Friday, April 13, 2018

भुतकाळाकडे माघारी

maya akhilesh cartoon kureel के लिए इमेज परिणाम

सध्या जे राजकारण ढवळून निघाले आहे, ते बघता पाच वर्षापुर्वीचा काळ आठवू लागला आहे. तेव्हाही असेच लोकसभेचे वेध लागलेले होते आणि चहूकडून भाजपावर माध्यमे व विविध पक्षाचे प्रवक्ते प्रश्नांचा भडीमार करू लागलेले होते. फ़रक एकाच गोष्टीचा आहे. तेव्हाही राजकारणाचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदीच असले, तरी त्यांची पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवड केलेली नव्हती. पण तशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्यावरूनच गदारोळ माजलेला होता. तेव्हाचा राजकीय अभ्यासक वर्गाचा एक निश्चीत निर्वाळा होता, की मोदींना भाजपाने उमेदवार केले, तर भाजपाचा सुपडा साफ़ होणार. किंबहूना म्हणूनच अनेक मान्यवर पत्रकार अभ्यासक भाजपा प्रवक्त्याला खिजवून विचारत होते, की तुम्ही इतक्या लोकप्रिय मोदींना नेतृत्व कशाला सोपवत नाही? त्या निष्कर्षाचा दबाव इतका होता, की भाजपाचे प्रवक्तेही ठाम आवाजात मोदीच नेता होतील, असे बोलायचे धाडस करीत नव्हते. पण चर्चेचा केंद्रबिंदू मोदीच होते आणि आजही मोदीच चर्चेचा मध्यबिंदू आहेत. फ़रक किरकोळ आहे की तेव्हा नुसतेच इच्छुक मानले जाणारे मोदी आज पंतप्रधान आहेत आणि पुन्हा त्यांच्या दारूण पराभवाचे निष्कर्ष आतापासून काढले जात आहेत. मात्र असे निष्कर्ष काढणार्‍यांना आपलेच पाच वर्षापुर्वीचे निष्कर्ष वा सिद्धांतही आठवत नाहीत. जणू काही नवेच सांगत असल्याप्रमाणे जुन्या गोष्टी रंगवून सांगितल्या जात आहेत. पण तेव्हा आपली कुठे व कशी फ़सगत झाली, त्याचा आढावा घेण्याची कोणाला गरज वाटलेली नाही. ही आपल्या देशातील राजकीय अभ्यास व विश्लेषणाची शोकांतिका होऊन बसली आहे. संदर्भहीन बडबड व बेताल निष्कर्ष, हा राजकीय अभ्यास होऊन बसला आहे. याचा मग मोदींसारख्यांना राजकीय लाभ मिळत असतो. तेव्हा मोदींमुळे भाजपाची धुळधाण उडण्याची हमी देणारे आता मोदींना बहूमत मिळणार नसल्याचे हवाले देत आहेत.

पाच वर्षापुर्वी जी राजकीय मोहिम सुरू झाली होती, त्यात कोणी अभ्यासकही भाजपा सोडा, त्या पक्षाच्या नेतृत्वाखालच्या एनडीए आघाडीलाही बहूमतापर्यंत घेऊन जायला तयार नव्हता. पण प्रत्यक्षात ती आघाडी सत्तेत आली आणि भाजपाला बहूमत मिळाले. तब्बल आठ लोकसभा निवडणूकीनंतर कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहूमत देण्यापर्यंत भारतीय मतदाराने मजल मारली. तो पराभव कॉग्रेस वा पुरोगामी पक्षांचा असण्यापेक्षाही तथाकथित राजकीय अभ्यासक म्हणून मिरवणार्‍या पुरोगामी अभ्यासकांचा होता. कारण या लोकांचा वर्तमानाशी संपर्क तुटला आहे. काळाबरोबर समाज बदलत असतो आणि त्याचा सामुहिक वर्तनावरही फ़रक पडत असतो. म्हणून मग चार वर्षापुर्वी जे निकाल लागले, त्याच्या धक्क्यातून या लोकांना अजून बाहेर पडता आलेले नाही. परिणामी तेव्हा आपले काय चुकले, त्याचाही अभ्यास न करता नव्या काळाची मिमांसा चालू असते. पण त्यातला विरोधाभासही यांना जोखता येत नाही. आज जी चर्चा चालू आहे. ती मोदी पुन्हा बहूमत गाठू शकतील किंवा नाही, अशी आहे. त्यात मोदींच्या अपयशाची भाकिते चालू आहेत. पण ह्याच मोदींना सत्तेपर्यंतही पोहोचता येणार नसल्याची भाकिते कशाच्या बळावर तेव्हा केलेली होती? ते निकष वा निष्कर्ष का चुकले? गणित मांडण्यात काय चुक झाली? ती चुक सुधारून आजचे आकलन चालू आहे काय? यासारखे प्रश्न उपस्थित होतात. यातला पहिला प्रश्न आहे आजच्या परिस्थितीचा. २०१४ मध्ये सत्ताबदलाला लोक इतके उतावळे कशाला झाले होते आणि आज तशी स्थिती आहे काय? कुठलेही भाकित करण्यापुर्वी अशा गोष्टी गंभीरपणे समिकरणात मांडाव्या लागतात. तेव्हा जनमानसाची स्थिती मनमोहन सरकार सोडून कोणीही अशी होती. आज तितकी बिकट परिस्थिती आहे काय? नसेल तर लोक कशाला सत्ताबदलाचा विचार करतील? केवळ अभ्यासकांना बदल हवा म्हणून कोणी मतदान करीत नसतो.

