Friday, March 23, 2018

मोदीमुक्त आणि मोदीयुक्त

gujarat riots के लिए इमेज परिणाम

पाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदीमुक्त भारताची घोषणा करून टाकली. तसे त्यात नवे काहीच नाही. कारण मागल्या तीन वर्षापासून देशातील अनेक विरोधी पक्षांनी त्यासाठी अतोनात प्रयत्न चालविले आहेत. फ़ार कशाला २००२ सालापासूनच देशातले पुरोगामी पक्ष मोदीमुक्त गुजरात करण्याच्या मोहिमेत अहोरात्र गुंतलेले होते. पण त्यातून त्यांनी आधी भाजपाला मोदीयुक्त करून टाकले आणि पुढल्या काही वर्षात भारतीय राजकारणच मोदीयुक्त करून टाकले. राज यांनी त्याला नेमका एक शब्द बहाल केला. कारण मोदीमुक्त अशी शब्दयोजना त्यापुर्वी कोणी केलेली नव्हती. राष्ट्रीय राजकारणात मोदी आले, तेव्हा त्यांनी कॉग्रेअमुक्त भारत अशी शब्दावली योजली आणि त्यालाच वळण देत राज यांनी मोदीमुक्त शब्दाची रचना केलेली आहे. त्यासाठी त्यांनी देशातील बिगरभाजपा पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहनही केले आहे. या भाषणात प्रथमच राज यांनी मतांच्या धृवीकरणाचाही उल्लेख केला. हिंदू मतांचे धृवीकरण करण्यासाठी मोदी व भाजपावाल्यांची देशात दंगली माजवण्याचीही योजना असल्याचा आरोप राजनी केला. त्यातही तसे नवे काहीच नाही. गेल्या तीनचार दशकात भाजपा राष्ट्रीय पक्ष म्हणून उभारी घेऊ लागला, तेव्हापासूनच पुरोगामी मानल्या जाणार्‍या पक्षांनी त्याच्यावर मतांच्या धृवीकरणासाठी दंगली माजवण्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे त्या अर्थाने आता राज ठाकरे यांच्या मनसेकडे देशातील एक पुरोगामी पक्ष म्हणून बघायला हरकत नसावी. मात्र अन्य प्रस्थापित पुरोगामी पक्ष ते मान्य करून राजना आपल्यात सामावून घेतात किंवा नाही, ते बघावे लागणार आहे. पण दरम्यान त्यांनी जी धृवीकरणाची भाषा वापरलेली आहे, तिचा उहापोह होण्याची गरज आहे. भारतीय वा मराठी राजकारणात हे काही परवलीचे शब्द तयार झाले आहेत. पण ते वाचणार्‍याला वा ऐकणार्‍याला अजिबात उमजत नाहीत. धृवीकरण त्यापैकीच एक शब्द आहे.

धृवीकरण हा वैज्ञानिक शब्द आहे. पृथ्वीला उत्तर व दक्षिण असे दोन धृव आहेत. या दोन धृवांमध्ये चुंबकीय शक्ती विभागल्या जात असतात. त्याच संदर्भाने हा शब्द राजकारणात योजला जातो. जेव्हा वस्तुमात्र दोन बाजूंनी ओढले जाते आणि त्यांचे विभाजन दोन टोकांमध्ये होते, तेव्हा धृवीकरण होते. हिंदू वा मुस्लिम किंवा कॉग्रेस आणि इतर विरोधी पक्ष, अशी मतांची विभागणी व्हायची त्यातून हा शब्द प्रचलीत झालेला आहे. दंगली माजल्या मग समाजाची धर्मानुसार वा भाषेनुसार विभागणी होत असते. याचा अर्थ राजकीय विचार वाजूला पडून वा विवेकाला सोडून, केवळ आपल्या अस्मितेच्या आहारी मातदार जातो, असे त्यातले गृहीत आहे. मोदी हे धृवीकरण करतात याचा अर्थ असा, की ते दोन गटात राजकारणाची विभागणी करतात, असा आक्षेप आहे. पण त्यात किती तथ्य आहे? निवडणूका जिंकण्यासाठी खरेच दंगल व हिंसाचाराने धृवीकरण घडवून आणता येते काय? अयोध्येत मशिद पाडली गेल्याने देशात अनेक जागी दंगली उसळल्या होत्या. खुद्द उत्तरप्रदेशात भाजपा तेव्हा सत्तेत होता आणि बाबरी पाडली गेल्यामुळे राज्य सरकार बरखास्त करण्यात आले. विधानसभाही बरखास्त करण्यात आली. नंतर झालेल्या मतदानात भाजपाच्या जागा घटल्या आणि मतदानही घटले. मग ज्यातून मते घटली, अशी दंगल त्या पक्षाने कशाला पेटवली असेल? दंगली माजल्याने भाजपाचा लाभ झाला असा कुठलाही दाखला देता येत नाही. कुठल्याही राज्यात कुठल्याही पक्षाला दंगलीचा लाभ मिळाला, असे सिद्ध करता येणार नाही. पण काही राजकीय विचारवंत अभ्यासकांनी तसा सिद्धांत मांडलेला आहे आणि आंधळेपणाने त्याची पुनरुक्ती राजकीय नेते व पत्रकार करीत असतात. २००२ च्या दंगलीचा लाभ मोदींना गुजरातमध्ये मिळाला, याचा कोणी इन्कार करू शकत नाही. पण त्यानंतरच्या विजयासाठी कुठल्या दंगली झाल्या होत्या?

