Monday, January 4, 2016

बलात्कार्‍याशी दोस्ती करावी?



एक गोष्ट मान्य करावीच लागेल, की भारतात कुठल्याही क्षेत्रातले जाणकार व विशेषज्ञ प्रचंड संख्येने आहेत. अर्थकारण, राजकारण असो किंवा समाजकारण वा सुरक्षेचा विषय असो, प्रत्येक बाबतीतले हजारो जाणकार भारतात पैशाला पासरी उपलब्ध आहेत. दुर्दैवाची गोष्ट इतकीच, की त्यांच्या गुणवत्तेची या देशात कदर होत नाही. म्हणजे अर्थातच सरकारला वा सत्ताधार्‍यांना त्यांची पात्रता ओळखता आलेली नाही, असे वाटू शकेल. पण तेही खरे नाही. तुमची पात्रता इतरांनी ओळखून तुम्हाला तशी संधी देणे नंतरची गोष्ट असते. निदान तुम्हाला तरी आपल्यातली गुणवत्ता व पात्रता ओळखता यायला हवी ना? तसे असते, तर राजकीय वक्ता प्रवक्ता होण्यासाठी रत्नाकर महाजन वा कुमार सप्तर्षी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर कशाला झाले असते? पण आपल्यात ठासून भरलेली राज्यशास्त्राची पात्रता न ओळखताच ते डॉक्टर व्हायला गेले आणि उर्वरीत आयुष्यात राजकीय पोस्टमार्टेम करीत राहिलेत. बहूतेक क्षेत्रात हीच शोकांतिका दिसेल. म्हणूनच ही भारतीय समाजाची शोकांतिका आहे. अन्यथा जब्बार पटेल वा श्रीराम लागू अभिनेते कलावंत कशाला झाले असते? कुमार केतकर संपादक होऊन खर्डेघाशी कशाला करीत बसले असते? त्यांच्या जागी मोदी, जेटली, पर्रीकर किंवा अन्थोनी असे लोक देशाची सत्तासुत्रे कशाला संभाळत बसले असते? कुणा गावातील वा गल्लीतील शरद पवार किंवा निलंगेकरांना निवडणूका लढवण्याची वेळ कशाला आली असती? कुणा अजित डोवाल किंवा व्ही. के. सिंग अशा लोकांना सुरक्षेचे खास प्रशिक्षण घेऊन देशाच्या सुरक्षेचा गोंधळ घालण्याची संधी कशाला मिळू शकली असती? सचिन तेंडुलकर वा विराट कोहलीला क्रिकेट तरी कशाला खेळावे लागले असते ना? मोक्याच्या जागी असे चुकणारे बसलेत आणि ज्यांच्यात खरी पात्रता आहे, ते चुकचुकत बाहेर बसलेत. ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका झालेली आहे.

मुंबईवरचा हल्ला किंवा पठाणकोटचा हल्ला झाल्यावरच्या प्रतिक्रिया बघितल्या, मग याचे खुप वैषम्य वाटते. भारतात गुणांची काही किंमत नाही. गुणीजनांना असे कोपर्‍यात ठेवून भारताला प्रगती करणे कसे शक्य आहे? दोनतीन दिवस वाहिन्यांवरील चर्चा आरोप-प्रत्यारोप ऐकले, त्याचा यापेक्षा अधिक काही अर्थ होऊ शकत नाही. अर्णब गोस्वामी वा कुणा संपादक पत्रकाराकडे देशाच्या सुरक्षेची सुत्रे असती, तर पाकिस्तानला वा जिहादींना भारताकडे वाकडी नजरही करायची हिंमत झाली नसती, याची खात्री पटून जाते. कुठल्या परिस्थितीत काय करावे आणि ज्यांनी काही केले ते नेमके कसे चुकले, याचे तपशील आपल्या पत्रकार व जाणकारांकडे सापडू शकतात. परराष्ट्र धोरण कसे असावे आणि त्यात कधी ठामपणा व कुठे लवचिकता असावी, हे सरकारला कधीच कळत नाही. पण सोशल मीडियापासून वाहिन्यांपर्यंत सर्वांना नेमके ठाऊक असते. मात्र ते काम करायला आपणच पुढाकार करायची बुद्धी अशा गुणवंतांना कधीच होत नाही. खरे तर देशाचे सुरक्षा व परराष्ट्र धोरण ठरवायचा अधिकार सरकारकडून काढून घेतला पाहिजे. ते धोरण वाहिन्यांच्या चर्चेतून वा वादावादीतून ठरवले गेले पाहिजे. त्यात पाकिस्तान व अन्य देशातले माजी अधिकारी व नेत्यांना समाविष्ट करून ठरवावे. तो मसूदा आपल्याकडे सोपवला जाईपर्यंत सरकारने हातावर हात ठेवून बसावे. किती छान कारभार होऊ शकेल ना? बंदुकीची एक गोळी सुद्धा झाडावी लागणार नाही, की सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी अब्जावधी रुपयेही खर्चावे लागणार नाहीत. देशात कुठे बलात्कार होणार नाहीत की कुठल्याही कोर्टात कुणाला न्यायासाठी दाद मागावी लागणार नाही. सामान्य भारतीय नागरिकांनी याचा विचार आता गंभीरपणे करण्याची गरज आहे. जाणते, प्रशिक्षित आणि राजकीय नेत्यांना नारळ देवून माध्यमातून झळकणार्‍यांना देशाची सुत्रे सोपवावीत.

