Tuesday, February 16, 2016

तिसर्‍या महायुद्धाची चाहुल

ज्या देशाची लोकसंख्याही दोनतीन कोटीच्या घरात नाही, त्याच्या भूमीवर साडेतीन लाख खडी सेना येऊन उभी राहिली, तर त्याला सैनिकी अभ्यास म्हणता येईल काय? की त्याला युद्धाची तयारी म्हणावे लागेल? हा प्रश्न भारतातील माध्यमांना आज पडलेला नाही. भारतच कशाला भारतातले पत्रकार ज्या पाश्चात्य माध्यमांकडे कायम आशाळभूतपणे बघत असतात, त्यांनाही सौदीच्या वाळवंटात उत्तरेला ही सैनिकी जमवाजमव कशाला होतेय, त्याचा उहापोह करण्याची गरज वाटलेली नाही. यातूनच सामान्य माणसापर्यंत कशी गाळीव माहिती पाठवली जाते आणि तिला कसे गाफ़ील ठेवले जाते, त्याचा पुरावा मिळू शकतो. जगातले अनेक देश परस्परांच्या सहकार्याने सैनिकी सराव किंवा अभ्यास अधूनमधून करत असतात. त्यात त्या त्या देशांचे सैनिक काही तुकड्या घेऊन सहभागी होतात. पण काही तुकड्यांचा हा सराव कधी हजारावरून लाखो सैनिकांच्या संख्येपर्यंत पोहोचत नाही. शिवाय जिथून जवळपास प्रत्यक्ष युद्धाच्या चकमकी घडत असतात, त्याच्या जवळपास सैनिकी सराव होत नसतो. मात्र सौदी वाळवंटाच्या उत्तरेस इराक व सिरीया अशा देशामध्ये साक्षात यादवी माजलेली आहे. अशा वेळी त्याच्या समीप दोन डझन देश सैनिक अभ्यास करायला आपला फ़ौजफ़ाटा घेऊन हजर होतात, यावर कोणी विश्वास ठेवायचा? पण मुख्य प्रवाहातील माध्यमे व वर्तमानपत्रे यांच्यावर विश्वास ठेवायचा, तर ही जमवाजमव केवळ सैनिकी सरावासाठी झालेली आहे. पण जिथे तो सराव होऊ घातला आहे, तिथूनच जवळपास सिरीयाला वाचवण्यासाठी रशियन हवाईदलाची लढावू विमाने हल्ले करीत आहेत. त्यापैकीच एक विमान तुर्कस्तानने पाडल्याने कटूता आलेली आहे. अधिक सौदी राजे सतत सिरीयाची राजवट संपवण्याची भाषा करीत असतात. अशावेळी अमेरिकेसह डझनावारी देशांनी सरावासाठी सौदी भूमीत सेनेच्या तुकड्या पाठवणे हा अभ्यास असू शकत नाही, तर मोठ्या व्यापक युद्धाची तयारी असू शकते. पण कुठल्याही माध्यमात त्याविषयी चर्चा नाहीत, की बातम्याही आलेल्या नाहीत. ही गोपनीयता कशासाठी व कोणाला उल्लू बनवण्यासाठी आहे?
नुसते आकडेच खुप बोलके असतात. सौदी वाळवंटात जमा झालेल्या फ़ौजफ़ाट्यामध्ये भूदलाचे विविध देशातील साडेतीन लाख सैनिक आहेत. त्याखेरीज २० हजार रणगाडे व चिलखती गाड्या तिथे आणलेल्या आहेत. जोडीला अडीच हजार लढावू विमाने आणि साडेचारशे लष्करी हेलिकॉप्टर्स तैनात झालेली आहेत. ही इतकी सज्जता कशासाठी आहे? एकट्या पाकिस्तानपाशी असलेली एकूण सेना इतकी सज्ज नाही, त्यापेक्षा सौदीच्या मित्रांनी अभ्यासासाठी जमवलेली फ़ौज अधिक युद्धसज्ज आहे. तिचे प्रयोजन काय आणि पुढे काय वाढून ठेवले आहे? सौदीने आधीच एक आखाती व सुन्नी देशांची आघाडी उभी केली आहे. त्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. अशा देशांसह