Wednesday, March 28, 2018

गावगप्पा संपल्या

karnataka polls के लिए इमेज परिणाम

निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी तारीखवार कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तिथे किंवा त्याविषयी ज्या गावगप्पा चाललेल्या होत्या, त्यांना पुर्णविराम मिळायला हरकत नसावी. कारण आजपासून फ़क्त सहा आठ्वड्याचा कालावधी मतदानाला उरलेला असून, त्यात प्रत्येक पक्षाला आपले मित्र शोधण्यापासून उमेदवारही निश्चीत करावे लागणार आहे. ते होण्यापर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडणार आहे आणि उमेदवार व बंडखोर यांच्यातला ताळमेळ घालण्यापर्यंत प्रचाराला वेळही उरणार नाही. सहाजिकच आता नुसत्या आरोप प्रत्यारोपाची चैन संपली असून, आखाड्यात उतरणार्‍या प्रत्येक पक्षाला अधिकाधिक जागा जिंकण्याला प्राधान्य देणे भाग पडणार आहे. अर्थात अशावेळी प्रत्येक पक्ष छाती फ़ुगवून आपणच कसे बहूमत वा यश मिळवणार हे सांगत असतो. मात्र निकालानंतर त्याच्या छातीतील हवा गेलेली असते. त्यामुळेच अशा गावगप्पांमध्ये अडकण्याची चैन कुणालाच परवडणारी नाही. पुढ्ल्या वर्षी व्हायच्या लोकसभा मतदानापुर्वी इथली निवडणूक ही पहिली उपांत्य फ़ेरी आहे. कारण यानंतर थेट डिसेंबर महिन्यात तीन विधानसभा होतील आणि मग लोकसभा. त्यामुळेच निदान कॉग्रेस व भाजपासाठी हे दोन्ही उपांत्य सामने निर्णायक आहेत. कारण आजही देशातील तेच अनेक राज्यात स्थान व संघटना असलेले राष्ट्रीय पक्ष असून, खरी लढत त्यांच्यातच व्हायची असते. बाकीच्या पक्षांनी कितीही उड्या मारल्या, तरी ते कुठल्या ना कुठल्या राज्यात कमीअधिक प्रभाव असलेले प्रादेशिक पक्ष आहेत आणि निर्णायक क्षणी त्यांना दोनपैकी एका गोटात दाखल व्हावे लागत असते. म्हणूनच तिसरी आघाडी वा मोदीमुक्त आघाडी असले शब्द ऐकायला कितीही गोजिरवाणे वाटले, तरी निरर्थक असतात. प्रत्येक राज्याच्या स्थितीनुसार राजकीय गणित बदलत असते आणि कर्नाटक त्याला अपवाद नाही.

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड ह्या तीन राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत. तिथे व कर्नाटकात थेट भाजपा व कॉग्रेस यांच्यात लढाई होऊ घातली आहे. पण त्यातला एक मोठा फ़रक असा, की कर्नाटकात फ़क्त याच दोन पक्षातला संघर्ष नाही. तिथे देवेगौडांचा सेक्युलर जनता दल नावाचा एक तिसरा मजबूत पक्ष आहे. या पक्षाची १०-२० टक्केपर्यंत मते कर्नाटकात आहेत आणि त्यांच्या कमीअधिक होण्यावर त्या राज्यातील सत्ताकारणाचे पारडे हलत असते. मागल्या विधानसभेत भाजपात फ़ुट पडल्याचा मोठा लाभ कॉग्रेसला झाला होता. म्हणून ३६ टक्के मतांवर कॉग्रेस ६० टक्के जागांचे बहूमत मिळवू शकली. पण जेव्हा लोकसभा आली, तेव्हा भाजपातले फ़ुटीर गट एकवटून मोदींनी तिथे मोठी बाजी मारलेली होती. त्यात सेक्युलर जनता दलाला मोठा फ़टका बसला. राष्ट्रीय राजकारणात देवेगौडा पुरोगामी म्हणून कॉग्रेसच्याच वळचणीला जाऊन बसतील, अशी खात्री असल्याने त्यांचा कॉग्रेसविरोधी मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाच्या गोटात गेला आणि त्याचा लाभ मोदींना मिळाला होता. पण आता होऊ घातलेली निवडणूक राज्यापुरती मर्यादित असून त्यात तोच मतदार कॉग्रेस विरोधासाठी देवेगौडांना सोडून भाजपाला मते देईल, असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण दुसरीकडे मतांच्या विभागणीचा एक भाग आणखी आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना देवेगौडांची संगत नको आहे. म्हणून त्यांनी त्या पक्षातले सात आमदार फ़ोडले व आघाडीही होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. किंबहूना देवेगौडांची कर्नाटकातील पुण्याई संपवायला त्यांच्याच या जुन्या चेल्याने आपली कंबर कसलेली आहे. म्हणूनच तिरंगी निवडणूका व्हाव्यात, अशी परिस्थिती अपरिहार्य आहे. कॉग्रेसलाही दिल्लीत कोणी मोठा नेता उरलेला नाही. त्यामुळे सिद्धरामय्या म्हणतील, त्याच दिशेने जाणे भाग आहे.

