Friday, March 2, 2018

मांझी नैया डुबे किनारा

manjhi bihar के लिए इमेज परिणाम

एक बातमी वाचून हसू आले. निदान त्याचे शीर्षक तरी कमालीचे हास्यास्पद आहे. ‘बिहारमध्ये भाजपाला धक्का, जितनराम मांझी ‘एनडीए’तून बाहेर’; हेच ते शीर्षक आहे. कमीअधिक फ़रकाने बहुतेक माध्यमात या बातमीचे शीर्षक असेच आहे. ही बातमी सांगणार्‍या वा लिहीणार्‍याला बातमीचा आशय तरी समजला आहे किंवा नाही, याची शंका येते. एकूणच पत्रकारितेमध्ये किती बौद्धिक मांद्य आलेले आहे, त्याचा नमूना म्हणून इकडे बघता येईल. कारण जीतनराम मांझी नावाचा बिहारमधला एक राजकीय नेता, भाजपा-नितीश आघाडीतून बाहेर पडला आहे. तर त्यामुळे त्या आघाडीला धक्का बसला, हे यातले गृहीत आहे. कुठलाही नेता एका पक्षाला सोडून गेला वा रागावून बाहेर पडला, म्हणजे त्या पक्षाला धक्का बसला, हे आपोआपच बोलले लिहीले जाते. पण त्या नेत्याची त्या पक्षात गटात वा जनमानसात काय प्रतिष्ठा आहे, त्याची तपासणीही करायची अशा बातमीदारांना गरज वाटेनाशी झाल्याचे ते लक्षण आहे. कारण त्यांच्या लेखी मांझी हे माजी मुख्यमंत्री आहेत, म्हणजेच अत्यंत वजनदार नेता असणार आणि सहाजिकच ते कुठल्याही पक्षाला सोडतील, तेव्हा त्याचे नुकसानच होणार असे त्यामागचे गृहीत आहे. यापुर्वी त्यांच्या अशा धरसोडीमुळे कुठल्या पक्षाचे नुकसान वा लाभ झाला आहे काय, तेही बघण्याची अशा वार्ताहरांना गरज वाटत नाही. त्या नेत्याची राजकीय शक्ती वा दुर्बळता काय आहे, त्याचीही तपासणी आवश्यक वाटत नाही. म्हणून मग अशा बातम्या झळकत असतात. अर्थात सैफ़-करिनाचा पुत्र तैमुर पाळण्यात उठला वा रांगू लागला, याची बातमी रंगवून सांगण्याचे कौशल्य आत्मसात केलेल्यांना मांझींचे पायही पाळण्यात दिसू शकतात. त्यांनी मांझीमुळे किती राजकीय उलथापालथ झाली, ते समजून घेण्याची अपेक्षा कोणी करणार नाही. तरीही अशी बातमी व तिचे शीर्षक बघून हसल्याशिवाय रहावले नाही. कोण हा मांझी? कसला धक्का?

चार वर्षापुर्वी लोकसभेच्या निवडणूकीत मोदी विरोधात गेलेले नितीशकुमार यांचा आपल्याच बिहारमध्ये दारूण पराभव झाल्यावर त्यांनी प्रायश्चीत्त म्हणून मुख्यमंत्रीपद सोडले होते. आपल्या जागी बाहुले बसवून रिमोट कंट्रोलने कारभार हाकण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यासाठी त्यांना जीतनराम मांझी हा उत्तम उमेदवार वाटला. त्यातून या गृहस्थांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. अन्यथा आपल्या जागी विधानसभेत निवडून येण्यापलिकडे त्यांची राजकीय कुवत नाही. पण सत्तापदावर बसताच मांझी यांना आपल्यामुळेच नितीशना महादलित मते मिळतात, असा साक्षात्कार झाला व त्यांनी नेतृत्वाला झुगारून कारभार हाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी सत्तेवरून त्यांना बाजूला करण्याची वेळ नितीशवर आली. केवळ ते पद पुन्हा मिळवण्यासाठीच नव्हेतर जदयु नावाच्या पक्षाची जी कही थोडीफ़ार अब्रु शिल्लक होती, ती टिकावी म्हणून मांझी यांची हाकालपट्टी करण्याचे टोकाचे पाऊल नितीशना उचलावे लागलेले होते. मग अशा टाकावू कचर्‍याला आपल्यात समावून घेत भाजपाचे महान चाणक्य अमित शहांनी जदयुला धक्का देण्याचा घाट घातला आणि त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. मोदीलाटेचा चकनाचूर बिहारमध्ये करण्याला मांझी यांनीच मोठा हातभार लावला आणि भाजपाला असलेल्या आपल्या जागाही टिकवणे मुश्किल होऊन गेले. थोडक्यात विरोधकांनी फ़ेकून दिलेला कुठलाही कचरा आपल्या पक्षाला लाभदायक ठरतो, असल्या पोरकटपणाची किंमत अमित शहांना व पर्यायाने भाजपाला तेव्हा भोगावी लागली होती. त्याचे स्मृतीचिन्ह म्हणजे जीतनराम मांझी होय. त्यांनी वेगळा पक्ष काढला व त्याला भाजपा आघाडीने जागा सोडूनही जागा जिंकता आल्या नव्हत्या. अशा नेत्याने भाजपा आघाडीत थांबले काय, किंवा आघाडी सोडली काय, कुठला फ़रक पडणार आहे? तसे असते तर त्यांना इतके दिवस तिथे थांबण्याची गरज नव्हती.