२००७ किंवा २०१२ सालात मोदींनी दोनदा गुजरात विधानसभेत चांगले बहूमत मिळवले. पण दरम्यानच्या दहा वर्षात गुजरातमध्ये कुठलीही दंगल माजली नाही, त्यापुर्वी गुजरातमध्ये दर एकदोन वर्षांनी दंगली माजत होत्या आणि सातत्याने कॉग्रेसलाच सत्ता व बहूमत मिळत होते. मग तेव्हाच्या दंगली कॉग्रेस घडवून आणत होती आणि निवडणूकात मतांचे धृवीकरण करत होती काय? मोदींनी आपल्या कारकिर्दीत दंगलीला कायमचा पुर्णविराम दिला आणि तरीही तिनदा विधानसभा गुजरात राज्यात जिंकून दाखवली. मग धृवीकरण म्हणजे काय? दंगलीचा त्याच्याशी संबंध काय? धृवीकरण कुठल्या तरी पक्षाला लाभदायक ठरते यात शंका नाही. पण ते कोण घडवून आणतो, तेही तपासण्याची गरज आहे. धृवीकरण म्हणजे मतदारासमोर दोनच पर्याय शिल्लक ठेवणे होय. जेव्हा अशा दोनच पर्यायातून निवड करण्याची वेळ येते, तेव्हा तिसर्‍या चौथ्या वा अन्य पर्यायांना निकालात काढले जात असते. गुजरातमध्ये हीच स्थिती इतर पक्षांनी आणली आणि मोदींचा विजय सोपा करून ठेवला. तिथले संपुर्ण राजकारण राज्यापुरते नव्हेतर देशभरातही मोदीमय करून टाकण्याचे पाप विरोधकांचे आहे. २००२ च्या दंगलीचे निमीत्त करून मोदी विरोधातली अशी आघाडी उघडण्यात आली, की देशाच्या कानाकोपर्‍यात मोदी हे नाव विरोधकांनीच पोहोचवले होते. लालूंनी २००५ सालात गुजरात दंगलीची छायाचित्रे मतदारापर्यंत नेऊन बिहारी जनतेला मोदींचा परिचय करून दिला. त्याला धृवीकरण म्हणतात. मुस्लिमांच्या मतांसाठी लालूंनी हा उद्योग केला. पण त्यातून बिहारी हिंदू मतदारांना एका कडव्या हिंदूत्ववादी नेत्याचा पर्याय दाखवला गेला. त्याला धृवीकरण म्हणतात. तेच मग २०१२ नंतर देशभर झाले आणि मोदीमुक्तीच्या डावपेचातून देशभर मतांचे धृवीकरण होत गेले. त्याच्या परिणामी मोदींच्या बाजूनेही धृवीकरण आपोआप होत जाते ना?

मोदीमुक्त भारत या घोषणेचा अर्थ म्हणूनच मूळातून समजून घेतला पाहिजे. मोदीमुक्त म्हणजे राजकारणात मोदी नको असलेल्या मतदारांसाठी पर्याय देणे होय. पण तसे करताना जे बाकीचे लहानमोठे पक्ष आहेत, त्यांच्यात एकजीवता नाही. त्यांचे आपसात रागलोभ आहेत आणि त्यांच्या अनुयायी व मतदारांचेही रागलोभ असतातच. सहाजिकच असे विभिन्न प्रवृत्तीचे लोक नेत्यांच्या निर्णयामुळे एकत्र येतात, तसे त्यांचे अनुयायी वा मतदार एकत्र येत नाहीत. त्यांच्यातला बेबनाव राजकीय तडजोडीने संपत नाही. म्हणूनच मग अशा आघाडी पक्षातले नाराज असतात, त्यांना अकारण मोदींच्या बाजूने ढकलून दिले जात असते. आघाडीतल्या कुठल्याही पक्षाविरुद्ध मत असलेल्या मतदाराला मग ती आघाडीच नको, म्हणून मोदींच्या आश्रयाला जावे लागते. म्हणजेच मोदीमुक्त आघाडी मोदींना आयते धृवीकरण करून देत असते. हा विचार कोणी केला आहे काय? ज्यांना मोदी नको त्यांच्यासाठी आघाडी तयार होईल. पण आघाडीतल्या कुठल्याही पक्षाविषयीची नाराजी, मग आघाडीतल्या इतर पक्षांना भोगावी लागत असते. त्याच्यासाठी मोदींना कुठलेही खास प्रयत्न करावे लागत नाहीत, की धृवीकरण करावे लागत नाही. मोदींपेक्षाही ज्यांना मायावती वा मुलायम नको असतात किंवा ममता वा डावे नको असतात, त्यांना मोदी हा तिसरा पर्याय म्हणून सक्तीने स्विकारणे भाग पडते. त्यासाठी मोदींनी कुठलेही प्रयत्न केलेले नसतात. मग धृवीकरण कोण करतो व त्याचे लाभ कोणाला मिळतात? नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून भागत नाही. त्यांचा अर्थ व परिणामांकडेही बघावे लागत असते. राज ठाकरेंना सोबत घेतले तर उत्तर भारत, गुजरात वा अन्य प्रांतातील इतर पक्षांना आपली मतपेढी दिवाळ्यात घालवावी लागेल ना? मग धृवीकरण कोणाचे झाले? कोणासाठी झाले? मोदीमुक्त भारताची कल्पना म्हणूनच खुद्द मोदींनाच गुदगुल्या करीत असेल.

1 comment: