Sunday, June 9, 2019

महाराष्ट्रात काय होणार?

Image result for raj thackeray pawar

लोकसभेच्या निवडणूका संपलेल्या आहेत आणि येत्या चार महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूका व्हायच्या आहेत. त्याखेरीज झारखंड आणि हरयाणा अशा आणखी दोन राज्याच्या निवडणूकाही त्याच दरम्यान व्हायच्या आहेत. पण त्यासाठी सत्ताधारी भाजपा वगळता कुठल्याही पक्षाची तयारी सुरू झालेली दिसत नाही. या तिन्ही राज्यात लोकसभेत सत्ताधारी भाजपाने नेत्रदिपक यश मिळवलेले असून, त्या राज्यातही भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. गेल्या खेपेस यापैकी दोन राज्यात भाजपाने असलेल्या आघाड्या मोडल्या होत्या आणि तरीही जवळपास स्वबळावर तिन्ही राज्याची सत्ता संपादन केलेली होती. यापैकी हरयाणात आता भाजपाला कोणाच्या मदतीची गरज राहिलेली नसून, तिथल्या दहाच्या दहा लोकसभा मतदारसंघात भाजपाने एकट्याच्या बळावर यश मिळवले आहे. काहीशी तशीच स्थिती झारखंडात आहे. मात्र महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे. चार वर्षे भांडल्यावर लोकसभेत पुन्हा भाजपाने शिवसेनेशी युती केली आणि आता केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर सेना सत्तेतील वाट्याबद्दल नाराज असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे राज्यात युती विधानसभेसाठी टिकणार काय, असा प्रश्न आहे. पण ती झाली सत्ताधारी युतीची डोकेदुखी. विरोधकांची स्थिती काय आहे? लोकसभेपुर्वी बहुतांश अभ्यासक व विरोधकांना भाजपा महाराष्ट्रात दणकून मार खाणार, अशी अपेक्षा होती. पण अशी सर्व भाकिते खोटी पडलेली असून, भाजपासह शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखलेले आहे. उलट सत्ताधार्‍यांना आव्हान देणार्‍या विरोधकांचा पुरता पालापाचोळा झालेला आहे. त्यामुळे राज्यात काय होईल, असे प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. युती टिकेल का? टिकली तर किती जागा मिळतील? कॉग्रेस राष्ट्रवादी वा वंचित आघाडी यांचे भवितव्य काय असेल? राज ठाकरे हा घटक काय प्रभाव पाडू शकेल? त्याची उत्तरे सोपी नसली तरी निरुत्तर करणारी नक्कीच नाहीत.

पहिली गोष्ट म्हणजे लोकसभा निकालांनी कॉग्रेस नामक पक्षाचा डोलारा किती तकलादू व पोखरून गेला आहे, त्याची साक्ष आकडेवारीतुनच मिळालेली आहे. दुसरी बाब म्हणजे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने अधिक यश मिळवलेले असले तरी भाजपा सेना युती समोर त्याही पक्षाचा टिकाव लागण्याची बिलकुल शक्यता दिसत नाही. कारण पक्षीय पातळीवर दोन्ही कॉग्रेस संपल्यात जमा आहेत. अन्य पुरोगामी पक्ष पराभूत होण्यासाठी लढणारे, इतकेच उरले आहेत. या लोकसभा निकालांनी दिलेला एक धडा म्हणजे महाराष्ट्राला खर्‍याखुर्‍या नव्या विरोधी पक्षाची गरज आहे. कॉग्रेसपाशी संघटना नाही, की नेतृत्व नाही. राष्ट्रवादीकडे नेते आहेत, पण संघटनाच नाही की मतदारांचे पाठबळ नाही. वंचित आघाडी म्हणून प्रकाश आंबेडकरांनी उभा केलेला पुरोगामी पर्याय फ़ारसा चाललेला नाही. म्हणजे टक्कर देणारा विरोधी पक्ष होण्याची क्षमता त्या आघाडीला दाखवता आलेली नाही. निकालानंतर आंबेडकर यांनी ओवायसींच्या पक्षावर दोषारोप करून या आघाडीला नजिकच्या काळात भवितव्य नसल्याचेच जाहिर केले आहे. मग महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपाशी निवडणूकीत दोन हात कोण करणार, असा सवाल आहे. कारण विरोधी जागा व मतदार उपलब्ध असला, तरी त्याला नेतृत्व देऊ शकेल असा कोणी पक्ष आघाडी वा नेता तरी अजून समोर आलेला नाही. परिणामी युती होवो किंवा तुटो, भाजपा आणि शिवसेना यांच्यातच बहुतांश आमदार विभागले जातील अशी आजची चिन्हे आहेत. त्यांनी एकत्र लढायचे ठरवले व समाधानकारक जागावाटप होऊ शकले, तर दोनशेहून अधिक जागा त्यांच्यातच विभागल्या जातील, उरलेल्या ५०-६० जागांसाठी विरोधकांनी लढायचे आहे. त्यामुळे सत्तेसाठी अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आजच संपलेली आहे. भाजपाला पुन्हा सहज सत्ता मिळणार, असे आजच सांगता येईल. म्हणूनच मराठी राजकारणाचे भाकित करताना विरोधकांचे भवितव्य काय, याचाच उहापोह करणे भाग आहे.

