Monday, February 8, 2016

हेडली आणि हिंदू दहशतवादशिकागो येथील तुरूंगात खितपत पडलेला डेव्हीड कोलमन हेडली याच्या साक्षीने भारतीय माध्यमे कमालीची फ़ुशारली आहेत. त्याच्या साक्षीतून पाकिस्तानचा मुंबई हल्ल्यात असलेला हात अगदी स्पष्ट होत असल्याने, आता पाकिस्तानला जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही, अशीच काहीशी समजूत भारतीय पत्रकार वा शहाण्यांनी करून घेतल्याचा तो परिणाम आहे. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. कारण हे आपलेच पाप आहे, हे पाकिस्तानी राज्यकर्ते व पाक सेनेला पक्के ठाऊक आहे. पण सराईत गुन्हेगाराने पोलिसांनाच पुरावे दाखवा म्हणावे, तशा बेशरमपणाने पाकिस्तान वागतो आहे. म्हणूनच हेडलीच्या साक्षीने उत्साहित वा उन्मादित होण्याला अर्थ नाही. कारण आता पाकिस्तानला बदनाम करण्यापेक्षा त्या साक्षीला फ़ारसा अर्थ नाही. मुंबई हल्ल्याचा खटला केव्हाच संपला आहे आणि त्यातला एकमेव हयात हल्लेखोर कसाब फ़ाशीही गेला आहे. पण या निमीत्ताने पाकिस्तानचा जिहादी दहशतवादी चेहरा जगापुढे आणायला मात्र ही साक्ष महत्वाची आहे. त्यातले हेडलीचे दावे पाकिस्तानने मान्य करावेत, म्हणून तिथल्या अधिकारी वा जाणत्यांना वाहिन्यांवरील चर्चेत बोलावणे केवळ मुर्खपणा आहे. कुठलाही गुन्हेगार पुरावे स्विकारून गुन्हा कबुल करीत नसतो. म्हणूनच त्याला पुरावे दाखवणे वा त्याच्यासमोर कोणाची साक्ष काढण्यातून काही साध्य होत नसते. मुद्दा पुरावे साक्षी कोणापुढे आणाव्यात इतकाच असतो. हेडलीची साक्ष तितकीच महत्वाची आहे आणि त्यातून पाकिस्तानचे भारत विरोधातले डाव कोणते आहेत, त्याविषयी माहिती मिळवणे महत्वाचे आहे. त्या दिशेने बघितले तर मुंबई हल्ला हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला नव्हता आणि आधी दोन प्रयास वाया गेले होते, हा नवा महत्वपुर्ण तपशील हेडलीने दिला आहे. त्यावर चर्चा व उहापोह होण्याची गरज आहे. नोव्हेंबरमध्ये हल्ला होण्याआधी दोनदा तशी योजना आखली व ऐनवेळी सोडून द्यावी लागली असे हेडली म्हणतो. त्याचे संदर्भ तपासून बघणे म्हणूनच मोलाचे आहे.

कसाब आणि मुंबई हल्ला याचा इतका गाजावाजा झाला, की तत्पुर्वीच्या काही महत्वाच्या घटनांचा कालावधी आपण पुर्णपणे विसरून गेलो आहोत. कसाब टोळीने मुंबईत समुद्रमार्गे येऊन जो उत्पात घडवला, त्याच्या दोन महिने आधी काय काय घडलेले होते? दोन महिने आधी म्हणजे सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या खास तपास पथकाने हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू दहशतवाद बोकाळला असल्याचा शोध लावला होता. त्यासाठी मालेगावच्या स्फ़ोट प्रकरणात कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक केलेली होती. याच लोकांचा अजमेर व समझोता एक्सप्रेसच्या घातपातात हात असल्याचा संशय व्यक्त करीत अनेक आरोप झाले होते. आपल्यापाशी सज्जड पुरावे असल्याचाही त्या पथकाने दावा केलेला होता. मग एका यंत्रणेकडून दुसर्‍या यंत्रणेकडे ह्या तपासाची सुत्रे जात राहिली. पण साडेसात वर्षे उलटून गेली तरी अजून त्या खटल्याची सुनावणी सुरू होऊ शकलेली नाही. यातल्या आरोपींना जामिनही सतत नाकारला गेला आहे. त्याचा कुठला तपास सुरू आहे, त्याचीही माहिती नंतर उजेडात येऊ शकलेली नाही. पण हिंदू दहशतवाद ही आरोळी ठोकण्यासाठी हा विषय सतत वापरला गेलेला आहे. त्याची सुरूवात सप्टेंबर २००८ दरम्यान झाली होती. म्हणजे ज्या काळात पाकिस्तानची हेरसंस्था, लष्कर आणि तिथल्या तोयबासारख्या संघटना इथे मुंबईत येऊन रक्तपात घडवण्याची कारस्थाने शिजवत होते, तेव्हा भारतातील तपासयंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा काल्पनिक अशा हिंदू दहशतवादाच्या भ्रामक प्रतिमांना उजाळा देवून जनतेला गाफ़ील ठेवण्यात गुंतल्या होत्या. एकप्रकारे हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा करणारे व्यवहारात मुंबई हल्ल्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यातच गुंतले नव्हते काय? हेडली आधीचे दोन प्रयत्न वाया गेले व सोडून द्यावे लागले म्हणतो. त्या काळात भारतामध्ये काय घडामोडी घडत होत्या, त्याला म्हणूनच महत्व आहे. हेडलीची साक्ष त्याच निकषावर तपासून बघणे आवश्यक आहे.

