Tuesday, February 23, 2016

कॉम्रेड येच्युरींची कांगावखोरीउचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी उक्ती मराठीत प्रसिद्ध आहे. पण कोल्हापूरात येऊन अज्ञानाचे प्रदर्शन मांडणार्‍या मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी यांना दुर्दैवाने मराठी भाषा अवगत नाही. पण समोर बसलेल्या श्रोत्यांना ती म्हण नक्कीच ठाऊक असेल. येच्युरी यांच्या प्रबोधनपर भाषणाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही मराठी उमजत असावी, अशी अपेक्षा आहे. पण इतिहासाचे संदर्भ ठाऊक नसतील, काय करणार? कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमीत्त योजलेल्या समारंभात कॉम्रेड येच्युरी आपले पांडित्य सांगायला आलेले होते. तर निदान पानसरे यांना ते ओळखत असावेत, असे गृहीत धरावे लागते. पानसरे यांचा पक्ष कोणता आणि त्याचा इतिहास काय आहे, त्याचेही भान येच्युरींना असावे, ही अपेक्षा गैरलागू म्हणता येईल काय? कारण तसे असते तर या महाशयांनी कोल्हापुरात येऊन पानसरे यांचा इतका अपमान केला नसता. पानसरेंच्या राजकीय वारश्याची विटंबना नक्कीच केली नसती. ज्या राजकीय घडामोडीचे व त्यातील घटनाक्रमाचे पानसरे यांनी अगत्याने समर्थन केले होते, त्याची हेटाळणी या निमीत्ताने येच्युरी यांच्याकडून झाली नसती. एका ज्येष्ठ कॉम्रेडला श्रद्धांजली अर्पण करताना येच्युरी काय म्हणाले? ‘आणिबाणीपेक्षाही देशात भयंकर परिस्थिती आलेली आहे’. त्याचा अर्थ इंदिरा गांधी यांनी लागू केलेली १९७५ सालची आणिबाणी अन्यायकारक होती, असे येच्युरी यांना म्हणायचे होते काय? तसे असेल, तर तो कॉम्रेड पानसरे यांचा घोर अवमान आहे. कारण आपल्या हयातीत त्या आणिबाणीचे पानसरे व त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बाहू पसरून स्वागत केले होते. त्या आणिबाणीतील कृत्यांना पाठींबा दिलेला होता. म्हणजेच आणिबाणी पानसरे व त्यांच्या पक्षाला आवडलेली व मान्य असलेली राजकीय परिस्थिती होती. त्यावर तोफ़ा डागण्यास पानसरे यांच्या स्मृतीदिनाचे व्यासपीठ वापरणे ही निव्वळ विटंबनाच नाही काय? आणि मजेची गोष्ट अशी की समोर बसलेले पानसरे यांचे निकटवर्ति निमूट हे सारे ऐकत होते. पुरोगामीत्व किती हास्यास्पद होऊन गेले आहे, त्याचा हा पुरावा!