लोकसभा प्रचार सुरू झाला, तेव्हा प्रकाश आंबेडकर जोरात होते. वास्तविक त्यांची वा ओवायसींची राज्यात तितकी ताकद नाही. पण अन्य कुठला मुस्लिम वा दलित पक्ष मैदानात नसल्याने त्यांना प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा जाणकारांनाही होती. पण तितकेही यश त्यांना मिळू शकले नाही. नाही म्हणयला इम्तियाज जलिल नामे एक खासदार ओवायसींना मिळाला, तो चक्क मतविभागणी म्हणून. औरंगाबादेत मागल्या विधानसभेत जलिल ज्या पद्धतीने जिंकले, त्याच विभागणीने त्याना याहीवेळी हात दिला. दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून उभे ठाकले आणि मध्यंतरीच्या काळात सेना-भाजपाच्या वैमनस्यामध्ये दुखावलेले भाजपावाले त्यांच्या बाजूने पुढे आले. त्यामुळे जी मतविभागणी झाली, त्यामुळे सेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले. पण जो दलित मतांचा लाभ जलिल यांना तिथे मिळाला, तितका मुस्लिम मतांचा फ़ायदा आंबेडकर यांना अकोला वा सोलापूरात मिळाला नाही. हे आता निकालानंतर त्यांच्या लक्षात आले. यामागची ओवायसींची मोडस ऑपरेन्डी समजून घेतली पाहिजे. त्यांच्या आदेशानुसार मुस्लिम मतदार गठ्ठा मतदान कुठल्या पक्षाला करीत नाही. जिथे भाजपा वा सेनेला पराभूत करणारा अन्य पक्षांचा उमेदवार बलादंड असेल, तिकडे मुस्लिम मतांचा गठ्ठा जातो. सोलापूरात वा अकोल्यात कॉग्रेस उमेदवार होते आणि औरंगाबादेत आपलाच मुस्लिम उमेदवार होता. मात्र अन्यत्र आघाडीला दलित मते नक्कीच मिळाली व कॉग्रेसचा तोटा झाला. त्यातही काही जागी राज ठाकरे यांचा समर्थक वंचित आघाडीकडे वळलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणूकीत राज ठाकरे स्वबळावर किंवा कॉग्रेसशी आघाडी करून मैदानात येणार आहेत. कदाचित शरद पवार नामशेष होणार्‍या कॉग्रेसला सोडून मनसेशी हातमिळवणी करू शकतात. त्याच दोघांनी एकत्र यायचे ठरवून अन्य प्रादेशिक लहान पक्षांना सोबत घेतल्यास कॉग्रेसचे पुर्ण दिवाळे वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुठल्याही सत्ताधारी पक्षाने कितीही उत्तम काम केले वा सरकार चालवले, म्हणून सगळा मतदार खुश असतोच असे अजिबात नाही. ठराविक प्रमाणात नाराज लोकांची संख्या असतेच. अशा मतदाराला काहीतरी पर्याय हवाच असतो. त्याला कुठल्याही राजकीय पक्ष वा विचारांशी कर्तव्य नसते. तो सत्ताधारी पक्षाच्या विरोधातल्या कोणाही खंबीर पक्षाकडे झुकत असतो. किंबहूना असा मतदार राजकीय पोकळी भरून काढणार्‍या नेत्याकडे वा पक्षाकडे सहज आकर्षित होत असतो. आजतरी अशा मतदाराला आकर्षित करू शकणारा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे आणि तो लोकसभा प्रचारात सभा गाजवून त्या मतदाराच्या समोर आलेला आहे, राज ठाकरे असे त्याचे नाव आहे आणि मनसे ह्या पक्षाला म्हणूनच विरोधी राजकारणातली पोकळी भरून काढण्याची अपुर्व संधी आगामी विधानसभेत मिळू शकणार आहे. ती त्यांनी साधली तर राज्यातले राजकारण कुठल्या कुठे बदलून जाऊ शकते. पाच वर्षात कॉग्रेस राष्ट्रवादी मरगळलेले पक्ष होते आणि शेकाप वगैरे यांच्यात लढण्याची कुवतही नाही. अशीच स्थिती १९८५ नंतर आलेली होती. पुलोद म्हणून जी विरोधी फ़ळी पवारांनी उभी केली, ती मोडून पवार कॉग्रेसवासी झाले आणि त्यांच्या मागे धावलेल्या विविध पक्षांची अवस्था हरवलेल्या मुलासारखी झालेली होती. नेमक्या त्याच पोकळीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी उडी घेतली आणि बघताबघता शिवसेना हा महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष होऊन गेला. भाजपाने ती संधी ओळखून सेनेशी युती केली. तर बाकीचे विरोधी पक्ष पुरोगामीत्वाचे घोंगडे अंगावर पांघरून कॉग्रेसच्या कच्छपी लागले, त्यातून त्यांनी विरोधी राजकारणाची अधिकाधिक जागा सेना व भाजपाला मोकळी करून दिली आणि आज ते नामशेष होऊन गेलेले आहेत. काहीशी तशीच परिस्थिती यावेळी कॉग्रेस व राष्ट्रवादी यांची आहे आणि त्यांनी सोडलेली जागा व्यापणाची संधी राज ठाकरेंना उपलब्ध झालेली आहे.

सत्तेच्या राजकारणात कुणाला रोखण्यासाठी वा अपशकून करण्यासाठी लोकमताचा पाठींबा फ़ारसा मिळत नाही. पण सत्ताबदलासाठी जो कोणी कंबर कसून समोर उभा ठाकतो, त्याच्याकडे क्रमाक्रमाने लोकमत वळत असते. आज तरी निदान प्रस्थापित कॉग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष त्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यांचे अनेक आमदार लढवय्ये आपापल्या जागा टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या दारात जाऊन तिकीटासाठी रांग लावून उभे आहेत आणि ते सेना-भाजपा विरोधातल्या मतदाराला दिसते आहे. अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे आक्रमक मोदी विरोधी नेतृत्व, त्या बाजूला पडलेल्या मतदाराला आकर्षित करणारे आहे. ज्यांना भाजपात स्थान मिळू शकत नाही वा कॉग्रेसविषयी खात्री उरलेली नाही; असे अनेक स्थानिक प्रादेशिक नेते कार्यकर्ते मनसेच्या गोटात दाखल होऊन आपले नशिब आजमावू शकतात. त्यांना लगेच  सत्ता मिळण्याची शक्यता नाही. पण राजकीय भवितव्य असू शकते. शिवसेना १९९० च्या सुमारास अशीच राज्यभर पसरली होती आणि आज मरगळल्या कॉग्रेसच्या जीवावर मनसेला नवे स्फ़ुरण चढू शकते. अलिकडेच आंध्रा व तेलंगणातील बहुतांश कॉग्रेसजन याचप्रकारे अन्य पक्षात गेले आणि तिथे तो पक्ष नामशेष होऊन गेलेला आहे. लढणारे आक्रमक व प्रभावी नेतृत्व अशा निराश कार्यकर्ते दुय्यम नेत्यांना हवे असते. त्यामुळे ज्या कॉग्रेस राष्ट्रवादी वैफ़ल्यग्रस्त नेत्यांना पर्याय शोधावा लागतो आहे, ते मनसेची वाट चोखाळतील. राज ठाकरे बहुधा त्यासाठी़च विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मध्यंतरी त्यांच्या भव्यदिव्य सभांचे आयोजन करण्यातून अनेक असे स्थानिक नेते कार्यकर्ते मनसेच्या संपर्कात आलेलेच आहेत. अशा कोणाकोणाला मनसेत सामावून घेता येईल, त्याचीही चाचपणी सुरू झालेली नसेल का? आगामी विधानसभा निवडणूकीत म्हणूनच मनसे आणि उर्वरीत राजकीय पक्ष, यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.

