Sunday, July 26, 2015

पुरोगामीत्वाचा बळी याकुब मेमनयाकुब मेमनच्या फ़ाशीला पहिला विरोध हैद्राबादचे असाद्दीन ओवायसी यांनी केला होता. त्यावरून काहुर माजले होते. त्यानंतर सलमान खान याने तसे ट्वीट केले आणि त्याच्या विरोधात झोड उठली. तोपर्यंत हा मामला अशा ‘नगण्य’ मानल्या जाणार्‍या ‘अप्रतिष्ठीतां’पुरता मर्यादित होता. पण या दोघांच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रिया बघून मग बहुतांश सेक्युलरांना जाग आली. त्यांचे पुरोगामीत्व अकस्मात कुंभकर्णी झोपेतून खडबडून जागे झाले. कारण त्यांच्या पुरोगामीत्वाला हिंदूत्वाची झणझणित फ़ोडणी आवश्यक असते. मागली दोन दशके चालू असलेल्या मुंबई बॉम्बफ़ोट खटल्याच्या कालखंडात कधीही यापैकी एकानेही याकुब मेमन वा अन्य कुणाचे समर्थन केले नव्हते. याकुब भारतीय पोलिस यंत्रणेच्या तावडीत सापडला त्यालाही आता वीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण तेव्हाही कोणी त्याची ‘वकिली’ करायला पुढे आलेला नव्हता. कारण एकूणच भारतीयांच्या मते याकुब शेकडो निरपराधांच्या हत्याकांडातला एक प्रमुख आरोपी होता. सहाजिकच त्याच्या बचावाला जाण्यात कुठले पुरोगामीत्व असणार? कारण याकुब वा अन्य आरोपींवर गुन्हेगारी आरोप होते आणि फ़क्त हिंदूत्ववादीच नव्हे, सर्वच त्याच्या विरोधात बोलत होते. त्याच्यावरच खटला दिर्घकाळ चालला आणि वेळोवेळी त्याच याकुबने आपल्यावर अन्याय होत असल्याचा टाहो फ़ोडला होता. पण कुणा तथाकथित पुरोगाम्याने याकुबच्या टाहोला प्रतिसाद दिल्याचे कोणाला आठवते काय? न्यायालयातही त्याने थैमान घातले होते आणि न्यायाधीशासह कोणावरही बेताल आरोप केलेले होते. पण आजच्या सह्याजीरावांपैकी एकानेही याकुबच्या यातना-वेदनांची दखल घेऊन एक शब्द उच्चारला नव्हता. अगदी त्याला टाडा कोर्टात फ़ाशी झाली, तेव्हाही यातल्या कुणी साधे दु:ख व्यक्त करायला चार शब्द खर्ची घातले नव्हते. मग आजच अशा तमाम प्रतिष्ठीत मान्यवरांना याकुबचा पुळका कशाला यावा?

