Thursday, March 22, 2018

ममता दिदीची रामनवमी

Image result for mamtas ramnavami

त्रिपुरातील व अन्य विजयामुळे भाजपाचा विरोधकांनी धसका घेतला आहेच. पण बंगालमध्ये आज फ़ारशी ताकद नसलेल्या त्याच पक्षाला, प्रचंड बहूमत पाठीशी असूनही तृणमूलच्या ममता बानर्जी अधिक घाबरल्या आहेत. त्रिपुरातून डाव्यांची आघाडी उखडून टाकण्यात अपयश आलेल्या ममतांना तिथे भाजपाने जे यश मिळवले, त्याने पुरते रडकुंडीला आणले आहे. कारण आता ममता आपल्याच सापळ्यात फ़सलेल्या आहेत. म्हणून आजवर हिंदूंना हुलकावण्या देण्याचे धोरण सोडून, त्यांनीही हिंदूंच्या लांगुलचालनाचा पवित्रा घेतला आहे. गेल्या नवरात्रोत्सवात ज्या ममतांनी दुर्गा विसर्जनाला ठराविक वेळेचे बंधन घालून मोहरमच्या मिरवणूकींसाठी पक्षपात केला होता, त्यांनाच आता थेट रामनवमी जिल्हावार साजरी करण्याची उबळ उगाच आलेली नाही. भाजपाकडे अधिक संख्येने हिंदू मतदार आकर्षित होत असल्याच्या भितीने दिदीला कमालीचे पछाडले आहे. मात्र आता हिंदूंचे हक्क मानले, तरी मुस्लिम मतदार आपल्या हातातून निसटण्याची भिती त्यांना आहे आणि त्याच मुस्लिमांचे आणखी लांगुलचालन करत राहिले, तर हिंदू मतदारही हातून जाण्याची भिती भयभीत करते आहे. वास्तविक याची काहीही गरज नव्हती. २०१० सालात डाव्यांना पाणी पाजले, तेव्हा ममतांना मुस्लिम लांगुलचालनाची गरज पडलेली नव्हती. सहाजिकच त्यांनी भाजपाला दुखावण्यासाठी मुस्लिम मौलवींच्या दाढीला हात लावण्याचे काही कारण नव्हते. पण त्यांचे मुस्लिमप्रेम कमी आणि भाजपा द्वेष त्यांना शांत बसू देत नव्हता. आपणच मुस्लिमांचे कैवारी व भाजपाचे एकमेव विरोधक असल्याची पुरोगामी प्रतिमा उभी करण्याच्या नादात ममता मुस्लिम धर्मांधतेच्या कधी आहारी गेल्या, ते त्यांच्याही लक्षात आले नाही.  त्यानंतर जो मुर्खपणा केला त्याची किंमत आता मोजण्याची वेळ आली आहे. त्यातून हे रामनवमीचे सोंग त्यांना घ्यावे लागलेले आहे.

