Thursday, February 25, 2016

युरेका! युरेका! स्मृती फ़सली रे……

बुधवारी लोकसभेत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने आपल्यावरचे सर्व आरोप फ़ेटाळून लावत भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण देशभर झाले आणि माध्यमातील त्यांच्या टिकाकार विरोधकांनाही स्मृतीच्या गुणवत्तेला दाद द्यावी लागली. पण ती दाद मनापासून नव्हती, तर देशभर जो माहोल त्या एका भाषणाने बदलला होता, त्याला हे माध्यमातले विरोधक शरण गेले होते. मात्र प्रत्यक्षात स्मृतीच्या भाषणात कुठे खोट काढता येते, त्याची जाडजुड भिंगे घेऊन तपासणी चालू होती. त्यात काही ‘खोट’ म्हणजे त्रुटी सापडत नसेल, तर निदान दिशाभूल करण्यासारखा मुद्दा तरी शोधणे भाग होते. त्यालाच पुरोगामीत्व असे नाव आहे ना? धडधडीत खोटे बोलल्याशिवाय ज्यांना अन्नाचा घासही घशाखाली उतरत नाही, त्यांनी खुल्या दिलाने स्मृतीच्या भाषणाचे गुणगान करण्याची अपेक्षाच करता येणार नाही. म्हणून दूर अवकाशातले तारे शोधण्यासाठी दुर्बिणा वापराव्यात, तशी उपकरणे लावून संशोधन सुरू झाले आणि आर्किमीडिजचे आधुनिक वारसदार आपल्या अंगावरची वस्त्रेही फ़ेडून ‘युरेका युरेका’, ओरडत न्हाणीघरातून नागडेउघडे धावत रस्त्यावर आले. कोणता मोठा शोध लावला होता त्यांनी? तर लोकसभेत स्मृती इराणी खोटे बोलल्या. त्यांनी संसदेची व देशाची दिशाभूल केली. त्यांनी राजिनामा दिलाच पाहिजे. आणि काय खोटे बोलल्या मनुष्यबळ विकासमंत्री? तर रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर दिर्घकाळ त्याच्या मृतदेहापाशी डॉक्टर्संना जाऊ देण्यात आलेले नव्हते. मुळात तिथे पोहोचलेल्या डॉक्टर्सची साक्ष काढून स्मृतीला खोटे पाडण्यात आले आहे. किती सज्जड पुरावा आहे ना? हेडली खोटारडा असतो, इतक्या ह्या डॉक्टर खरे बोलत आहेत. त्या डॉक्टरनीच स्मृतीचा दावा खोटा पाडला आहे. कारण माहिती मिळताच आपण विनाविलंब रोहितपाशी पोहोचून त्याची प्रकृती तपासली असे त्यांचे म्हणणे आहे.
रोहितच्या आत्महत्येची माहिती मिळताच डॉक्टर राजश्री तिथे पाच मिनीटात पोहोचल्या आणि त्यांनीच तपासणी करून त्याला मृत घोषित केले होते. त्याच आरोग्य विभागात तेव्हा ड्युटीवर होत्या. सहाजिकच त्यांच्या या दाव्याला कोणी आव्हान देवू शकत नाही. पण म्हणून स्मृती इराणी लोकसभेत खोटे बोलल्या, असा दावा कसा करता येईल? स्मृतीने केव्हाही डॉक्टर राजश्री यांच्या हवाला देवून असे विधान केलेले नाही. किंबहूना आज डॉक्टर राजश्री पोपटासारख्या बोलत आहेत, तर त्यांनीच तेव्हा ही माहिती आपल्या मंत्री महोदयांकडे कशाला पाठवली नव्हती? इतके दिवस डॉक्टर त्याविषयी गप्प कशाला बसल्या होत्या? स्मृतीनी लोकसभेची फ़सवणूक करण्याची त्यांना प्रतिक्षा होती काय? रोहितच्या आत्महत्येचे भांडवल करण्याचा डाव इथेच उघडा पडतो. या आत्महत्येविषयी मंत्री म्हणून आपण काय धावपळ केली, त्याचा गोषवारा स्मृतींनी आपल्या भाषणातून दिला. त्यामध्ये स्थानिक पातळीवर किती बेफ़िकीरी व हलगर्जीपणा होता, त्याचाच पाढा त्यांनी लोकसभेत वाचला. डॉक्टर राजश्री वा त्यांच्या खुलाश्याला दुजोरा देणार्‍या शिकरुल्लाह निशा, या दोघांनी स्मृतीला खोटे पाडण्यापेक्षा त्यांच्याच आरोपाला दुजोरा दिलेला आहे. स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात स्थानिक प्रशासन व सरकार किती गाफ़ील व बेपर्वा होते, त्यावर बोट ठेवलेले आहे. तेलंगण राज्यात हे विद्यापीठ आहे आणि केंद्रीय विद्यापीठ असले तरी स्थानिक कायदा व्यवस्था राज्याचा अधिकार आहे. म्हणून बातमी कळताच आपण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला. पण ते कामात आहेत म्हणून आपल्याला त्यांच्याशी बोलूही देण्यात आलेले नव्हते. त्यांच्या खासदार कन्येशीही आपण संपर्क साधला. पण तिनेही कुठला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून आपल्याला माहिती मिळवावी लागली, असे स्मृतीचे कथन आहे.
