Thursday, March 29, 2018

जिंकले कोण? हरले कोण?

maya akhilesh so sorry के लिए इमेज परिणाम

गेल्या शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशच्या दहापैकी नऊ जागा भाजपाने गणिती पद्धतीने जिंकल्या. त्याला जनतेचे समर्थन मिळवून संपादन केलेला विजय म्हणता येणार नाही. पण दुसरीकडे नियमांचा आधार घेऊन यश-अपयश ठरणार असेल, तर त्या विजयाविषयी शंका घेणे गैरलागू आहे. तरीही मायावती व इतरांनी भाजपावर लबाडी केल्याचा आरोप ठेवलेला आहे. आता अशा आरोपांची जितकी भाजपाला सवय झाली आहे, तितकाच हा आरोप सामान्य लोकांनाही अंगवळणी पडला आहे. कारण अशा कुठल्याही आरोपात तथ्य नसल्याचा दिर्घ अनुभव लोकांनी घेतला आहे. वर्षभरापुर्वी त्याच उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणूका झाल्या व त्यात भाजपाने अपुर्व यश संपादन केलेले होते. त्यात आपल्या पक्षाचा सफ़ाया झाला, म्हणून मायावतींनी थेट मतदान यंत्रावरच शंका घेतली होती. निवडणूक आयोग भाजपाचा एजंट म्हणून काम करतोय असाही आरोप केला होता. यात भाजपाचे यश बघण्यापेक्षा आपल्यातल्या त्रुटी कोणाला बघायच्या नाहीत, ही खरी समस्या आहे. मग आपले अपयश लपवण्यासाठी कुठलेही बेलगाम आरोप केले जातात. विधानसभा मतदानात यंत्राने गफ़लत केल्याचा आरोप खरा असता, तर फ़ुलपुर व गोरखपूर मतदानात भाजपाचा पराभव झालाच नसता. राजस्थान व अन्यत्रच्या मतदानातही तशीच गफ़लत करून भाजपाने विजय मिळवून दाखवला असता. पण जिथे आपला विजय होतो, तिथे लोकशाहीचा विजय आणि आपला पराभव झाला की भाजपाची लबाडी, असा आरोप बिनबुडाचा असतो. म्हणूनच त्यातून सामान्य जनतेचा विरोधी पक्षांविषयी भ्रमनिरास होत गेला आहे. पण इथे मुद्दा आहे, तो सपा-बसपा यांच्यात होऊ घातलेल्या युतीचा आणि २०१९ सालातल्या लोकसभा निवडणूकीसाठी विरोधी बड्या आघाडीचा आहे. राज्यसभेच्या ताज्या निकालानंतर त्या युती आघाडीचे भवितव्य काय असेल?

भाजपाकडे ३२५ आमदार होते आणि उर्वरीत आमदार विरोधात मतदान करणारे, हे गृहीत धरले तरी बसपाचा उमेदवार जिंकणे अवघड काम होते. गणिताप्रमाणे प्रत्येक विजयी उमेदवाराला किमान ३७ मते मिळायला हवी होती. आपले आठ उमेदवार पहिल्या फ़ेरीत निवडून आणण्यासाठी भाजपाला २९६ पेक्षा अधिक आमदार होते. म्हणजेच त्याच्याकडे आणखी २९ आमदार शिल्लक होते. त्यात ८ इतर आमदारांची भर पडली तर नववा उमेदवारही निवडून येऊ शकणार होता. समाजवादी ४७ मायावती १९ व कॉग्रेसचे ७ आमदार एकत्र केले तरी बेरीज ७३ होते. त्यातले दोघेजण तुरूंगात आणि त्यांना मतदानास कोर्टानेच प्रतिबंध घातलेला. म्हणजे उरले ७१ आमदार. त्यातून दोन उमेदवार निवडून आणायचे तर आणखी तीन आमदार हवे होते. पण यातल्याच दोनतीन आमदारांनी गद्दारी केली. हा भाजपाचा दोष कसा म्हणता येईल? समाजवादी पक्षाने जया बच्चन या आपल्या उमेदवाराला ३८ मते दिली म्हणजे बसपाच्या उमेदवारासाठी उरली होती ३३ मते आणि त्यातही गद्दारी झाल्याने दहाव्या जागेसाठी दोन उमेदवारात पेच पडला होता. असे होते तेव्हा निवडून आलेल्या उमेदवारांची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात आणि तिथे भाजपाचे पारडे जड होते. कारण त्यांच्यापाशी तीनशे मते दुसर्‍या क्रमांकाची होती आणि बसपाकडे ३८ मतांचीच सोय होती. सहाजिकच ती दहावी जागा भाजपाला मिळणार, हे सोपे गणित होते. म्हणून याला गणिती विजय मानता येईल. पण तो व्यवहारी विजय सुद्धा आहे. कारण भाजपाचा नववा उमेदवार राज्यसभेत पोहोचला आहे आणि मायावतींचा पराभूत झाला आहे. आता प्रश्न असा आहे, की त्यामुळे मायावती कुणावर किती रागावणार व त्याचे राजकारणावर कोणते परिणाम संभवतात? त्या चिडाव्यात म्हणून भाजपा प्रवक्त्याने दुखण्यावर बोट ठेवले, ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे.