वास्तविक नितीश यांच्याशी भाजपाने हातमिळवणी करण्याच्या विरोधात मांझी होते. पण राजकीय फ़ायदातोटा मोजताना त्यांच्या नितीशद्वेषावर भाजपाला अवलंबून रहाणे शक्य नसल्यानेच गतवर्षी ती तडजोड झाली होती. तेव्हाच खरेतर मांझी यांनी तिथून बाहेर पडायला हवे होते. भाजपालाही हे लोढणे नकोच होते. पण नितीशच्या नव्या संयुक्त मंत्रिमंडळात काही महत्वाचे सत्तापद मिळण्याची अपेक्षा करीत मांझी तिथे थांबले होते. ते काही होऊ शकले नाही आणि तिथे कुचंबणा होऊ लागल्यावर त्यांना अन्य मार्ग शोधणे अपरिहार्य होते. नितीश सत्तापद देत नव्हते आणि आघाडीत राहून त्यांना आपल्या मनातली नितीश विरोधातली मळमळही बोलून दाखवता येत नव्हती. सहाजिकच त्यांना बाहेर पडण्याला पर्यायच नव्हता. तोच पर्याय त्यांनी निवडला. त्यामुळे भाजपाचे कुठलेही नुकसान होऊ शकत नाही. उलट पिडा गेली असा सुस्कारा भाजपावाले सोडतील आणि नितीशही खुश झाले असतील. अशावेळी लालूपुत्र तेजस्वी याने मांझी यांचे बाहू पसरून स्वागत केले, तेही योग्यच आहे. कारण लालू तुरूंगात अडकले असून त्यांना जामीनही मिळण्याची शक्यता नाही. अशावेळी त्यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला मरगळ आलेली आहे. त्यात तेवढीच नवी काही हालचाल स्वागतार्हच असते. तिचा उपयोग किती व राजकीय लाभ कोणता, असे प्रश्न विचारायचे नसतात. पण ज्यांना राजकीय बातमीदारी करायची असते, त्यांनी अशा व्यक्ती व त्यांची पार्श्वभूमी विसरून चालत नाही. आसामचे कॉग्रेसनेते हेमंतो विश्वशर्मा यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपात जाण्याने फ़ार मोठा फ़रक पडत असतो. कारण त्याने आसाममध्ये भाजपाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याची मेहनत घेतली व कॉग्रेसची सत्ता उध्वस्त करून टाकली होती. मांझी यांच्यापाशी तितकी कुवत नाही की बळ नाही. मग धक्का कोणाला कसला लागणार?

एक गोष्ट मात्र मांझी यांच्याविषयी नक्की सांगता येईल. मागल्या चार वर्षात त्यांनी दोन राजकीय पक्षांची नौका बुडवण्याचा पराक्रम नक्की केला आहे. रिमोट कंट्रोलने चालणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तापदावर नितीशनी बसवले होते आणि त्याच स्वपक्षाला डबघाईला आणण्याचे धाडस मांझींनी करून दाखवले होते. पुन्हा बिहार जिंकायचा असेल, तर आधी मांझींना बाजूला सारून नितीशनी स्वत: मुख्यमंत्री पदावर बसावे, अशी अट रणनितीकार प्रशांत किशोरने घातली होती. मांझी यांच्यामुळे जदयुची जनमानसातील प्रतिमा खालावली आहे, पर्यायाने निवडणूका गमावणे भाग आहे असे त्याने सांगितले होते. त्यानुसार नितीशना निर्णय घ्यावा लागला होता. तर पक्षादेश झुगारून मांझी यांनी राजिनाम्याला नकार दिला आणि अखेरच्या क्षणी शक्तीप्रदर्शन करून राजकीय तमाशा केला होता. त्याला ठामपणे सामोरे जाऊन नितीश यांनी पक्षाचे बुडते तारू सावरले होते. तेव्हा अमित शहांनी या ‘नितीशना धक्का’ देणार्‍या बुडव्या मांझीला आपल्या सोबत घेतले आणि भाजपाची नौका बुडवण्याचे काम सोपवले. अशी या नेत्याची ख्याती आहे. वास्तविक बुडत्या नौकेला महापुरातूनही सुखरूप किनार्‍याला घेऊन येण्याचे कौशल्य ज्याच्यापाशी असते, त्या नावड्याला मांझी म्हणतात. पण हा अजब मांझी आहे, तो अनेक राजकीय नौका बुडवण्यासाठीच प्रसिद्ध आहे. तो भाजपा आघाडीतून गेला असेल, तर राजकीय धक्क्यातून पक्ष सावरला म्हणून अमित शहाही खुश असतील. उलट आधीच बुडू लागलेल्या राजद या पक्षाने मांझीना जवळ घेऊन आपल्या हमखास बुडण्याची बेगमी केली म्हणायला हवे. कारण या मांझीपाशी कुठलीही आपली हक्काची नौका नाही. पण अन्य कुणाच्या नौकेत बसला तर तो तिलाही बुडवतो. त्याच्याही पलिकडे जाऊन म्हणता येईल की नौकाच काय, जीतनराम मांझी किनाराही बुडवून दाखवू शकतात.

1 comment: