Sunday, July 8, 2018

शशी थरूर थरारलेत

pushkar tweet mehr के लिए इमेज परिणाम

अखेरीस सुनंदा पुष्करच्या मृत्यूने तिच्या पतीला गाठले आहे. आजपर्यंत थरूर यांनी आपल्यावरचे या संदर्भातले सर्व आरोप फ़ेटाळून लावलेले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही. आता त्याविषयात विशेष पथकाने केलेल्या तपासानंतर आरोपपत्र दाखल झाले असून, त्याच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर होण्याचा आदेश निघाल्यावर थरूर यांना जाग आलेली आहे. अर्थात अशा विषयात कोणी सामान्य माणूस असता, तर त्याला कधीच पोलिसांनी फ़रफ़टत कोठडीत डांबले असते आणि नंतरच चौकशी केली असती. पण थरूर राजकीय नेता व सत्ताधारी पक्षाचे मंत्री होते. म्हणूनच आरंभापासून यात चौकशी गुंडाळली गेली व तपासापेक्षाही सारवासारव करण्याचाच प्रयत्न झाला. पण काही ठराविक पत्रकारांच्या प्रयत्नामुळे या प्रकरणाला वाचा फ़ुटलेली असून, आता ते खटल्यापर्यंत आलेले आहे. थरूर यांच्याविषयी संशय घेण्याचे कारण खुद्द त्यांची पत्नी सुनंदा पुष्करच होत्या. आपल्या मृत्यूपुर्वी त्यांनी धक्कादायक ट्वीट केलेले होते आणि मोठ्या गौप्यस्फ़ोटाचे इशारे दिलेले होते. त्यातही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय गुंतलेला असल्याने पोलिसांनीही इतका हलगर्जीपणा करायला नको होता. पण पोलिसांपेक्षाही तात्कालीन नामवंत पत्रकार माध्यमांचे दुर्लक्ष शंकास्पद स्वरूपाचे होते. एका राज्यमंत्र्याची पत्नी पंचतारांकित हॉटेलात संशयास्पदरित्या मरण पावलेली असतानाही, कुणाला कसली शंका घ्यावीशी वाटली नाही. न्या. लोयांच्या मृत्यूचे नसलेले सत्य शोधण्यात सर्व शक्ती खर्ची घालणार्‍या शोध पत्रकारांना सुनंदाचा संशयास्पद मृत्यू कुतूहलाचा वाटू नये, यातच पत्रकारितेचे तेव्हा किती दिवाळे वाजले होते, त्याची साक्ष मिळते. किंबहूना लोया प्रकरणात हिरीरीने न्यायालयाचे दार वाजवणार्‍या नामवंत वकीलांनाही सुनंदाला न्याय मिळावा असे वाटलेले नसावे, हीच बाब अधिक संशयास्पद नाही काय?

सुनंदा पुष्कर ही एका भारतीय राज्यमंत्र्याची पत्नी होती आणि एक दिवस आधी त्रिवेंद्रम येथून दिल्लीला येताना विमानतळ व विमानातही त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. अशी माहिती नंतर दुसरे राज्यमंत्री मनिष तिवारी यांनी दिलेली होती. त्याशिवाय काही दिवस आधी खुद्द सुनंदाने आपल्या मंत्री नवर्‍याला पाकिस्तानी महिला पत्रकार प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याचा गौप्यस्फ़ोट केलेला होता. थरूर व पाकची ही महिला यांच्यात संशयास्पद संबंध असून, ती पाक हेरखात्याची हस्तक आहे, असाही सुनंदाने जाहिर आरोप केलेला होता. सुनंदाच्या असल्या आरोपांना मेहर तर्रार नावाच्या त्या पाक महिलेनेही प्रत्युत्तर दिलेले होते. अशी पार्श्वभूमी असलेल्या कुणा व्यक्तीचा इतक्या शंकास्पद रितीने मृत्यू झाल्यावर किती बरकाईने चौकशी व्हायला हवी? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पहिली गोष्ट म्हणजे मंत्र्यांसाठी खास दिल्लीत बंगले दिलेले असताना त्याच दिवशी थरूर पत्नीसह पंचतारांकीत हॉटेलात मुक्कामाला कशाला आलेले होते? ते कॉग्रेस अधिवेशनात काही तास हजर असताना ही घटना घडली आणि त्याचा कोणीही साक्षीदार नसावा काय? सुनंदा नैराश्यग्रस्त होती आणि काही उपचार घेत असल्याचे थरूर यांनी सांगितले होते. पण असे कुठले उपचार करणारा कोणी डॉक्टर कधी समोर आला नाही. आपल्या पायांनी चालत हॉटेलात आलेली मध्यमवयीन महिला, अशी अचानक आत्महत्या करते वा अनैसर्गिक मृत्यूची शिकार होते, ही बाब कुणाच्याही मनात शंका संशय निर्माण करणारी आहे. मग ज्यांचे कामच संशय घेणे आहे, त्या पोलिसांनी कुठलाही बारकाईने तपास न करताच हे प्रकरण कशाला गुंडाळावे? लग्नानंतर सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू झाल्यास तात्काळ पतीवर संशय घेऊन कारवाई केली जाते. मग थरूर यांना कुठल्या कायद्यान्वये त्यातून सवलत मिळाली? असे अनेक प्रश्न आजवर अनुत्तरीत राहिले आहेत.

