Wednesday, February 10, 2016

छगन कवन धन पायो!अमेरिकेहून परतल्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपले शक्तीप्रदर्शन करण्याचा विमानतळावरच प्रयत्न केला. पण त्यातल्या त्रुटी लपून राहिलेल्या नाहीत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शब्दांचे सामर्थ्य भुजबळांच्या मागे उभे केले असले, तरी त्यांची रया गेली आहे यात शंका नाही. सत्य समोर येईलच अशी भाषा भुजबळांनी केली असली, तरी त्यातली खोच लक्षात घ्यावी लागेल. तसे नसते तर चिक्की प्रकरण मागल्या वर्षी गाजत असताना राष्ट्रवादीचा नवा चेहरा असलेले जीतेंद्र आव्हाड यांनी विधानसभेतच तेलगीचा विषय उकरून काढला नसता. त्या एका घटनेने भुजबळांना कोण अडचणीत आणतोय, याचा उलगडा होऊ शकतो. म्हणून असेल, भुजबळ आपल्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे असल्याचा हवाला देतात, पण चौकशीचे शुक्लकाष्ट पाठीशी कोणी लावले, त्या नेत्याचे नाव घ्यायला राजी नाहीत. कितीही झटकले तरी भुजबळांच्या मागे लागलेले हे प्रकरण सोपे नाही, की संपणारे नाही. कोणीतरी ठरवून आणि योजनाबद्ध रितीने भुजबळांना त्यात गोवले आहे. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या अन्य प्रकरणांवर धुळ साचत असताना, भुजबळ कुटुंबियांवरच्या कारवाईला मात्र गती मिळालेली आहे. नुसते आरोप मागे पडून त्यांच्या पुतण्याला अटकही झाली व कोठडीतही डांबले गेले आहे. सत्तेत असताना जी अरेरावी भुजबळांनी दाखवली, त्याची किंमत मोजायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. राजकीय सूडबुद्धीची भाषा त्यांना आज सुचते आहे, तर सत्तेत असताना घेतलेल्या अनेक निर्णयांची फ़ेरतपासणी त्यांनीही करायला हरकत नाही. आठ वर्षे धुळ खात पडलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखाच्या प्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेविषयी तत्पुर्वीच्या गृहमंत्र्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची ताळाटाळ केली होती. त्यावरची धुळ झटकण्याचा निर्णय भुजबळ यांनी गृहमंत्री होताच कोणत्या न्यायबुद्धीने घेतला होता? त्यातून दोन आठवडे नाट्य रंगले आणि एकही मिनीट ठाकरे अटकेत जाऊ शकले नव्हते.

तेव्हा कायद्याच्या अंमलाचे नाटक रंगवणार्‍या भुजबळांचे नाक कोर्टातच कापले गेले आणि पुन्हा ते प्रकरण बाहेरही येऊ शकले नव्हते. अशा आरोप खटल्यातून काहीही साध्य होत नाही, म्हणून त्यावर धुळ साचू दिली जाते. हे भुजबळांनाही ठाऊक होते. पण ठाकरे यांना हात लावण्याची हिंमत अन्य कोणाला झाली नाही, ते धाडस आपण गृहमंत्री होताच करून दाखवले, अशी शेखी मिरवण्याच्या नादात भुजबळांनी एके संध्याकाळी त्या फ़ाईलवर सही ठोकली होती. आपल्या विश्वासातील पत्रकारांना त्याची खबर देवून धमाल उडवून दिली होती. राजकीय वातावरण इतके तापले, की पुढले दोन आठवडे मुंबईला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अखेर पोलिस सुरक्षेतच असलेल्या बाळासाहेबांच्या मर्जीनुसार त्यांना पोलिसांनी महापौर बंगल्यातून येऊन ताब्यात घेतले आणि कोर्टात हजर केले होते. मात्र ज्याच्यासाठी इतका मोठा तमाशा भुजबळांनी रंगवला, ती अटक कोर्टात क्षणभरही वैध ठरली नाही. तिथल्या न्यायाधीशांनी विनाविलंब खटलाच बाहेर फ़ेकून दिला आणि प्रकरण कालबाह्य ठरवले होते. त्यातून भुजबळच नव्हे तर तेव्हाच्या संयुक्त सरकारचे नाक कापले गेले होते. थोडक्यात कोर्टानेच त्या अटकेला राजकीय सुडबुद्धीची कारवाई ठरवले होते. ह्या अनुभवातून गेलेल्या भुजबळांच्या तोंडी आज तेच शब्द शोभत नाहीत. ज्याचा अवलंब आपणच यापुर्वी केला आहे, त्याला आज सुडबुद्धी ठरवणे कितीसे योग्य आहे? त्यापेक्षा आपण अशा गुंत्यात कशामुळे फ़सलो, त्याचा भुजबळांनी गंभीरपणे अभ्यास करणे रास्त ठरेल. पक्षातल्या अन्य सहकार्‍यांवर यापेक्षा गंभीर आरोप असूनही ते मुक्त असताना, भुजबळ कुटुंबिय पोलिसांच्या कचाट्यात सापडण्याचे धागेदोरे शोधले तर, यातून सहीसलामत निसटण्याचा मार्ग निघू शकेल. आदर्श वा सिंचन घोटाळ्यातून सहकारी निसटले. कारण त्यांना विश्वासू साथीदारांनी दगा दिलेला नाही. भुजबळांनी आपल्या गोटातील कोणा विश्वासू व्यक्तींनी आपल्याला चव्हाट्यावर आणले, त्याचा माग घेतलेला बरा.

