Saturday, October 5, 2019

युती कशासाठी? कुणासाठी?

No photo description available.

अखेरीस उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस मावळत असताना, घाईगर्दीने नागपूर येथे आपला उमेदवारी अर्ज सादर करून, मुख्यमंत्री मुंबईला पोहोचले. मग त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात युतीची अधिकृत घोषणा केली. तसे बघितल्यास युतीची घोषणा यापुर्वीच चंद्रकांत दादा पाटिल व सुभाष देसाई यांच्या सहीनिशी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आलेली होती. मग या ठाकरे फ़डणवीस घोषणेची काय गरज होती? तर एक कळीचा मुद्दा युतीच्या बाबतीत मागे राहिला होता आणि तो होता जागावाटपाचा. तोच मुद्दा मागल्या खेपेस युती मोडायचे मुख्य कारण झालेला होता. शिवसेना किमान १५० जागांसाठी अडून बसली होती आणि भाजपा १४६ पेक्षा अधिक जागा द्यायला राजी नव्हता. यावेळी युती झाली व घोषणा झाली, तरी कोणाला किती जागा, हा आकडा गुलदस्त्यात ठेवलेला होता. त्याचीच घोषणा करण्यासाठी ४ तारखेला पत्रकार परिषद झाली आणि आकडा जगासमोर आला. त्यानंतर राजकीय विश्लेषणात आकड्याचे पोस्टमार्टेम सुरू झाले. १६४ भाजपा आणि १२४ शिवसेना असे जागावाटप झाले असेल, तर थोरला भाऊ आपोआप भाजपा होऊन गेला. मग विधानसभेत थोरला भाऊ असण्याचा सेनेचा हट्ट कुठे गेला? त्यावर काही विचारण्याला अर्थ उरला नव्हता. कारण १२४ जागांना सेनेने मान्यता दिलेली असेल, तर डिवचून काही हाती लागणार नव्हते. शिवाय सेनेने कमी जागांवर सौदा कशाला केला, तेही उघड गुपित आहे. २०१४ प्रमाणे यावेळी भाजपाला युतीची गरज उरलेली नाही. शिवसेनेला बाजूला ठेवूनही भाजपा आज स्वबळावर बहूमत मिळवण्याच्या स्थितीत आला आहे. मग भाजपाने तरी १६४ जागा घेऊन त्यातूनच छोट्या मित्रपक्षांना डझनभर जागा देण्यातून साधले काय? खरेतर राजकीय विश्लेषणात याच प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. पण उत्तर शोधण्यापेक्षा कळलावेगिरी हेच पत्रकारितेचे हेतू झाले; मग योग्य प्रश्न बाजूला पडतात आणि राजकीय प्रश्न रहस्य होऊन जातात. खरेच भाजपाने स्वबळाची खात्री असताना सेनेला इतक्या जागा तरी कशाला द्याव्या? युती का करावी?