फ़ुलपुर व गोरखपूर या दोन्ही जागी समाजवादी पक्षाने लोकसभेच्या पोटनिवडणूका जिंकल्या आणि त्याचे श्रेय मायावतींच्या एकतर्फ़ी पाठींब्याला जाते. शक्ती असतानाही त्यांनी तिथे उमेदवार टाकलेले नव्हते आणि अखिलेशने पाठींबा मागितलेला नसतानाही देऊन समाजवादी विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यानंतर सपाचे म्होरके अखिलेश यांनी मायावतींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले होते. विरोधक एकत्र आल्यास मोदीलाटेचा पराभव होतो, याची देशव्यापी चर्चा सुरू झाली होती. मागल्या दोन आठवड्यात त्यावरून देशभर घुसळण सुरू झाली होती. कारण या दोन जागी फ़क्त भाजपा उमेदवाराचा पराभव झाला नव्हता, त्या दोन्ही जागांवर २०१४ सालात निवडून आलेले खासदार सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पराभव त्यांचाच झाला असा निष्कर्ष काढला जाण्यात गैर काहीच नाही. तिथून विरोधी ऐक्याचे पडघम सुरू झाले होते आणि त्याचे पुढले पऊल म्हणून अखिलेशनी मायावतींचा राज्यसभा उमेदवार निवडून आणायला हातभार लावणे, ही अपेक्षा होती. पण निकाल बघता समाजवादी पक्ष तिथे कमी पडला. किंबहूना अखिलेशने मायावतींना दगा दिला, असाही सूर भाजपाच्या प्रवक्त्यांनी लावला आहे. तो जाणिवपुर्वक त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयास आहे. मायावतींनी या पराभवानंतर उघडपणे भाजपावर दलितविरोधी असल्याचा आरोप केला आणि राजकारणासाठी तो योग्यच आहे. पण जाहिरपणे बोललेले मनातलेच असते असेही नाही. या पराभवानंतर मायावतींच्या मनात काय शिजत असेल, तेही तपासून बघितले पाहिजे. अखिलेशने आपली फ़सवणूक केली असे मायावतींना वाटले, तर उत्तरप्रदेशातून सुरू झालेली विरोधी आघाडी बोंबलली असेच म्हणावे लागेल. तशी शक्यता नाकारता येत नाही. कारण मतदानाचे गणितच त्याचे पुरावे देते आहे. जया बच्चन यांची पहिल्या पसंतीची मते खुप काही सांगून जातात.

केवळ ३७ मतांवर जया बच्चन या समाजवादी उमेदवार निवडून येणे शक्य असताना, त्यांना ३८ मते देताना अखिलेशने बसपाच्या उमेदवाराला आणखी एका मतासाठी वंचित ठेवले. खेरीज आणखी एका समाजवादी आमदाराने खुलेपणाने भाजपाला मत दिले. म्हणजेच आपला उमेदवार नक्की येण्याची काळजी घेणार्‍या अखिलेशने मायावतींच्या उमेदवाराला वार्‍यावर सोडून दिले होते. बसपा व मायावतींनी दोन लोकसभा जिंकून देण्यासाठी आपले कार्यकर्ते समाजवादी प्रचारात फ़ुलपुर गोरखपूरला मैदानात उतरवले होते. त्याच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आपले मोजके दहाबारा आमदारही ठामपणे बसपाच्या पाठीशी उभे केले नाहीत. हे मायावतींना कळत नसेल काय? ही मायावतींची दुखरी जखम आहे आणि त्यावर भाजपाने मीठ चोळताना म्हटले आहे, जो बापाचा झाला नाही, तो आत्याला दगा द्यायला कितीसा वेळ लागेल? हे शब्द मायावतींना जिव्हारी लागणारे आहेत. त्या आज उघडपणे बोलल्या नाहीत, तरी मनात तेच वादळ चालू असणार. कारण १९९५ पासून बसपाने कधीही कुठल्याही अन्य पक्षाशी निवडणूकपुर्व युती केलेली नाही. त्याची त्यांनीच केलेली मिमांसाही लक्षात घेतली पाहिजे. मतदानपुर्व आघाडीत आमचे मतदार मित्रपक्षांना मते देतात. पण मित्रपक्षांची मते बसपाला कधीच मिळत नाहीत. म्हणून आपण निवडणूकपुर्व युती करत नसल्याचा युक्तीवाद मायावतींनी कायम केलेला होता. यावेळी प्रथमच त्यांनी आपला युक्तीवाद बाजूला ठेवून दोन पोटनिवडणूकात समाजवादी पक्षाला पाठींबा व मते दिलेली होती. त्याची राज्यसभेसाठी परतफ़ेड व्हावी, इतकी त्यांची अपेक्षा असेल, तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. पण तिथे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे आणि तो जितका जिव्हारी लागलेला असेल, तितका मग भविष्यात निवडणूकपुर्व आघाडी करण्याविषयी संशयाला खतपाणी घालणारा असेल. त्याचा पुढल्या राजकारणावर विपरीत परिणाम होऊ शकेल.

