Monday, March 5, 2018

‘पिडी’ताची गोष्ट

pidi cartoon के लिए इमेज परिणाम

मध्यंतरी म्हणजे गुजरात विधानसभा निवडणूकीपुर्वी राहुल गांधी यांच्या प्रतिमा उज्वलीकरणाचे काम म्हणे कुणा परदेशी कंपनीकडे सोपवण्यात आले. तसेच त्यांच्याच नावे चालविल्या जाणार्‍या सोशल मीडियाचे खाते ही कुठल्या तरी चटकदार ओळी लिहू शकणार्‍या गटाकडे देण्यात आले. पुढे त्या चटकदार वाक्यांना प्रतिसाद मिळत गेला आणि अमेरिकेतील काही विद्यापीठांमध्ये मुलाखती देऊन राहुल वाजतगाजत मायदेशी परतले. त्यातून त्यांनी नवा अवतार धारण केल्याचाही डंका पिटला गेला होता. योगायोग असा, की त्यानंतर गुजरातची निवडणूक आली आणि ती मोदी व भाजपाला अवघड झालेली होती. ज्या मतदारांच्या भक्कम पाठींब्यावर मोदींनी राष्ट्रीय राजकारणात झेप घेतली, तो गुजराथी होता. पण मागल्या दिड वर्षात मोदींनी नोटाबंदी व जीएसटी असे दोन महत्वाचे निर्णय घेतले आणि त्याचे सर्वाधिक चटके बसू शकणारा वर्गही तोच गुजराथी घटक होता. त्याच वेळी हार्दिक पटेल व अन्य घटकही मोदींच्या विरोधात गेलेले होते. अशा पार्श्वभूमीवर गुजरातचे मतदान झाले आणि त्यात आपल्याला झटका बसणार हे ओळखून मोदींनी तिथे आपले सर्वस्व पणाला लावलेले होते. सहाव्यांदा विधानसभेची निवडणूक किती अवघड असते, त्याचे प्रत्यंतर सध्या त्रिपुरामध्ये डाव्या आघाडी व मार्क्सवादी पक्षाला आलेलेच आहे. मग सहाव्यांदा गुजरात जिंकताना मोदींसाठी किती मोठे आव्हान असेल, ते वेगळे सांगायला नको. पण मोदींनी ती बाजी मारली आणि गुजरातमध्ये सहाव्यांना भाजपाला सत्ता मिळवून दिलेली आहे. त्या बाचाबाचीमध्ये कॉग्रेसला २०-२५ जागा अधिक मिळाल्या तर मोदी संपल्याचा डांगोरा पिटला जात होता. अशावेळी राहुलना किती नशा चढावी? आपल्या ट्वीटसचे कौतुक होते म्हटल्यावर ते कोण लिहीतो? अशा चौकशीला त्यांनी जाहिर उत्तर दिले की पीडी हा त्यांचा लाडका कुत्रा ते काम बघतो. याला मस्ती म्हणतात.

आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे तर तो सन्मानाने व अदबीने पत्करण्याचे सौजन्य राहुल दाखवू शकले नाहीत. त्यांनी कुत्र्याला बिस्कीटे भरवण्याचे चित्रण सोशल मीडियात टाकून आपल्या हुशारीचा दाखला दिलेला होता. केवळ अशा वागण्यातून ते कॉग्रेस पक्षाला कसे रसातळाला घेऊन जात आहेत, त्याची प्रचिती यायला हरकत नाही. लोकांना तुमच्याविषयी उत्सुकता असते, तेव्हा त्या सदिच्छा असतात. त्याची अशी टवाळी करण्याने तुम्ही मोठे होत नसता. पण हे समजून घेण्याइतकी बुद्धीच नसेल तर दुसरे काय व्हायचे? चारपाच पिढ्या देशावर राज्य केलेले असले, मग सामान्य जनता ही दुबळी व अगतिक क:पदार्थ वाटू लागणे स्वाभाविक आहे. त्यातूनच अशा प्रतिक्रीया व प्रतिसाद येत असतात. ज्यांच्या वाट्याला असले अनुभव आलेले असतात, ते सुचक शब्दात त्याचे कथनही करीत असतात. आरंभीच्या काळात राहुलना भाषणाचा मसुदा लिहून देणार्‍या जयराम रमेश यांनी त्याच दरम्यान राहुल यांचे व त्यांच्या सवंगड्यांचे नेमके वर्णन केलेले होते. कॉग्रेस समोर सध्या अस्तित्वाचा संघर्ष उभा असून पक्षात साम्राज्य संपलेले लोक सम्राटाच्या मस्तीत वागत आहेत, असे रमेश यांनी म्हटलेले होते. आपला सोशल मीडीया अकौंट लाडका कुत्रा पिडी चालवतो, हे त्याचे उदाहरण आहे. आता त्रिपुरा वा इशान्येकडील राज्यात कॉग्रेसचा धुव्वा उडालेला असताना पक्षाध्यक्ष गायब आहेत. बाकीच्या सरदार आणि आश्रीतांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. किंबहूना ह्या लाडक्या कुत्र्यानेच राहुलसह कॉग्रेसचा बोजवारा उडवलेला आहे. पण ते सत्य बोलायचे कोणी, ऐकायचे कोणी? मान्य करायचे कोणी? शनिवारी लागलेल्या निकालात भाजपाला इशान्येत दिग्विजय मिळवून देणार्‍या एका लढवय्याचे नाव हेमंतो बिश्वशर्मा असून तोही एक राहुल‘पिडी’त आहे. किंबहूना ती पिडा असह्य झाली, म्हणूनच तो कॉग्रेस सोडून भाजपात आलेला आहे.

हेमंतो बिश्वशर्मा हा मुळचा कॉग्रेसी नेता आहे. दोन वर्षापुर्वी तो कॉग्रेसच्या गोगोई मंत्रीमंडळात एक प्रमुख मंत्री होता. लोकसभेत पक्षाचा दारूण पराभव झाला आणि आसामातही पक्षाला मोठा मार खावा लागला. म्हणून तो कार्यकर्त्यांची कैफ़ियत मांडायला दिल्लीत आलेला होता. त्याच्यासह कार्यकर्ते आसामचे राजकीय दुखणे राहुल गांधींना कथन करीत असताना, त्यांचे ऐकण्यापेक्षा हे चिरंजीव आपल्या लाडक्या कुत्राला बिस्कीटे खिलवण्यात गर्क होते. तो हेमंतो याला अपमान वाटलाच. पण त्यापेक्षा अशा नेत्याकडून पक्षाचे काही भले होण्याची अपेक्षा राहिली नाही. या अनुभवाने भ्रमनिरास झालेल्या बिश्वशर्मा याने मग अन्य मार्ग शोधण्याचा पवित्रा घेतला. तर आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्याकडून त्याची ससेहोलपट सुरू झाली. तेव्हा चिडलेल्या हेमंतोने भाजपाचे दार वाजवले. त्याला पक्षात घेताना कुठला सौदा झाला असेल? त्याने भाजपाकडे कसली मागणी केली? त्याने कुठलेही पद नको की सत्ता नको. आपल्याला कॉग्रेससह राहुलचे नामोनिशाण इशान्य भारतातून पुसण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपा अध्यक्षाकडे केली. यापेक्षा अमित शहांना आसाममध्ये लागलेली कुठली अन्य लॉटरी लागू शकते. प्रथम त्याने कॉग्रेसमधले अनेक आमदार भाजपात आणले आणि कॉग्रेस खिळखिळी करून टाकली. नंतर आसाम भाजपाच्या झोळीत टाकल्यावर हेमंतो आसपासच्या अन्य राज्यातून कॉग्रेसची पाळेमुळे खणून काढण्याच्या कामाला लागला. मणिपुरमध्ये कॉग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असताना, तिथेही त्यापैकी अनेकांना भाजपात आणून हेमंतोने कॉग्रेसला पाणी पाजले. पुढल्या काळात उरलेल्या राज्यात त्याने भाजपाला बस्तान बसवून देण्यासाठी बरीच जोडतोड केली. त्रिपुरा त्यापैकी एक आहे आणि मेघालय व नागालॅन्ड त्याच्याच मोहिमेचा भाग आहे. थोडक्यात भाजपाचे यश ही एकप्रकारे ‘पिडी’कृपाच आहे.

