Monday, February 8, 2016

म्हातारपणाचे वेध



गेल्या दोनतीन आठवड्यात सोशल मीडियातील माझा वावर बराचसा कमी होता. त्यामुळे अनेक मित्रांनी चौकशी सुरू केली. प्रश्न व शंकाही विचारल्या. काहीजण काळजी करू लागलेत. अर्थात त्यात माझाही दोष आहेच. ब्लॉग सातत्याने सहसा कोणी लिहीत नाही. पण मी गेली तीन वर्षे हट्टाने ब्लॉग लिहीत आलो आणि नित्यनेमाने लिहीताना वाचकांची संख्याही वाढत गेली. रोजच्या घटनांची दखल घेऊन त्यावर भाष्य करीत असल्याने अनेकांना त्याची सवयही लागली आहे. परिणामी एखादा दिवस त्यात खंड पडला किंवा विलंब झाला, तर अनेक मित्रांना चुकल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. पण दुसरीकडे अशाच मित्रांमुळे व त्यांच्या आग्रहामुळे नित्यनेमाने लिहीले गेले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यापैकीच काहीच्या आग्रहामुळे जुने वेळोवेळी लिहीलेले लेख गोळा करण्याचेही काम हाती घ्यावे लागले. ४७ वर्षात खुप काही लिहीले, ते संदर्भ म्हणून आजच्या पिढीला महत्वाचे वाटते आणि त्याचा काही संग्रह असावा हा आग्रह पुढे आला. शक्य असतील ते लेख गोळा करून त्याची वर्गवारी व पुस्तक रुपाने प्रकाशनाचा विचार सुरू झाला. काही तरूण मित्रांच्या आग्रह-पुढाकार यातून त्याला चालना मिळाली. म्हणून गेले काही दिवस त्याच कामात व्यग्र होतो. त्यामुळे इथे थोडे दुर्लक्ष झाले. लिहीलेले व प्रकाशित झालेले सर्व एख जपून ठेवायची सवय नसणे, हा एक दुर्गुण म्हणता येईल. त्यामुळे हे काम परिपुर्ण करू शकलेलो नाही. पण शक्य झाले तितके जमा केले आहे आणि करतही आहे. त्यांचे विषयवार संग्रह करून निवडक लेखांना पुस्तकरूप देण्याचा विचार आहे. अर्थात काही तरूण मित्रांनी ती जबाबदारी घेतल्यानेच माझ्यासारख्या आळशी माणसाला हे काम हाती घेता आलेले आहे. या मित्रांनी त्यासाठी काही योजनाबद्ध कार्यक्रम आखला आहे. आज अडुसष्टाव्या वाढदिवशी त्याची घोषणा करण्याचा मुहूर्त म्हणूनच साधत आहे. दहाबारा हजार लेख तरी आजवर लिहून झाले. त्यातले निवडक पुस्तक रुपाने प्रकाशित करायचे म्हणजेही काम सोपे नाही. पण विषय व आशय यांच्या वर्गवारीने ते काम सुरू केले आहे.

इतके लिहूनही पुस्तकाच्या रुपाने खुपच कमी प्रकाशन होऊ शकले आहे. त्याला अर्थातच अनेक कारणे आहेत. पहिली बाब म्हणजे पुस्तकाच्या किंमती व वितरणाची समस्या! त्यावर या तरूण मित्रांनी नवा पर्याय काढला आणि तो सोपा सुटसुटीत वाटल्याने त्याचा संकल्प आज करीत आहे. स्वस्तात पुस्तकांची विक्री व वितरण अशी ही संकल्पना आहे. त्याला आम्ही सुवाच म्हणजे ‘सुजाण वाचक चळवळ’ असे नाव दिले आहे. त्यात माझ्या आजवरच्या निवडक लेखांचे पुस्तक रुपाने प्रकाशन करतानाच अन्य प्रकाशने व अन्य लेखकांची पुस्तकेही वाचकांपुढे किमान किंमतीत नेण्याची योजना आहे. वितरणाला ऑनलाईन मार्गाने प्राधान्य देवून वाचकाकडे स्वस्तात व थेट पुस्तके घेऊन जाण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, ते काळच ठरविल. योजनेचे काही भाग आहेत. वर्गणीदार वा सदस्य अशी कल्पनाही त्यात समाविष्ट आहे. पण बाजारमुल्याच्या ५०-७० टक्के किंमतीत पुस्तके घरपोच होऊ शकतील, असा या तरूण मित्रांना विश्वास आहे. निदान त्यांनी मला तरी त्याची खात्री पटवली आहे. म्हणूनच आज त्याची घोषणा करण्याचा मुहूर्त साधला आहे. केवळ माझेच लिखाण नव्हे तर खरोखर चांगले लिहीणारे व नवा भिन्न विचार मांडणारे अनेक लेखक बाजरात दुर्लक्षित राहिले आहेत. अशांनाही त्यातून प्रकाशात आणायचा विचार आहे. वाचक आणि पुस्तके यांना एकत्र आणायची चळवळ, असे याचे स्वरूप आहे. आरंभी त्यात माझ्या निवडक लेखांची पुस्तके छापली जाणे स्वाभाविक आहे. पण लौकरच अन्य लेखक प्रकाशकांचीही पुस्तके त्यातून वाचकांना मिळावीत, असा प्रयत्न होणार आहे. घाऊक व किरकोळ विक्रीतून वाढणार्‍या किंमतीला बगल देवून हा व्यवहार व्हायचा असल्याने त्यात सदस्य वर्गणीदार व ऑनलाईन थेट विक्री यांनाच प्राधान्य द्यायचा प्रयत्न आहे. जे मित्र सोशल माध्यमातून माझ्या फ़ेसबुक व ब्लॉगने जोडलेत, त्यांच्याच माध्यमातून ह्याची सुरूवात सोपी होईल अशी या तरूण सहकार्‍यांची अपेक्षा आहे. म्हणूनच वाढदिवसाचे निमीत्त करून ही घोषणा आज केली आहे.