Related image

लोकसभेच्या आधी व आताही मनसेला सोबत घ्यावे किंवा नाही, याबाबतीत कॉग्रेसमध्ये दुविधा आहे. उलट खुद्द शरद पवार मनसेला सोबत घेण्यासाठी बहुतांशी राजी आहेत. म्हणूनच त्यांनी कॉग्रेसचा नकार झिडकारून मनसे राष्ट्रवादी अशी आघाडी करण्याची शक्यता आहे. किंवा कॉग्रेसला मनसेला सोबत घ्यायला भाग पाडले जाणेही शक्य आहे. राज ठाकरे यांच्यापाशी आज पक्षीय संघटना नसेल, पण मतदाराला भारावून टाकणारी ओढून घेणारी वाणी नक्कीच आहे. त्याचा पुरेपुर लाभ घेण्य़ासाठीच दोन्ही कॉग्रेसना मनसेला टाळता येणार नाही. आणि समजा अशी टाळाटाळ झाली, तर त्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांचा ओघ मनसेकडे सुरू होण्याचा धोका पकरावाच लागेल. याची तिसरी बाजूही समजून घ्यावी लागेल. दोन्ही कॉग्रेसची आघाडी ही भाजपासाठी दुबळे असले तरी आव्हान आहे आणि ते दुर्बळ करण्यासाठी तिसरा घटक मैदानात असणे भाजपाला लाभदायक ठरू शकते. सहाजिकच मनसे तसा तिसरा घटक म्हणून मैदानात येण्याची शक्यता असली, तर भाजपा अप्रत्यक्षपणे त्यांना सर्व मदत केल्याशिवाय रहाणार नाही. अशा राजकीय हाणामारीत राज ठाकरे यांचा कोणता लाभ असू शकतो? त्यांनी आपल्या भाषणांच्या आतषबाजीने आपण संघटना नसली तरी दखलपात्र नेता असल्याचे लोकसभेत दाखवून दिले आहे. या सर्व गडबडीत कुठल्याही पद्धतीने विधानसभा लढवून राज आपले पाचदहा आमदार निवडून आणू शकले, तरी नव्याने त्यांच्या पक्षाला उभारी मिळू शकते. वय त्यांच्या बाजूने उभे आहे आणि कॉग्रेस राष्ट्रवादी पक्ष मरणासन्न झालेले आहेत. महाराष्ट्राला नव्या राजकीय विरोधी पक्षाची सक्त गरज असुन, नवी मनसे त्याच पोकळीत उभी राहू शकते. विद्यमान स्थिती बघता भाजपा व शिवसेना यांना एकत्र येणे किंवा परस्पर विरोधात लढू शकतात. पण दोन्ही कॉग्रेस तिसरा पर्याय होण्याच्या पलिकडे गेलेल्या आहेत. म्हणून ही मनसेसाठी सुवर्णसंधी आहे.

कालपरवाच बंगालच्या निकालांनी अभ्यासकांना चकीत केले. पण तिथे भाजपा अकस्मात उगवलेला नाही. मागल्या दोनतीन वर्षात कॉग्रेस वा डाव्या आघाडीने ममता बानर्जींना टक्कर देण्य़ात कुठलाही पुढाकार घेतला नाही आणि तीच पोकळी हेरून भाजपाने तिथे लक्ष घातले. त्यातून ममतांशी झुंजणारा नवा पक्ष बंगाल्यांनी तात्काळ स्विकारला आहे. त्यातली किमया लक्षात घेतली, तर महाराष्ट्रात मरगळल्या विरोधी पक्षाच्या पोकळीचा अंदाज येऊ शकतो. ती पोकळी भरायला राज ठाकरे डावपेच खेळत असतील का? मला तरी आज ठाऊक नाही. पण तशी खेळी त्यांनी केलेली असेल, तर त्यांना भवितव्य आहे. त्यांना सोबत घेऊन शरद पवार कॉग्रेसला संपवू शकतात आणि आपल्या पक्षाला नवे जीवदान देऊ शकतात. मात्र भविष्य राष्ट्रवादीलाही नसेल. कारण त्या पक्षातही कोणी उमदा नेता उरलेला नाही. आणखी दहाबारा वर्षे भाजपाला व शहाणपणाने चालली तर शिवसेनेला राज्यात धोका नाही. कारण कुठलाही नेतृत्व वा पक्षाचा पर्याय उभा रहायला किमान पाचसात वर्षांचा कालावधी लागतो. कॉग्रेस राष्ट्रवादीमध्ये तशी कुठली लक्षणे नाहीत. उद्याच्या महाराष्ट्राचे राजकारण कल्पनेत मांडताना, राज ठाकरे हाच काही करू बघणारा व त्यासाठी झोकून देणारा एकमेव नेता मतदारासमोर आहे. अर्थात त्याने अपेक्षित खेळ करावा लागतो, विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विराट खेळला नाही आणि रोहित शर्माने मात्र बाजी मारली. तशीच इथे व्यक्त केलेली अपेक्षा राज ठाकरे पुर्ण करतील तर भविष्य त्यांची प्रतिक्षा करते आहे. कारण त्यांच्यात ती क्षमता आहे. बाकी अन्य कुठल्या पक्षात वा नेत्यामध्ये ती कुवत नसेल, तर त्यांच्या भवितव्याविषयी कुठले भाकित करता येऊ शकेल? आणखी चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, या वर्षाच्या अखेरीस चित्र स्पष्ट झालेले असेल. कारण आक्टोबर महिन्याच्या अखेरीस विधानसभेच्ए निकाल बहुधा लागलेले असतील.

26 comments:

  1. भाजप+शिवसेना, राष्ट्रवादी+मनसे यांना टक्कर द्यायला कॉंग्रेस+बविआ ही शक्यता कितपत वाटते? आणि ही वास्तवात आली, तर त्याचा परिणाम किती होईल?

    ReplyDelete
  2. बंगालमधे असच झालय.काॅंगरेसने व डाव्यांनी लढायच सोडुन दिल व भाजपचा उदय झाला

    ReplyDelete
  3. भाऊ, तुमचं राज ठाकरेंच्या प्रती असलेलं प्रेम आणि विश्वास अनाकलनीय आहे. ते कितीही चांगले वक्ता असले तरी ५० पेक्षा जास्त जागांवर त्यांचा प्रभाव नाही.एव्हाना त्यांनी पक्षाची संघटना बांधायला हवी होती. त्या भाषणांची जादू मतांमध्ये परिवर्तित करायला संघटनाच नाही राजकडे. त्यामुळे ही विरोधकांची पोकळी ते भरून काढतील, असं वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. मला आपले मत पूर्ण मान्य आहे ! आतापर्यंत मनसेचं लक्षणीय कार्य कुठंच दिसत नाही !

      Delete
    2. भाऊचं मनसे प्रेम नेहमीच दिसते

      Delete
  4. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन केंद्रीय सरकार आणि भाजप यांच्यावर टीका करावी. जेणेकरून युतीचे स्थिर सरकार येईल.

    ReplyDelete
  5. वाह, मान गए भाई।

    ReplyDelete
  6. मनसेचे काही नाही होणार.

