Monday, January 11, 2016

ममता सिंगुर-नंदीग्राम विसरल्या?



सध्या म्हणजे बंगालमध्ये ममता बानर्जी यांच्या तृणमूल कॉग्रेसची सत्ता आल्यापासून जे काही चालले आहे, त्याला अराजक यापेक्षा वेगळा शब्द वापरता येत नाही. अर्थात तसे ममतांना वाटत नाही, की त्यांच्या समर्थकांना कधी दिसत नाही. म्हणूनच मालदा या सीमावर्ति जिल्ह्यात वा अन्यत्र जे जातिय धर्मांध दंगे हिंसाचार चालू आहेत, त्याबाबतीत ममता अगदी निष्क्रीय आहेत. मालदा जिल्ह्यातील कालियाचक नावाच्या शहरवजा गावात मुस्लिमबहुल लोकवस्ती आहे आणि तिथे लाखोच्या संख्येने मुस्लिमांचा जमाव जमवला गेला. त्यानंतर काय झाले त्याचे थेट चित्रण व नंतर रहिवाश्यांच्या मुलाखती, अनेक वाहिन्यांनी अगोदरच प्रक्षेपित केल्या आहेत. पण त्याची दखलही ममतांनी घेतलेली नाही. कुठली ठोस कारवाई झालेली नाही. पण परस्पर त्याला स्थानिक हाणामारी ठरवून ममतांनी हस्तक्षेप करायचेही टाळले आहे. त्याचे कारण उघड आहे. बंगालमध्ये ३० टक्क्याच्या आसपास मुस्लिम लोकवस्ती असून त्यांच्याच मतांनी तिथल्या सत्ताधार्‍यांना बहुमताचा पल्ला गाठता येत असतो. ज्यांच्या बाजूने मुस्लिम मतदार झुकतो, त्याला बहुमतासह सता बळकावणे शक्य असते. तसे हिंदू बहुसंख्य असूनही होत नाही. कारण हिंदू वा बिगरमुस्लिम मते विभागली जातात आणि मुस्लिम मतांना निर्णायक महत्व आहे. मार्क्सवादी असोत वा ममता, त्यांना मुस्लिमांच्या बाजूने झुकते माप देणे भाग असते. जेव्हा मार्क्सवाद्यांची डावी आघाडी मुस्लिमांना झुकते माप देईना, तेव्हा त्यांचा ओढा ममताकडे वळला. म्हणून साडेतीन दशकाची डाव्यांची मक्तेदारी संपवून ममतांनी बंगाल पादाक्रांत केला होता. पण फ़क्त मुस्लिम मतांनी ममतांना सत्ता दिलेली नाही. सिंगूर व नंदीग्रामच्या घटनांनी ममतांना सत्तेचा मार्ग प्रशस्त केला. त्याचाच ममतांना आज विसर पडलेला दिसतो. तसे नसते तर त्यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला रोखले नसते.