लोकसभेतील पक्षाच्या अपयशानंतर जो नेता पक्षाची फ़ेरमांडणी व नव्याने बांधणी करण्यासाठी राहुल गांधींना भेटायला गेलेला होता, त्याला अलगद उचलून भाजपाच्या झोळीत टाकण्याचे पाप कोणाचे होते? राहुलचे की त्यांच्या लाडक्या पिडीचे? जो हेमंतो बिश्वशर्मा दुसर्‍या पक्षात येऊन इशान्येमध्ये इतकी मोठी कामगिरी बजावू शकतो, त्याला आपल्या मुळच्या पक्षात म्हणजे कॉग्रेसमध्ये योग्य संधी मिळाली असती, तर आज इशान्य भारतातले चित्र कसे दिसले असते? पण त्याचे आकलन वा आवाका राहुलपाशी नाही किंवा त्यांच्या भोवती जमलेल्या दिवट्यांपाशी तितकी बुद्धी नाही. इतकाच याचा अर्थ होतो. सहसा कुठल्याही पक्षांतराच्या सौदेबाजीत सत्तापदे वा अधिकाराची बोली लावली जात असते. पण बिश्वशर्मा याने भाजपाकडे काय मागितले? त्याने पद वा सत्ता मागितली नाही, तर आपल्या मुळ पक्षाला नामशेष करून टाकण्याची संधी मागितली. जो पक्षाध्यक्ष म्हणजे राहुल त्या स्थानिक नेत्यावर अशी पाळी आणतो, त्याच्याकडून कॉग्रेसचा उद्धार किती व कसा होऊ शकेल? याची नुसती कल्पनाही धक्कादायक आहे. कुत्र्यापेक्षा आपल्या पक्षाच्या नेत्यांना राहुल गांधी कमी लेखतात, हाच हेमंतो बिश्वशर्मा याचा राग होता व आसाम निकालानंतर त्यांनी ते जाहिरपणे वाहिन्यांवरील चर्चेत सांगितले होते. सहाजिकच त्यापासून दुर जाणे ही राहुल यांच्यासाठी राजकीय आवश्यकता होती. पण अलिकडल्या काही काळात त्यांनी त्याच कुत्र्याचे कौतुक सोशल मीडियात आपल्याच अकौंटवर टाकून हेमंतोच्या आक्षेपांना दुजोराच देऊन टाकला. अशा व्यक्तीच्या हाती शतायुषी पक्षाची धुरा आली तर त्या पक्षाला कोणते राजकीय भवितव्य असू शकते? त्याचे वय किंवा घराणे कामाचे उरत नाही. त्याची राजकीय समज मोलाची असते आणि राहुलनी आपल्या कृतीतून कॉग्रेसच्या भवितव्याचा ललाटलेख लिहून ठेवलेला आहे. त्याला आपण पिडीची गोष्ट असे म्हणू शकतो.

2 comments:

  1. जे पिडी ते ब्रह्मांडी! हे भविष्य हो! 😀😀

    ReplyDelete
  2. राहुल बाबाने चटकदार ओळी /' ट्विट ट्विट ' करण्याचे अधिकार कर्नाटकातील एका चटक चांदणीला दिले होते. आता राहुल बाबा ट्विटचे क्रेडिटही त्यांच्या ' डॉग्गीला ' देत असतील तर ती ट्विट लिहिणारी चटक चांदणी भानावर येणे गरजेचे आहे.

    ReplyDelete