‘स्मृती खोटे बोलल्या’ या शिर्षकाची जी बातमी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रकाशित झाली आहे, त्यातही तेच म्हटले आहे. ‘असा दावा इराणी यांनी तेलंगण पोलिसांच्या हवाल्याने केला होता.’ म्हणजेच पोलिसांकडून जी माहिती मिळाली, त्यानुसार स्मृतीला बोलावे लागले. कारण जो इतका भयंकर तातडीचा सेक्युलर विषय आहे, त्याबद्दल इतके आठवडे लोटले, तरी पुरोगामी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना केंद्राला माहिती देण्य़ाची गरज भासलेली नाही. किंबहूना तथाकथित सेक्युलर राजकारणी नेत्यांची रोहितला जीवंत ठेवण्यामध्ये किती अनास्था होती, तेच तर स्मृतीला आपल्या भाषणातून सिद्ध करायचे होते. घटनेच्या दिवशी सोडाच, अजूनपर्यंत राव यांनी आपल्याला ‘उलट प्रतिसाद’ म्हणून फ़ोन केलेला नाही, असेही स्मृतीने ठामपणे लोकसभेत सांगितले. मग डॉक्टर राजश्री यांचा दावा कशासाठी आहे? जी माहिती पोलिसांनी स्मृती इराणींना दिली, त्यापेक्षा अधिक माहिती त्यांना पुरवण्याचे कर्तव्य डॉक्टर राजश्री यांनी कशाला पार पाडले नाही? आपला मुख्यमंत्री काही करत नसेल, तर डॉ. राजश्री केंद्रीय मंत्र्याला माहिती द्यायला गेल्या नाहीत, इतके दिवस गप्प राहिल्या. त्यांना सत्य समोर येण्यापेक्षा स्मृतीला खोटे पाडण्यात रस असावा. रोहित मेला काय नि जगला काय? त्याची कुणा सेक्युलर पुरोगाम्यांना फ़िकीर नाही. त्यांना स्मृती वा भाजपाला खोटे पाडण्यात स्वारस्य आहे. त्यात मग रोहित वा तत्सम मुलांनी आपला बळी द्यायचा असतो. मुख्यमंत्री भेटत नसेल, तर या डॉक्टर राजश्री कोण व त्या कुठे कुठे कधी जातात, किंवा त्यांचा फ़ोन नंबर काय, त्याचा सर्व तपशील स्मृतीपाशी असला पाहिजे. पण चंद्रशेखर राव किंवा अन्य कुणा सेक्युलर नेत्याने मात्र केंद्रीय मंत्र्याला त्यासाठी धावपळ करायला आग्रह धरण्यासाठीही साधा फ़ोन करू नये, याला पुरोगामीत्व म्हणतात. त्यासाठी रोहित सारख्यांनी मरायचे असते आणि पुरोगामी हुतात्मे व्हायचे असते.
स्मृतीला खोटे पाडण्यासाठी जितकी बुद्धी वापरण्यात आली, किंवा तत्परता दाखवण्यात आली, तितकी पुरोगामी तातडी रोहितला वाचवण्यासाठी दाखवण्यात आली होती काय? रोहितने आत्महत्या करू नये, यासाठी कुठल्या पुरोगाम्याने किती हातपाय हलवले, याचा कुठलाही तपशील नाही. त्याच्यासह ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, ती हटवून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, म्हणून एका तरी सेक्युलर नेत्याने संबंधित मंत्री म्हणून स्मृती इराणी यांना पत्र लिहून, फ़ोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून काही केले होते काय? आज ज्यांना रोहितचा उमाळा आला आहे, त्यापैकी एकाने तरी तो निराश-हताश असताना आत्महत्येपर्यंत जाण्यापासून त्याला वाचवण्यासाठी कोणते उपाय योजले, त्याचा कुठलाही तपशील समोर आलेला नाही. तो तपशील आणायचा विचारही कुणा सेक्युलर मेंदुला शिवलेला नाही. शिवणार तरी कसा? काही केलेलेच नाही. कुणाही पुरोगाम्याला रोहितच्या हाल वा अन्यायाविषयी काडीची फ़िकीर नव्हती. त्याच्या जिवंत असण्याने कुठलाही पुरोगामी राजकीय लाभ नव्हता. त्यापेक्षा त्याच्या आत्महत्या वा मृत्यूने पुरोगामी लाभ होता. म्हणून हे डोमकावळे त्याच्या वा तत्सम मुलांच्या मृत्यूकडे आशाळभूत नजर लावून बसले होते. त्याला मरू दिले गेले, आत्महत्या करू दिली गेली आणि मगच सगळ्यांची कावकाव सुरू झाली आहे. स्मृती इराणी यांनी त्याकडेच नेमके बोट दाखवले आहे. स्मृतीनी निदान बातमी कळताच धावपळ केली आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याशी संपर्क साधला. तेव्हाही त्यांना दाद मिळाली नाही. हीच तर स्मृतीने पुरोगाम्यांची सादर केलेली लक्तरे आहेत. डॉक्टर राजश्री त्याचीच ग्वाही देत आहेत. कारण त्या रोहितची तपासणी करायला गेल्या, हे मुख्यमंत्र्याला ठाऊक नव्हते आणि तेलंगणाच्या पोलिसांनाही ठाऊक नव्हते. स्मृतीने धावपळ करूनही त्यांना दिल्लीत काही कळू शकत नव्हते. कारण प्रत्येक पुरोगाम्याला रोहित मेलेलाच हवा होता. खोटे कोण किती बेधडक बोलतोय ते यातून लक्षात येते.

