Friday, April 6, 2018

कडेलोटावरचे शक्तीप्रदर्शन

MMRDA भाजपा मेळावा के लिए इमेज परिणाम

स्थापना दिवस म्हणून भाजपाने मुंबईत जो महामेळावा योजला, त्याची खरोखरच काही गरज होती काय? मागल्या चार वर्षात मुंबई महानगराने भाजपा निवडणूकीत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. अर्थात ही स्थानिक भाजपा नेत्यांपेक्षाही मोदीकृपा आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी जनमानसात आपल्याविषयी ज्या अपेक्षा निर्माण केल्या, त्याचा लाभ भाजपाला प्रत्येक निवडणूकीत मिळत गेला. तो प्रतिसाद संघटना वा शक्तीप्रदर्शनाची पावती नव्हती. आजवरच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांनी जनभावनेविषयी निगरगट्ट असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपाला दिलेला प्रतिसाद होता. प्रामुख्याने मुंबईकराची अवस्था अतिशय दयनीय आहे. वाहतुकीपासून जगण्यातली प्रत्येक सुविधा मुंबईत ढासळत गेली आहे. प्रत्येक मुंबईकर कडेलोटावर उभा असल्यासारखा जीवन कंठत असतो. अशा मुंबईकर मतदाराची भाजपाकडून कुठली अपेक्षा असेल? त्या पक्षाने सत्ता मिळताच दुर्दशा झालेल्या मुंबईला जादूची कांडी फ़िरवून सुसह्य करावे, अशी टोकाची अपेक्षा कोणी करणार नाही. पण या पक्षाने निदान आधीच असह्य झालेल्या मुंबईच्या नागरी जीवनात आणखी कुठला व्यत्यय आणू नये, ही अपेक्षा नक्कीच असणार. मग त्यापैकी कशाची पुर्ती भाजपाने केलेली आहे काय? नसेल, तर कडेलोटावर उभ्या असलेल्या मुंबईकराला आपल्या शोभा मेळाव्यासाठी आणखी गर्तेत लोटून द्यावे काय? मोठ्या सभा वा मेळावे हे शेवटी शक्तीप्रदर्शन असते आणि त्यातून जनता किंवा कार्यकर्त्याचे कुठलेही प्रबोधन वगैरे होत नसते. मग तुमच्या शक्तीप्रदर्शनासाठी अर्धा दिवस मुंबईकरांना ओलिस ठेवण्याने काय साध्य केले जाते? प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चा-बंदने विचलीत होणारे जनजीवन आणि भाजपाच्या महामेळाव्याने होणारी अव्यवस्था, यात कुठला मोठा फ़रक असतो? लोक त्याला शक्तीप्रदर्शनापेक्षाही मस्तवालपणाच समजणार ना?

अर्थात कुठल्याही पक्ष वा संघटनेला आपल्या शक्तीप्रदर्शनाचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे आणि एखादी संघटना कुठलाही हिंसक प्रकार करणार नसेल, तर त्यांना अशा कार्यक्रमाला प्रतिबंध घालण्याची अजिबात गरज नाही. पण मुंबईचे जनजीवन इतके गुंतागुंतीचे झाले आहे, की त्यात आणखी बेशिस्तीचा भार सोसण्य़ाची क्षमताच राहिलेली नाही. बीकेसी या भागात सर्वात मोठे विस्तीर्ण मैदान पटांगण आहे म्हणून शक्तीप्रदर्शनला ती जागा वापरली जाते. पण ही जागा मुंबई महानगर व उपनगरांच्या मध्यवर्ति जागी आलेली आहे. उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारे सर्व मार्ग व वाहतुकीची साधने तिथूनच जात असतात. सहाजिकच या मैदानात कुठलाही मोठा मेळावा किंवा कार्यक्रम असला, म्हणजे मुंबईच्या नाड्या आपोआप आखडल्या जात असतात. काही तासांसाठी स्थापना महामेळावा भरवायचा तरी संपुर्ण दिवस मुंबई ठप्प करणे भाग पडते. शुक्रवार हा मुंबईसाठी कामाचा दिवस असतो आणि लाखो लोक उत्तर दक्षिण असे धावत पळत येजा करीत असतात. त्यांच्यासाठी शुक्रवारी भाजपाने व्यत्यय आणण्याचे काम केले. आधीच मुंबईतल्या विविध भागात मेट्रोसाठी खोदकाम करून ठेवलेले आहे. जागोजागी आधीच अरूंद असलेले रस्तेही आणखी चिंचोळे झालेले आहेत. त्यात आणखी काही हजार वहानांची भर या मेळाव्याच्या निमीत्ताने पडणार असेला, तर मुंबईकराला कडेलोटावरून ढकलूनच दिले जाते ना? जी स्थिती या मेळाव्याच्या निमीत्ताने झाली. किंबहूना तशीच स्थिती रामरहिमच्या खटल्याचा निकाल होता, त्यादिवशी चंदीगडची झालेली होती. काही लाख लोक मुंबईत तात्पुरते आल्यानेही गर्दी असह्य होऊन जाते आणि सध्या उन्हाळ्याने मुंबईकर घुसमटलेला आहे. यापैकी कशाचेही भान भाजपाच्या नेतृत्वाला राहिलेले नसेल, तर यांना मते दिल्याचा पश्चात्ताप लोकांना झाल्याशिवाय रहाणार नाही.