दोनतीन वर्षापुर्वी भुजबळ यांच्या बांद्रा पश्चिम येथील शिक्षण संस्थेचा व्यवहार व व्यवस्था यांच्या संबंधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यामागे त्यांचेच कोणी विश्वासू सहकारी होते. एका सार्वजनिक संस्थेची मालमत्ता व साधने भुजबळ कुटुंबिय खाजगी लाभासाठी वापरतात, अशी तक्रार होती. संस्थेच्या विश्वासू सहकार्‍यानेच ती तक्रार केलेली होती. सुनील कर्वे हे भुजबळांच्या शिक्षण साम्राज्याचे एक संस्थापक सदस्य होते. त्यांनीच ही तक्रार केलेली होती. खरे तर भुजबळांनी तेव्हाच आपल्या गोटात पडू घातलेली ही फ़ुट रोखण्याचे प्रयास केले असते, तर त्यांच्यावर आज ही पाळी आली नसती. कारण सुनील कर्वे हे निव्वळ भुजबळांचे एक सहकारी नव्हते, तर चार्टर्ड अकौंटंट आहेत सहाजिकच् कागदोपत्री ज्या पैशाच्या, खर्चाच्या नोंदी होतात, त्याच्या वैधतेबद्दल जितके ज्ञान कर्वे यांना आहे वा होते, तितके भुजबळांपाशी नाही. भुजबळ कुठल्याही सभेत वा मोर्चात जाऊन बाजी मारू शकतील. तावातावाने आक्रमक पवित्रा घेऊन लोकाचा मुड बदलणे भुजबळांना शक्य आहे. पण कायदा व कोर्टाच्या कामात भुरळ घालणारी शब्दसंपदा उपयोगाची नसते. तिथे आकडे व शब्द नेमके लक्ष्य गाठणारे असावे लागतात. त्यात कुठेही गफ़लत झाली, तर उलटणार्‍या शस्त्राप्रमाणे तेच आकडे शब्द आपल्यालाच घायाळ करतात. भुजबळांना त्याचेच स्मरण राहिले नाही. त्यांनी ज्याला दुखावले तो सहकारी कोणी सहकारी कार्यकर्ता वा नेता नव्हता. तो एक चार्टर्ड अकौंटंट आहे आणि हिशोबाच्या क्षेत्रातला महायोद्धा ठरण्याची क्षमता त्याच्यात आहे. राजकीय हिशोब चुकते करताना आर्थिक हिशोबाच्या गाळात कोणालाही कसे व कुठे गुंतवावे, हे अशा लोकांना नेमके ठाऊक असते. तिथे राजकीय भाषेची आतषबाजी कामाची नसते. म्हणूनच शरद पवार यांच्या कृपेपेक्षाही सुनिल कर्वे यांच्या अवकृपेची घाईगर्दीने दखल घेणे भुजबळांना भाग होते. नेमका तोच गाफ़ीलपणा आज भुजबळांना भोवतो आहे. एम ई टी या संस्थेपासून सुरू झालेली घसरगुंडी त्यांना गाळात ओढत चालली आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे. कर्वे यांना भुजबळांनी उभ्या केलेल्या शिक्षण साम्राज्यात संस्थापक सदस्य म्हणून घेतले, तेव्हा आर्थिक कसरती व हिशोबाचे इमले उभे करण्यासाठी त्यांचा उपयोग असणार. शून्यातून अर्थकारण उभे करताना कायद्याचा कचाट्यातून सुटण्यासाठी अशा जाणकारांची मदत आवश्यक असते. त्यामुळेच व्यापारी व्यावसायिकही आपल्या पत्नीपेक्षा आपल्या सीएवर अधिक विश्वास ठेवतात. त्याच्याच सल्ल्याने वागतात. त्याला दुखावण्याचे धाडस करीत नाहीत. पण कर्वे प्रकरणी भुजबळांनी तीच चुक केलेली दिसते. अन्य कोणी तक्रार करावी आणि भुजबळांच्या आर्थिक बाबींचे समर्थन करण्याला ज्याने पुढे यावे, त्यालाच भुजबळांनी आपल्या विरोधात उभे रहायची वेळ आणली. ती यातली मोठी घोडचुक आहे. ज्यांच्यावर आजतागायत घोटाळ्याचे अनेक आरोप झालेत त्यांच्या कुणा सीएने कधी विरोधातली माहिती दिलेली नाही, की पुढे आणलेली नाही. उलट तशी वेळ आली तर संबंधितांचे सीए बुरूजासारखे प्रतिकाराला उभे ठाकलेले दिसतील. भुजबळांची कथाच वेगळी आहे. आपल्या सुरक्षा कवचालाच त्यांनी आपल्या विरोधात उभे केले. आज ज्या प्रकरणाचा इतका बट्ट्याबोळ झाला आहे, त्याची सुरूवातच मुळात कर्वे यांच्या कुरबुरीपासून झाली होती. आपल्या संस्थेतला हाच विश्वासाचा सहकारी नाराज होणार नाही, याबद्दल भुजबळ जागृत राहिले असते, तर प्रकरण इतके चिघळले नसते. भुजबळांची गोची अशी आहे, की त्यांनाही आपल्या आर्थिक व्यवहारात कुठे खाचाखोचा आहेत, याची माहिती नसेल, तितके तपशील त्यांच्यापासून दुरावलेल्या कर्वे या मित्राला माहिती असतील. मग ते शिक्षण साम्राज्य असो किंवा अन्य कुठल्या सरकारी व्यवहारातून मिळवलेले लाभ असोत. कुठून पैसे आले व त्यांना कोणते नाव देवून कुठे गुंतवले वा फ़िरवले, त्याच्या जंत्रीचा हा मामला आहे. विविध तपास यंत्रणा एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत, तो प्रश्न आहे कुठल्या मार्गाने पैसा आला व कुठून कुठे कसा फ़िरत गेला. थोडक्यात, छगन कवन धन पायो!

No comments:

Post a Comment