त्याचवेळी दिला. तो संदर्भ अतिशय मोलाचा आहे. अमेरिकेतील अशा संस्था नुसते पोपटपंची करणारे शिक्षण देत नाहीत, तर विद्यार्थी व मुलांमधली प्रज्ञा व प्रतिभेला नवी क्षितीजे ढुंढाळायला प्रवृत्त करतात, ही बाब महत्वाची आहे.

अशा जगभर नामवंत असलेल्या अमेरिकन वा पाश्चात्य शिक्षणसंस्था सरकारी अनुदानाला लाचार नसतात किंवा त्यासाठी सरकारी इशार्‍यावर आपापले अभ्यासक्रम बनवत नसतात. त्यांच्यापाशी इतके प्रचंड निधी उपलब्ध आहेत, की त्यांना तिथल्या सरकारी मान्यतेचीही गरज भासलेली नाही. सरकारच्या कुठल्याही मान्यता नाकारून या शिक्षणसंस्थांनी आपली ख्याती निर्माण केलेली आहे. पुढल्या काळात सरकारलाच लाचारी म्हणून आपली मान्यता अशा संस्थांना द्यावी लागलेली दिसेल. शिक्षणमहर्षी म्हणून अवघे आयुष्य त्याच हेतूला वाहून टाकलेल्यांनी या संस्था सुरू केल्या व उभ्या केल्या. त्यांना त्यासाठी लागेल तेवढा निधी पुरवणारे उद्योगपती व व्यापारीही तिथे जन्माला आले. त्यांनी त्यातून नफ़ा मिळवण्याची अपेक्षा न बाळगता अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक अशा अज्ञात वाटेने निघालेल्या विद्यार्थ्यामध्ये केली. त्याच्या परिणामी तसे ‘माथेफ़िरू’ संशोधक अविष्काराचे चमत्कार घडवू शकले. त्याचाच लाभ ऊठवित अब्जावधी रुपये कमावणार्‍या नारायण मुर्ती, अजीम प्रेमजी. मुकेश अंबानी वा कुणा बिर्लाने भारतात अशा ‘माथेफ़िरूं’चा शोध घेऊन त्यांच्यासाठी विद्यापिठे कशाला उभारली नाहीत? निव्वळ पदव्यांची प्रमाणपत्रे छापणार्‍या राजकीय शिक्षणमहर्षींना भारताचे शिक्षणक्षेत्र बळकावण्य़ाची मोकळीक कोणी दिली? त्यांच्याच विद्यापिठातून पदवी नावाचे कागद घेऊन येणार्‍यांना भरपूर पगाराची मोठमोठी पॅकेज देवून सन्मानित कोणी केले? मुर्तींच्याच इन्फ़ोसिस वा तत्सम कंपनीनेच ना? त्यापेक्षा अशा हुशार बुद्धीमान मुलांना करोडो रुपये देऊन त्यांच्यातल्या प्रतिभेला अज्ञाताच्या वाटेवरचे वाटसरू बनवण्यासाठी थोडीशी पदरमोड मुर्तींसारख्यांनी कशाला केली नाही? त्यासाठी सरकारने काही करावे म्हणून राज्यकर्त्यांकडे शिक्षणातले जाणकार बघत बसले, तसेच मुर्तीही आशाळभूतच राहिले ना?

मग जो सवाल आज मुर्ती विचारत आहेत, तो त्यांनी आरशापुढे उभे राहून स्वत:लाच विचारावा. ज्या देशात धोनी, तेंडूलकर वा विराट कोहली यांना सोबत घेऊन खाजगी क्रिकेट संघ उभे करणारे उद्योगपती आहेत आणि त्यांचीच मनोरंजक स्पर्धा भरवणारे शरद पवारांसारखे राजकीय धुरीण आहेत, त्या देशात अज्ञाताच्या वाटेवर कशाला कोणी जाणार? आणि त्या वाटेनेन निघालेच नाही, तर कुठली अदभूत गोष्ट आम्हा भारतीयांना सापडणारच कशी? त्यात पैसे गुंतवायला कोणाला हौस आहे? सरकारी पैशावर पुख्खा झोडणारे आमचे प्रतिभावंत मागल्या दहाबारा वर्षात जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचू शकणारी कुठली गोष्ट निर्माण करू शकले, असाही गर्भित सवाल त्यात आहे. त्याचे मात्र नवल वाटले. कारण याच कालावधीमध्ये भारतात देशीविदेशी करोडो रुपये सेक्युलर संशोधनावर खर्च झाले आणि त्यातून नरेंद्र मोदी नावाच्या सैतानाने गुजरातमध्ये मोठी कत्तल घडवल्याचा मोठा ऐतिहासिक शोध जगभर पोहोचवला ना? म्हणून जगातल्या अनेक देशांनी मोदींना प्रवेशही नाकारला होताच ना? आमचे किती अभ्यासक, जाणकार व शिक्षणतज्ञ अमेरिकेच्या विद्यापिठात मोदींना तिथे येऊ देवू नये, म्हणून आपली बुद्धी पणाला लावत होते? याचा थांगपत्ता मुर्तींना अजून लागलेला नसेल, तर त्यांना भारतीय शिक्षणक्षेत्राची कितीशी जाण आहे, याबद्दल शंका येते. रा. स्व. संघाची तुलना अलकायदाशी करावी, हे संशोधनात्मक ज्ञान जगभरच्या बुद्धीमंतांना कुठल्या जाणत्यांनी पुरवले? त्यासाठी अहोरात्र संशोधन कोणी केले? फ़ोर्ड व रॉकफ़ेलर फ़ौडेशनच्या बहुमोल विदेशी निधीतून हे संशोधन भारतात चालू होते, याची जाणिव असती तर नारायण मुर्तींनी असा सवालच मूळात केला नसता. आजच्या माध्यमे व भारतीय बुद्धीमत्तेशी मुर्तींचा संपर्क दिर्घकाळ तुटलेला असावा. भारतात रहाता ना तुम्ही नारायण मुर्ती? मग काय वाटेल ते बरळताय?

4 comments:

 1. Bhau mazya baryach prashnanchi uttare milali

  ReplyDelete
 2. mediasavy विचारवंत आपलं अर्धमुर्ध आणि अस्वाभाविक मत असुनही त्याला कशी हवा देतात!!
  nice bhau!! :-D

  ReplyDelete
 3. बरोबर, भारतात राहता ना, मग आपल्याच चुका दाखवून देऊ नये. आपण कुठेही कमी पडत असलो तरी अस बाहेर बोलू नये.

  ReplyDelete
 4. You included Birla in your list. Hence would like to say that they attempted by creating BITS.

  ReplyDelete