Wednesday, February 3, 2016

भवानीआई रोडगा वाहीन तुलाभाजपाची पंतप्रधान पदाची उमेदवारी नरेद्र मोदींना मिळाल्यापासून तिथे ज्येष्ठ म्हणून मिरवणार्‍या कालबाह्य नेत्यांची अखंड कुरबुर सुरू आहे. कालपरवा पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला शिव्याशाप दिले आहेत. आपण काय नवे सांगितले, हे त्यांचेच त्यांनी शोधायला हरकत नाही. २०१३ च्या मध्यास पक्षाच्या गोव्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मोठ्या मताधिक्याने मोदीं यांना पक्षाचा चेहरा बनवण्याचे घाटत असतानाच त्याची सुरूवात झालेली होती. पक्षाचे प्रचारप्रमुख अशी मोदींची निवड होऊ घातली असताना, त्याला नकार देवून ज्येष्ठ नेते अडवाणी तिथून निघून गेले होते. तरीही मोदींच्या नावावरच शिक्कामोर्तब झाले आणि अडवाणींनी पक्षाच्या सर्व पदांचे राजिनामे देणारे पत्र पक्षाध्यक्षाला लिहीले होते. पण माध्यमातल्या बातम्या होण्यापेक्षा त्याचा काडीमात्र परिणाम झालेला नव्हता. असे का व्हावे, याचा विचार अडवाणींनी तेव्हाच केला असता, तर आज इतके केविलवाणे व्हायची पाळी त्यांच्यावर आली नसती. पक्षात आता व्यक्तीचे स्तोम माजले आहे. विचार व तत्वाला धरून चालणारा पक्ष राहिला नाही. आपापले व्यक्तीगत स्वार्थ घेऊन पक्ष ओलिस ठेवला जातो, अशा तक्रारी त्यांनी पत्रातून केलेल्या होत्या. पण डाळ शिजली नाही आणि अडवाणींनी राजिनामे मागे घेऊन रुसवेफ़ुगवे सुरू केले. कधी मुलाखतीतून तर कधी ब्लॉग लिहून, त्यांनी सतत मोदींना अपशकुन करण्याचे डाव खेळले होते. आता अडवाणी यांना त्यांच्याच वयोगटातील आणखी काही लोकांची साथ मिळत आहे. मुरलीमनोहर जोशी, शांताकुमार वा यशवंत सिन्हा हे त्यांचे उतारवयातील सवंगडी झाले आहेत. त्यांनी अधूनमधून शिव्याशाप देण्याचा एक सपाटाच लावला आहे. यशवंत सिन्हा यांनी गोव्यात अलिकडे केलेले विधान त्याच रडगाण्याचा पुढला अध्याय म्हणता येईल.

सिन्हा यांनी गेल्या १९ महिन्यातील मोदी सरकारच्या कारभाराची आणिबाणीच्या १९ महिन्यांशी तुलना केलेली आहे. मग आणिबाणीनंतर मतदाराने इंदिरा सरकारला कसे उध्वस्त करून टाकले, त्याची आठवण करून देत, मोदींनाही तेच भोगावे लागेल असे शाप दिले आहेत. मुद्दा इतकाच, की इंदिराजींनी आणिबाणी लावली, तेव्हा हे सिन्हा काय करत होते? राजकारण वा पक्ष संघटना यात सिन्हांचे योगदान कुठले व किती? राजीव गांधी यांच्या कारकिर्दीनंतर सिन्हा राजकारणात आले. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी राजीव विरोधातले बंड पुकारून नवी राजकीय चुल मांडली, त्या जनता दलातून सिन्हा यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पण लौकरच सिंग सरकार कोसळले आणि तेव्हा चंद्रशेखर यांच्या बंडखोर गटातून सिन्हा हंगामी सरकारचे मंत्री झालेले होते. तेही सरकार डळमळीत होते. तेही कोसळले आणि पुढल्या कालखंडात भाजपाला चांगले दिवस येण्याची चाहुल लागली असल्याने, सिन्हा भाजपात दाखल झाले. या सर्व कालखंडात त्यांनी पक्षासाठी वा संघटनेसाठी कोणते योगदान केले? आज पक्ष व त्याच्य सरकारचे मोजमाप घ्यायला बोलणारे सिन्हा, यांनी भाजपासाठी किती योगदान दिलेले आहे? राजकारण करताना थेट सत्तापदापासून आरंभ करणारे हे गृहस्थ, जनतेच्या भावनांचे हवाले आज देत आहेत. तर त्यांनी जनतेत राहून आजवर कोणते काम केले आहे? जनमानसाचा सुगावा लागावा यासाठी जनसंपर्कात सिन्हा कितीसे असतात? ज्या माणसाने लोकप्रिय पक्षाच्या लाटेवर स्वार होऊन सत्तापदे उपभोगली आणि त्यातून ज्येष्ठता संपादन केली, त्याने जनतेच्या मताचे हवाले देण्यात कितीसा अर्थ आहे? आणिबाणीशी मोदी सरकारची तुलना करण्यातला विरोधाभास तिथेच स्पष्ट होतो. आपल्याला सत्तेत कुठलाच सहभाग नाही, याची पोटदुखी व्यक्त करण्यापेक्षा सिन्हा यांनी काहीही दुसरे केलेले नाही.