काहीतरी कारण असेल ना? खरेच त्यांना याकुबचा पुळका असता तर त्यांना असे निवेदन काढायला इतका आणखी आठवडाभर उशीर व्हायचे काही कारण नव्हते. ज्या दिवशी फ़ाशीची तारीख घोषित झाली, त्याच दिवशी ओवायसीच्या सुरात सुर मिसळून त्यांनीही याकुबवर अन्याय होत असल्याचा गळा काढायला हवा होता. पण त्यापैकी काही झाले नाही आणि सुप्रिम कोर्टात याकुबची अखेरची याचिका निकालात निघेपर्यंत यापैकी कोणी याकुबकडे ढुंकून बघायला तयार नव्हते. किंवा त्यांना तशी सवडही मिळू शकली नाही. ती याचिका फ़ेटाळली गेली तरीही हे तमाम मान्यवर गप्प व अनभिज्ञ होते. मात्र ओवायसी वा नंतर सलमान खानच्या वक्तव्यावर तथाकथित हिंदूत्ववाद्यांना चेव आला आणि पुरोगाम्यांची झोपमोड झाली. त्यांना अकस्मात जाग आली, की ज्याअर्थी हिंदूत्ववाद्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत, त्याअर्थी घडणारी घटना नक्की प्रतिगामी असली पाहिजे. पर्यायाने त्यांना हस्तक्षेप करणे भाग पडले. कारण आजकाल पुरोगामीत्वाचा अजेंडा प्रतिगामी ठरवत असतात. पुरोगाम्यांना जे कोणी प्रतिगामी वाटतात, त्यांनी एखादी कृती केली, मग त्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकणे, इतके पुरोगामीत्व शिल्लक राहिले आहे. जर हे प्रतिगामी गप्प बसले मग पुरोगामी लोकही शांत चित्ताने झोपा काढतात. इथेही काही भिन्न घडलेले नाही. याकुबला फ़ाशी ठोठावली जाऊन काही वर्षे उलटलेली आहेत. त्यावर अनेक अपिले झाली आणि अखेरीस त्यावर सुप्रिम कोर्टानेही शिक्कामोर्तब केलेले आहे. पण ती नुसती न्यायप्रक्रिया होती. त्यात कुठे हिंदुत्ववादी नव्हते की तथाकथित प्रतिगामीही नव्हते. मग त्यात पुरोगाम्यांचे काय काम? पुरोगाम्यांना याकुबकडे ढुंकून बघण्याची गरज तरी होती काय? तो कुढत मरत होता. टाहो फ़ोडत होता. त्याचे वकील प्रत्येक कोर्टाचे दार ठोठावत होते. पण कुणा पुरोगाम्याने त्याकडे वळून तरी बघितले काय?

सर्व मार्ग संपले आणि याकुबची फ़ाशी निश्चीत झाली. तेव्हा राज्य सरकारवर ते काम पुर्ण करायची जबाबदारी आली. सरकारने त्यासाठी तारीख नक्की करून सज्जता सुरू केली. तरीही पुरोगामी निवांत निद्रेत होते. मात्र ओवायसी व सलमान खान यांनी सर्व गडबड केली. त्यांच्या विधानांनी प्रतिगामी हिंदूत्ववादी चवताळले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यावर पुरोगामीत्वाला आव्हान उभे राहिले. यातली याकुबची फ़ाशी दुय्यम बाब आहे. त्याच्याशी एकाही पुरोगामी सह्याजीरावाला सोयरसुतक नाही. याकुब जगला काय आणि मेला काय? एकाही पुरोगाम्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. पण त्यातून प्रतिगामी आनंदित होत असतील, तर दु:खाचा तमाशा मांडणे पुरोगामी लोकांचे कर्तव्य होत नाही काय? थोडक्यात सलमान वा ओवायसीच्या बकवास करण्यावर हिंदूत्ववादी गप्प बसले असते, तर यातला एकही सह्याजीराव याकुब वा त्याच्या फ़ाशीबद्दल अवाक्षर बोलला नसता. किंबहुना याकुब मेमन नावाचा कोणी होता वा फ़ाशी गेला, याचीही खबर त्यांना लागली नसती. सगळा मुर्खपणा त्या हिंदूत्ववाद्यांचा आहे. त्यांच्या उतावळेपणाने कुंभकर्णाची झोप काढणार्‍या पुरोगाम्यांची झोपमोड झाली. धावपळ सुरू झाली आणि मान्यवर लोकांची यादी बनवण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात मग नेहमीचेच कलाकार सहभागी होत गेले. एक लांबलचक यादी राष्ट्रपतींना पाठवण्यात आली. यातल्या कुणाला मुंबई स्फ़ोटात प्राण गमावणारीही माणसे होती आणि त्यांना कुठल्याही सुनावणीशिवाय ठार मारले गेले, याच्याशी कर्तव्य नाही. पण त्यासाठी त्यांना दोष द्यायचेही कारण नाही. कारण आता ज्या याकुबसाठी त्यांनी आक्रोशाचे नाटक चालविले आहे, त्याच्याही मरण्याशी यांना कर्तव्य नाही. त्यांना कर्तव्य आहे ते प्रतिगामी हिंदूत्ववाद्यांचा मुखभंग करण्याशी. त्याची एक संधी याकुबने त्यांना दिली, यापेक्षा त्यांना याही प्रकरणात किंचीत आस्था नाही.