नाटो व अमेरिकेनेही तिथे आपल्या तुकड्या पाठवल्या आहेत. त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. अरब स्प्रिंग म्हणून जे नाटक चार वर्षापुर्वी सुरू झाले, त्यातून ही स्थिती आलेली आहे. ट्युनिशिया येथून सुरू झालेल्या वादळामागे अमेरिकन पैशावर उभ्या असलेल्या काही स्वयंसेवी संस्था त्या उठावाची प्रेरणा होत्या. त्यातून सौदीला अमान्य असलेले अनेक मुस्लिम अरब राज्यकर्ते हटवण्याची मोहिम सुरू झाली. त्यातूनच लिबीयाचा गडाफ़ी व इजिप्तचा होस्ने मुबारक पदभ्रष्ट झाले. पण त्याला सिरीयाचा बशर अल असद शरण गेला नाही. त्याच्या विरोधात उभ्या असलेल्या कर्डीश बंडखोरांना मग हत्यारे पुरवण्यात आली आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी पाश्चात्य व अमेरिकन हवाई दलांनी सिरीयात हल्ले करीत बंडखोरांना सिरीयाचा मोठा प्रदेश बळकावण्याची संधी मिळवून दिली. तेव्हाच इसिस नावाचे भूत उभे करून सौदी व तुर्कस्तानने सिरीया इराकचा काही भाग बळकावला. तरीही असद शरण गेला नाही. इराण व रशियाच्या पाठींब्यावर त्याने सत्तेत टिकून रहाण्याची हिंमत दाखवली. अखेरीस काही महिन्यांपुर्वी रशियाने त्यात थेट हस्तक्षेप करून सिरीयातील बंडखोर व इसिसच्या प्रदेशात हवाई हल्ले केले. इतकेच नव्हेतर मित्र असदला संपवायला डावपेच खेळले गेल्यास सौदीवरही हल्ला करायची धमकी पुतिन यांनी दिली. सौदीभूमीतील आजची जमवाजमव म्हणूनच युद्धाची सज्जता होऊ शकते.
सिरीयात कुठलेही अनधिकृत हवाई हल्ले झाल्यास त्याला युद्ध समजून प्रतिकार केला जाईल, असा इशारा रशियन संरक्षणमंत्र्यांनी दिलेला आहे. तसे हल्ले पुर्वी नाटो व अमेरिकन सेनेने केलेले आहेत. अलिकडे तुर्कस्तान तसे हल्ले आपल्या सीमेलगत करीत असते. मात्र अपवाद फ़्रान्सचा आहे. पॅरीसच्या घातपातानंतर फ़्रेंच हवाई दलाने इसिसच्या अड्ड्यांवर भेदक हल्ले केले. रशियाच्या जोडीला फ़्रान्सने असे हल्ले केल्याने इसिसचे कंबरडे मोडायला आले आणि असदची सेना पुन्हा मोठा प्रदेश कब्जात आणू शकली आहे. अलेप्पो नावाच्या शहरातील इसिसचा कब्जा ढिला झाला आणि त्यांना पळ काढावा लागला आहे. रोका शहरातून इसिसला माघार घ्यावी लागल्यास पुन्हा असदची सत्ता संपुर्ण सिरीयात प्रस्थापित होऊ शकते. म्हणूनच सौदीला धडकी भरली आहे. कारण तसे झाल्यास इसिसच्या जिहादींना सौदीतच आश्रय द्यावा लागेल आणि त्यांना वाचवायला सिरीयात घुसले, तर रशियाला सौदीवर हल्ला करण्याची मुभा दिली जाईल. त्यातून मार्ग काढण्यासाठी इसिसच्या बंदोबस्ताचे नाटक तुर्की व सौदी रंगवत आहेत. पण प्रत्यक्षात इसिसचे बोलविते धनी हेच दोघे आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. त्या युद्धाला एकटे सामोरे जाण्याची हिंमत सौदी वा तुर्कीमध्ये नाही. म्हणूनच २५ देशांची आघाडी बनवलेली असून, रशियाला