पुढल्या वर्षभरात काय होईल, ते आज सांगता येत नाही. पण गेल्या चार वर्षात काय स्थिती आहे, त्याचा आढावा नक्कीच घेता येईल. त्याकडे बघता, मोदी सरकारने लोकांना वैफ़ल्य यावे, इतका वाईट कारभार केलेला नसल्याचे लक्षात येईल. पण एकूण माध्यमांचा सूर बघितला तर जणू मोदी सरकार येण्यापुर्वी सर्व काही सुरळीत होते आणि त्या काळाची पुनर्स्थापना करायला लोक उतावळे झालेत, असाच सुर लागलेला असतो. कुठे आहेत अच्छे दिन? पंधरा लाखाचे काय झाले, असले खुळचट प्रश्न विचारले जातात, तेव्हा प्रश्नकर्त्याची कींव करावी असे वाटते. चार वर्षापुर्वी विविध पक्ष आपापल्या भूमिकेतून वा अजेंड्यावर निवडणूकीला सामोरे गेलेले होते. आज तेच तमाम पक्ष मोदी विरोधात एकजुट करून लढण्याची भाषा बोलत आहेत. त्याचा साधा सरळ अर्थ इतकाच, की यापैकी कोणाही पक्षाला वा नेत्याला स्वबळावर लढायची हिंमत राहिलेली नाही. मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला आपण आपल्या बळावर रोखू शकत नसल्याची पराभूत मानसिकता, हे मोदींचे राजकीय यश नसेल तर काय आहे? आपण अजिंक्य असल्याची धारणा जर मोदी मागल्या चार वर्षात सर्व विरोधी पक्षात रुजवू शकले असतील, तर त्याला राजकीय झेप म्हणता येईल. त्यामुळेच आगामी लोकसभेची कुंडली मांडताना कुठले कुठले पक्ष व नेते एकजुटीने मोदी विरोधात एकत्र येतील, त्याची मांडणी करावी लागते. हाच पाच वर्षातला मोठा फ़रक आहे. आज कॉग्रेससारखा जुना देशव्यापी पक्षही आपल्या बळावर कुठे लढायचा विचार करत नाही, तर त्या पक्षाचा अध्यक्ष पुर्वीच्या विरोधी नेत्यांप्रमाणे आघाडीच्या भाषेत बोलू लागला आहे. एवढी एकच बाब मोदी किती आघाडीवर आहेत, त्याची साक्ष देतो. इतके लक्षात घेतले तर २०१४ सालात मोदींना कुठल्या घटकांनी विजयाला हातभार लावला, त्याचे आकलन होऊ लागेल. ते झाले तर मोदींना पराभूत करण्याचे मार्ग मिळू लागतील.