https://www.myind.net/police-report-confirms-smriti-irani%E2%80%99s-statement

5 comments:

 1. स्मृती भाषण करण्याआधीच विरोधकांनी तेथून पलायन केलं,
  बाकि पूर्ण भाषणात एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी भाषणात मांडलेल्या मुद्यांचे महत्व कमी होत नाही.

  ReplyDelete
 2. भाऊ एकदम बरोबर. .
  रोहितच्या आत्महत्येचा विषय असो वा दादरिचा विषय असो केंद्र सरकारला बदनाम करण्याचा एकच अजेंडा मिडीयाने केन्द्र सरकार बदललेल्या पासून सुरू केला आहे. स्थानिक किंवा सत्तेतील पक्षाच्या ठराविक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी उचकवुन मुळ विषय बाजूला ठेऊन प्रतिक्रियेवर पुरोगाम्यांना साथीला घेऊन सरकारला बदनाम करण्याचा एकच अजेंडा मिडीयाने घेतला आहे. त्यात आरणव गोस्वामी व राजदीप सरदेसाई आघाडी वर आहेत. हे शोषित शोषकांचे पुढारी झालेत
  JNU Hydrabad university आणि Ishrat issue हयावर media channel वर जोरदार चर्चा सुरू आहे. .
  Times Now वर सराईतपणे अरणब गोस्वामी सारखे जणु आपणच देशाचे कैवारी राष्ट्रभकत असे दाखवत आहे....
  परंतु गेले दोन आठवडे काँग्रेस पक्षाचा एकही प्रतिनिधी Times Now News Hour वर उपस्थित नाही. .
  परंतु आरणव गोस्वामी ने नेहमी प्रमाणे cover दिले आहे व पारसिलीटी करतो आहे पण JNU व इतर काही वक्तव्या मुळे सर्वसामान्याना तो देशाचा कैवारी वाटतोय. खरच या मुळे देश असाच शतकानुशतके गुमराह दिशाभूल झालेल्या अवस्थेत भरकटत आहे. आपल्या देशातील विचारवंत अशा कारस्थानात सामील होतात व देशबांधव व देश सोयीस्कर पणे (कारण शहानिशा करायला मेनदुला मेहनत दयावी लागते हजारो (आता लाखो ) मावळे व स्वतंत्रसैनिका प्रमाणे घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते त्याची कोणाची तयारी नाही ना कोणा एका नेतृत्वाला साथ द्यायची तयारी (देशहिताचया पुढे जात धर्म पंथ प्रांत पक्ष बाजुला ठेऊन )दिशाभूलीचे बळी होत आहेत...
  या सर्व दिशाभूलीवर निरबंध घालणे आवश्यक / अशक्य ( अती लोकशाही/ लोकही शंढ). ..म्हणून. न्यायालयीन लढाई करून बंदी घातली पाहिजे. . Amool Shetye

  ReplyDelete
 3. They used rohits suside as a political tool

  ReplyDelete
 4. नशीब,ठाण्यातील कासारवडवली च्या घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे,नाहीतर या मिडियाने मोदी सरकार आणि फडणवीस सरकारवर अल्पसंख्यांक कुटुंबाचे हत्याकांड घडवल्याचा टाहो फोडला असता

  ReplyDelete
 5. Rohit ne kharokhar ch aatmahatya keli ki to rajkeey bali tharala aahe?

  ReplyDelete