इतके झाले, मग आपल्याला निश्चींत मनाने झोपता येईल. म्हणजे डोळे झाकून प्रश्न सुटले असे समजायला हरकत नाही. सैनिक व सेनाच शिल्लक उरणार नाही, तर सैनिकांची हत्या होऊन त्यांना शहीद व्हायची तरी वेळ कशाला येईल? भारताने शेजारी व शत्रू देशांचा विश्वास संपादन केला आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, म्हणजे भारताला सुरक्षा दलांची गरजही उरणार नाही. आक्रमणाचीच शक्यता राहाणार नाही, मग लढाईचा तरी प्रसंग कशाल येईल ना? पर्यायाने सैन्य शस्त्रास्त्रे वा दारूगोळाही अनावश्यक खर्च होऊन जाईल. बरखा दत्त, मणिशंकर अय्यर, दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी त्यासाठी किती अखंड झटत असतात ना? त्यालाच नेहरूवाद म्हणतात. जिथे युद्ध शत्रूत्व यांना स्थान नसते. सैन्याची गरज नसते. पाकने आपल्याशी क्रिकेट खेळावे आणि भारतात पाकिस्तानी गायकांनी मैफ़ली रंगवाव्यात. अधूनमधून कंटाळा आल्यावर तिथल्या जिहादींनी इथे काही माणसे घातपात करून मारावीत. आपल्याकडे मरायला माणसांची संख्या कुठे कमी आहे? वर्षभरात एकदिड लाख माणसे अशी मारली गेली, म्हणून किती फ़रक पडतो? सव्वाशे कोटी माणसे टिपून मारायला जिहादींच्या कित्येक पिढ्या खर्ची पडतील. तरीही भारताची लोकसंख्या संपवणे त्यांना शक्य होणार नाही. मारून संपणार नाही, इतकी प्रचंड लोकसंख्या हे आपले सर्वात मोठे हत्यार आहे आणि तेच तर नेहरूवादी पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपल्याला नसती हिंसेची व लढाईची खुमखुमी असते, म्हणून हा सैन्य व सुरक्षा खर्चाचा बोजा उचलावा लागतो. नेहरूंच्या एकट्याच्या हाती असते तर त्यांनी तेव्हाच भारतीय सेना बरखास्त करून टाकल्या असत्या. नव्हे तसा त्यांचा विचारही होता. पण पाकिस्तानी नेत्यांनी मुर्खपणा केला आणि भारताला हा लष्कर उभारण्याचा खर्चिक बोजा उचलावा लागला.