गेल्या वेळी भाजपाला स्वबळावर बहूमत मिळन्याची अजिबात खात्री नव्हती. पण युती मोडून स्वबळावर विधानसभा लढवल्यास एकट्याने विधानसभेत मोठा पक्ष होण्याची खात्री होती. ती खात्री राष्ट्रवादी पक्षाने दिलेली होती. युती तुटल्यास आघाडीही मोडून स्वबळावर लढणारा भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष होईल, अशी हमीच राष्ट्रवादीने दिलेली होती आणि त्यांनी शब्दही पाळला होता. युतीच्या पाठोपाठ दोन तासात आघाडी मोडली गेली आणि दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची पाळी आणली गेली. अशा चौरंगी लढतीतही एकहाती बहूमत भाजपा मिळवू शकणार नाही, हे भाजपा ओळखून होता. पण राज्यात सर्वात मोठा पक्ष होताना शिवसेनेची खुमखुमी जिरवण्यासाठी राष्ट्रवादीची ऑफ़र भाजपाला सुखावणारीच होती. त्यात राष्ट्रवादी किंवा पवारांचा कुठला डाव साधला जाणार होता? तर त्यांचाही प्रादेशिक पक्ष आहे आणि राज्यात कॉग्रेस दुबळी झाल्यास त्यातले अनेकजण पर्याय म्हणून राष्ट्रवादीत दाखल होणार, हे उघड होते. पण त्याचवेळी प्रादेशिक पक्ष असलेली शिवसेना दुबळी होण्यातही पवार आपले राजकीय स्वार्थ शोधत होते. म्हणूनच भाजपा व पवारांच्या अशा राजकारणात युती मोडली गेली होती. दोन पक्षांच्या दिर्घकालीन मैत्रीमध्ये बिब्बा घातला गेला होता. झालेली तसेच. भाजप सर्वात मोठा पक्ष बनला तरी बहूमत हुकलेले होते आणि त्यातूनही भाजपाला शिवसेनेची गरज भासू नये, म्हणून पवारांनी अंतिम निकाल येण्यापुर्वीच पाचर मारून ठेवली. त्यांनी एकतर्फ़ीच भाजपाला सरकार बनवण्यासाठी बिनशर्त पाठींबा घोषित करून टाकला आणि भाजपा सेनेतील भांडण विकोपास जाईल याची काळजी घेतली. झालेही तसेच सेनेला धुसफ़ुसत ठेवून भाजपाने आपले सरकार स्थापन केले आणि पुढे सत्तेसाठी आसुसलेल्या सेनेला तुटपुंज्या खात्याच्या बदल्यात पाठींबा देण्यापर्यंत वाकवून घेतले. आता पाच वर्षे उलटुन गेल्यावर मधल्या काळात सेनेने खुप धुसफ़ुस केली. पण पुन्हा स्वबळावर लढायची तयारी अजिबात केली नाही. लोकसभा आल्यावर भाजपाचा धाकटा भाऊ म्हणून भूमिकाही पार पाडली. थोडक्यात व्यवहारातून सेनेने धाकटेपण स्विकारले होते. मग युतीची चिंता उरलेली नव्हती. तरीही भाजपाने युती कशाला करावी?

तसे बघायला गेल्यास लोकसभेपुर्वी भाजपाचा हात थोडा दगडाखाली होता. तीन राज्यात भाजपाने सत्ता गमावली होती आणि पोटनिवडणूकातही भाजपाला धक्का बसलेला होता. सर्व पक्षांनी भाजपाला हरवण्यासाठी एकत्र येण्यासाठी गठबंधनाच्या हालचाली वेगात चालू होत्या. त्यामुळे भाजपा सेनेला वगळून राज्यात आपल्या पुर्वीच्या जागा राखण्याची हिंमत गमावून बसलेला होता. त्यामुळे अगतिक होऊन त्याला सेनेशी युती करण्याला पर्याय नव्हता. सहाजिकच सेनेला खुळखुळा दाखवण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर आले आणि क्षणात राजकीय पारडे फ़िरून गेले. विनासायास युती झाली आणि निकालही थक्क करणारे लागले. त्यातून सर्वात मोठा निष्कर्ष असा समोर आला, की भाजपाला महाराष्ट्रात आता कुणाच्या मदतीची गरज उरलेली नाही. एकट्याच्या बळावर भाजपा मोठा पक्ष झालेला आहे आणि अगदी दोन्ही कॉग्रेस एकवटल्या तरी त्यांना मिळू शकणारी मते भाजपाला मोठा पक्ष होण्यापासून रोखू शकत नव्हती. पण कॉग्रेस आघाडी व भाजपा तुल्यबळ संख्येने निवडून आले, तर तिसरा पक्ष किंवा रागावलेली शिवसेना भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवू शकली असती. सेनेने कॉग्रेस आघाडीशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचे डावपेचही यशस्वी होऊ शकले असते. त्यालाही शह देण्याची तयारी झालेली होती. कॉग्रेस व राष्ट्रवादीतून आपापल्या क्षेत्रातून सहज जिंकू शकणार्‍या आमदारांना भाजपात आणून बहूमतापर्यंत मजल मारण्याची योजना कार्यान्वीत झालेली होती. त्यामुळेच भाजपाला बहूमत मिळवायला युतीची गरज उरलेली नव्हती. तरीही जागावाटप करून १६४ जागांवर लढण्याचे कारण म्हणून खरे रहस्य आहे. त्यापेक्षा २८८ जागी लढून भाजपा सहज स्वबळावर बहूमताचा जुगार खेळू शकत होता. तसे केल्यास शिवसेनेला दणका दिला जाईल जरूर. पण सेनेला दणका बसत असताना दोन्ही कॉग्रेस आघाडी करून लढल्याने पुन्हा सावरू शकतात आणि ते भविष्यातले मोठे आव्हान होऊ शकते. सेनेला हाताळणे जितके सोपे आहे, तितके कॉग्रेस राष्ट्रवादीला खेळवणे सोपे नाही. म्हणून मग युती करूनही बहूमत गाठण्याचा जुगार अधिक सुरक्षित होता. युती होण्यातला तो मोठा मुद्दा आहे.