पुस्तक प्रकाशन ही हौस नाही, तर त्यात भांडवली गुंतवणुक, विक्री, वितरण व आर्थिक समतोल आवश्यक असतो. म्हणूनच तो माझा विषय नाही. लिखाणात शहाणपणा शिकवणे वेगळे आणि व्यवहारी शहाणपण वेगळे असते. तो शहाणपणा माझ्यापाशी असता, तर एव्हाना माझ्याही खात्यात दोनचार डझन पुस्तकांची जमा पुंजी दिसली असती. पण इथे तितकाच विषय नाही. वाचकाला घरात आपल्या मालकीची पुस्तके बाळगता यावी व आपला ग्रंथसंग्रह करता यावा, यासाठी मराठी पुस्तकाच्या किंमतीला लगाम लावणे अगत्याचे आहे. तेच माझ्या सोबत आलेल्या तरूण मित्रांच्या डोक्यात आहे. यात धंदेवाईक विक्रेते सोबत घेण्यापेक्षा वाचकांची मदत घेण्याचा विचार झाला आहे. म्हणून त्यात वाचक मित्रांना आवाहन करतो आहे. ज्यांनी आजवर दोनतीन वर्षात ब्लॉगला असा प्रचंड प्रतिसाद दिला, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनानेच लिहू शकलो, तर त्यांचीच अमूल्य मदत यातही होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. ठराविक संख्येने योजनेत सदस्य वर्गणीदार जमले तर ही चळवळ यशस्वी होऊ शकेल. मराठी मध्यमवर्गाच्या घरात शोकेसमध्ये बाहुल्या शो-पीस दिसतात. त्याजागी पुस्तके दिसावित, अशी त्यामागची अपेक्षा आहे. त्यासाठी विविध मार्गाने मित्र मदत करू शकतील. ही मदत करण्याचे मार्ग कोणते असू शकतील? त्याविषयीची सविस्तर माहिती इमेलद्वारे पाठवली जाईल. संस्थात्मक, व्यक्तीगत वा सामुहिक पद्धतीनेही यात मित्र हातभार लावू शकतील. मात्र अजून ही कल्पना असून त्यातले बॅन्क व अन्य व्यवहारी घटक मार्गी लागल्याशिवाय कोणाची मदत घेता येणार नाही. तोपर्यंत कळ काढावी लागेल. मात्र इमेलद्वारे तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण खालील इमेल पत्त्यावर ब्लॅन्क मेल पाठवून माहिती मिळवू शकाल. या संकल्पना व योजनेविषयी आपली प्रतिक्रियाही तिथेच मिळावी ही अपेक्षा आहे.
(paharekari@gmail.com)

कदाचित हे म्हातारपणाचे लागलेले वेधही असू शकतील. मी कधी वाढदिवस साजरा करीत नाही. कोणाच्या वाढदिवसाला शुभेच्छाही देत नाही. तरी दोन दिवस आधीपासूनच शुभेच्छा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल आभार! पण एका चांगल्या संकल्पाचा मुहूर्त म्हणून वाढदिवसाचा मुहूर्त साधला आहे. बघू तुमच्या प्रतिक्रिया कशा येतात.

- भाऊ तोरसेकर

34 comments:

  1. Happy Birthday Bhavu
    Aap Jiyo Hajaro Saal

    ReplyDelete
  2. Happy Birthday Bhavu Saheb..!!!
    May God Bless You With Long Life!

    ReplyDelete
  3. maza sakriya pathimba. atishay uttam yojana. me punyatil aapala niyamit vaachk aahe. me mail sudhha karto.

    ReplyDelete
  4. भाऊ, तुमच्या ह्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. भाऊ जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, जेणेकरून आमचे म्हणजे सामान्य जणांचे प्रबोधन होत राहील. तुमच्या सारख्या पत्रकाराची / विचारवंताची सोबत (virtual) लाभली हे आमचे सौभाग्य. तुमच्या नवीन उपक्रमाला आमचा १००% पाठींबा राहील.

    ReplyDelete
  6. भाऊ तुम्ही लिहिणे थांबवू नका. आज परखडपणे दुसरी बाजू दाखवतानाच जुने संदर्भ आणि घटना नवीन पिढीला अवगत करून देणारे पत्रकार नाहीत. प्रत्येकजण सोयीचे तेवढे दाखवतो आणि बाकी गोष्टी विस्मरणात जातील ह्याची काळजी घेतो. तुमची आम्हा सर्वाना गरज आहे. त्यामुळे लिहिणे थांबवू नका, निवृत्त होवू नका.. तुमच्या विचाराधीन असलेल्या कार्यक्रमास आणि पुस्तकास शुभेच्छा. हे पुस्तक तुमचे वाचक नक्कीच विकत घेतील.

    ReplyDelete
  7. भाऊ तुमचे लेख अप्रतिम आहेत/असतात, वास्तविकता असते आणि विकावु मीडिया पेक्षा कितीतरी वेगळे असतात, म्हणून वाचण्याचि ओढ़ निर्माण होते

    ReplyDelete
  8. भाऊ तुमचे लेख वाचणे ही खरच आम्हाला पर्वणी असते..सततच्या चालू असणाऱ्या घडामोडींची चीरफाड़ आणि त्यातली मुळ सत्य तुमच्याच् ब्लॉग मधून वाचायची सवयच आता लागली आहे.. म्हणून जस तुम्ही म्हटलत अगदी तसच वाढदिवसाच्या मुहूर्तावर वर नम्र विनंती की लिहित जा आमच्यासाठी...

    वाढदिवसाच्या खुप साऱ्या लेखणीमय शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  9. भाऊ तुमच्यासाठी सर्व काही तुम्ही फ़क्त आदेश दया.शक्य होईल तेवढी विनामूल्य ते हि स्वखर्चाने मदत तुम्हाला मी करणार.

    ReplyDelete
  10. bhau happy birthday

    ReplyDelete
  11. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  12. भाऊसाहेब....

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    आपले सर्व लेख वाचण्याचा प्रयत्न असतो. जास्तीत जास्त लेखांवर सहमती नसतेच. तरीपण वाचणे टाळू शकत नाही. आपल्या लेखांचे पुस्तक येणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीमध्ये स्वस्तात पुस्तके ऊपलब्ध करून देण्याबाबत प्रकाशक आणि लेखकांनी विचार केलाच पाहिजे. इंग्रजीमधे पेपर बॅक आवृत्ती काढतात. 1000 पानांची पुस्तके हलकी आणि सोबत ठेवण्यासाठी सोपी असतात. बसमध्ये, काॅफीशाॅप इ. कुठेही वाचू शकतो. मला वाटते पैसे कमविण्यापेक्षा विचार पोहोचवणे त्यांना महत्वाचे वाटत असावे. मराठीत प्रकाशकांनी याचा नक्की विचार करायलाच हवा.

    पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य लाभो...

    - आपलाच
    सेवकदास

    ReplyDelete
  13. भाऊ, तुम्हांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
    यापुढेही तुमचे लेखन बहरत जावो आणि आमच्या सारख्या तुमच्या ब्लॉगप्रेमींना तुमचे लेख वाचण्याचा आनंद मिळत राहो ह्याच आजच्या वाढदिवशी माझ्याकडून आपणास शुभेच्छा..

    ReplyDelete
  14. Belated Happy birthday. Upakram stutya ...pratyakshyayat yava yasathi shubhechha

    ReplyDelete
  15. Many many happy returns of the day bhau

    ReplyDelete
  16. पुस्तक प्रकाशन व्यवसायाची इकॉनॉमी मलाही कधीच कळली नाही. माझे मत असे ही की मराठी माणसाची इकॉनॉमी हा मोठा अडसर आहे. बहिणाबाईची कविता मी सोपानदेव चौधरींचे चिरंजीव मधुसदून चौधरी ह्यांना छापून दिली. हे पुस्तक रोटरीवर छापल्यामुळे मला 6.44 रुपयांना पडले. ह्ाय पुस्तकाची किमत 20 रुपये ठेवण्याचा सल्ला मधुसूदन चैधरींना दिला. त्यांनी तो मानलाही. त्यामुळे पुस्तक महिनाभरात संपले. अर्थात कवयित्री बहिणाबाईंच्या नावामुळे हा चमत्कार झाला असेल. पहिली गोष्ट क्षी साप्ताहिकाचे मालक भुत्ता आणि रोटरी फोरमनने रोटरी छपाई तुम्हाला परवडणार नाही असा इशारा दिला होता. तो मी अव्हेरला. अन्य तपशील इथे जाहीररीत्या देऊ इच्छित नाही. -रमेश झवर

    ReplyDelete
  17. Bhau tumchya yojanesathi kahi madat haviasel tar majhyasarkhe tarun tayaar ahet tumhi fakt avaaj dya

    ReplyDelete
  18. भाऊ तुम्ही आजच्या पिढीला भुतकाळातील संदर्भ समजावून देऊन लिहीत असता त्यामुळे तुमच्या लिखाण मला तरी खुप आवडते. तुम्ही असेच सतत लिहीत रहा.

    आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

    ReplyDelete
  19. भाऊ , आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🎂🌹🎊

    ReplyDelete
  20. भाउ, तुम्ही बोलणे थांबविले,आम्ही तक्रार केली तुम्ही ऐकले नाही,आम्ही नाराज न होता तुमचे ब्लाॅग वाचत राहीलो कधी प्रतीसाद दिला कधी दिला नाही त्याबाबत तुमचीही तक्रार नाही आमचीही नाही पण आज हात जोडुन विनंती करतो भाउ कृपया लिहीणे थांबउ नका तुमच्या लेखांमधुन आम्हाला उर्जा मिळते नविन जग कळते प्रत्येक घडामोडीचा अर्थ कळतो एक नवी दिशा मिळते.
    असो जास्त काही लिहीत नाही ,आपण सुज्ञ आहात आपल्याही काही अडचणी असतील .
    आपणास वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  21. Dear Bhau,

    Wish you a very happy birthday !!

    I support "सुजाण वाचक चळवळ ".

    Regards
    Samadhan Shinde

    ReplyDelete
  22. Tumhi manane tarun ahat, tyamule mhatarpanache vedh lagu shatat nahit.

    ReplyDelete
  23. भाऊ तुम्हाला माझ्यातर्फे वाढदिवसाच्या ( सहिष्णू !!! ) शुभेच्छा !

    ReplyDelete
  24. Bhau tumchi books 'Amazon "var uplabdh karaa .
    Record break sell hoil .

    Karan tumcha vachak tech savy aahe.

    ReplyDelete
  25. भाऊसाहेब,
    तुमचं, परखड, मार्मिक आणि अभ्यासपूर्ण लिखाण भावत. सध्या तुम्ही संकल्प केल्या प्रमाणे निवडक लेख प्रसिद्ध कराच. पण वाचकांना समग्र भाऊ तोरसेकर सुद्धा आवडतील.तुमच्या लेखांमुळे पुढच्या पिढीला सत्यदर्शन नक्कीच होईल. तुमचं पुस्तक(पुस्तके -हेच योग्य) भेट म्हणून देतांना एक छोटंस सामाजिक कार्य केल्याचं समाधान वाचकांना लाभेल. मनःपूर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete
  26. भाऊ आपणास जन्मदीवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ तुम्ही पुण्यनगरीत उलट तपासणी लेखचा नियमित वाचक होतो खरच भाऊ तुमास् भेटण्याची इच्छा आहे तुम्ही विनँतीला होकार द्याल तुमचा वाचक

    ReplyDelete
  27. भाऊ तुम्हाला जन्मदीवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  28. भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  29. Bhau vadh divsachya hardik subhecha v tumcha nirnay khup changla aahe ,amhi vachak tumchya sobat ahot

    ReplyDelete
  30. Better if all this is also available on net from where interested people can download in this new world. It is difficult to keep books now a day.

    ReplyDelete