पहिली मोठी गोष्ट म्हणजे कुठल्याही विरोधी प्रचार वा अपप्रचार यातून मोदींना शक्ती मिळत असते. हा २०१४ चा मोठा धडा आहे. पण कुठलाही पक्ष वा विरोधक तो धडा शिकलेला नाही. मागली चार वर्षे मोदी व त्यांनी उभा केलेला भाजपाचा संघटनात्मक सांगाड्याला आव्हान देऊ शकेल अशी यंत्रणा कुठल्या पक्ष वा आघाडीने उभी केलेली नाही. त्यापेक्षा २०१४ मध्ये फ़सलेला नुसत्या अपप्रचाराचाच खेळ पुन्हा जोरात चालू झालेला आहे. माध्यमे व प्रचार इतक्याच पुंजीवर प्रत्येक पक्ष लढाईत उतरायला बघतो आहे. त्यासाठी मग आपापल्या मतांच्या बेरजा करून त्याच्या समोर भाजपाची मते कमी कशी आहेत, त्याचे युक्तीवाद मांडले जात आहेत. २०१४ ची रणनिती जशीच्या तशी पुन्हा पुढे रेटली जात आहे. फ़रक किरकोळ आहे. तेव्हा प्रत्येक पक्ष आपापल्या बळावर आणि आपापल्या क्षेत्रात मोदींना रोखायला पुढे सरसावला होता. आज त्यांना एकमेकांच्या मदतीने ते धाडस करायचे आहे. दुसरी गोष्ट आपण सर्वजण एकत्र येऊन मोदी वा भाजपाला बहूमतापासून रोखू शकलो तरी बहादुरी, इतकी पराभूत मानसिकता विरोधकांमध्ये बोकाळली आहे. तेव्हा मोदींना सर्वात मोठा पक्ष होण्याइतकी मतेही मिळणार नसल्याची या लोकांना हमी वाटत होती. आज त्याच लोकांना भाजपाला बहूमत मिळू नये, अशी किमान आशा आहे. ह्याला पराभूत मानसिकता म्हणतात. मनात पराभवाचे भय घेऊन कोणी लढू शकत नसतो. कालबाह्य झालेली रणनिती व साधने घेऊन आधुनिक लढाई लढता येत नाही, की जिंकता येत नाही. अजून ज्यांना २०१४ च्या पराभवातून बाहेर पडता आलेले नाही, त्यांनी गर्जना कितीही केल्या म्हणून उपयोग नाही. सहाजिकच जुन्या चुकांची पुनरावृत्ती करण्याकडेच सर्वांचा ओढा दिसतो आहे. किंबहूना तेच मोदींचे बळ होत चालले आहे. २०१९ ही २०१४ ची पुनरावृत्ती होत चालली आहे.

4 comments:

  1. भाऊ, हे सर्व जरा विचित्रच वाटत आहे. 2014पासून जर नीट पाहिले तर प्रत्येक निवडणुकीत काहीतरी नवेच प्रकरण बाहेर येत आहे. अगदी बिहार निवडणूक - सहनशीलता ते आता कर्नाटक - बलात्कार. काहीही करून मोदींना बदनाम करायचे. मला हे समजत नाही की हे सर्व विरोधी लोकांची मानसिकता बदलत का नाही? मोदींचा पराभव होऊ शकतो पण त्याला त्यांच्या तोडीचे डावपेच खेळावे लागतात हे त्यांना कोण सांगणार ? कदाचित आपण जिंकू शकत नाहीतर त्याला पुरता बदनाम करू तर मग जनता आपल्याला निवडून देईल असा समज आहे. हल्लाबोल यात्रा काय किंवा परत निडणूक लढवणार ही सर्व मानसिकता त्याचेच लक्षण आहे असे वाटते.
    मला वाटते आता मतदारांचा निर्णय महत्वाचा.

    ReplyDelete
  2. भाऊ खरंच आहे,टीव्ही वर किंवा पेपर मध्ये हे तथाकथित लोक विश्लेषण करतात तेव्हा काँग्रेस ,सपा राष्ट्रवादी ,बसपा डावे तीच ती टेप वाजवतात १५ लाख रुपये ,नोटबंदी,बेरोजगारी,असाहिशुनता ,gst वगैरे .लोक पण कंटाळतेत ते ऐकून मोदी ना नव्हे ,कधी तर असा वाटत कि मोदींनीच हे मुद्दे दिलेत त्यांना चघळायला.,स्वतःहून करू शकणाऱ्या कितीतरी गोष्टी ते फायदा घेऊ शकत नाहीत.उदा sc st कायदा,त्यांत सरकार पक्ष नव्हता त्यामुळे कोर्टाने निकाल दिल्यावर कोणीही याचिका दाखल करू शकल असत ,सरकार पण एक आठवडा शांत बसलं आणि विरोधी लोक सरकारच का कोर्टात जात नाही म्हणून अडवून बसले, अरे तुम्ही गेला असता तर सरकारची किती नाचक्की झाली असती दलितांची सहानुभूती पण मिळाली असती आता जे काही होईल ते मोदींच्या फायद्याचेच होईल ,एरवी प्रशांत भूषण वगैरे लोक रोहिंग्या,कसाब,याकूब,काश्मीर चे दगडफेकू यांच्या साठी काही कारण नसताना कोर्टात जातातच ना ,काँग्रेस ला काय वाटत हे भाजप लोकांना सांगणार नाही निवडणुकीत?,असे खूपच मुद्दे आहेत.

    ReplyDelete
  3. सुजित सरांनी खूपच छान माहिती दिली,
    खरोखरच भाऊ आपण राजकारणातील चाणक्य पेक्षा थोर आहे
    विपक्ष किती बेअक्कल त्यांनी भाऊ कडून शिकुन घाव

    ReplyDelete