आता युतीमध्ये थोरला भाऊ किंवा निर्णायक अधिकार असलेला भागिदार म्हणून भाजपाने आपले स्थान पक्के केलेलेच आहे. सेनेला नरमाईने घ्यायला भाग पाडलेलेच आहे. आव्हान होऊ शकेल असा प्रतिस्पर्धी दोन्ही कॉग्रेस आहेत. त्या दुबळ्या आहेत. पण त्यांना सावरण्याची संधी दिली तर त्यातून भविष्यातले आव्हान मोठे होऊ शकते. त्यांच्यापेक्षा शिवसेनेला सावरायला देणे अशिक सोयीचे आहे. हे ओळखूनच भाजपाने युतीचा पत्ता खेळलेला आहे. तो खेळताना सेनेला डोईजड होणार नाही, इतक्या जागा दिल्या आहेत आणि स्वत:ला ठेवलेल्या जागातूनही बहूमताची संख्या गाठण्याची शक्यता कायम राखलेली आहे. लोकसभेत युतीला मिळालेला प्रतिसाद बघता, युती २२०-२४० जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि त्या निकालानंतर दोन्ही कॉग्रेसच्या अनेक सरदार मनसबदारांचा धीर सुटलेला होता. त्यांना आपल्या गोटात आणुन उमेदवारी देण्यातून भाजपाने ९०  टके उमेदवार जिंकू शकतील, असेच जागावाटप व तिकीटवाटप केलेले आहे. मात्र त्याचा अर्थ स्वत:चे बहूमत संपादन करून सेनेला पुन्हा सत्तेपासून वंचित ठेवण्याचा कुठलाही डाव असू शकत नाही. कारण युतीचा अधिक लाभ सेनेला मिळणार आहे. तुलनेने तितका लाभ भाजपाला मिळणार नाही. त्यामुळे झीज सोसूनही भाजपाने आपल्याला कमी जागा घेत सेनेला सोबत ठेवले आहे. कारण गेल्या विधानसभेत सेना हेच लक्ष्य होते. यावेळी दोन्ही कॉग्रेस खरे लक्ष्य आहेत. सेनेला ७०-८० जागा मिळाव्यात आणि भाजपाला १४० हून अधिक जागा मिळाव्यात असे यामागचे समिकरण आहे. ती संख्या बहूमताच्या पार गेली तरी युती टिकणार आहे. पण नुसती सत्ता टिकवणे वा सत्ता युती़च्या हाती राखणे, हे भाजपाचे लक्ष्य अजिबात नाही. या विधानसभेच्या निवडणूकीत दोन्ही कॉग्रेस गलितगात्र करून टाकणे आणि विरोधात वंचित वा तत्सम नव्या कुठल्याही पक्षाला भागिदार बनवणे, हे खरे लक्ष्य आहे. म्हणूनच १६२ जागा आपल्याकडे घेऊन किंवा मित्र पक्षांना कमळ निशांणीवरच लढायला भाग पाडून भाजपा सेनेला अंधारात ठेवतोय, असे मानायचे कारण नाही. कारण अटी घालण्याच्या स्थितीत शिवसेना २०१५ पासूनच राहिलेली नाही. म्हणून तर वाट्याला आल्या तितक्या जागा सेनेने स्विकारल्या आहेत. खरे लक्ष्य दोन्ही कॉग्रेस आहेत आणि ते शरद पवार यांना नेमके उमजलेले आहे. म्हणून तर वणवण करीत याही वयात पवार अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

