Thursday, March 15, 2018

आत्मविश्वासाचा फ़ाजीलपणा

उत्तरप्रदेशातील पोटनिवडणूकांनी त्रिपुराच्या भाजपा विजयावर सावट आणले आहे. राजस्थान वा अन्य पोटनिवडणूकातील भाजपाचा पराभव आणि उत्तरप्रदेशातील अपयश, यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. तसे बघितले तर उत्तरप्रदेशपेक्षाही राजस्थानचा पराभव मोठा आहे. तिथे लाखाच्या फ़रकाने कॉग्रेसने भाजपाच्या दोन जागा हिसकावून घेतल्या होत्या. तुलनेने गोरखपूर वा फ़ुलपूरचा समाजवादी विजय छोट्या फ़रकाने झालेला आहे आणि त्याविषयी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केलेले स्पष्टीकरण लंगडे आहे. या दोन्ही जागा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रिकाम्या केलेल्या होत्या. त्यामुळेच तिथे त्यांच्या प्रभावाची कसोटी लागणार होती. राजस्थान येथील पोटनिवडणूका अन्य कारणांनी रिक्त झालेल्या होत्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात यश मिळवू शकणार नसतील, तर त्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह लागत असते. खरे तर निकाल असे लागतील ही अपेक्षा मतदान संपल्यावरच स्पष्ट झालेली होती. पन्नास टक्केच्या पलिकडे मतदान होऊ शकले नाही, म्हणजे या दोन प्रमुख राज्य नेत्यांच्या मतदारानेच त्यांच्याकडे पाठ फ़िरवली असाच अर्थ काढला जाऊ शकतो. इतके कमी मतदान झाले तर बहुधा विरोधकांनाच संधी मिळत असते. मोठ्या वा जास्त सभा घेणार्‍या या नेत्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांना पुरेसे मतदान घडवून आणण्यास प्रवृत्त केलेले नाही, हेच दिसून येते. म्हणूनच योगी आदित्यनाथ फ़ाजील आत्मविश्वास म्हणतात, ही पक्षासाठी चिंतेची बाब आहे. आपण मोदींच्या नावावर घरात बसून जागा जिंकू शकतो, असा आत्मविश्वास त्यामागे असू शकतो. किंबहूना लोकसभा व विधानसभा भाजपाने कशामुळे दमदार यशाने जिंकल्या, त्याचा थांगपत्ता त्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला लागलेला नसावा. अन्यथा असला फ़ाजील आत्मविश्वास लज्जास्पद पराभवापर्यंत घेऊन गेला नसता.

लोकसभा किंवा विधानसभेतील भाजपाचे दैदिप्यमान यश, हे निव्वळ मोदींच्या लोकप्रियतेचे यश अजिबात नव्हते. सुसंघटित कार्यकर्त्यांची फ़ौज आणि मतदाराला प्रवृत्त करण्यातून वाढलेले मतदान, हे भाजपाच्या यशाचे खरे समिकरण होते. मागल्या लोकसभेत म्हणजे चार वर्षापुर्वी याच दोन जागा भाजपाने जिंकल्या, तेव्हा तिथे बसपा व सपा यांच्या मतांची बेरीजही भाजपाच्या मतांपेक्षा कमी होती. म्हणूनच तेव्हासारखे मतदान झाले असते, तर आजही त्या दोन्ही जागा भाजपाला राखता आल्या असत्या. पण तसे झालेले नाही. कारण अपयश हे मतदानाच्या टक्केवारीत दडलेले आहे. मोदीपर्व सुरू झाल्यापासून जिथे भाजपाने नव्याने मुसंडी मारली वा यश संपादन केले, तिथे एकूण मतदानात झालेली भरघोस वाढ, त्या पक्षाला मोठे यश देऊन गेलेली आहे. लोकसभेच्या वेळी तर विक्रमी मतदान झाले होते आणि विधानसभेतही अधिकचे मतदान झालेले होते. यावेळी गोरखपूर वा फ़ुलपूर येथील मतदानाचे आकडे बघितले तरी फ़रक कुठे पडला आहे, त्याचे उत्तर मिळू शकते. सपा व बसपा यांनी त्याच दोन्ही जागी २०१४ मध्ये मिळवलेली मतांची बेरीज आजही वाढलेली नाही. म्हणजेच त्यांना त्यांच्या निष्ठावान मतदाराने प्रतिसाद दिला, तसा भाजपच्या २०१४ च्या मतदाराने उत्साही प्रतिसाद यावेळी दिलेला नाही. ४३ ते ५० टक्के इतकेच मतदान त्या जागी झाले. याचा अर्थ मायावती व अखिलेश यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायला त्यांचा मतदार जितक्या उत्साहाने घराबाहेर पडला, तसा भाजपाचा मतदार केंद्रात आला नाही. तिथेच भाजपाचा पराभव निश्चीत झाला होता. जी निवडणूक यंत्रणा २०१४ व २०१७ मध्ये भाजपाने तिथे राबवली होती, ती शिथील पडण्याला फ़ाजील आत्मविश्वास असे मुख्यमंत्र्यांनी नाव दिलेले आहे. त्यात तथ्य अजिबात नाही. सत्ता हाती आल्यापासून भाजपाचे कार्यकर्ते व नेते किती आळशी झालेले आहेत, त्याची ही साक्ष आहे.

आता अर्थातच या पराभवाचे खापर मोदी सरकार व पक्षाध्यक्ष अमित शहांच्या माथी फ़ोडले जाणार. पण त्यांनी गल्लीबोळातील प्रत्येक निवडणूकीत काम करायचे असेल, तर मौर्य वा योगी यांनी काय नुसती सत्ता उपभोगायची असते काय? बिहारमध्ये लालू तुरूंगात पडलेले आहेत आणि त्यांचा धाकटा मुलगा तेजस्वी पक्षाचा किल्ला एकाकी लढवतो आहे. तरीही त्याने जिद्दीने प्रचार करून अरारिया व जहानाबाद ह्या जागा राखलेल्या आहेत. एका बाजूला लालू मदतीला नाहीत व मागल्या खेपेस सहकार्याला असलेले नितीशकुमार आज भाजपाच्या सोबत गेलेले आहेत. तरीही तेजस्वी आपल्या दोन्ही जागा जिंकून दाखवत असेल, तर योगी व मौर्य यांचे अपयश डोळ्यात भरणारे मानावे लागेल. सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी मतदाराचा विश्वास अधिक संपादन करायला हवा होता. निदान त्यांच्या मतदारसंघात त्यांना आपले प्रभाव सिद्ध करण्याची ही उत्तम संधी होती. मतदार घरातून त्यांच्यासाठी बाहेर पडण्यातून तो प्रभाव दिसला असता. मोदी शहांनी अखंड राबून त्यांना उत्तरप्रदेशची सत्ता मिळवून दिली. मग या सत्ताधीशांनी आपल्या गल्लीबोळातील जागा राखण्याचे कर्तृत्व तरी दाखवायला नको काय? तिथे तोकडे पडायचे आणि नंतर फ़ाजील आत्मविश्वासाची सारवासारव करायची. याचे एकमेव कारण असू शकते. मोदींच्या युगात येऊन पोहोचले असले तरी भाजपाचे अनेक नेते आजही जुन्या जमान्यातली मानसिकता घेऊन जगत आहेत. मोदीही आपल्या लोकप्रियतेवर विसंबून रहात नाहीत आणि अपार कष्ट उपसतात. त्यात कुठेही फ़ाजील आत्मविश्वास दिसणार नाही. मग योगी वा मौर्य यांना खोट्या आत्मविश्वासाचे प्रदर्शन मांडायला कोणी सांगितले होते? मोदी शहांनी मिळवून दिले, तेवढे राखायचेही कर्तृत्व यांना दाखवता येणार नसेल, तर भाजपाला मोदी पश्चात भवितव्य असू शकत नाही.