या संबंधात नेहमी विचारल्या गेलेल्या प्रश्नांना थरूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत. प्राथमिक माहितीनुसार तपासकामात त्यांनी हस्तक्षेप केला, हे लपून राहिले नाही. पोस्टमार्टेम करणार्‍या डॉक्टरची लौकरच इस्पितळातून उचलबांगडी झाली. ह्या मृत्यूचे कुठलेही ठोस कारण समोर येऊ शकले नाही आणि इतक्या संशयास्पद रितीने लाडक्या पत्नीचा शेवट होऊनही, थरूर यांनी कधी त्याचा कसून तपास होण्यासाठी प्रयत्नही केले नाहीत. यापेक्षा त्यांच्याविषयी संशय घ्यायला आणखी कुठले कारण आवश्यक आहे? जणु मागची पिडा गेली, अशाच मनस्थितीत नंतरच्या काळात थरूर यांची वागणुक राहिलेली आहे. कारण मृत्यूपुर्वी सुनंदाने जे आरोप केलेले होते, त्यापैकी कुठल्याही आरोपाचे समाधानकारक उत्तर थरूर कधीच देऊ शकलेले नाहीत. प्रामुख्याने यात एका मंत्र्याच्या पत्नीचा शंकास्पद मृत्यू आणि तिने पाकच्या हेरखात्याविषयी व्यक्त केलेल संशय, हा एका कुटुंबापुरता व्यक्तीगत मामला उरत नाही. त्यात सरकार व राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा येत असतो. त्यामुळेच तेव्हाचे सरकार व एकूण शासन यंत्रणेने या मृत्यूचा कसून तपास करण्यासाठी आकाशपाताळ एक करायला हवे होते. पण थरूर वा तेव्हाचे सत्ताधारी, यापासून आपले अंग झटकून टाकत राहिले होते. जणू त्याचा तपास करत गेल्यास त्यात आपलेच हातपाय अडकतील, अशा भितीने तात्कालीन सरकारी पक्षाला भयभीत केलेले असावे. गंमतीची गोष्ट म्हणजे तेव्हाच्या कुठल्याही नामवंत पत्रकार संपादकालाही या मृत्यूचा पाठपुरावा करण्याची गरज वाटली नाही. सगळेच जणू त्यावर लौकरात लौकर पडदा पाडण्यासाठी उतावळे झालेले होते. म्हणूनच हे गुढ अधिक गुंतागुंतीचे आहे. आताही थरूर व त्यांच्या कॉग्रेस पक्षाने यात राजकीय सुडबुद्धी असल्याचा उलटा आरोप केला आहे. जणु यापैकी प्रत्येकाला सुनंदा खुपत असावी.

गुजरातमध्ये सोहराबुद्दीन नामक एका गुन्हेगाराची पोलिस चकमकीत हत्या झाली. तर त्याला खोटी चकमक ठरवून सुप्रिम कोर्टापर्यंत नाटके रंगवली गेली. त्यामध्ये पुढाकार घेणार्‍या प्रत्येकाला न्यायाची चाड असल्याचे नाटक रंगवले जात होते. कारण तेव्हा अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांच्यासकट मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना खुनाच्या आरोपात गोवण्यासाठी इतका न्यायालयीन आटापीटा चालला होता. इतकी न्यायाची चाड असलेला कोणीही मायका लाल सुनंदाच्या न्यायासाठी किंवा तपासासाठी पुढे आला नाही. त्या प्रकरणाची सुनावणी करत असताना लोया नावाच्या न्यायमुर्तींना एका समारंभात हृदयविकाराचा झटका आला, तर त्यात अनेकांना हत्याकांडाचे खोलवर शिजलेले कारस्थान दिसलेले होते. त्यासाठी हायकोर्ट व सुप्रिम कोर्टापर्यंत तपाच चौकशीची मागणी करण्यात आली. त्यावरून राजकारणही रंगवले गेले. पण हेच सारे न्यायाचे पाईक सुनंदाच्या मृत्यूविषयी पुर्ण संवेदनाहीन असतात. तर कशाला? त्यांचाही सुनंदा मरण्यात लाभ असतो काय? सुनंदा पाकिस्तानी हेरखात्याचे पाप चव्हाट्यावर आणणार होती, तर तिची हत्या त्याच हेरखात्याने केलेली असेल. त्या पाक हेरखात्याला सापळ्यात ओढायला पुरोगामी वकील पत्रकार पुढाकार कशाला घेत नाहीत? एखाद्या वाहिनीने त्यात तपास करून नवे गौप्यस्फ़ोट केल्यास इतर माध्यमे तिकडे पाठ कशाला फ़िरवून बसली? तेव्हाच्या सत्ताधारी कॉग्रेस पक्षापासून नामवंत पुरोगामी पत्रकारांपर्यंत सर्वांना पाक हेरखात्याला पाठीशी घालण्यात इतकी आस्था कशाला असावी? मजेची गोष्ट म्हणजे ह्या प्रकरणाचा पाठपुरावा भाजपाचे एक नेते सुब्रमण्यम स्वामी करीत राहिलेले आहेत आणि आताही आपल्याला या सुनावणीत सामील करून घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. ही बाब सर्वाना भयभीत करून गेलेली आहे काय? थरूर इतके कशाला घाबरले आहेत?