    ReplyDelete
  7. Apologies in advance but I do not agree. To me RT is a lost opportunity. He had been given a chance to prove in Nashik. He has done a blunder by speaking against Modi in this election. To me he comes across as an arrogant man without any intelligence. I do not want my Maharashtra to be led by person like him whose deliverables are zero so far in life besides just being the nephew of Balasaheb.

    ReplyDelete
  8. जर कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी शंभर,वं.ब.आ.आणि म.न.से.प्रत्येकी चाळीस व उर्वरित आठ जागी शेकाप, बविआ,राजू शेट्टी अशी वाटणी करून लढले तर भाजप सेना युतीपुढे आव्हान उभे राहू शकते.
    पण अशी आघाडी होण्याची शक्यता फारच कमी आहे.

    ReplyDelete
  9. भाऊ ...राज ठाकरे हा वक्रूत्व असलेला राहुल गांधी आहे .....

    ReplyDelete
  10. प.बंगाल मधील भाजपाचा उदय हा भाजपाच्या कार्यकर्तेयानी व त्यांच्या अध्यक्षांनी घेतलेल्या प्रचंड परिश्रमावर झालेला आहे. राज ठाकरे त्यांच्या 1 % तरी परिश्रम घेतात का ? त्यांच्या कार्यर्कत्यांची वागणूक मतदारामधये दहशत निर्माण करणारी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना फार मोठे भवितव्य नाही.

    ReplyDelete
  11. भाऊ ,
    तुम्हाला मनसे मध्ये " दम " दिसतोय , म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तुम्ही लिहीता त्या मागे तुमच्या पध्दतीने केलेले चिंतन असते. काय सांगावं तुम्ही म्हणता , तसे घडेल ही ! आम्हा पामरांची बुध्दी " मनसे " चालत नाही , हेच खरे !

    ReplyDelete
  12. राज साहेब जर राहूल सारखी भाजप वर नुसतीच (अगदि) घणाघाती आरोपांची आतश बाजी करणार असतील व व्हीडियोंची रेलचेल दाखवित बसणार असेल आणि स्वत:चा पक्ष आपण कसा विकास करणार आहोत हे सांगणार नसतील तर लोकसभे सारखीच विधानसभेचीही वाट लागायची थांबयाची नाही !!

    ReplyDelete
  13. CONG & NCP lost their credibility. Therefore people don't vote for them.This also applies to Raj Thackeray. He doesnt have any credibility.

    ReplyDelete
  14. भाऊंना राजविषयी कितीही ममत्व वाटले तरी राज व मनसे हे महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे संपले आहेत. राणे व पवारांप्रमाणे, राज व मनसेला काहीही भवितव्य नाही.

    ReplyDelete
  15. पुढच्या काळात भाजप आणि शिवसेना एकमेकांचे विरोधी झालेले महाराष्ट्रात दिसून येतील.

    ReplyDelete
  16. राज ठाकरे ला पुढे येण्यासाठी शिवसेना आणि भाजप आतून प्रयत्न करू शकतात. कारण मग फालतूचे सेक्युलॅरिझम संपूनच जाईल आणि सरकार आणि विरोधी पक्ष हे कमी अधिक फरकाने एकाच विचारधारेचे असतील. देशाला बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या गर्तेतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्येक राज्यात हळूहळू असे काही होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  17. कोणे एकेकाळी महाराष्ट्र हा काॅग्रेसचा बाल्लेकिल्ला होता.पण आता त्या काॅग्रेसची काय अवस्था झालीय आणि काँग्रेसचीच ‌‌‌जातकुळी असणारा राष्ट्रवादी पक्षाचीही अवस्था नाजुकच झालीय.

    ReplyDelete
  18. भाऊंना मनसे/राज च प्रेम आहे. पण राज ठाकरे एक नेता म्हणून कसा आहे? निवडून आलेले आमदार, नगरसेवक पक्षात का टिकत नाहीत? हे असंच होत राहील तर मनसे वाढेल का?
    जे चिंतन मनसे बाबतीत केले आहे तेच नारायण राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेला ही लागू होऊ शकते.
    मला तरी वैयक्तिक राज किंवा राणे हे भविष्यात महाराष्टातले विरोधी नेते होतील असं वाटत नाही.

    ReplyDelete