Saturday, February 13, 2016

पुरोगाम्यांपेक्षा हेडली अधिक विश्वासार्ह

डेव्हीड कोलमन हेडली हा फ़सवा माणूस आहे. तो अमेरिकेसह पाकिस्तानचा एकाच वेळी हस्तक होता. आपल्या बोलवित्या धन्यालाही फ़सवत होता. म्हणून आता त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल पुरोगाम्यांनी उभा केला आहे. चटकन पटणारा असाच हा तर्क आहे. पण ज्यांची बुद्धी शाबुत आहे आणि विवेक ठिकाणावर आहे, त्याला असे तर्क फ़सवू शकत नाहीत. इशरतचे मानसबाप किंवा मानलेले आप्तस्वकीय सेक्युलर गोतावळ्यात अनेक आहेत. त्यांनीच आपल्या लेकीसाठी हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हेडलीचा खरेपणा सिद्ध करण्यापेक्षा, अशा इशारतीवर नाचणार्‍यांना इशरतच्या खरेपणाविषयी उलटे प्रश्न केले पाहिजेत. त्यात नेहमी पुढाकार घेणार्‍या राष्ट्रवादी आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी तेव्हा नरेंद्र मोदी व भाजपावर बेछूट आरोप केलेले होते. त्यासाठी त्यांना एकूण माहिती घेऊन अभ्यास करायची गरज भासली नव्हती. पण हेडलीने ग्वाही दिल्यावर मात्र त्यांना अभ्यासाची गरज भासू लागली आहे. शरद पवार यांच्यावर दिल्लीत कोणा माथेफ़िरूने हल्ला केल्यावर अण्णा हजारे सहज बोलून गेले, ‘एकही मारा?’ त्यावर वस्तुस्थितीचा कितीसा अभ्यास आव्हाड यांनी केलेला होता? तेव्हा आव्हाडांनी अण्णा हजारे यांना नथूराम गोडसे म्हणायला वेळ लावला नाही. मग तेव्हा ते अभ्यास सोडून कोणाची ‘कॉपी’ करत होते? कोणीतरी काही बरळला आणि तो सेक्युलर असेल, तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याला, पुरोगामी म्हणतात काय? बुद्धीमंत म्हणतात काय? गोध्राची घटना घडल्यावर मुख्यमंत्री म्हणून मोदींनी पोलिस अधिकार्‍यांची बैठक बोलावली. त्यात हजर नसताना संजीव भट नामक अधिकार्‍याने एक अफ़वा पसरवली. हिंदुंना सुड घ्यायला सवड द्या, असे मोदींनी सांगितल्याची ती अफ़वा बारा वर्षे सेक्युलर मंडळी इश्वराची आकाशवाणी म्हणून खरी मानत आली. अखेर सुप्रिम कोर्टानेच भटाला खोटा ठरवला. तरी आव्हाडांसह कोणी त्यावर विश्वास ठेवायला तयार आहेत काय? ज्यांना खोट्यावर विश्वास ठेवायची दुर्बुद्धी होते, त्यांना हल्ली सेक्युलर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुरोगाम्यांना जे काही खोटे वाटते, त्यावर निखळ सत्य म्हणून विश्वास ठेवायची वेळ आता आली आहे.
तीस्ता सेटलवाड हिच्यावर गुलमर्ग सोसायटीच्या रहिवाश्यांनी अफ़रातफ़र केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यानुसार तक्रार नोंदली आहे. गुजरात पोलिस त्यानुसार तपास करत आहेत. त्यापासून जामिन मिळवायला तीस्ता जीव मुठीत धरून पळते आहे. यापैकी कोणी तिच्या अफ़रातफ़रीचा खरेखोटेपणा तपासून बघितला आहे काय? त्याची कोणा पुरोगाम्याला गरज वाटलेली नाही. गुजरात दंगल पिडीतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याला पुरोगामी पोषक आहार म्हणतात. तीस्ताने त्याचा धंदा केला आणि प्रत्येक पुरोगामी तीस्तावर विश्वास ठेवत आलेला आहे. कारण तीस्ता पक्की