अडवाणी यांनी आपल्या ज्येष्ठतेला शोभेसे वर्तन त्यानंतर केले नाही. आपलाच चेला असलेल्या मोदींच्या विरोधात कुरापती करणे वा त्याला अपशकून करण्यातून ज्येष्ठतेची साक्ष मिळत नसते. मोदींना उमेदवारी मिळाल्यावर राजिनामे देवून मागे घेण्यापासून मतदारसंघासाठी रुसून बसण्यापर्यंत अडवाणींनी केलेला मुर्खपणा जगजाहिर आहे. अशा लोकांना वडीलधारे वागता येत नाही. पण मान व अधिकार मात्र वडीलधारेपणाचा हवा आहे. तो मिळणार नसेल तर अखंड शिव्याशाप देण्याचे रडगाणे चाललेले असते. संत एकनाथ महाराजांनी अशा वयातील रडगाण्यावर जे भारूड लिहीले आहे, त्याचे भाजपातील हे ज्येष्ठ स्मरण करून देतात. घरातली म्हातारी प्रत्येकाला शिव्याशाप देवून देवीकडे जो नवस करते, त्यापेक्षा अडवाणी, सिन्हा, जोशी वा शांताकुमार यांची भाषा किंचित वेगळी असते काय? कोणाला खरूज येऊदे किंवा कोणाला बोडखी करण्यासाठी भवानीआईला रोडगा वाहण्याचा नवस करण्याचाच हा प्रकार नाही काय? यशवंत सिन्हा यांची गोव्यातील विद्वत्ता त्यपेक्षा वेगळी नाही. कारण संवाद हे लोकशाहीचे द्योतक असल्याची ग्वाही देताना, त्यांनी कोणाशी किती संवाद साधला आहे, याचाही खुलासा करण आवश्यक ठरेल. संवादासाठी कोणी चौकात जाऊन आरोळ्या ठोकत नाही. आपल्या कुटुंबात किंवा गोतावळ्यात संवादाची सुरूवात होत असते. ज्या पक्षात सिन्हा अजून आहेत, त्या पक्षातल्या अन्य कार्यकर्ते वा नेत्यांशी त्यांनी आपल्या मनातल्या शंकांविषयी कितीसा संवाद साधला आहे? मोदी हा दुय्यम विषय आहे, पक्षाला महत्व असते. जिथे आपल्याच पक्षाची चुक होते आहे, त्याविषयी पक्षात संवाद सुरू करायला सिन्हांना कोणी रोखलेले नाही. विविध पातळीवरचे नेते व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन सिन्हा चुका दाखवू शकले असते. त्यापेक्षा चौकात उभे राहून बोंबा ठोकण्याला ते संवाद समजत आहेत.