नवनवे प्रांत काबीज करीत सुटलेल्या अमित शहा व पंतप्रधान मोदी यांच्यासाठी हा मोठा धडा आहे. नुसते नवे प्रदेश पादाक्रांत करून उपयोग नाही. तर तिथे नव्याने सत्तेत बसवलेला आपला प्रतिनिधी वा नेता तितक्याच जागरुकपणे भाजपाची सत्ता लोकाभिमूख बनवतो किंवा नाही, याला प्राधान्य देण्याची गरज मोदी व शहांना ओळखता आली पाहिजे. मध्यप्रदेशचे शिवराजसिंग चौहान व छत्तीसगडचे रमणसिंग यांनी मोदीपुर्व काळातही आपल्या बळावर सातत्याने जिंकून दाखवले आहे. परंतु गुजरातचे रुपानी वा आनंदीबेन पटेल मात्र मोदींनी रुजवलेल्या झाडालाही पुरेशी फ़ळे देण्यात अपेशी ठरलेले आहेत. भाजपाकडे स्वयंभूपणे राज्याचा कारभार करू शकतील अशा नेत्यांची वानवा असल्याची ही लक्षणे आहेत. त्यातच अनेकजण इतके आगावू आहेत, की त्यांचा पक्षाला उपयोग कमी व अपायकारकता अधिक आहे. आपल्या मुक्ताफ़ळे व वादग्रस्त विधानांनी ते पक्षाला हानी पोहोचवित असतात. साक्षी महाराज वा साध्वी निलांजना आज कुठे आहेत? त्यांची अकारण चालणारी बकवास जास्त हानी करणारी असते. त्यांना लगाम लावणे वा सरळ बाजूला करण्याचे धाडस नेतृत्वाला दाखवता आले पाहिजे. खरेतर याच पोटनिवडणूकीतून महागठबंधन निरूपयोगी ठरवण्याची उत्तम संधी योगींना मिळालेली होती. २०१४ इतके मतदान घडवून आणले असते तरी सपा बसपाची बेरीज तोकडीच पडली असती आणि विरोधकांची एकजुट निकामी असल्याचा संदेश गेला असता. ती शक्यता कमी मतदानाने संपवली. याला फ़ाजील आत्मविश्वास म्हणत नाहीत, तर पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला दगा देणे म्हणतात. यातून एक गोष्ट साफ़ झाली. पुन्हा लोकसभेत बहूमत मिळवण्यात मोदींना अडचण येणार नाही. पण तितक्याच उत्साहात ते राज्यातली सत्ता मिळावी म्हणून कष्ट उपसणार नाहीत. कारण देशाची सत्ता हाकताना दिवाळखोर नेत्यांची चैन मौज भागवणे, हे राष्ट्रीय नेत्याचे काम असू शकत नाही.

6 comments:

  1. ह्या योगीचे कर्तृत्व काय? मग मुख्यमंत्री कसा केला याला? हाच तर नेतृत्वाचा फाजील आत्मविश्वास आहे. यांना हवीत फक्त ताटा खालची मांजरे.

    ReplyDelete
  2. भाऊ मला आपले जुने लेख वाचायचे असेल तर ते मोबाईल वर सर्च करण्याची काही सोय नाही ती असल्यास फार बरे होईल वेब व्हर्जन वर आहेपण मोबाईल वर्जन वर नाही

    ReplyDelete
  3. जिंकले ते मोदीं हरले ते स्थानिक

    ReplyDelete
  4. अगदि तळागाळातील नेत्यांनी सुध्दा ह्यापुढे प्रत्येक पाऊल फक्त आणि फक्त पक्षाच्या हीत लक्षात घेवून उचलले नाहीतर हे टायटॅनिक समोर दिसत असलेल्या ’ हिमनगा ’वर आदळून कधी तळाला पोहोचेल कळणार पण नाही.

    ReplyDelete
  5. what you have written at the end is correct, alone Modi can not do any miracle, down the line level II & III leaders have to put in their efforts

    ReplyDelete
  6. सगळ्या गोष्टी मोदी शाह यांनी पाहायला हव्यात मग बाकी काय करणार. हे थांबायला हव नाही तर 2019 अवघड आहे. पुन्हा एकदा सगळे लबाड एकत्र येत आहेत.

    ReplyDelete