Sunday, April 29, 2018

चला, ‘मागे-मागे’ उभे राहू

Image result for kureel cartoon on 2019

दिल्ली या नगर राज्यातील सत्ता कॉग्रेसने गमावून आता पाच वर्षे होतील. तेव्हा अर्थातच कॉग्रेसने नुसती दिल्ली गमावलेली नव्हती तर आणखी तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीतही दणकून मार खाल्लेला होता. त्यानंतर पत्रकारांच्या समोर येऊन सोनिया व राहुल गांधी यांनी एक निवेदन केलेले होते आणि आपला पराभव अतिशय नम्रपणे स्विकारलेला होता. लोकसभेच्या निवडणूकीचे वेध लागलेले होते आणि त्या पराभवातून योग्य तो धडा आपण शिकत असल्याची ग्वाही राहूल गांधींनी दिलेली होती. मात्र धडा काय असतो तेवढेच त्यांना कोणी सांगितलेले नव्हते. म्हणूनच मग त्यांनी पुन्हा दिल्लीची म्हणजे देशाची सत्ता गमावण्याचा नवा धडा गिरवला आणि एकामागून एक धडे शिकतच गेलेले आहेत. उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी आता कॉग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत आणि पाच वर्षांनी प्रथमच कॉग्रेसला रामलिला मैदानावर सभा घेण्याची गरज वाटली. नुकताच त्यांनी भव्य जनआक्रोश मेळावा घेतला आणि यापुढे प्रत्येक निवडणूकीत कॉग्रेसच जिंकणार असल्याची हमी आपल्या अनुयायी व कॉग्रेस समर्थकांना दिलेली आहे. त्यांच्या शब्दात किती वजन असावे? तब्बल दहा वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेले मनमोहन सिंगही ‘पुढे’ येऊन म्हणाले, आम्ही सारे राहुलच्या ‘मागे’ ठामपणे उभे रहाणार आहोत. आता मागे उभे रहायचे असेल, तर यापुर्वी त्यापैकी कोणी राहुलच्या पुढे उभे होते काय? प्रत्येक निवडणूक कॉग्रेस जिंकणार म्हणजे काय? निवडणूक कशी जिंकतात? कालपरवाच त्रिपुरा राज्यातील निवडणूक झाली तिथे कॉग्रेस सफ़ाचाट कशाला झाली? गोरखपूर फ़ुलपूरच्या पोटनिवडणूकीत कॉग्रेस उमेदवारांनी अनामत रकमा कशाला गमावल्या? असे प्रश्न विचारायचे नसतात. असे प्रश्न मनमोहन वा अन्य कुणा कॉग्रेसवाल्यांना कधी पडत नाहीत आणि तोच खरा धडा आहे. बाकी सोडून द्या, आणखी दोन आठवड्यांनी कर्नाटकचे निकाल येणार आहेत. तिथे काय होईल?

१२ तारखेला कर्नाटक विधानसभेसाठी मतदान व्हायचे असून १५ तारखेला तिथले निकाल लागतील. आज कॉग्रेसच्या हाती असलेले ते मध्यम आकाराचे शेवटचे राज्य आहे. आपली सर्व शक्ती पणाला लावून तो किल्ला राखण्याला कॉग्रेसने प्राधान्य द्यायला हवे. पण त्याचे भान तरी सोनिया, मनमोहन वा राहुल गांधींना आहे काय? असते तर त्यांनी दिल्लीत तमाशा मांडण्यापेक्षा कर्नाटकात लक्ष केंद्रीत केले असते आणि जनआक्रोश थोडा पुढे ढकलला असता. ज्या काही मतचाचण्य़ा समोर आल्या आहेत, त्याकडे बघता तिथेही कॉग्रेसला सत्ता टिकवता येणार नसल्याचेच अंदाज आलेले आहेत. मग कुठलीही निवडणूक जिंकणारच असल्या वल्गना राहुल का करत आहेत? त्यांच्या डोक्यातली रणनिती नेमकी काय आहे असा प्रश्न पडतो. ती रणनिती कर्नाटक जिंकण्याची वा डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या तीन विधानसभा जिंकण्याची दिसत नाही. त्यापेक्षा राहुल गांधींच्या पाठीशी सर्व कॉग्रेस एकदिलाने उभी आहे, असे चित्र रंगवण्यात सगळे गर्क आहेत. त्यातून काय साध्य होणार आहे? उरलेले कर्नाटक राज्य गमावले, मग राहुल वा कॉग्रेस यांना गमावण्यासारखे काही शिल्लक उरत नाही, हा धडा आहे काय? राजकारणात असाही धडा असू शकतो. तो धडा काय आहे? डाव्या चळवळीचे समाजवादी तत्वज्ञान मांडणार्‍या कार्ल मार्क्सचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ‘जगातल्या कामगारांनो एक व्हा, लढा! गुलमीच्या शृंखला गमावण्याखेरीज तुमच्यापाशी आहेच काय?’ राहुल बहुधा तोच धडा शिकलेले आहेत आणि निवडणूकांच्या माध्यमातून तोच धडा गिरवत आहेत. जोपर्यंत गमावण्यासारखे काही हाताशी असते, तोपर्यंत क्रांती होऊ शकत नाही. त्यामुळेच क्रांतीचा पाया घालण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करायचे, तर हाताशी असलेले सर्वकाही गमावले पाहिजे. कर्नाटक गमावला, मग कॉग्रेसला गमावण्यासारखे शिल्लक काय उरते?