महामेळावा घ्यायला हरकत नाही. तो मुंबईत म्हणजे थेट मुंबईच्या गाभार्‍यात घेण्याची काय गरज आहे? मुंबईकर आणि मुंबईत कामासाठी यावेच लागणार्‍या बाहेरच्या उपनगरी नागरिकाच्या त्रासाचा विचार करण्यात काय अडचण आहे? वाशी, कोकणभवन वा कल्याण आदी दुरच्या पण मुंबईच मानल्या जाणार्‍या तुलनेने विरळ वस्ती असलेल्या भागात असा मेळावा घेता आला नसता काय? त्यामुळे मुंबईतल्या वहानांची गर्दी वाढली नसती की आधीच्याच वाहतुक कोंडीची आणखी कोंडी करण्याची वेळ आली नसती. जगाच्या पाठीवर कुठेही असले महामेळावे घेतले, तरी थेट प्रक्षेपणातून त्यातले शक्तीप्रदर्शन होतच असते. मग मुंबईचा हट्ट कशासाठी? ज्या पक्षाला मुंबई व देशातल्या बहुसंख्य जनतेने कौल दिलेला आहे, त्याला शक्तीप्रदर्शनाची गरज नसून लोकांविषयी आस्थेचे प्रदर्शन मांडण्याची गरज आहे. मुंबईकराच्या जीवनात असलेल्या दुविधांविषयी आपुलकी दाखवून मेळावे दुर घेतले, तर मुंबईकरांनी अधिक दुवा दिला असता. पण शुक्रवारी तोच मुंबईकर भाजपाला शिव्याशाप देत होता. बाहेरून मेळाव्यासाठी मुंबईत आलेल्या गाड्या व त्यातल्या भाजपावाल्यांवर मुंबईकर रागावलेला होता. अमिताभसारख्या दिग्गजानेही वाहतुकीत पाच तास अडकून पडल्याची सोशल मीडियात तक्रार करावी, याचा अर्थ पक्षाच्या नेत्यांना उमजतो काय? कालपरवा शेतकरी मोर्चा याच मुंबईत आला होता आणि त्यांनी शालेय परिक्षांचा मोसम असल्याने अपरात्री चेंबूरहून आझाद मैदानकडे प्रस्थान ठेवले. त्यातला समजूतदारपणा भाजपाला दाखवता आलेला नाही. याला मस्तवालपणा म्हणावा लागेल. जे पराभूत आहेत, तेही जनभावनेची कदर करतात आणि ज्यांना जनतेने डोक्यावर घेतले, त्यांना लोकांच्या अडचणीविषयी फ़िकीर नाही; असाच याचा अर्थ होतो. हा पक्ष ३८ वर्षापुर्वी कशाला मुंबईत स्थापन झाला, असे म्हणत मुंबईकराने डोक्यावर हात मारून घ्यावा, अशी अपेक्षा आहे काय?

भले हा मेळावा कुठला व्यत्यय आणण्यासाठी योजलेला नव्हता आणि त्यातल्या कोणा घोळक्याने कुठे दंगा माजवला नाही. पण मुंबईचे जनजीवन विस्कळीत करून टाकले ना? मग भारत बंद वा भीमा कोरेगाव नंतरचा महाराष्ट्र बंद, यातून वेगळे काय साधले गेले होते? तेव्हा तर हेतूच जनजीवन विस्कळीत करण्याचा होता. ज्यांचे बळ तोकडे वा क्षीण असते, त्यांच्याकडून अशी कृती होऊ शकते. आपली कमी असलेली शक्ती जनजीवन ओलिस ठेवून त्यांना सिद्ध करायची असते. भाजपाला अशा शक्तीप्रदर्शनाची गरज का वाटावी? कारण बंद असो किंवा असा महामेळावा, त्यातून मुंबईकराच्या वाट्याला आलेले परिणाम सारखेच आहेत. सत्तेत बसलेल्यांनी लोकांचे जीवन सुरळीत चालण्याचा विचार करायचा असतो, ती त्यांची जबाबदारी असते. त्याचे कुठले भान यात दिसले नाही. विमानतळाकडे पक्षाच्या अध्यक्षाचे स्वागत म्हणून दहा हजार बाईकस्वार पाठवण्याने काय साध्य झाले? जणू सगळीकडून मुंबईकरांची कोंडी करण्याचाच कार्यक्रम असावा, असाच हा अनुभव नाही काय? हे कॉग्रेसकडून अनेकदा झालेले आहे आणि त्यातून त्या पक्षाचे बळ कधी वाढले नाही. भाजपानेही अशा नाटके व प्रदर्शनातून लौकर बाहेर पडावे. अशा कार्यक्रमांना योग्य असेल तशा जागी महामेळावे भरवावे आणि शक्तीप्रदर्शन करावे. बीकेसीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांनी भाजपाच्या बस व गाड्या चिडून रोखल्या असतील, तर पक्षासाठी ती लोकप्रियता मानता येणार नाही. तुमचा हेतू किती शुद्ध आहे, त्याच्याशी लोकांना कर्तव्य नसते. लोकांना कोणते परिणाम भोगावे लागतात, त्यावर लोकांची मते बनत असतात आणि तीच मते सत्ता देत वा हिसकावून घेत असतात. हे सत्य जितक्या लौकर भाजपच्या नेतृत्वाला कळेल तितके बरे. अन्यथा लोकांना ते मतदानातून समजावण्याची वेळ येईल. लोकांच्या अपेक्षा फ़ार नसतात. पण राजकीय पक्षांसाठी अपेक्षाभंग मात्र फ़ार मोठा असतो.