याप्रकारचे हल्ले शत्रू देशात केले जातात व घातपात घडवले जातात, त्याला स्थानिक साथीदारांची मदत आवश्यक असते. त्याच्या उलट असे हल्ले हाणून पाडायचे असतील तर शत्रूच्या स्थानिक साथीदारांचा सतत मागोवा घेऊन त्यांना निकामी करण्याचे काम इथल्या सुरक्षा यंत्रणांनी करायचे असते. त्यापासून अशा यंत्रणांना दूर ठेवणे वा अन्य कामात गुंतवणे, म्हणजे प्रत्यक्षात त्या शत्रूच्या घातपाती हल्ल्याला पोषक स्थिती निर्माण करणेच असते. मालेगाव प्रकरणात जो तपास चालू होता, त्याला हिंदू दहशतवादाचा चेहरा लावून दुसरे काय चालले होते? ज्यापासून देशाला वा मुंबईला कोणताही धोका नव्हता, तिकडे सर्व लक्ष व शक्ती वळवून कसाब टोळीचे काम सोपे व्हायला हातभार लावला गेला नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? ज्या काळात हेडली वा तत्सम पाकिस्तानी हस्तक मुंबईत फ़िरून घातपाताची तयारी करीत होते, त्याच काळात इथल्या यंत्रणा व पोलिस हिंदू दहशतीच्या भ्रामक कामात गुंतवणार्‍यांनी काय साध्य केले? खरोखर तसा धोका असल्यास आजवर त्याचा खटला कशाला उभा राहू शकलेला नाही? साडेसात वर्षे तपास चालू आहे आणि साधी सुनावणी होऊ शकलेली नाही. कुठलाही पुरावा समोर आलेला नाही वा हाती लागलेला नाही, इतकाच त्याचा अर्थ होतो. पण पुरोहित वा साध्वींना निर्दोष सोडले तर पकडले कशाला आणि त्याच कालखंडात त्यावरून काहुर कशाला माजवले, असेही प्रश्न उपस्थित होऊ शकतील. किंबहूना ते काहुर माजवून कसाबच्या कारस्थानाकडे बघायला वेळच दिला गेला नाही, हे पाप उघडकीस येऊ शकते. हेडली जो तपशील देतो आहे, त्याचे काळवेळाशी असलेले संदर्भ म्हणून महत्वाचे व दिशादर्शक आहेत. कसाब टोळीच्या हल्ल्याला मोकळी वाट करून देण्यापर्यंत भारतीय सुरक्षा यंत्रणांना गाफ़ील ठेवण्याचे पाप तेव्हा झालेले आहे आणि असे पाप करणार्‍यांना तोयबा वा पाक घातपाताचे भागीदार म्हणायला हरकत नसावी. आज जे कोणी हेडलीच्या साक्षीने पंख फ़ुटल्यासारखे उडत नाचत आहेत, ते त्या हल्ल्याच्या आधी कितपत जागरूक होते?