सातआठ वर्षापुर्वी डाव्या आघाडीने बंगालमध्ये औद्योगिक विकासासाठी मुक्त अर्थव्यवस्थेला आमंत्रण दिले. तिथे टाटा उद्योग समुहाने नॅनो मोटार उत्पादनाचे मोठे संकुल उभे करण्याचा प्रस्ताव दिला. त्याला डाव्या सरकारने प्रचंड जमिन बहाल केलेली होती. ती जमिन शेतकर्‍यांकडून ताब्यात घेऊन टाटांना सोपवण्याची जबाबदारी डाव्या सरकारची होती. त्याला स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला आणि तो मोडून काढण्यासाठी सरकारने पोलिसी कारवाई केलेली होती. त्यात काही शेतकर्‍यांचा बळी पडला. पण आंदोलन शांत होण्यापेक्षा त्याला राजकीय रंग चढला. विरोधकांनी शेतकर्‍यांचे समर्थन केले आणि विरोधी पक्षांना गप्प करण्यासाठी मग मार्क्सवाद्यांचे कार्यकर्ते आखाड्यात उतरले. थोडक्यात पोलिस बाजूला पडले आणि सिंगूरला युद्धभूमीचे रुप आले. जाळपोळ, हिंसाचार, रक्तपात फ़ैलावत गेला. त्याचा लाभ उठवायला ममता बानर्जी सिंगुरला जाऊन धरणे धरून बसल्या. लोकसभा वा विधानसभेत नगण्य स्थान असलेल्या ममतांना त्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. कदाचित त्या हिंसाचारात त्यांच्या जीवालाही धोका होता. पण तसे झाल्यास राजकीय तोटा होण्याचा धोका ओळखून डाव्या सरकारने ममतांना इजा होणार नाही याची आळजी घेतली होती. तेव्हा तिथे ममतांना व शेतकर्‍यांना पाठींबा द्यायला स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाचे नेतृत्व करणार्‍या मेधा पाटकरही जाऊन पोहोचल्या. मात्र त्यांना प्रत्यक्षात सिंगूरपर्यंत जाणे शक्य झाले नाही. डाव्या सरकारच्या पोलिसांनी त्यांना प्रतिबंधक कारवाई करून रोखलेले होते. माघारी पिटाळून लावलेले होते. मेधा पाटकरांमुळे स्थिती बिघडेल, असा दावा डाव्या सरकारने केला होता. पण माध्यमातून सिंगुर नंदीग्रामचा झालेला बोभाटा पुरेसे नुकसान करून गेलेला होता. तिथून मग मार्क्सवाद्यांचे ग्रह फ़िरले आणि सामान्य जनतेचा विश्वास डावी आघाडी गमावून बसली.

घटनास्थळी पहाणी करायला वा पिडीतांना सहानुभूती दाखवायला जाणार्‍यांना रोखून काय साध्य होते? सिंगुर त्याचा दाखला आहे आणि खुद्द ममता बानर्जीच त्याच्या सर्वात मोठ्या लाभार्थी आहेत. मग त्यातून टाटांनी माघार घेतली आणि अशा स्थितीत तिथे नवा प्रकल्प उभारणे अशक्य असल्याचे त्यांनी जाहिर केले. आपला नवा प्रकल्प घेऊन टाटा गुजरातला गेले आणि डाव्यांनाही उद्योगविकासावर पाणी सोडावे लागले. अर्थात त्यामुळे व्हायचे नुकसान मात्र टळले नाही. त्या एका घटनेने ममता म्हणजे सामान्य गरीब पिडीतांच्या मसिहा होऊन गेल्या आणि डावी आघाडी म्हणजे गुंडगिरी व अराजकाचे प्रतिक होऊन गेले. परिणामी लौकरच आलेल्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणूकीच्या मतदानात त्याचे प्रतिबिंब पडले. आपल्या दिर्घकालीन बालेकिल्ल्यात डाव्यांना ऐतिहासिक मार खावा लागला. कॉग्रेसशी हातमिळवणी करून ममतांनी मग डाव्यांना लोकसभेत पाणी पाजले. प्रथमच डाव्यांना बंगालमध्ये कोणीतरी राजकीय शह दिला होता. त्याचा असा परिणाम झाला, की डाव्यांसोबत राहून पुढे भवितव्य नाही असे वाटू लागलेल्या अनेक गुंड गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी ममताच्या पक्षात आश्रय घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे दोनच वर्षांनी आलेल्या विधानसभा निवडणूकीत ममतांनी डाव्यांचे पुरते पानिपत करून टाकले. ‘मा, माटी, मानुष’ ही ममतांची तेव्हाची गर्जना होती. आज त्यांना आपल्याला सत्ता मिळवून देणार्‍या त्याच घोषणेचेही स्मरण राहिलेले नाही. अन्यथा मालदासारख्या भयंकर घटना घडत राहिल्या नसत्या. दिर्घकाळ डाव्यांना सत्तेत राखायला उपयुक्त असलेल्या गुंडगिरीची मदत ममतांना मिळाली असली, तरी मिळालेली सत्ता गुन्हेगारी मोडण्यासाठी असल्याचे भान ममतांना राहिले नाही. त्याचाच परिणाम आता सगळीकडे दिसू लागला आहे. परिणामी जनमानसात ममतांची प्रतिमा मलिन होत चालली आहे.