१९७५ सालात इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लावली आणि तमाम विरोधकांना उचलून कुठल्याही खटल्याशिवाय तुरूंगात डांबलेले होते. कशाला व कायद्याच्या कुठल्या निकषावर इतक्या हजारो लोकांना तुरूंगात डांबले गेले होते? तर त्यांच्यामुळे देशाला धोका असल्याचा निष्कर्ष इंदिरा गांधी यांनी काढला होता. त्याची न्यायालयिन छाननीही करायची सोय नव्हती. सरकारच्या लुठल्याही कृती वा निर्णयाच्या विरोधात मतप्रदर्शन करणे, हा गुन्हा मानला गेला होता. घोषणा वा सभासंमेलने घेऊन सरकार विरोधातले मत मांडण्यालाही बंदी होती. किंबहूना सरकारच्या विरोधकांना कुठलाही जाहिर समारंभ योजण्यालाच बंदी घालण्यात आली होती. कारण सरकार विरोधात बोलणे म्हणजेच देशद्रोह व पर्यायाने देशाला धोका, असा निष्कर्ष लागू होता. त्याला आणिबाणी म्हणतात. त्यामध्ये तमाम बिगरकॉग्रेस पक्षीय नेते कार्यकर्ते व संघटना व्यक्ती भरडल्या गेल्या होत्या. अपवाद होता कॉग्रेसजन व कॉ. पानसरे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष! कारण या दोन पक्षांनी आणिबाणी म्हणजेच लोकशाही असे मानलेले होते. त्यापासून पानसरे अलिप्त नव्हते. पक्षशिस्त म्हणून असेल, पण त्यांनीही त्या कालखंडात आणिबाणीचे समर्थन केले होते. तेव्हा कोणी कुठे येच्युरी यांचे नावही ऐकले नव्हते. बहुधा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पाळण्यात येच्युरी आपल्याच पायाचे अंगठे तोंडात घालून चोखताना मार्क्सवादाचे बाळकडू घेत असावेत. म्हणून त्यांना आणिबाणी म्हणजे काय ते ठाऊक नसावे, किंवा पानसरे यांचे आणिबाणी विषयक मत वा भूमिका ठाऊक नसावी. खरे तर येच्युरी वा त्यांच्यासारखे दिवाळखोर पुरोगामी डावे यांनी मार्क्सवाद साम्यवाद कितीसा अभ्यासला आहे याचीच शंका येते. कारण त्यांच्या तोंडी डाव्या विचारवंतांपेक्षा गोळवलकर गुरूजींची अवतरणे अधिक असतात. त्यामुळे त्यांनी संघाचे विचार अभ्यासलेत की डाव्या विचारांचा व्यासंगी अभ्यास केलाय, याचीच शंका येते.

१९७५ सालात आणिबाणी लागू झाली आणि त्याच्याही दोन वर्षे आधी दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांचे निधन झाले. तितके जुने गुरूजी वा त्यांची विविध पुस्तके त्यातले उतारे येचुरी सारख्यांना आठवतात. मग कॉम्रेड पानसरे आणिबाणीत काय करत होते, हे कशाला आठवत नाही? १९७३ पुर्वी गुरूजींनी व्यक्त केलेले विचार आजही जर संघाचेच म्हणून ठामपणे आरोप करायचे असतील, तर आणिबाणीच्या काळातले पानसरे वा त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे विचार आजही त्यांचेच विचार म्हणून बोलावे लागेल. आणि तसेच असेल तर देशात आणिबाणीसारखी स्थिती असेल तर पानसरे सुखावलेच असते. पण पुरोगामी असले मग सोयीनुसार अर्थ वा शब्द बदलण्याचे खास अधिकार मिळाल्याच्या भ्रमात लोक वागत असतात. म्हणून येच्युरी यांच्यासारखे कुमार सप्तर्षी इत्यादि सतत बरळत असतात. आणिबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती म्हणजे काय? भयंकर सोडून द्या, आणिबाणी असती तर येच्युरी वा तत्सम लोकांना जाहिरपणे सरकार वा मोदी विरोधातला शब्दही उच्चारता आला नसता. सभासमारंभ वा घोषणाबाजी दुरची गोष्ट झाली. पण येच्युरी दिल्लीहून कोल्हापुरला येऊन वाटेल तसे बरळू शकले किंवा मुक्ताफ़ळे उधळू शकत आहेत, याचा अर्थच आणिबाणीपेक्षाही प्रचंड अविष्कार स्वातंत्र्य आज उपलब्ध आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे काय त्याचाच थांगपत्ता नसेल, तर असले पढतमुर्ख असेच बरळत रहाणार ना? किंवा मग त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या भिन्न असली पाहिजे. आपण म्हणू तोच शहाणपणा आणि आपल्या विरोधात कोणी भूमिका मांडली, तरी तो विचारस्वातंत्र्याचा संकोच गळचेपी अशी समजूत असेल, तर गोष्ट वेगळी. मागल्या काही वर्षात डावे पुरोगामी विचार म्हणजेच विचार आणि अन्य काही असेल तर तो अविचार; असा एक भ्रम या लोकांनी पोसला आहे. त्यामुळेच वेगळा विचार कानावर येऊ लागल्याने हे लोक कमालीचे विचलीत होऊन गेलेत. डावा विचार लोक फ़ेटाळू लागल्याने त्यांना भयगंडाने पछाडले आहे.