7 comments:

  1. बिचारे वाजपेयीजी त्यांनी फार कमी लोकांना घेउन मुंबइत समुद्राकाठी भाजपा स्थापनव केला व अतिशय सुदंर व काव्यात्मक भाषन केले तेआजही व लोकप्रििरििय आहे पनआज तीच बीजेपी नुसतेच शक्तीीप्रर्दशन करतेय शहांनी १५मिनिटांचे भाषन केले येवढ्या लोकांना बोलवुन त्यासाठी इतक्कांया लाेकाना मुंबइतआणण्याची काय गरज?

    ReplyDelete
  2. Bhau aaj tumhi nipakshyapati pana dakhavilya dhanyavaad.

    ReplyDelete
  3. सगळा समजूतदारपणा फक्त भाजपाने दाखवावा ही अपेक्षा म्हणजेच भाजपसाठी राजकीय नाही पण वैचारिक अस्पृश्यता नाही काय??

    यापूर्वी आणि गेली कित्येक वर्षे शिवसेना आणि आता मनसे मुंबईत शक्तिप्रदर्शन करतातच ना मग हे उपदेशाचे ढोस फक्त भाजपलाच का?

    कारण काय तर जरी भाजपची स्थापना मुंबईत झाली असली तरी भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, आणि इतर दोन हे या मातीतले प्रादेशिक पक्ष आहेत हा एकप्रकारे भेदभावच नाही काय?? मान्य आहे मुंबईत लोकांना त्रास झाला, होतोय पण याचा अर्थ असा दुजाभाव करणे तर नाही ना?

    ReplyDelete
    Replies
    1. जर भाजपा Party with Difference म्हणवून घेत असेल तर लोक अपेक्षा करणारच ना अशा समजूतदारपणाची.

      नाहीतर भाजपा आणि बाकीच्यांमध्ये कसला आलाय DIFFERENCE!

      Delete
    2. सामान्य जनतेला वेठीस न धरता असले सोहळे करता येत नाहीत का? निदान तसा विचार तरी? आजकाल लाखो करोडो रूपये खर्चून तयार झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होतात.. FM चा वापर करून मन की बात करणाऱ्या पक्षाला लोकांच्या 'मनातली बात' आता कळायलाच हवी..

      Delete
  4. भाऊ, मुंबईकर आणि मुंबईचे दैनंदिन जीवन हे विस्कळीतच आहे
    त्याला आणखीनच विस्कळीत करण्यासाठी प्रत्येक
    पक्षांनी हातभार लावला आहे. खरे पाहता मुंबई मधून राज्याची राजधानीचे संपूर्ण स्थलांतर करायला हवे. शेतकरी मोर्चा
    रात्री मंत्रालयाकडे आला ह्याचे कौतुक लोक करतात हे
    पण तेव्हढेच चूक आहे कारण जे शेतकरी तंगडतोड करीत
    आणले गेले त्यांना कम्युनिस्टांनी हातात लाल बावटे दिले पण
    पायात चपला दिल्या नव्हत्या. दरवर्षी नित्यनियमाने विराट मोर्चे
    मुंबईत येत असतात आधीच विस्कळीत असलेले जीवन
    आणखीन विस्कळीत करून टाकत असतात.. भारतीय जीवनात
    शहरीकरण संपूर्ण चुकले आहे.. भा ज पा ने
    स्मार्ट सिटी चा पर्याय समोर आणला आहे पण
    तो अस्तित्वात येण्यासाठी भा ज पा सत्तेवर पुन्हा
    यायला हवा

    ReplyDelete