Tuesday, March 20, 2018

छचोरपणा आणि संयम

kamal haasan rajini cartoon के लिए इमेज परिणाम

तामिळनाडूच्या राजकारणात आता दोन नव्या अभिनेत्यांनी उडी घेतली आहे. पण अजून त्यांच्या राजकीय पक्षांना संघटनात्मक स्वरूप आलेले नसले तरी खडाजंगी सुरू झाली आहे. प्रमुख्याने कमला हासन यांनी आपल्या राजकीय शेरेबाजीचा सपाटा लावलेला आहे. तर रजनीकांत यांनी पक्षाला संघटनेचे स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी राजकीय वक्तव्ये करण्याविषयी कमालीचा संयम राखला आहे. सत्तेच्या व निवडणूकीच्या राजकारणात अशा संयमाला मोठे महत्व असते. परंतु कमला हासन त्यात तोकडा पडत असून रजनीकांत धुर्त वाटतो आहे. मध्यंतरी कमला हासन यांना आपल्या वक्तव्याचे खुलासे करावे लागले आणि आपण हिंदूविरोधी नसल्याचे सांगण्याची पाळी आली. पण त्याची काय गरज होती? आपण पुरोगामी असल्याचे सांगून कमला हासन आपली बाजू भक्कम करू बघत आहेत. पण त्याची खरोखरच गरज आहे काय? तामिळनाडूत तरी कुठलाही हिंदूत्ववादी पक्ष वा संघटना बलशाली नसून, आजवर तिथे भाजपाला आपला प्रभाव एकदाही दाखवता आलेला नाही. उलट कुठल्या ना कुठल्या द्रविडीयन पक्षाचाच प्रभाव तामिळी मतदारावर राहिला आहे. सहाजिकच त्या मतदाराला जिंकायचे असेल, तर हिंदूत्वाला आव्हान देऊन उपयोग नाही. तर प्रस्थापित द्रविडी नेतृत्वाला आव्हान देण्याची गरज आहे. त्यात कमला हासन काय प्रगती करू शकले आहेत? एका समारंभानिमीत्त त्यांनी द्रमुकच्या मंचावर हजेरी लावली आणि समारंभाला हजर राहुनही रजनीकांत यांनी प्रेक्षकात बसणे योग्य मानले. हा संयम निर्णायक असतो. कारण त्यातून मतदाराला योग्य संदेश दिले जात असतात. कमला हासन त्याच बाबतीत खुप गोंधळ घालून ठेवतात आणि मग खुलासे देताना त्यांची तारांबळ उडालेली असते. जगातल्या प्रत्येक विषयात आपले पांडित्य सांगण्याची कमला हासनची ही हौस, त्याचा खरा राजकीय शत्रू आहे.

सव्वा दिड वर्षापुर्वी ही स्पर्धा सुरू झाली. जयललिता यांच्या निधनामुळे व करुणानिधींच्या वृद्धापकाळाने राजकारणात पोकळी निर्माण झाली. ती भरून काढणारे नेतृत्व त्या दोघांच्या पक्षांपाशी आजवर तयार होऊ शकलेले नाही. त्यामुळे तामिळनाडूला नवा उद्धारक हवा असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यातून मग प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार काय, अशी चर्चा उदयास आली आणि तिला सकारात्मक प्रतिसाद त्याने दिल्यानंतर कमला हासन यांनाही राजकारणाचा मोह अनावर झाला. तिथून ही स्पर्धा आरंभ झाली. पण वर्ष उलटून गेले असले तरी दोघांपैकी कोणीही आपापल्या राजकीय छावण्या राज्यभर उभारलेल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्यातले राजकीय खटके अजून रंगू लागलेले नाहीत. पण पत्रकारांसह माध्यमांना त्यातून सनसनाटी माजवण्याचा मोह आवरता आलेला नाही. म्हणून असेल दोघांना त्या वखवखलेल्यांसाठी काही चिथावणीखोर वक्तव्य देणे भाग पडते आहे. कालपरवा हासन याने जीएअटी कचराकुंडीत फ़ेकून द्यावा असा निर्णय असल्याचे म्हटले आहे. ते विधान भले खळबळ माजवू शकेल. पण त्याला जबाबदार राजकीय वक्तव्य मानता येत नाही. कारण जीएसटीसाठी भले खापर भाजपाच्या माथी मारले जात असेल, पण तो कायदा वा फ़ेरबदल अवघ्या संसदेने संमत केलेला आहे. त्यातल्या त्रुटी सांगणे वेगळे. पण त्याला सरसकट कचर्‍यात फ़ेकून देण्याची भाषा थिल्लरपणाच आहे. कारण संसदेत संमत होणारे कायदे अनेक अडथळे पार करून जात असतात. त्यात जीएसटी हा विषय दिर्घकाळ विविध संसदीय समित्या व राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये उहापोह झाल्यानंतर आकारास आलेला आहे. त्याच्या अंमलबजावणीत काही त्रुटी असल्या म्हणून तो कचराकुंडीत फ़ेकण्याची भाषा अश्लाघ्य आहे. किंबहूना इतक्या उथळपणे राजकारणाकडे बघणारा माणूस तामिळानाडूचे काय करील, अशी शंका घेणे भाग आहे.