यातच राहुल गांधी यांनी देवेगौडांच्या पक्षावर भाजपाचा छुपा हस्तक असल्याचा आरोप केलेला आहे. म्हणजे मतविभागणी होऊन भाजपाला लाभ मिळावा, असेच देवेगौडा वागत असल्याचा तो आरोप आहे. पण त्यांना सोबत घेण्य़ासाठी कॉग्रेसने कुठलेच प्रयत्न केले नसतील, तर असा आरोप गौडांच्या अनुयायांना क्षुब्ध करू शकतो. अर्थात अशा मतदाराच्या रागाची राहुलनी कधी पर्वा केलेली नाही की पक्षाच्या मतांची बेरीज हा राहुलचा कधी चिंतेचा विषय राहिलेला नाही. दरम्यान सिद्ध्रामय्यांनी लिंगायत मतांमध्ये फ़ुट पाडून भाजपाला शह देण्याचा केलेला खेळ किती लाभदायक ठरतो, ते मतमोजणीतूनच कळणार आहे. कारण लिंगायत हा भाजपाचा कणा राहिलेला आहे आणि त्यांचा येदीयुरप्पा हा एकमुखी नेता होता. सिद्द्धरामय्यांनी धर्माची मान्यता या पंथाला देऊन येदीयुरप्पांच्या एकमुखी असण्याला सुरूंग लावण्याचा डाव खेळला आहे. थोडक्यात सिद्धरामय्यांना आपल्या तुलनेत अन्य कोणीही कानडी नेता नको आहे. म्हणून त्यांनी गौडा व येदी यांना एकाच वेळी अंगावर घेण्याचे राजकारण खेळलेले आहे. ते कॉग्रेसला कितपत यश मिळवून देते, ते बघावे लागेल. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी कर्नाटक मोहिम सुरू केल्यापासून सिद्धरामय्यांनाच आपले लक्ष्य केलेले आहे. ते बघता, राहुल गांधी हा घटक कर्नाटकात कॉग्रेससाठी फ़ारसा उपयुक्त नसल्याची खात्री होते. मुख्यमंत्री म्हणतील, त्यानुसार राहुल वागत आहेत. पण इथे गुजरातच्या नेमके उलटे वातावरण आहे. तिथे भाजपा पाचदा निवडून आलेला व सत्तेतला पक्ष होता. म्हणून वाटेल ते आरोप प्रचारात करणे शक्य होते. कर्नाटकात मागली पाच वर्षे कॉग्रेसची सत्ता असून आपण काय प्रगती वा कारभार केला; त्याचा हिशोब द्यायचा आहे. उलट भाजपाला वाटेल ते आरोप करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच भासते तितकी ही निवडणूक कॉग्रेसलाही सोपी नाही.

मागल्या अनेक निवडणूकांचा इतिहास बघितला, तर कुठल्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्याला सत्तेत असताना विधानसभेत बहूमत मिळवता आलेले नाही. भाजपाचे येदीयुरप्पा विधानसभा बरखास्त झालेली असल्याने सत्तेतले मुख्यमंत्री म्हणता येणार नाहीत आणि बाकीच्यांनी कधी तो पल्ला मारलेला नाही. सिद्धरामय्यांना वाटते आहे तितका इतिहास त्यांच्या मागे ठामपणे उभा नाही. म्हणूनच त्यांनी मागल्या वर्षभरात अनेक मार्गाने कानडी अस्मिता, वा धार्मिक खेळ करून ठेवलेले आहेत. पण ते कितपत यश देतात, ते बघावे लागणार आहे. पण यात त्यांची कसोटी आहे, तितकीच चार वर्षापुर्वी लोकसभेत मोठे यश मिळवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही कसोटी लागायची आहे. आजही त्यांची दक्षिणेतील या राज्यातली लोकप्रियता कितपत टिकून आहे? किंवा त्यांच्या देशभरातील कारभाराला कानडी मतदार किती साथ देणार आहे, त्याचा नमूना यावेळी पेश व्हायचा आहे. कारण आजही अर्थातच भाजपासाठी कर्नाटकातल्या प्रचाराचा मुळ चेहरा मोदीच असणार आहेत. मागल्या आणि यावेळी होणार्‍या लढतीमध्ये एकच मोठा फ़रक भाजपासाठी आहे. त्यांचा प्रचारप्रमुख पंतप्रधान आहे आणि यंदाच्या निवडणूकीची व्यवस्था व नियोजन अमित शहा करणार आहेत. त्याबाबतीत मागल्या खेपेस भाजपाचा संपुर्ण बोजवारा उडालेला होता. गेल्या साडेतीन वर्षात अमित शहांनी निवडणूका जिंकणारे यंत्र, अशी आपली ख्याती करून घेतलेली आहे आणि त्याच बाबतीत कॉग्रेस वा देवेगौडा अनभिज्ञ आहेत. उत्तरप्रदेश व त्रिपुरा शहांनी ज्याप्रकारे जिंकले त्याकडे काणाडोळा करून भाजपाशी यावेळी विरोधी पक्षांना लढता येणार नाही. जितके बारकावे शहा विचारात घेतात व आखणी करतात, त्याचा अन्य पक्षात दुष्काळ असणे, ही भाजपाची म्हणूनच जमेची बाजू झाली आहे. तिथे राहुल गांधींची टोलेबाजी वा सिद्धरामय्यांना आत्मविश्वास कामाचा नाही, की देवेगौडांचे पाताळयंत्री राजकारण उपयोगाचे नाही.

No comments:

Post a Comment