त्रिपुरात डाव्यांना कंटाळलेला मतदार आणि हिंदू यांचे नेतृत्व भाजपाने हाती घेतले आणि चमत्कार घडला. तेच २०१३ सालात तिथे ममतांनी केले असते, तर त्यांनाही त्रिपुरातून डाव्यांना हाकलून लावणे शक्य झाले असते. पण ममतांना तिथल्या दुखावलेल्या हिंदूंपेक्षा बंगालमधल्या मुस्लिम मतांची व त्यांच्या धर्मांध नेत्याची अधिक फ़िकीर होती. म्हणूनच त्यांनी त्रिपुरातील हिंदूंकडे डोळेझाक केली. त्याचा फ़ायदा बंगालच्या धर्मांध मुस्लिम नेत्यांनी इतका करून घेतला, की ममतांना त्या राज्यातील मुलायम सिंग बनवून टाकले. बाबरी पाडली गेल्यापासून मुलायमनी आपल्याला मुस्लिमांचा नेता म्हणून पेश करण्याचा प्रयत्न केला आणि हळुहळू समाजवादी पक्षच मुस्लिम लीग बनुन गेला. त्यात एकामागून एक मुस्लिम धर्मांध नेते व मौलवींचा भरणा होत गेला, पर्यायाने त्यांच्यापासून सामान्य हिंदू दुरावत गेला. त्याचा ओढा आपोआप मोदींकडे वाढत गेला. पुढल्या काळात तर गुजरात दंगलीची छायाचित्रे व बातम्यांचा अनेक राज्यातील पुरोगामी पक्षांनी मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी वापर  करून घेतला. पण त्यातूनच उलटलेली प्रतिक्रीया म्हणून दुखावलेला गांजलेला हिंदू मनात मोदीभक्त होत गेला, त्याचाच लाभ मोदींना २०१४ सालात लोकसभेच्या मतदानात मिळाला. खरे तर ममतांसारख्या नेत्यांनी व पक्षांनी त्यापासून धडा घेण्याची गरज होती. पण उलट ममताच लालू वा मुलायम होण्याच्या दिशेने धावत सुटल्या. आता त्याच पापाची भुते त्यांना सतावू लागली आहेत. दुसर्‍यांदा बंगालची विधानसभा मोठ्या फ़रकाने जिंकल्यावर ममतांना राष्ट्रीय नेता होण्याचे वेध लागले आणि त्यांनी नोटाबंदीपासून प्रत्येक बाबतीत केजरीवाल होण्याचाही प्रयास आरंभला. त्यासाठी मग बंगालमध्ये (नसलेल्या) भाजपाला उखडून टाकण्याचे खुळ त्यांनी मनावर घेतले आणि त्याच्या परिणामी भाजपा समजून हिंदू समाजालाच छळायला आरंभ केला.

एक गोष्ट स्पष्ट आहे. देशात हिंदू समाजाच्या बाजूने उभा रहाणारा भाजपा सोडून अन्य कुठला राष्ट्रीय पक्ष नाही. उलट मुस्लिमांचे वा अन्य धार्मिक अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन प्रत्येक पक्ष करत असतो. पण म्हणून सगळे हिंदू उठून भाजपाला मते देत नाहीत. बहुतांश पुरोगामी पक्षांना हिंदूंच्याच मतावर गुजराण करावी लागते. मग त्यांनी भाजपा विरोधासाठी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काय कारण आहे? तर त्याचे कारण मुस्लिमांना खुश करण्यासाठी! त्याचा अर्थ असा, की हिंदूंच्या भावना दुखावल्या तरच मुस्लिमांची मते आपल्याला मिळतील, असा काहीसा गैरसमज या पुरोगामी पक्षांनी करून घेतला आहे. त्यांना भाजपा व हिंदू यात फ़रक करण्याचे भान राहिलेले नाही. त्याच्या परिणामी त्यांच्याकडून हिंदू मानसिकता सतत दुखावली जाते आणि त्याच्या परिणामी त्या नाराज हिंदूला भाजपा खेरीज अन्य कुठला पर्याय शिल्लक उरत नाही. त्रिपुरा असो किंवा अन्य कुठल्या राज्यात असो, भाजपाची शक्ती त्यातूनच वाढलेली आहे. भाजपाने मग आपली रणनिती म्हणून सर्वत्र हिंदूंचे धार्निक सण, हा आपला अजेंडा बनवलेला आहे आणि त्यात भाजपाचा पुढाकार दिसला मग पुरोगामी पक्ष व नेते त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहातात. केरळात वा बंगालमध्ये तेच झाले आणि त्यातून भाजपाचा पाया घातला गेला आहे. ममतांनी तर कहर केला, बंगालमध्ये दुर्गापूजा हा हिंदूंचा दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणून पाळला जातो. तर त्याच दुर्गेच्या मुर्तीचे विसर्जन करण्याला मुदतीचे बंधन घालून ममतांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. अखेरीस त्यांना कोर्टानेच कानपिचक्या दिल्या. पण त्यातून झाले काय? मुस्लिमांसाठी ममता हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवतात, अशी समजूत तयार झाली. भाजपाने तसा राजकीय आरोप केलेलाच होता. तर ममतांनी आपल्या दिवाळखोर कृतीतून त्याला दुजोरा दिला. त्यामुळे आता रामनवमी करण्याची नामुष्की आलेली आहे.

गेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या. देवदर्शनाचा तमाशा केला आणि त्यामुळेच कॉग्रेसची मते वाढल्याचा समज अनेकांनी करून घेतला आहे. गुजरातमध्ये भाजपाची मते कमी झाली नसून वाढलेली आहेत आणि ठराविक जागी नाराज गठ्ठे विरोधात गेल्याचा लाभ कॉग्रेसला मिळू शकला आहे. केवळ राहुलच्या मंदिरात जाण्यामुळे कॉग्रेसला लाभ मिळालेला नाही. हिंदू मतदार तितका मुर्ख नाही. अन्यथा या देशात पुरोगामी पक्षांना कधीच गाशा गुंडाळावा लागला असता. पण त्यांच्या अतिरेकी भाजपा विरोध व त्यासाठी हिंदूंना दुखावण्यातून त्यांनी आपल्यावरच हिंदू लांगुलचालनाची नामुष्की ओढवून आणलेली आहे. त्याची काडीमात्र गरज नाही. भाजपा व हिंदू समाज यात फ़रक केला, तर त्यांच्याकडून कुठला धार्मिक पक्षपात होणार नाही. बाकी काही अधिक करण्याची गरज नाही. ममतांनाही तसे काही करण्याची गरज नव्हती, की मुस्लिम मौलवी व धर्मांध नेत्यांना डोईजड करण्य़ाचे कारण नव्हते. तितका समजूतदारपणा दाखवला असता, तर आज रामनवमीचे नाटक करावे लागले नसते. आताही त्यांनी नवमी करावी किंवा राहुलनी देवस्थानांच्या वार्‍या कराव्यात. त्यामुळे या पक्षांची मते वाढणार नाहीत की भाजपाला त्याचा तोटाही होण्याची शक्यता नाही. पुरोगामी म्ह्णजे हिंदूंचे शत्रू; ही प्रतिमा त्यांनी स्वत:च आपल्या वागण्याबोलण्यातून उभी केली आहे. ती केवळ त्याच मार्गाने पुसून टाकण्याची गरज आहे. कारण हिंदू समाज कधीच धर्माच्या नावाने मते देत नाही व देणारही नाही. पण धर्माच्या नावाने आपल्यावर अन्याय होतो असे दिसले, मग हिंदू मतदार चवताळल्यासारखा मतदानातून उत्तर देतो. ममतांच्या हे लक्षात आले असते तर त्यांनी आधी चुक केली नसती. आणि आता नवमीचा सोहळा साजरा केल्याने त्याची भरपाईसुद्धा होण्याची शक्यता नाही. कारण दिदीच्या अतिरेकाने भाजपाला बंगालमध्ये पाय रोवून उभे केले आहे ना?

3 comments:

 1. भाऊ, मतदार प्रशिक्षण ही आता खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. निरनिराळे पक्ष काळानुसार, वेळेनुसार आपले रंग बदलत आहेत. यात खरे काय अन खोटे काय हे मतदारांनी स्वतः ठरवले पाहिजे. 70 वर्षात आपल्या नेत्यांनी प्रजेला शिक्षित केले नाही व लोकांना सुद्धा याची गरज वाटली नाही. आता कोणी NGO ने पुढे येऊन लोकांना लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका हे समजावून सांगून मत कसे द्यायचे हे शिकविले पाहिजे.
  राहिली गोष्ट दिदींची. आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी अशी परिस्थिती झाली आहे. त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.

  ReplyDelete
 2. भाऊ, आपण जे बोलत आहेत ते कदाचित आत्ता काँग्रेस किंवा ममता सारख्या लोकांना उमजून चुकले आहे. म्हणून तर राहुल जानवेधारी हिंदू झाला आणि ममता राम नवमी करत आहे.
  प्रश्न हा आहे कि आता हिंदू मतदार याला किती प्रतिसाद देणार.मुस्लिम मतदाराला जोपर्यंत कोणी "आपला" पर्याय मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस किंवा पुरोगामी पक्षांना मत देणार हे नक्की. पण असा पर्याय उभा राहिला तर हिंदू मतांसाठी सर्व पक्ष पुन्हा जानवेधारी होणार आणि भाजप साठी हे धोकादायक ठरेल.
  त्यावेळेला पुन्हा एकदा पुरोगामी लाट येणार आणि कदाचित भाजप त्याच नेतृत्व करेल.

  ReplyDelete
 3. the same happened with Bramhan'
  s in Maharashtra......

  ReplyDelete