मालदा येथे घटनेची पहाणी करायला गेलेल्या भाजपाच्या शिष्टमंडळाला अटक करून माघारी पिटाळणार्‍या ममताना, सिंगूर येथून मेधा पाटकरांना पिटाळणार्‍या डाव्यांचे काय झाले, त्याचा विसर पडला आहे. त्या मेधा पाटकर ममतांच्या समर्थनार्थ तिथे निघालेल्या होत्या. आज तशाच एका शिष्टमंडळाला पिटाळून डाव्यांनी केलेली चुक ममता पुन्हा करत आहेत. आपण अराजकवादी, हिंसाचारी व गुन्हेगारीच्या पाठीराख्या आहोत, असाच संकेत त्यांच्या कृतीतून दिला जात आहे. किंबहूना आपल्याला असेच रोखावे आणि मतदाराची सहानुभूती आपल्या झोळीत पडावी, हीच तर भाजपाची अपेक्षा आहे. त्यासाठीच तर हे शिष्टमंडळ भाजपाने पाठवलेले होते. त्या शिष्टमंडळाच्या कालियाचक भेटीने तिथल्या पिडीतांच्या जखमा भरणार नव्हत्या, की ममतांच्या सत्तेला आव्हान दिले जाणार नव्हते. किंबहूना पिडीत व भाजपा यांना ममतांनी अडवले नसते, तर त्यातली हवा कमी झाली असती. पण ममतांच्या अहंकाराने त्यांना दगा दिला आणि भाजपाच्या हाती कोलित मिळाले आहे. माध्यमांनाही ममतांनी दिर्घकाळ दुखावलेले आहे. म्हणूनच याचा एकत्रित परिणाम ममतांच्याच राजकीय भवितव्यावर होणार आहे. एक गठ्ठा मुस्लिम मतांसाठी चाललेला हा प्रकार बहुसंख्य हिंदूमतांना वेगळा विचार करण्यास भाग पाडू शकणारा आहे. किंबहूना भाजपाचेही तेच उद्दीष्ट आहे. मुस्लिमांच्या लांगुलचालनाने हिंदूंना अन्याय अत्याचार सोसावा लागतो आणि त्यात त्यांच्यासोबत भाजपा सोडून कुठलाच राजकीय पक्ष उभा रहात नाही, ही समजूत भाजपाला हवीच आहे. ती समजून निर्माण व्हायला मामताच्या ताज्या कृतीने हातभार लावला असेल, तर लाभ कोणाचा होईल? असाच भावनात्मक विषय उचलून ममतांनी सिंगूरमधून डाव्यांच्या साम्राज्याला खिंडार पाडले होते. तोच सापळा आज भाजपाने लावला आणि त्यात ममता फ़सलेल्या नाहीत काय? त्या सिंगूर नंदीग्राम विसरल्या काय?

3 comments:

  1. 100 टक्के बरोबर सांगितले भाऊ तुम्ही
    ममता पुढच्या वेळेस आपटी खाणार बंगाल मधून

    ReplyDelete
  2. ममता विदधीत न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम् ।

    ReplyDelete
  3. परन्तु ममता जितक्या चूका करतील तितके ते देशहिताचेच होइल. ही अत्यंत व्यक्तिकेंद्री, राजकारण करणारी कुटिल बाई, कोणताही विधिनिषेध नसलेल्या भयानक प्रवृत्तीचे प्रतिक आहे. ती घरी जाणे देशाच्या हिताचेच होणार आहे.

    ReplyDelete