त्यांना कुठले तरी मोठे सत्तापद दिले असते वा मिळाले असते, तर सिन्हा यांना संवाद चालू असल्याचा साक्षात्कार झाला असता. पण पाऊणशे वयमान झालेल्यांना सत्तापद नाही, असा दंडक घातला गेल्याने सिन्हा यांच्या आशा मावळलेल्या आहेत. त्यामुळेच संवाद संपल्याची बोंब ठोकण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. ज्येष्ठ नेते म्हणून मिरवणार्‍यांचे तेच खरे दुखणे आहे. जेव्हा पंधरा वर्षापुर्वी तेच सत्तेत होते, तेव्हा त्यांनी कोणाशी किती संवाद केला होता? मागल्या दहा वर्षात युपीए सरकार सत्ता उपभोगत होते, त्या काळात कितीसा संवाद चालू होता? संसद बंद पाडण्याची प्रथा आजची नाही, ती मागल्या दोन दशकातील आहे. तेव्हा लोकशाही गुण्यागोविंदाने नांदत होती असे सिन्हा यांना म्हणायचे आहे काय? तसे असते तर लोकपाल आंदोलन किंवा निर्भयाकांड इतके कशाला गाजले असते? लोक रस्त्यावर येऊन धुमाकुळ घालत होते आणि त्यांच्याही दोन शब्द बोलायला तात्कालीन युपीए सरकार कुठला संवाद साधत होते? रामलिला मैदानावरून मध्यरात्री रामदेव यांच्यासह अनुयायांना पोलिस फ़ाटा आणून पळवून लावण्यात आले, त्याला सिन्हा संवाद समजतात काय? त्याला आणिबाणीतले इंदिरा सरकार म्हणतात. जेव्हा अपरात्री नेत्यांना अनुयायांना उचलून गजाआड फ़ेकलेले होते. त्याच आणिबाणीचे स्मरण २०११ साली सिन्हा यांना कसे झाले नाही? त्याची किंमत जशी इंदिराजींनी मोजली, तशीच त्यांच्या सुनेला व नातवाला २०१४ च्या निवडणूकीत मोजावी लागली आहे. सिन्हा यांना त्या निकालानंतर आणिबाणी आठवली नाही. कारण तोपर्यंत आपल्यालाही मंत्रीपद किंवा सत्तापद मिळण्याची आशा होती. ती संपली आणि सिन्हा कंपनीला आणिबाणी व संवादाचे स्मरण झाले आहे. त्यामुळे मग ‘रोडगा वाहीन तुला’ असले भारूड अडवाणींचे सवंगडी गाऊ लागले आहेत. त्यातून आपल्यालाच जगापुढे आणखी केविलवाणे बनवण्यापेक्षा अधिक काही साध्य होणार नाही.

4 comments:

  1. भाऊ ...........मस्त लेख. !! ' रोडगा वाहीन तुला ' ह्याचा उल्लेख तर ' भन्नाटच ' ...............हि सर्व चौकडी ' वयाने ' वाढली म्हणून ' ज्येष्ठ ' म्हणायाचे अशी मंडळी आहेत. हे सर्व भाजपा मधले अपशकुनी ' मामा ' आहेत. अडवाणी तर कधी पासून पंतप्रधान पदासाठी स्वताच्या गुढग्याला ' बाशिंग ' बांधून बसले होते. गोव्यामध्ये झालेल्या बैठकीत ' नरेंद्र मोदी ' यांची भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड होताच ' त्यांना ' ताप भरला ' व ते बैठकीला आले नाहीत. यशवंत सिन्हा हि त्या बैठकीत गेलेले न्हवते. वर त्यांनी पत्रकारांना मुलाखत देताना सांगितले होते कि त्यांना ' नमोनिया ' झालेला नाही. अजून अनेक लोक हे विसरलेले नाहीत. बरे यशवंत सिंह यांचा मुलगा ' पंतप्रधान मोदी ' यांच्या मंत्रिमंडळात आहेच. तरी पदाचा लोभ आणि तोंडातून ' लाळ ' सुटायची काही थांबत नाही.

    ReplyDelete
  2. भाऊ, वयावर नका जावू, पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी अपर कष्ट घेणारे अनमोल महातारे असे मातीमोल करून भवितव्य वधारणारे नाही. हेच फळ यावे का मज कर्माला , असा विचार या जगात प्रत्येकजन विशेषत्वा जो मन-तन-धन अर्पून झटतो, तो करणारच … for अटलबिहारी आणि अडवाणी

    ReplyDelete
  3. बरे, यांच्या मुलाला मंत्रिपद मिळाले आहेच की , पण मलाच पाहिजे अन ते पण सरनावर जाई पर्यन्त पाहिजे , ही यांची वृति , आत्ता यांना मंत्त्रिपद देऊ दया , मग मोदी चांगले , सरकार चांगले , कारभार चांगला ,

    ReplyDelete