राजकारण व सत्ताकारण ही फ़क्त लोकप्रियता संपादन करण्याची खेळी नसते. तिथे लोकांनी जबाबदारी सोपवली तर कारभार करण्याची वेळही येत असते. त्या जबाबदारीला सामोरे जाणार्‍याला कुठलेही कायदे व व्यवस्थेविषयी बोलताना जपून आपले मतप्रदर्शन करणे भाग असते. नुसत्याच गर्दीच्या टाळ्या मिळवण्यासाठी वादग्रस्त विधाने करून भागत नाही, की त्या जबाबदारीतून सुटता येत नाही. आज जीएसटी या व्यवस्थेविषयी इतके उथळपणे मत व्यक्त करणारा माणूस, उद्या तामिळनाडूचा सत्ताधीश झाला तर काय करील? तो केजरीवाल यांच्याप्रमाणे प्रशासकीय अडचणी निर्माण करून जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकणार काय? योगायोग असा, की कमला हासन व केजरीवाल एकमेकांचे समर्थक आहेत आणि हासनच्या पक्षाच्या स्थापनाप्रसंगी केजरीवाल अगत्याने हजर होते. त्यांच्यातले समानसुत्र हाच उथळपणा आहे किंवा काय, अशी म्हणूनच शंका येते. जीएसटी कचर्‍यात फ़ेकून देण्याची भाषा बोलण्यापेक्षा हासन यांनी त्यात कोणते मुलभूत बदल करता येतील, त्याचे विवेचन करायला हवे होते. पण तसे झालेले नाही. केजरीवाल तरी कुठे उपलब्ध साधने व अधिकारानुसार काम करतात? नसलेले अधिकार वापरून त्यांनी दिल्लीकरांचे जीवन उध्वस्त करून टाकलेले आहे. कमला हासन त्याच मार्गाने जायला बघत असतील, तर त्यांनी वेगळा पक्ष काढण्यापेक्षा आम आदमी पक्ष म्हणूनच तामिळनाडूत काम आरंभले असते तरी बिघडले नसते. कारण वर्षभरात त्यांनी आपल्यातला केजरीवाल दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यामागचे तर्कशास्त्र समजत नाही. आपला पक्ष जोवर जनतेमध्ये स्थान प्राप्त करत नाही, तोवर तरी संभाळून सर्वसमावेशक भूमिका असायला हवी. पण हासन आपण कोण नाही वा कोणाला जवळ घेणार नाही, त्याच्याच गर्जना सातत्याने करीत राहिलेले आहेत. मग त्यांना कोण किती गांभिर्याने घेऊ शकेल?