भयभीत करण्याचा डाव त्यामागे आहे. मात्र रशियाही कच्च्या गुरूचा चेला नाही. त्यालाही अशा युद्धाची चाहुल लागली असून, त्याला सामोरे जाण्याच्या तयारीनेच मागल्या काही काळात पुतिन यांनी मैत्री जोडली आहे. सिरीया, इराण व रशिया असे यातले दुसर्‍या बाजूचे खेळाडू आहेत. त्यातला सिरीया बरबाद झाल्याने दुबळा आहे. पण इराणकडे शक्ती आहे आणि जोडीला उघडपणे रशिया असल्यास, खर्‍या युद्धाचा भडका उडू शकतो. त्यात पाश्चात्य देशांना सहभागी करून घेण्यासाठी हे अभ्यासाचे नाटक उभे करण्यात आले आहे. अमेरिका वा युरोपियन देश त्यात थेट उतरायला राजी नाहीत. तर रशिया माघार घ्यायला राजी नाही. अशी चमत्कारीक स्थिती आहे. वेळ आल्यास अमेरिका हात झटकण्याच्या तयारीत आहे.
इतकी मोठी फ़ौज एकजिनसी नाही, ही रशियासाठी जमेची बाजू आहे. दुसरी गोष्ट मुस्लिम अरबी देश वगळता अन्य नाटो देशांच्या सैनिकांसाठी हा भूप्रदेश अनोळखी आहे. पण रशियासाठी सिरीया वा अरबी प्रदेश शेजारी भूमी आहे. म्हणूनच इतका फ़ौजफ़ाटा जमवून रशियाला भयभीत करण्याचा डाव यशस्वी होऊ शकणार नाही. पण त्याला मानवी संख्येने उत्तर देणे शक्य नसलेल्या रशियाकडून सौम्य अण्वस्त्रे वा रासायनिक शस्त्रे वापरली जाऊ शकतात. तसे झाल्यास अवघा मध्यपुर्व प्रदेश युद्धाच्या खाईत लोटला जाऊ शकेल. अर्थात तशी अस्त्रे रशियाने वापरली तर जगालाच युद्धात ओढले जाण्याची मोठी शक्यता आहे. कारण अरबस्तान पेटला तर युरोपात मागल्या दोन वर्षात निर्वासित म्हणुन दाखल झालेल्या अरबी मुस्लिम लोकसंख्येची प्रतिक्रिया भयंकर असू शकते. त्यातून आपण जिहादी लढवय्ये तिथे पाठवल्याचे इसिसने आधीच जाहिर केलेले आहे. त्यांनी अशा युद्धकाळात युरोपात उच्छाद मांडला, तर निर्वासितांच्या गर्दीने नाराज असलेल्या युरोपियन देशात यादवी भडकायला वेळ लागणार नाही. आधीच जर्मनीसह अनेक देशात निर्वासित विरोधात आक्रमक विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. काही युरोपियन शहरात त्याला रौद्ररुप येऊ लागले आहे. अशावेळी सौदीच्या सैनिकी अभ्यासाने युद्धाची ठिणगी टाकली, तर युरोप व आशियाच्या अनेक देशांना महायुद्धाच्या खाईत ओढले जाणार आहे. त्यासाठी सिरीया वा सौदीच्या वाळवंटात एक ठिणगी पडण्याची गरज आहे. बघता बघता भारताच्या पश्चिम व वायव्य बाजूला महायुद्धाचा आगडोंब उसळलेला दिसू शकेल. तो दिवस फ़ार दूर नाही. कारण आगामी दोन आठवड्यातच सौदीच्या उत्तरेला असलेल्या वाळवंटी प्रदेशात जमलेला हा प्रचंड फ़ौजफ़ाटा आपला सैनिकी अभ्यास करणार आहे. त्याचा निकाल कसा लागतो हे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपल्यापुढे येऊ शकेल. आज कुठे तशा बातम्या नाहीत, कारण माध्यमे ते लपवून बसली आहेत. मात्र जेव्हा भडका उडेल तेव्हा जणू आकस्मिक काही घडले असा छानपैकी देखावा रंगवला जाईल.

