Sunday, March 11, 2018

वादग्रस्त आणि निर्विवाद

statue vandalism jadavpur के लिए इमेज परिणाम

गेल्या काही दिवसांपासून न्यायमुर्ती लोयांच्या शंकास्पद म्हणजे वादग्रस्त मृत्यूवरून खुप खळबळ उडवून देण्यात आली आहे. अगदी गतवर्षीच्या अखेरीस चार सुप्रिम कोर्ट न्यायाधीशांनीही बंडाचा झेंडा हाती घेताना त्यावरून पुरोगामी वादळ उठवले होते. अर्थात कुठल्याही शंकास्पद मृत्यू वा हत्येबद्दल प्रश्न विचारले जाणे चुकीचे म्हणता येणार नाही. पण अशा शंका व प्रश्न उपस्थित करण्याची वेळ व कारणही तितकेच महत्वाचे असते. तो संदर्भ सोडून अशा प्रश्नाकडे न्यायाची मागणी म्हणून बघता येणार नाही. जेव्हा अशाच स्वरूपाच्या अन्य हत्या वा मृत्यूविषयी पद्धतशीर मौन धारण केले जाते, तेव्हा उरलेल्या विषयात शंका काढणे हेतुपुरस्सर असल्याचा संशय येणे स्वाभाविक असते. न्या. लोया प्रकरणातील गदारोळ तसाच राजकीय होता आणि त्यांच्या नावाने न्यायाचा जोगवा मागण्याचा विषय न्यायाशी संबंधित नव्हता, तर त्यात राजकारण भरलेले होते. तेच आता त्रिपुरातील लेनिन पुतळ्यावरही म्हणता येईल. कारण पुतळ्यांची विटंबना हेच दुखणे असेल, तर पुण्यातले अनेक पुतळे अगदी अलिकडल्या काळात फ़ोडण्याचे तोडण्याचे प्रकार घडलेले होते. पण त्यावेळी यापैकी कोणालाही त्याची कुठली दखल घेण्याची गरज वाटलेली नव्हती. मग यांच्या न्यायाची वा संवेदनशीलतेची व्याख्या कोणती, असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. कोण मारला जातो वा कुठल्या पुतळ्याची विटंबना झाली, ही बाब दुय्यम होते आणि तो पुतळा फ़ोडला कोणी वा मारला कोणी या निकषावर मागण्या होतात, तेव्हा निदान तटस्थतेचा मुखवटा चढवण्यात अर्थ उरत नाही. न्या लोयांच्या मृत्यूला तीन वर्षे उलटून गेल्यावर ज्यांना त्यामागचे सत्य शोधण्याचा अट्टाहास करावासा वाटतो, त्यात सत्याची ओढ असती, तर त्यापैकी अनेकांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वा दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूविषयी तितकीच आस्था दाखवली असती.

जनसंघ वा संघाशी संबंधित अशा दोन मोठ्या नेत्यांच्या हत्या वा मृत्यू कायम संशयाच्या घेर्‍यात राहिले आहेत. त्याबद्दल संघ वा भाजपाच्या लोकांनी सातत्याने आवाज उठवलेला होता. पण त्यांच्या त्या मागणीला साथ द्यायला कोणी पुरोगामी गोटातून पुढे आलेला नव्ह्ता. ह्याचे काय कारण असावे? ज्या पत्रकारांनी वा अन्य माध्यमांनी लोया प्रकरणात न्यायाचा आवाज उठवण्याचा आव आणलेला होता, त्यापैकी कितीजणांनी उपाध्याय वा श्यामाप्रसाद यांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य उजेडात यावे म्हणून प्रश्न विचारले आहेत? नसतील तर का विचारले नाहीत? त्याची काय कारणे आहेत? संघाचा वा भाजपा जनसंघाचा कोणी मारला गेला व त्याचा मृत्यू शंकास्पद असेल, तर तो नैसर्गिक मृत्यू मानावा; असे पुरोगामी विचारांचे सुत्र आहे काय? तशी काही भारतीय राज्यघटना वा कायद्यात तरतुद केलेली आहे काय? नसेल तर तितक्याच आवेशात यापैकी कोणी त्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मृत्यूची चौकशी कधीच का मागितली नाही? त्याचे कारण स्पष्ट आहे. माणूस मारला जाण्याला महत्व नाही. तो कुठल्या विचारांचा आहे किंवा त्याला मारणारा कुठल्या राजकीय गोटातला आहे, त्यानुसार पक्षपाती भूमिका घेण्याला पुरोगामीत्व संबोधले जात असते. म्हणून तर दाभोळकर वा पानसरे पुरोगामी असतानाही त्यांच्या हत्येविषयी हळहळ व्यक्त करण्यासाठी इतरेजनांवर दबाव आणला जातो. पण संघाच्या कुणाची केरळ त्रिपुरात हत्या झाली, तर पुरोगामी गोटात कटाक्षाने मौन पाळले जाते. कधीकधी तर मृताला दाखलेबाज वा हिंदू दहशतवादी ठरवून पाठ फ़िरवण्याचीही तरतुद आधीच केलेली आहे. त्यामुळे वादग्रस्त व निर्विवाद या शब्दांच्या पुरोगामी व्याख्याच वेगळ्या आहेत. सहाजिकच त्याचीच पडछाया त्रिपुरातील लेनिन पुतळ्यावर पडलेली आहे. त्यावरून प्रचंड काहूर माजवले गेलेले आहे.

काही वर्षापुर्वी पुण्यातल्या लालमहाल या ऐतिहासिक वास्तुमधील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मुळ शिल्पातून कापून काढण्यात आला. ती कोणत्या लोकशाही सभ्यतेची साक्ष होती? दूर त्रिपुरातला पुतळा उखडल्याने विचलीत झालेल्यांना आपल्या शेजारी पुण्यातल्या राम गणेश गडकरींचा पुतळा उखडल्याने झोपमोडही झालेली नव्हती. ही कसली संवेदनशीलता असते? कारण तिथे संघविरोधी झुंड म्हणजे संभाजी ब्रिगेड उचापतखोर असते. त्यांच्या पाठीशी कोळसे पाटील हे पुरोगामी न्यायाधीश असतात. तेच मग शनवारवाड्याच्या समोर भरलेल्या एल्गार परिषदेचेही पाहुणे असतात. हा मोठा फ़रक असतो. कृती वा मानवी हत्या महत्वाची नसते. तर कोणाच्या कृपेने वा आशीर्वादाने अशी कृत्ये होतात, त्यावर प्रतिक्रीया अवलंबून असतात,. त्या वादग्रस्त वा वादातीत तेव्हा होतात, जेव्हा त्यांचे नातेगोते शोधून काढले जातात. निरपेक्षता अशी पक्षपाती झाली आहे. केरळात मधू नावाच्या गरीब आदिवासीला तांदुळ चोरले म्हणून जमावाने ठार मारले, तर प्राथमिक प्रतिक्रीया जोरात होती. पण लौकरच त्या हत्येमागे हिंदू जमाव नसून मुस्लिम पोरांनी मारल्याचे निष्पन्न होताच, सगळ्या संवेदना बधीर होऊन जातात. पण दिल्लीनजिकच्या अखलाखला तसाच जमावाने मारला असूनही प्रतिक्रीया भिन्न व दिर्घकालीन असतात. अखलाखला मारणारा जमाव हिंदू असल्याने घटना मोठी वादग्रस्त होते आणि मधूला मारणारा जमाव मुस्लिम असल्याने घटना निर्विवाद होऊन जाते. शिवसेनेने कुणाला चोपले तर अविष्कार स्वातंत्र्याची भयंकर गळचेपी होऊन जाते आणि पॅरीसमध्ये शार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रकार संपादकांचे सामुदायिक शिरकाण झाले, तरी ते क्षम्य कृत्य असते. थोडक्यात पुरोगामी शब्दकोषात गुन्हे वा पापकर्माच्या व्याख्या व व्याप्ती संदर्भानुसार कायम बदलत असतात. कृती वा घटना दुय्यम असून गुंतलेले कोण, त्यावर प्रतिक्रीया बनणे ही संवेदनशीलता असते.

एकूणच पुरोगामीत्व इतके पोरकट वा बालीश झाले आहे, की आता रस्त्यावरच्या सामान्य माणसालाही त्यातला खुळेपणा व खोटेपणा लक्षात येऊ लागला आहे. म्हणूनच या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. तुमच्या हातात सत्ता असताना सरसंघचालक मोहन भागवतांच्या साध्या राष्ट्रध्वजाच्या कार्यक्रमावर बंदी घातली जात होती, तो कुठला सभ्यपणा व लोकशाही होती? ज्याच्या हाती लाठी त्याची भैस, हाच नियम पुरोगाम्यांनी लोकशाहीचा पायंडा बनवला होता ना? बंगालमध्ये ममता दुसरे काय करीत आहेत? सत्ता किंवा बळ हाती आल्यावर मनमानी करण्याला लोकशाही मानावे लागेल, असे कृतीतून कोणी दाखवून दिले आहे? त्याची प्रतिक्रीया मग सत्तांतरानंतर उमटत असते. लक्षात ठेवा, त्रिपुरात सत्ता भाजपाने हाती घेतली जाण्यापुर्वी पुतळा तोडला गेला आणि तो सरकारने पाडलेला नाही. ती जमावाची प्रतिक्रीया आहे. पण ममता किंवा पिनयारी विजयन तर सत्तेचा वापर करून मुस्काटदाबी व दहशत माजवत आहेत ना? मग त्यावर ज्याने कोणी आवाज उठवलेला असेल, त्यालाच आता लेनिनचा पुतळा फ़ोडणार्‍यांना निषेध करता येईल. तेव्हा मीठाची गुळणी घेऊन बसलेल्यांनी बोंबा ठोकण्याची काहीही गरज नाही. कारण आज पुतळे फ़ोडणारेही पुरोगामी पायंड्याचे अनुकरण करत आहेत. तिला पुरोगामी कृती नक्की म्हणता येईल. जे कोणी ममता वा विजयन यांना पुर्वी जाब विचारत होते, ते माझ्यासारखे लोक मात्र भाजपाला जरूर जाब विचारू शकतात. विचारलाही आहे. निषेधही केला आहे. कारण जे कृत्य चुकीचे आहे, त्याला वैचारीक पाठींबा असू शकत नाही. शिवाय जे कृत्य पुरोगामी प्रणालीतले पाखंड आहे, त्याचे अनुकरण भाजपा वा संघाचा कोणी करीत असला, म्हणून त्याला पाठीशी घालण्याचेही काही कारण नाही. मुद्दा चुकीच्या कृती वा गुन्ह्याचा आहे. तो कोणी केला याला अजिबात महत्व नाही.

3 comments:

  1. कोळसे का अस्तनीतील निखारे ?

    ReplyDelete
  2. खरय भाउ या पुरोगाम्यांनी अस जनतेला ठगवलय की बस.आता सत्तेच कवच नसल्याने जरा जास्तच तडफड होतेय

    ReplyDelete