राज्यसभेचा हा अनुभव आहे. लौकरच तशा प्रयोगाचा वेगळा अनुभव मायावतींना कसा येतो, त्यावर लोकसभा २०१९ च्या आघाडी प्रयोगात त्या किती सहभागी होतील, ते अवलंबून असेल. दोन महिन्यात व्हायच्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकात त्यांनी देवेगौडांच्या पक्षाशी युती व जागावाटप केलेले आहे. यात बसपाला किरकोळच जागा मिळाल्या आहेत. पण अशा जागी तरी मित्रपक्षांची किती मते बसपाच्या परड्यात पडतात आणि त्यांचे किती आमदार निवडून येतात, तिकडे मायावतींचे बारीक लक्ष असेल. त्यात लाभ दिसला नाही वा अनुभवास आला नाही, तर मायावतींनी मोदीविरोधी आघाडीत सहभागी होण्याचा विषय निकालात निघेल. कर्नाटकात त्यांना दोनचार आमदार मिळाले तरी मायावती खुश असतील. पण तसे झाले नाही, तर विषय संपणार आहे. जया बच्चन यांना नक्की निवडून आणण्यासाठी अखिलेशने जो डाव केला, तो त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. त्याने एका राज्यसभेसाठी उत्तरप्रदेशातील मोठ्या मतदार गठ्ठ्य़ाला लाथ मारली आहे. पक्षातर्फ़े त्याने जया बच्चन यांच्याऐवजी अन्य कोणी उमेदवार उभा केला असता आणि तो भले पडला असता, तरी बिघडले नसते. पण त्याने आपली शक्ती मायावतींच्या उमेदवाराला निवडून आणण्यामागे लावली असती, तर उत्तरप्रदेशातील सपा-बसपा युतीवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झाले असते. त्यातला मोठा पक्ष म्हणून त्या आघाडीवर यादव वर्चस्व राहिले असते. पण तितकी व्यवहारी हुशारी अखिलेशने दाखवली नाही आणि पर्यायाने विरोधी बड्या आघाडीला जन्मापुर्वीच अपशकुन झाला आहे. राज्यसभेतील एक जागा जिंकण्यापेक्षा मायावतींच्या मनातील अविश्वासाला जिंकून अखिलेशला मोठी बाजी मारता आली असती. भाजपाने एक जागा अधिकची जिंकल्याने फ़ारसा फ़रक पडलेला नाही. पण त्यापेक्षा मोठी बाजी भाजपाने मायावतींच्या मनात शंकेचे बीज पेरून मारलेली आहे. त्याला अखिलेशचा हातभार लागला आहे. किंबहूना त्याच कारणास्तव नववा उमेदवार भाजपाने मैदानात आणलेला होता. थोडक्यात भाजपाचा नववा उमेदवार जिंकताना मायावतींचा उमेदवार पडला. पण पराभूत झाले अखिलेश यादवच्या बड्या आघाडीचे स्वप्न!


पुढारी ऑनलाईन

2 comments:

  1. १९९६ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी बसपाने कॉग्रेस पक्षाबरोबर निवडणूकपूर्व युती केली होती. अविभाजित उत्तर प्रदेशातील ४२५ पैकी ३०० जागी बसपाने तर उरलेल्या जागी कॉग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते.

    मायावतींनी आतापुरते सपा-बसपा युती चालू राहणार असल्याचे म्हटले आहे. पण त्या आपल्या मनात नक्की काय चालू आहे याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. १७ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयींचे सरकार लोकसभेत एका मताने पडले होते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री लोकसभेत वाजपेयी सरकारावरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत बोलताना मायावतींनी 'हा ठराव म्हणजे सापनाथ विरूध्द नागनाथ यांच्यातील झगडा आहे आणि बसपा या झगड्यात कोणाचीही बाजू न घेता तटस्थ राहील असे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात काही तासानंतर त्यांनी वाजपेयी सरकार विरोधात मत दिले. आता यावेळी मायावती आयत्या वेळी अशीच गुगली टाकतात की मोदीलाटेत आपण पुरते वाहून जाऊ नये म्हणून अखिलेश बरोबर युती कायम ठेवतात हे बघायचे.

    ReplyDelete
  2. Shahanchi rananiti baghta phulpur Gorakhpur the muddan Harale asach watatay karan mayawati akhilesh madhye dosti navati va dushmani pan nawati.RS election ne mayawatinchya manat shanka perali ti nasati perali tar 2019 che jagawatap bsp sp che nit zale asate ata tase honar nahi khup tanatani hoil bjp LA the hawe ahe

    ReplyDelete