मागल्या चौदा वर्षात राहुल बहुधा हाच मार्क्सवादी राजकीय धडा शिकलेले आहेत. गमावण्यासारखे काहीच शिल्लक उरायला नको. हा धडा शिकल्यामुळेच त्यांनी गेल्या काही वर्षात एकामागून एक राज्ये व निवडणूका गमावण्याचा सपाटा लावलेला असावा. त्यातले कर्नाटक हे शेवटचे राज्य आहे. एकदा तेवढे राज्य गमावले, मग राहुल गांधींनी गमवावे असे काही उरते का? कुठले राज्य टिकवण्याची अगतिकता नाही की भिती नाही. उलट नशिबाने काही जिंकण्याची संधी मात्र शिल्लक उरते. मग पुढल्या कितीही व कोणत्याही निवडणूका गमावल्या, पराभव झाला, तर चिंता नाही. जे राज्य आपले वा कॉग्रेसचे नव्हतेच, ते गमावल्याचा आरोप कोणी राहुलवर करू शकत नाही. पण नशिबाचे फ़ासे योग्य पडले आणि एखादे नवे राज्य हाती आले, तर तो किती मोठा विजय असेल ना? हरण्याची शृंखला संपण्याला महत्व आहे आणि तीच राहुलची रणनिती आहे. म्हणून त्यांनी कर्नाटकात लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा रामलिला मैदानात मेळावा घेतला आणि आपल्या पुढे-पुढे नाचणार्‍याना आपल्या मागे ठाम उभे रहायला भाग पाडलेले आहे. १५ मे रोजी कर्नाटक गमावले, मग ही निवडणूका जिंकण्याची कटकट संपून जाईल. तिथून पुढे मग राहुल गांधींचा प्रत्येक निवडणूकीत नैतिक विजयाचा मार्ग मोकळा होऊन जाईल. त्यांना मागे वळूनही बघण्याची गरज उरणार नाही. मनमोहन सिंग पाठीशी ठामपणे उभे राहिले, मग ममता वा शरद पवार यापैकी कोणाच्या मनधरण्य़ाही करायची गरज उरणार नाही. अर्थात ममतांनी आधीच सांगून टाकलेले आहे की त्या कॉग्रेसच्या मागे फ़रफ़टणार नाहीत. पवारांनी युतीला तयार असलो तरी रडीचा डाव चालणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. अशा लोकांच्या नादाला लागायचीही राहुलना गरज नाही. हरण्यातली मजा या लोकांना कधी कळणार आहे? जिंकण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. त्यापेक्षा हरणे सोपे नाही काय?

सत्ता व राज्ये गमावण्याची राहुलची गती बघता ते पक्के मार्क्सवादी होत चालल्याची खात्री होते. वस्तुनिष्ठ बोलण्याचे स्वातंत्र्य मिळते. जनआक्रोश मेळाव्यातील राहुलचे भाषण किती वास्तविक होते ना? कॉग्रेस नसती तर शेतकर्‍यांच्या जमिनी मोदींनी लाटल्या असत्या, अशी ग्वाही त्यांनी दिली, अनेकजणांना हा दावा हास्यास्पद वाटेल. पण काळजीपुर्वक इतिहास तपासून बघा. कॉग्रेस युपीए म्हणून सत्तेत असताना हजारो एकर जमिन राहुलचे जिजाजी रॉबर्ट वाड्रा यांनी वेळीच ताब्यात घेतल्या नसत्या, तर एव्हाना त्या जमिनी मोदींनी बळकावल्या असत्या ना? शेतकर्‍यांच्या त्या लाखमोलाच्या जमिनी केवळ वाड्रामुळे मोदींपासून वाचल्या. सत्ता कॉग्रेसच्या हाती नसती, तर वाड्राला त्या जमिनी मिळू शकल्या नसत्या आणि मोदींनी गिळंकृत केल्या असत्या. पुढल्या काळात मोदींच्या हाती सत्ता जाणार हे राहुलचे जिजाजी ओळखून होते. म्हणूनच त्यांनी हरयाणा राजस्थानातील कित्येक एकर जमिनी ताब्यात घेऊन ठेवल्या. खिशात दमडा नसताना आणि बॅन्क खात्यात लाखभर रुपये नसतानाही, त्यांनी कुठल्या तरी कंपनीकडून उसनवारी करून ह्या जमिनी ताब्यात घेतल्या. आज देशाची सत्ता हाती असूनही मोदी त्या जमिनीला हात लावू शकलेले नाहीत. ह्याला कॉग्रेसची कृपा व राहुलची दूरदृष्टी म्हणतात. इतकी दुरदृष्टी असलेल्यांना नजिकच्या भविष्यकाळातील जय-पराजय आताच बघता येत असतील तर नवल नाही. राहुल आज तोच भविष्यकाळ बघत आहेत. कॉग्रेस प्रत्येक राज्यात जिंकत असल्याचे त्यांना स्पष्ट दिसत आहे. प्रत्येक राज्यात मोठमोठ्या जमिनी वाड्रा ताब्यात घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देत असल्याचे सुंदर दृष्य राहुल बघत असतील, तर त्यापेक्षा शेतकर्‍यांना आणखी कय हवे? १५ मे २०१८ ची प्रतिक्षा करा. एकदा कर्नाटक कॉग्रेसने गमावला, की शेतकर्‍यांचे गरीबांचे अच्छेदिन सुरू होणार आहेत. आपण मनमोहन सोनियांच्या मागे उभे रहातचे फ़क्त. कारण राहुलच्या पाठीशी उभे रहाण्याचा पहिला मान त्यांचा आहे. आपण जितके ‘मागे’ राहू तितके देशाचे कल्याण झाले म्हणून समजा.

2 comments:

  1. बापरे हे सगळे भयंकर आहे भाऊ. एकदा कर्नाटक गमावले की जिंकायची कट कट संपली. सारखी सारखी ती धावपळ नको आणि कष्ट नकोत नुसत राहुल च्या मागे उभे राहायचे.

    ReplyDelete