कालपर्यंत हेच थरूर व त्यांचे कॉगेसी सहकारी राजकीय सुडबुद्धीचा आरोप करून प्रश्न उडवून लावत होते. मागल्या महिन्यात यातले आरोपपत्र दाखल झाले तरी थरूर यांनी त्याला किंमत दिलेली नव्हती. पण उद्या सोमवारी त्यांना सुनावणीला हजर रहायची तारीख जवळ आली आणि त्यांचे अचानक धाबे दणाणलेले. धावपळ करून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. तोच अर्ज महिनाभर आधीही करता आला असता. पण शेवटच्या क्षणी त्यांना त्याची गरज कशाला वाटली आहे? त्याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही, की त्यांच्या वकीलांनी खुलासा केलेला नाही. मुद्दा असा आहे, की जे आरोपपत्र दाखल झालेले आहे, त्यात आरोपी म्हणून फ़क्त थरूर यांचे नाव आहे आणि म्हणून त्यांना अटकेचे भय सतावते आहे. त्यांनीच अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्यामुळे पोलिसांचे काम सोपे झालेले आहे. आता पोलिसांनीही ताब्यात घेऊन थरूर यांची जबानी आवश्यक असल्याचे कोर्टात सांगितलेले आहे. त्यातले युक्तीवाद होतील आणि व्हायचा तो निकाल लागेल. पण मुद्दा एका संशयास्पद मृत्यूचा आहे, तितकाच देशातल्या तथाकथित न्यायप्रिय नाटक्यांचाही आहे. जिथे भरपूर संशयाला जागा आहे तिथे त्यांना साधा वासही येत नाही, की चौकशी आवश्यक वाटत नाही. पण जिथे शंकेलाही वाव नाही, तिथे उकरून कुठलेही प्रकरण काढून न्यायाचे दार सतत ठोठावले जात असते. जे लोक सुनंदाने पाकच्या हेरखात्याचा उल्लेख केल्यावरही ढिम्म गप्प बसतात, तेच अफ़जल गुरू वा याकुब मेमनच्या फ़ाशीला रोखण्यासाठी अपरात्रीही कोर्टाचा दरवाजा वाजवतात. हा निव्वळ योगायोग मानता येईल काय? त्यांच्यातले धागेदोरे किती खोलवर एकमेकात गुंतलेले आहेत, त्याचा अंदाज यातूनच येऊ शकतो. एक गोष्ट मात्र निश्चीत; सुनंदाच्या या खटल्याने थरूर यांना कैचीत पकडले असून, त्यात सुब्रमण्यम स्वामींना सहभागी करून घेतले तर भल्याभल्यांचे मुखवटे टरटरा फ़ाटकत जाणार आहेत.

4 comments:

  1. इतक झाल तरी माध्यमे चुपच आहेत अजुन पन,उलट मोदीत्रस्त दुआ नावाचे काॅंगरेसी पत्रकार आहेत,ते म्हनतात की थरूरच जुन एक प्रकरन काढुन मोदी त्रास देतात पन हे प्रकरन खुनाचे आहे मुद्दाम सांगत नाहीत.इतका बदमाशपना चालुय.पाक मिडीया तर खुल्लमपने मेहेरमुळे एक भारतीय मंत्री कसा सापडला याची बढाइ मारतो.हे सर्व या बिकाउ पत्रकारांना दिसत नाही.

    ReplyDelete
  2. इथल्या जमाते पुरोगामीला आंबे,पगडी,असहिष्णुता,जास्त महत्व आहे पाक आणि सुरक्षेपेक्षा

    ReplyDelete
  3. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू सेक्युलर असल्यामुळे पुरोगामी त्याविषयी तोंडाला कुलूप लावून बसले आहेत असे दिसते.

    ढोंगीपणा तुझे दुसरे नाव पुरोगामीत्व आहे.

    ReplyDelete
  4. सुनन्दा हत्या कान्ड़ चि चोक्सी जली पाहेजि

    ReplyDelete