आपल्या भूमिका विचारांपेक्षा अन्य विचार मांडण्याची मुभा म्हणजेच आपली गळचेपी, अशी ही भूमिका आहे. अर्थात जगात जिथे जिथे साम्यवादी कम्युनिस्ट सत्ताधीश झाले, तिथे त्यांनी हाच मार्ग अवलंबिला आहे. तिथे दुसर्‍या पक्ष वा राजकीय विचारसरणीला बंदी असते. अन्य विचारांची कायद्याने व सत्तेचा दंडूका उगारून गळपेची केली जाते. प्रसंगी अशा भिन्न वि़चारांच्या लोकांची कत्तल केली जाते, जसे आज येच्युरींचे साथी कॉम्रेड केरळात संघाच्या कार्यकर्त्यांचे खुन पाडत आहेत. त्याला डाव्यांच्या भाषेत ‘शुद्धीकरण’ म्हणतात. आणि तसेच काही इतरेजनांनी केल्यास त्याला हत्याकांड नाव दिले जाते. ज्या कॉम्रेड स्टालिनचा फ़ोटो मार्क्सवाद्यांच्या कार्यालयात झळकत असतो, त्याने हजारोंच्या संख्येने भिन्न विचारांच्या लोकांची कत्तल केलेली होती. केरळात येच्युरींचे सहकारी तेच करत आहेत. तर नक्षलवादी म्हणून त्यांचेच आप्तस्वकीय डझनाच्या भावात कत्तली करीत असतात. त्याला वैचारिक सहनशीलता म्हणतात. एकूणच कांगावा असतो. जगात कुठल्याही अन्य विचारांपेक्षा डाव्या कम्युनिस्ट विचारांनी मोठी मानवी हत्याकांडे केलेली आहेत. अशी हत्याकांडे कम्युनिस्ट राजवटीत वैध असतात. भारतीय लोकशाहीत ती अवैध असतात. म्हणून भारतात मोदी सत्तेत असूनही येच्युरी जीभ लांब करून मुक्ताफ़ळे उधळू शकत आहेत. मुर्खालाही भांडवली लोकशाहीत वाटेल ते बरळण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच राजदीपपासून येच्युरीपर्यंत कुणालाही बकवास करता येते आहे. त्यांच्याच डाव्या विचारांचे राज्य आले तर त्यातले दोष बोलण्यासाठी हेच दिवटे जीभ उचलू शकणार नाहीत. ते त्यांनाही पक्के ठाऊक आहे. कारण बाजूला चीनमध्ये त्यांचे सतत येणेजाणे असतेच. पण इथे लोक सहन करतात व संयमी आहेत, म्हणून बरळत रहायचे, हा डाव्यांचा स्वभाव झाला आहे. मात्र आता त्यांच्या बरळण्याला लोक भिक घालेनासे झालेत, म्हणून टाहो फ़ोडून रडावे लागते आहे.

3 comments:

  1. भाऊ अप्रतीम लेख खरोखरच तुमच्या लिखाणाला मिच काय कोणीही दाद देइल कारण सत्याची गुणवत्ता खूप खोलातले विश्लेेषन येच्युरीला सनसनाटी चपराक

    ReplyDelete
  2. शिवसेनेही आणिबाणीचे स्वागत केले होते, हे ही सांगा ,

    ReplyDelete
  3. भाऊ देशातील लोकांनी शुद्धीकरण करणे गरजेचे आहे

    ReplyDelete