खोटारडी आहे. आणखी एक गोष्ट घ्या. बडोदा बेस्ट बेकरीच्या विषयात जाहिरा शेख हिने पहिल्या कोर्टात आपली जबानी फ़िरवली होती. तेव्हा तिच्यावर दबाव आणला गेला, असा गदारोळ करून टाहो फ़ोडला गेला. पण पुढल्याच खटल्यात तीच जाहिरा शेख साक्ष फ़िरवू लाग,ली तेव्हा तिला खोटारडी ठरवायला तमाम पुरोगामी ब्रिगेड अहोरात्र कामाला लागली होती. त्याच बडोदा जळीतकांडात जिचे तमाम नातलग जळून भस्मसात झाले, त्या जाहिराला खोटी पाडून वर्षभर तुरूंगात पाठवण्याला पुरोगामीत्व म्हणतात. गुजरात दंगलीतले पिडीत मोदीविरुद्ध उभे राहिले, मग सच्चे असतात आणि पुरोगामी मुखवटा फ़ाडू लागले, मग खोटारडे असतात. जाहिरा यांच्या तालावर नाचत होती तोवर खरी होती आणि विरुद्ध बोलू लागली मग खोटी पाडली गेली. ही मालिका संपत नाही. जाहिराला गुपचुप बडोदा येथून मुंबई घेऊन येणारा रईस खान पठाण तीस्ताची पापे चव्हाट्यावर आणू लागला, तेव्हा खोटा असतो. विश्वास कोणी कोणावर ठेवायचा? त्यानेच अनेक मुस्लिम दंगलपिडितांची खोटी प्रतिज्ञापत्रे तीस्तासाठी बनवल्याची साक्ष दिली आहे. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा? पुरोगामी टोळीच्या विरोधात बोलेल वा त्यांचे पितळ उघडे पाडणारा तो खोटा, हाच त्यांचा निकष आहे. त्यांना कुठले पुरावे किंवा साक्षी देवून उपयोग काय? ज्यांना खोटेच सत्य म्हणून लोकांच्या गळी मारायचे असते, त्यांना सत्य पटवण्याची गरज नसते. पाकिस्तान आणि इथे वसलेले पुरोगामी यांची शैली एकच असावी हे नवल नाही.
मुंबई हल्ल्यानंतर आजपर्यंत कित्येक पुरावे आणि साक्षी पाकिस्तानला भारताने पाठवल्या आहेत. त्याचा काही उपयोग होऊ शकला आहे काय? कितीही पुरावे द्या, ते भक्कम नाहीत किंवा विश्वासार्ह नाहीत, हीच टकळी पाकिस्तानकडून वाजवली जाते आहे ना? पठाणकोट असो किंवा अन्य कुठलेही पुरावे असोत, पाक सरकार वा नेते त्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांचा सत्यावर विश्वास नाही. त्यांना खोटे बोलायची व वागायची सवय लागली आहे. मग त्यांच्या गळी सत्य उतरवायचे कसे? कारगिलच्या घुसखोरीनंतर जे पाक सैनिक तिथे मारले गेले, त्यांचे मृतदेह सुद्धा पाक सरकारने स्विकारले नाहीत. इतका पाकिस्तानी खोटेपणा भक्कम आहे. या पाकिस्तानी भूमिका व पुरोगामी वागण्यातले साम्य आपण साध्या डोळ्यांनी बघू शकतो, समजू शकतो. काश्मिरच्या बाबतीत असो किंवा अन्य कुठल्याही बाबतीत देशद्रोहाचे समर्थन इथले पुरोगामी करताना दिसतील. काही महिन्यापुर्वी याकुब मेमनच्या फ़ाशीला रोखण्यासाठी दिवसरात्र राबत असलेली टोळी बघा. त्यातले चेहरे आणि आज हेडलीला खोटा पाडायला धावलेले चेहरे समान दिसतील. अफ़जल गुरूच्या फ़ाशीला स्थगिती मिळवण्यासाठी कोण राबत होते? त्यांचेही चेहरे समान दिसतील. त्याच घोळक्यात नक्षलवादी हत्याकांडातल्या आरोपींना वाचवायला राबणार्‍यांची वर्दळ दिसेल. त्यातच इशरत किंवा गुजरात दंगलीवरून काहुर माजवणार्‍यांचे चेहरे आढळतील. पाकिस्तानात मेजवान्या झोडायला जाणार्‍यांचाही त्यातच भरणा असलेला लक्षात येईल. म्हणूनच या लोकांनी हेडलीबद्दल शंका घेऊन त्याला खोटा पाडण्याची मनोवृत्ती लक्षात येऊ शकते. ज्या उत्साहात आज हे लोक हेडलीला खोटा पाडत आहेत, नेमके तसेच युक्तीवाद काही वर्षापुर्वी जाहिरा शेखलाही खोटे ठरवण्यासाठी झालेले होते. इशरत हयात असती आणि तिनेही आपल्या चुकांची कबुली दिली असती, तर याच गोतावळ्याने तिलाही खोटीच पाडली असती. मग हेच लोक म्हणाले असते, इशरत जिहादी आहे, तिच्यावर कसला विश्वास ठेवायचा? ही तथाकथित बुद्धीमान माणसे किती कोलांट्याउड्या मारतात, तेही तपासून बघण्यासारखे आहे. हेडलीविषयीच यांच्या मर्कटलिला तपासून घेता येतील.
उदाहरणार्थ वादासाठी हेडली दहशतवादी म्हणून विश्वासार्ह नसल्याचा दावा मान्य करू या. पण तो दहशतवादी तरी कशामुळे ठरतो? तो जिहादी असण्यावर तरी पुरोगामी कशामुळे विश्वास ठेवतात? त्याचा पुरावा काय आहे? हेडलीला अमेरिकेत पकडले आणि तिथल्या कोर्टाने अपुर्‍या पुराव्यामुळे त्याला सौदा करून शिक्षा कमी देण्याच्या बदल्यात जबानी घेतली. त्या जबानीच्या आधारेच तो दहशतवादी ठरला आहे. पण जिहादी म्हणून सिद्ध होण्यासाठी त्याच्याच जबानीपेक्षा कुठला मोठा भक्कम पुरावा नाही. याचा अर्थ हेडलीवर विश्वास ठेवला, तरच त्याला दहशतवादी मानता येते. आणि त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नसेल, तर हेडलीला दहशतवादी सुद्धा मानायची गरज नाही. सहाजिकच ‘एका दहशतवाद्यावर किती विश्वास ठेवायचा’ या पुरोगामी युक्तीवादाचा पायाच ढासळून जातो. आपण मुंबई हल्ल्यात सहभागी होतो वा पाक हेरखात्यासह जिहादी संघटनांना मदत केली, हा हेडलीचा दावा मान्य केला; तरच तो जिहादी आहे. त्याच्या साक्षीवर सोयीनुसार विश्वास अविश्वास दाखवता येणार नाही. पुरोगाम्यांचा हेडलीच्या साक्षीवर विश्वासच नसेल, तर त्याला दहशतवादी संबोधणेही मुर्खपणाच नाही काय? सवाल हेडलीवर विश्वास ठेवण्याचा नसून पुरोगामी लोकांवरील विश्वासाला जनमानसात तडा गेला आहे. हेडलीच्या विश्वासार्हतेचा मुद्दा कोर्टापुरता मर्यादित आहे. पण सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या पुरोगाम्यांची विश्वासार्हता प्रत्येक नव्या नाटकातून रसातळाला जात आहे. त्यांचा कोणावर विश्वास आहे, याला महत्व उरलेले नाही. त्यांच्यावरून सामान्य लोकांचा विश्वास उडाला आहे. लोकसभा मतदानात त्याची प्रचिती आली. कारण यांनी ज्याला दंगलखोर म्हणुन बारा वर्षे बदनाम केला, त्याच्याच हाती जनतेने देशाची सुत्रे सोपवली. आताही नेहरू विद्यापिठातील अफ़जल गुरू नाट्य तसेच उलटले आहे. पुरोगामी बोलला म्हणजेच खोटे अशी समजूत हळुहळू जनमानसाल पक्की होत चालली आहे. तेव्हा हेडलीच्या विश्वासार्हतेची चिंता पुरोगाम्यांनी करू नये. आज तरी सामान्य भारतीयाला पुरोगाम्यांपेक्षा हेडली विश्वासार्ह वाटतो आहे.

4 comments:

 1. Bhavu
  What happened in JNU?
  Describe that too

  ReplyDelete
 2. राष्ट्रवादीचा रॉबिनहूड अभ्यासाला लागलाय . वागळे , सरदेसाई आणि मंडळी कधी अभ्यास करणार ?

  ReplyDelete
 3. pls write a blog on JNU issue

  ReplyDelete