इथे मग ‘बिचार्‍या’ याकुब मेमनची दया येते. कारण त्याची फ़ाशी वा त्याचे मरण हे त्याच्या पापासाठी असेलही. पण पुरोगामी लोकांनी त्याच्या मरणाचाही धंदा बनवला आहे. जीवानिशी जायचा आहे याकुब, पण पुरोगाम्यांनी आपल्या राजकीय अजेंडासाठी त्याच्या मरणातही संधी शोधली आहे. दाखवायला हे सर्व लोक याकुबला वाचवायला पुढे सरसावले असेच कोणालाही दिसते आहे. पण वास्तव तसे अजिबात नाही. याकुबचा गळफ़ास आपल्या राजकीय विरोधकांना चिमटे काढण्यासाठी वापरण्याचा हिडीस हेतू त्यातून साधला जात आहे. याकुबच्या गळ्यातला फ़ास आवळणाराही जितका कृर नसेल आणि शेकडो निरपराधांचे हकनाक जीव घेणारा याकुब जितका क्रुरकर्मा म्हणता येणार नाही; इतके हे राक्षसी क्रौर्य आहे. दुसर्‍याच्या मुडद्यावर आपले राजकीय हेतू साधून घेण्याची ही मानसिकता घातपात्यांपेक्षा भयंकर आहे. अन्यथा याच लोकांनी याकुबला फ़ाशी झाली, तेव्हा किंवा राष्ट्रपतींकडे त्याचा दयेचा अर्ज पडून होता, तेव्हा असे निवेदन काढले असते. याकुबला फ़ाशीपासून वाचवायची तीच खरी वेळ होती. पण त्या प्रत्येक वेळी यापैकी कोणीही काहीही केले नाही. याकुब नावाच्या माणसाविषयी कुठली माहितीही त्यांनी कधी घेतली नाही किंवा त्याच्या खटल्याचे कामकाज विचारले नाही. मात्र आज प्रतिगामी वा हिंदूत्ववाद्यांना डिवचण्याची संधी म्हणून हे लोक याकुबच्या गळ्यातल्या फ़ासाशी खेळायला सिद्ध झाले आहेत. दुसर्‍या कुणाच्या जीवन मरणातून आपल्या राजकीय संधी शोधणारे कसाब वा याकुबपेक्षा भयंकर नाहीत काय? कारण याकुब वा अफ़जल गुरू लोकांच्या मनात एक गुन्हेगार म्हणून बदनाम झालेला असतो. आणि त्यांच्यापेक्षा राक्षसी कृत्य करणारे असे सह्याजीराव मात्र समाजात उजळमाथ्याने वावरत व मिरवत असतात. याकुबवर गुन्हा दाखल करता येतो, खटला भरता येतो, आणि त्यापेक्षा भयंकर राक्षस असूनही अशा प्रतिष्ठीतांना कायदा काहीही करू शकत नाही.

6 comments:

 1. आता हे तथाकथित पुरोगामी लोक याकुबच्या समर्थनार्थ उतरले आहेत. हा न्यायव्यवस्थेवरील अविश्वास नाही का ?

  ReplyDelete
 2. याकूबचे समर्थन म्हणजे न्यायव्यवस्थेवरील अविश्वासच नाही का ?
  फुर्रोगामी हे आजकखल निव्वळ प्रतिक्रियावादी बनत चाललेत..

  ReplyDelete
 3. यांच्या सेक्यु बडबडण्याला कवडीची किंमत नाही

  ReplyDelete
 4. नेहमीपेक्षा गतिमान सरकार आल्यापासून देशविरोधी लोकांनीही उपद्व्याप वाढवलेत. नागरिकांनी अधिक जागृत राहणे म्हणूनच आवश्यक. आपल्यासारखेच आणखी पहारेकरी हवेच आहेत आणि प्रत्येक नागरिक तसा बनूही शकतो. धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 5. अत्यंत retaining कपटखोड्या काढणारे निष्प्रभ पण कुरापतखोर पुरोगांडु!

  ReplyDelete
 6. ज्यांनी सह्या केल्या त्यांच्या वर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा....

  ReplyDelete