युती करताना शंभर जागांवरही सेनेला थोपवता आले असते किंवा समाधानी करता आले असते. पण तितका मोह भाजपाने ठेवलेला नाही. सेनाही फ़ायद्यात असावी हे तत्वत: मान्य केले असल्याने सत्तेतही सेनेला चांगला वाटा देण्याचा सौदा झालेला आहे. त्यात आज घोषित नसलेली एक मोठी अट आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचीही आहे. ती मान्य केल्यावर सेनेला जागा किती, याचा फ़ारसा फ़रक पडणार नव्हता. तरीही १२४ जागा देण्यात आल्या. याचा अर्थच भाजपा विधानसभा निवडणूकीत सेनेला लक्ष्य करीत नसल्याचा निघतो. पण काहीही करून दोन्ही कॉग्रेस पक्षांना एकत्रित ४०-४५ जागांवर रोखणे, हे खरे उद्दीष्ट दिसते. किंबहूना विरोधी पक्ष म्हणून जो अवकाश राज्यात आज शिल्लक आहे, त्यामध्ये कॉग्रेसला आणखी एकदोन भागिदार नवे उभे करणे, ही भाजपाची खरी रणनिती आहे. मनसे वा वंचित आघाडी अशा पक्षांना प्रत्येकी किमान आठ ते दहा टक्के मते मिळवता येतील; अशा चाली भाजपा खेळतो आहे. त्यात यश आले, तर दोन्ही कॉग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था उत्तरप्रदेश वा बिहार राज्यासारखी होऊन जाईल. त्यांना विरोधक म्हणूनही मान्यता उरणार नाही. राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर असे उत्साही आक्रमक नेते महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात झपाट्याने विरोधी चेहरे होऊ शकतात आणि दोन्ही कॉग्रेसचा उरलासुरला मतदारही क्रमाक्रमाने त्याच्याकडेच ओढला जाऊ शकेल. हे अर्थातच प्रादेशिक स्वरूपाचे पक्ष असून त्यांच्याशी व्यवहार करने जितके सोपे व सहजशक्य आहे, तितके राष्ट्रीय अशा कॉग्रेस पक्षाशी व्यावहारीक राजकारण खेळणे अशक्य आहे. महाराष्ट्रात कॉग्रेस आणखी दुबळी खिळखिळी होण्याचा परिणाम अन्य राज्यात मिळू शकतो. मतदारांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. सशक्त प्रादेशिक पक्ष व दुबळे राष्ट्रीय पक्ष, ही भाजपाची रणनिती आहे. म्हणून ती सेनेला सत्तेत वाटा नाकारण्यासाठीची नसून दोन्ही कॉग्रेसचे सगळ्या बाजूने खच्चीकरण करण्याची आहे.

21 comments:

  1. भाऊ अगदी सटीक विश्लेषण अंदाज़ अगदी बरोब्बर पन लहन मुलाला उप मुख्यमंत्री करून चुकीच्या महत्वकांक्षेला
    बीजेपी खत पानी घालतोय ासे वाटतका ज्याला जिल्हा परिषद् पंचायत समिति माहिती नहीं त्याला उगाच chal तुला फुगा घेऊन देतो ासे म्हणणे बरोबर आहे का ???