नेहरूंना मुळातच देशावर कुठून हल्ला होईल वा लढाई करावी लागेल असे वाटत नव्हते. म्हणूनच ब्रिटीशांनी उभारलेली भारतीय सेना बरखास्त करून टाकण्याचा त्यांचा मनोदय होता. पण तेव्हाच पाकिस्तानने काश्मिरमध्ये घुसखोरी केली व सेना घुसवल्या आणि त्याचा प्रतिकार सैन्यबळाने करावा लागला. थोडक्यात पाकिस्तानने जी चुक केली, त्यामुळे भारतीय सेना बचावली. अन्यथा नेहरूंनी सेनादले बरखास्त करायचा विचार पक्का केलेला होता. आजचे त्यांचे वैचारिक वारस म्हणूनच पाकिस्तानशी दोस्ती हवी आणि त्यासाठी लष्करी कारवाईला विरोध करीत असतात. त्यांनाच गेल्या अर्धशतकात बुद्धीमंत जाणकार किंवा अभ्यासक मानण्याची आपल्या देशात प्रथा आहे. म्हणून सुधींद्र कुलकर्णी पाकनेत्यांची शांततावादी पुस्तके भारतात प्रकाशित करतात. मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी मुशर्रफ़ यांची मदत मागू शकतात. कारण तोच शांततेचा व मैत्रीचा मार्ग आहे. बलात्कार्‍याशी तडजोड केली व त्याला शरण गेले, तर कधी कुठल्या मुलीवर महिलेवर बलात्कार होऊ शकेल काय? हल्लेखोराला बलात्कारापासून वंचित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या इच्छेला आक्रमणाला शरण जाणे. मग त्याला बलात्काराचे सुख मिळू शकत नाही. यापेक्षा असल्या भूमिका किती भिन्न असतात? बलात्कारीतेने किती व कसा आपला बचाव केला किंवा केला नाही, असे प्रश्न कोर्टात विचारण्याची कुशाग्र बुद्धी आणि पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचे युक्तीवाद किती समान आहेत ना? सुरक्षेतील गाफ़ीलपणा हलगर्जीपणा क्षम्य नसतोच. पण जखमा ओल्या असताना त्यावर असा मिठाचा मारा करण्याला बुद्धीमत्ता मानले जाते, तिथे कुठलीही गोष्ट सुरक्षित असू शकत नाही. सुरक्षा दले किंवा यंत्रणांना खच्ची वा गाफ़ील करण्यासाठी आपले बौद्धिक युक्तीवाद कसे कारण झालेत, याचाही कधी विचार कोणी करणार आहे काय?

6 comments:

  1. खरय भाऊ.
    या लोकांचा बौद्धिक दहशतवादच आज एक मोठी समस्या बनला आहे.
    भारतीयांची मानसिक / वैचारिक गुलामगिरीतून सुटका झाल्याशिवाय यांची दुकानदारी बंद होणार नाही. पिढ्यानपिढ्या पद्धतशीरपणे रुजवलेल्या या मानसिकतेपासून येणाऱ्या पिढीला मुक्त करण्यासाठी आज बऱ्याच संस्था - व्यक्ती प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नातून बदललेले समाजमन अशा प्रवृत्तीला नाकारेल तेंव्हा यांची दुकान बंद होतील. तोपर्यंत या दिशेने काम करणाऱ्यांना यथाशक्ती मदत करून हा बदल घडवू.
    ब्लॉगवरील अतिशय मार्मिक अन सडेतोड लिखाणाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  2. भाऊ बलात्कार्‍याशी जनतेने तडजोड केलेलीदिसतेय तरीच हे secular जिवंत आहेत

    ReplyDelete
  3. १०० % सत्य आहे भाऊ ..पण तुम्हाला जे सुचते ते बाकी पत्रकारांना का नाही सुचत ? आणि सुचत नसेल तर सामान्यांना सत्य कसे काय कळणार ?

    ReplyDelete
  4. bhau barkha dattcha ullekh donhi artical madye kela yach karn kalu shakle nahi

    ReplyDelete
  5. भाऊ यांचा धंदा झालाय दिशाभूल करायाचा पण तुमचा अतिशय सुंदर बाँल्ग लिहिल्यामुळे अामची दिशाभूल होत नाही
    त्यामुळे तुमचे आभारी आहे

    ReplyDelete
  6. हिन्दी अनुवाद भी पोस्ट करते तो अच्छा है

    ReplyDelete