7 comments:

  1. भाऊ तुमच्या लेखणीला सलाम,

    ReplyDelete
  2. भाऊ ,,...........नेहमी प्रमाणे ' उत्तम ' लेख...... विषयाची निवड व त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन एकदम मस्त !! सध्या आखातात घडत असलेल्या प्रत्येक घटनेला अनेक पदर आहेत. ओबामा यांच्या कारकिर्दीचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे ते स्वतः जास्त काही करण्याच्या स्थितीत नाहीत.सौदी मुद्दामहून तेलाचे उत्पादन कमी करत नाही जेणे करून घसरलेल्या तेलाच्या किमतीचा फटका ' रशिया , इराण ' या दोघांना बसावा. त्यामुळे रशिया आणि सौदी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. रशिया हा सौदी कडून काही चूक अथवा ' आगळीक ' व्हावयाची वाटच बघत आहे. सौदी कडे कितीही अति आधुनिक शस्त्रात्रे असली तरी त्यांच्या सैन्याला प्रतकश्य युद्धाचा अनुभव नाही. युरोपला ' गेसं ' ची गरज असून ती फक्त रशिया कडून पुरविली जाते. क़तर देशाला ' गेस पाईप लाईन ' टाकायला सीरियाने पूर्वीच विरोध केला होता. तेंव्हा राहता राहिले इराण आणि सिरिया ज्यांच्याकडे ' गेस रिझर्व भरपूर आहे आणि हे तिन्ही देश एकाच फळीत एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ' सौदी ' कडूनच काही ' आगळीक ' होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मोठा भडका उडायची शक्यता आहे. सध्या इसीसला ' हग्या मार ' मिळत असल्यामुळे ती ब्याद परत सौदीमध्ये घुसायची सौदीला भीती वाटत आहे.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    अमेरिकेला आयसिसच्या माध्यमातून सबंध मध्यपूर्व ताब्यात घ्यायची होती. यासाठी तुर्कस्थान आणि सौदी अरेबिया या चमच्यांची अमेरिकेस साथ होती. पण वांधा असा झाला की रशियाने हस्तक्षेप करून आयसिसचं कंबरडं मोडलं. असद अजूनही सीरियाचा अधिकृत सत्ताधारी आहे. त्यामुळे असदने आम्हाला आमंत्रण दिलं असं रशिया म्हणू शकतो. अमेरिका आणि तिच्या चमच्यांना असा युक्तिवाद करता येणार नाही. कारण आयसिस राष्ट्रसंघाच्या दृष्टीने अनधिकृत आहे.

    आता जर आयसिसची वासलात लागली तर कुर्द अतिशय शिरजोर होतील. ते इराक आणि तुर्कस्थानातला कुर्दबहुल विभाग वेगळा काढून स्वतंत्र कुर्दिस्तान उत्पन्न करतील. इराणमधला कुर्द विभाग कदाचित मिळणार नाही. पण त्याबदल्यात इराण पाठींबा जरूर देईल.

    या घडामोडींतून तुर्कस्थानाचे वर्चस्व कमी होईल. ज्या लोकांना हाताशी धरून सीरियात अस्थिरता माजवली, तेच लोकं उलट तुर्कस्थानात घुसतील.

    यांतली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारे कुर्दबहुल विभाग अपरिमित तेलसाठ्यांवर वसलेले आहेत. म्हणून अमेरिकेचा हा युद्धाचा खटाटोप चालला आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. छान भाऊ मस्त निरीक्षण भारताने याचा फायदा घेतला पाहिजे चपटे नाकवाले व आधे ठेचले पाहिजेत

    ReplyDelete
  5. http://hindi.revoltpress.com/world/third-world-war-saudi-arab-army-ready-against-syria/

    ReplyDelete
  6. मस्तच विश्लेषण,
    अमेरिका दुतोंडी आहे,हे सर्वातीत आहेच.
    एक रशियाच अमेरिकेला सडेतोड उत्तर देवू शकेल,अशा परिस्थितीत भारताने अमेरिकेचे चमचे न बनता रशियाला साथ द्यावी असे मला वैयक्तिक वाटते.

    ReplyDelete