हासन यांच्या विरुद्ध टोकाला रजनीकांत उभे आहेत. त्यांनी अतिशय नाजूक वा संवेदनाशील प्रश्नावरच आपले मत व्यक्त करण्याचा संयम काटेकोर पाळला आहे. उठसुट कुठल्याही विषयात मतप्रदर्शन त्यांनी केलेले नाही. किंबहूना आपण तसे करणारही नसल्याचे रजनीकांत यांनी नुकतेच सुचित केले आहे. कमला हासन नास्तिक असल्याची नेहमी जाहिरात करतात, उलट रजनीकांत श्रद्धाळू असून ते आपल्या अध्यात्मिक धारणा लपवित नाहीत. विविध देवस्थानांना भेटी देणे वा आध्यात्मिक गुरूकडे व मठांत रजनीकांत गाजावाजा न करता जात असतात. या आठवड्यात त्यांनी अशाच एका अध्यात्मिक दौर्‍यात ॠषिकेश येथील एका आश्रमाला भेट दिली होती. दक्षिणेतील हा सुपरस्टार उत्तराखंडात एक सामान्य श्रद्धाळू म्हणून दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात आलेला असताना त्याला चहाते व पत्रकारांनी गराडा घातला. तेव्हा त्याचे विविध घटनांविषयीचे मत जाणून घेण्याचा प्रयास झाला. त्याला साफ़ नकार देताना रजनीकांत याने आपण अजून पुर्ण वेळ राजकारणी झालो नसल्याचे सांगत मौन धारण केले. अजून आपल्या पक्षाचे नाव जाहिर झालेले नाही, किंवा कुठलेही धोरण भूमिका समोर आलेली नसताना प्रत्येक विषयात बोलण्याची गरज नाही, असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले. त्यातून या अभिनेत्याचा आपल्या मनावर किती संयम आहे त्याची जाणीव होते. राजकारणात नसताना इतका संयम राखणारा माणूस उद्या स्पर्धात्मक राजकारणात आला, तर किती काटेकोर मतप्रदर्शन करील, त्याचा अंदाज बांधता येतो. तो संयम इतक्यासाठी महत्वाचा असतो, की हजारो लाखो चहाते तुमच्या एका शब्दावर हलतडुलत असतात. त्याचा शक्ती म्हणून काळजीपुर्वक वापर करण्याला जबाबदारी म्हणतात. आपले चहाते अनुयायी यांना चिथावण्या दिल्यास त्या स्फ़ोटक शक्तीचा अन्य कोणालाही दुरूपयोग करायची संधी दिली जाण्याचा धोका असतो.

प्रत्यक्ष निवडणुका व मतदाराला सामोरे जाण्यापुर्वीच दोन अभिनेत्यांमध्ये लोक तुलना करू लागलेले असतात. त्यात पत्रकार व माध्यमांना कमला हासन आवडू शकतो. कारण तो नित्यनेमाने माध्यमांना हेडलाईन पुरवित असतो. पण सामान्य जनता व राजकारणासाठी त्या हेडलाईनचा किती उपयोग आहे, त्याचे हासनला भान रहात नाही. उलट रजनीकांत आपल्या प्रत्येक विधान व वक्तव्याविषयी जागरुक आहे. आपल्याकडून कुठलाही विपरीत शब्द उच्चारला जाऊ नये आणि आपल्याला खुलासा देण्याची नामुष्की येऊ नये, याची काळजी त्यातून दिसते. पण हासनमध्ये त्याचे भान नाही, अन्यथा त्यांनी जीएसटीविषयी असे पोरकट विधान केले नसते. इतरही बाबतीत हासनला पुरोगामीत्व मिरवण्याची उबळ येते आणि त्यातूऩच त्याच्या राजकीय मर्यादा साफ़ होत चालल्या आहेत. पुरोगामी पोपटपंची केल्यास देशातील मुठभर तथाकथित विचारवंतांकडून जरूर पाठ थोपटली जाते. पण जनतेचा पाठींबा कितपत मिळतो? निवडणूकांच्या आखाड्यात उतरणार्‍यांना त्याचे तारतम्य राखणे भागच असते. पण कमला हासन त्यात खुप मागे पडलेले असून रजनीकांत यांनी संयमाने व संथगतीने आपली वाटचाल सुरू केली आहे. अजून आपण पुर्णवेळ राजकारणी झालो नाही, हे तसेच सावध विधान आहे आणि सोयीस्कर मौन आहे. पण म्हणूनच ते मौन हे सर्वात मोठे राजकीय निवेदनही आहे. जेव्हाकेव्हा पुर्णवेळ राजकारण येऊ तेव्हा बेधडक आपण मतप्रदर्शन करणार असल्याचा तो इशारा आहे. अगदी दुखण्यावरच बोट ठेवायचे तर आपण कमला हासन नाही, असेच राजनीकांत यांनी यातून सांगून टाकलेले आहे. जगातल्या कुठल्याही विषयावर सदोदित मते व्यक्त करणारा नेता हवा असेल, तर कमला हासनकडे जा, असेच रजनीने यातून सुचवलेले नाही काय? हा दोघातला फ़रक आहे आणि तोच आगामी काळात अधिकाधिक स्पष्ट होत जाणार आहे.

No comments:

Post a Comment