पुरोहित वा साध्वी यांच्या अटकेनंतर जे बिनबुडाचे आरोप झाले आणि दावे करण्यात आले, त्याची कसुन तपासणी पत्रकार माध्यमांनी तेव्हाच केली असती, तर हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा व्हायला हातभार लागला नसता. साक्षीपुरावे म्हणून ज्या गोष्टी मालेगाव प्रकरणात समोर आणल्या जात होत्या वा सांगितल्या जात होत्या, त्याची झाडाझडती अजून झालेली नाही. पण त्यातून भारतीय समाज व यंत्रणांना गाफ़िल ठेवण्याचे पाप होऊन गेले आहे. त्यात ज्यांनी पुढाकार घेतला वा गदारोळ केला, त्यांना जाब विचारला पाहिजे. कारण हेडलीची साक्ष तिकडेच बोट दाखवते आहे. २००७ मध्ये मुंबई हल्ल्याची योजना पाक हेरखात्याने आखली आणि त्यानुसार ते कामाला लागले होते. त्याचा सुगावाही भारतीय गुप्तचरांना लागला नाही. कारण तेव्हा इथले गुप्तचर नसत्या कामात गोवलेले होते. किंबहूना भारतीय गुप्तचरांना इशरत जहान चकमकीत गोवण्याचे राजकीय डाव सत्ताधारीच खेळत होते. आपल्याच बचावात गुप्तचरांना गुंतवून ठेवण्यात आलेले होते. पर्यायाने शत्रूच्या हस्तकांना व हेरांना इथे मोकाट रान मिळण्याची सोय तात्कालीन सत्ताधार्‍यांनीच केलेली होती. हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा करण्याचा कालावधी आणि पाकिस्तानात मुंबई हल्ला शिजण्याचा कालावधी एकच असावा, ही बाब लक्षणिय नाही काय? आजवर या संदर्भात कुठेही चर्चा झाली नाही. पण हेडलीच्या साक्षीने त्याची दारे उघडली आहेत. हेडली ताज हॉटेलात मुक्काम करीत होता, मुंबईभर मोकाट फ़िरत होता. दोस्त बनवत होता. त्याच्यावर पाळत ठेवून पाकचे कारस्थान हाणून पाडायला वेळ कोणाला होता? आमच्या गुप्तहेरांना तेव्हा इशरत प्रकरणी गोवले जात होते आणि उरलेल्यांना साध्वी किंवा पुरोहिताची जन्मकुंडली शोधण्याच्या कामाला जुंपलेले होते. हेडलीच्या साक्षीनंतर ह्या गोष्टी तपासण्याची गरज आहे. म्हणूनच साडेसात वर्षे उलटून गेल्यावरही तो मालेगावच्या स्फ़ोटाचा खटला सुनावणीला कशाला येत नाही, त्याबद्दल प्रश्न विचारण्याची गरज आहे. पण आमची माध्यमे पाकच्या माजी अधिकारी व पाकप्रेमी भारतीय जाणत्यांशी गप्पा मारण्यात गर्क आहेत. मग हेडलीच्या साक्षीचा बोजवारा उडाला तर काय नवल?

6 comments:

 1. This is the best and the only correct analysis of the situation.

  ReplyDelete
 2. हेडली ला मदत करणारे सुधा राजकारणी आणि हिंदू दह्शद वाद रंगवून सांगणारे हि राजकारणी यातीलच काही मालेगाव ला मुस्लिम जिल्हा बनवायला निघाले होते …
  भाऊ नेहमी प्रमाणे उत्तम माहिती दिली आहे तुम्ही .

  ReplyDelete
 3. भाऊ, You are great. आसा विचार खरोखरच करावयास हवा.

  ReplyDelete
 4. साध्वी प्रज्ञा तर मुळात अभाविपची कार्यकर्ती ! पुरोहित वा साध्वी यांच्या अटकेनंतर हिंदुत्वाची मक्तेदारी घेऊन मिरवणार्‍या संघ परिवाराच्या संघटनाही शेपुट घालून बसल्या ना ? तेव्हा सत्ता नव्हती तर निदान कायदेशीर लढाई तरी सुरु केली पाहिजे होती. मात्र मी असं ऐकलं की सेनाच म्हणाली की आम्ही त्यांना वकील देऊ ! आता मोदी आलेत तरी माशी सुध्दा हले ना त्या केस वरची .... आपल्या लोकांच्या वरच्या केस लढून त्यांच्या बाजूने संपवणं किंवा सत्तेत आल्यावर धोरण राबवून केस मागे घेणं हे षंढ परिवाराला जमलेलं नाही. फक्त मोठे नेते अडकले असतील तरच हे सगळं होतं आणि हा सगळा माझा वैयक्तिक अनुभव आहे. -बोलो शेपुट मैया की जय !

  ReplyDelete
 5. अतिशय स्पष्ट शब्दात वस्तुस्थिती मांडल्याबद्दल आभार. दुर्दैवाने संबंधित याकडे दुर्लक्ष करतात हे खरे दुखणे आहे.

  ReplyDelete
 6. भाऊ काय हे? तात्कालीन सरकार या मुंबई हल्ला शिजण्याचा कटात सामिल आहे असे दिसते

  ReplyDelete