    ReplyDelete
  2. आजची भाजपाची घोडदौड पाहता भाजपाला किमान 160 जागा मिळायला हव्या होत्या

    ReplyDelete
  3. भाऊ,तुम्ही केलेली राजकीय मांडणी बरोबर आहे, त्यात शिवसेनेला आज २०१९ ला धोका / अडचण नाही. प्रश्न 2019 ते 2024 या कालखंडाचा आहे. सत्तेचे कदाचित तुम्ही म्हणत आहात तसे आणि तितके वाटप होईल. पण दुबळी ४०-४५ संख्येपर्यंत मर्यादित झालेली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी २०१९ नंतर संदर्भहीन होण्याच्या मार्गावर असेल, तेंव्हा भाजपाला सेनेची गरजच उरत नाही, उलट नंतर शिवसेना ७०-८० आमदार असून आजाच्यासारखीच ना धड सत्तेत ना धड विरोधात अशी रेंगाळलेली असेल. आणि त्या टप्प्यावर भाजपा-शिवसेना निर्णायक सामना होईल २०२४मध्ये.
    हा मुद्दा तुमच्या लिखाणात 'सूचित' होत आहे का? तुम्ही तसा लिहिलेला नाही, पण स्वबळावर सत्ता शक्य असताना २०२४मध्ये वाटेकरी सोबत ठेवणे तर्कात बसत नाही.
    त्यामुळे सेनेला आत्ताच्या क्षणाला निर्धास्त ठेवून, पण उद्याच्या निर्णायक लढाईत चितपट करण्याची शक्यता नाकारता नाही असे वाटते.

    ReplyDelete
  4. राज पुरोहित, प्रकाश मेहता, यांना विधानसभेची तर ,किरीट सोमय्या यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली, सोमय्यांच्या कुटुंबातसुद्धा विधानसभेचे तिकीट नाकारले,
    हे सर्व अमराठी नेते होते.

    मुंबई प्रदेश भाजप मधील आशिष शेलार वगळता मातब्बर नावे वगळली आहेत,

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी म्हणायची का?

    ReplyDelete
  5. मनसे आणि वंचित आघाडी सारख्या पक्षांना बळ देणे म्हणजे सामाजिक आत्महत्या.
    समाज हे कधीच स्विकारणार नाही. पंजाबात कॉंग्रेस, रालोआ आणि आआप यातून निवड करताना आकली नको म्हणून मतदारांनी कॉंग्रेस निवडली आआप नाही.

    ReplyDelete
  6. दोन मुद्दे नाही पटले.
    १) भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे १६४ जागा लढवल्या तरी १४० जिंकतील हे शक्य वाटत नाही.
    २) शिवसेना मजबुरीने १०० जागांच्या बदल्यात युती करायला तयार झाली नसती. शिवसेना ही निवडणूक अस्तित्वाची निवडणूक समजून लढली असती. मते फोडून भाजपला घायाळ करून स्वतःचे उपद्रवमूल्य दाखवूनही शिवसेना खुश झाली असती. युती झाली नसती तर शिवसेनेतूनही नेते भाजपमध्ये गेले असते व शिवसेनेला गळती लागली असती. मात्र शिवसेनेची ताकद कट्टर शिवसैनिकात आहे. भुजबळ, राणे, राज ठाकरे असे मोठमोठे धक्के शिवसेनेने यशस्वीरित्या झेललेले आहेत.


    शरद पवारांनी ह्यावेळी काँग्रेसशी आघाडी करून राष्ट्रवादीच्या गळ्यात धोंडा बांधून घेतला की काय असे वाटते. स्वबळावर किंवा मनसेशी युती करायला हवी होती. काँग्रेसचे ह्या निवडणुकीत कुठे अस्तित्वही जाणवत नाही. काँग्रेसचे जे कोणी निवडून येतील तेही बहुतेक पवारांमुळेच निवडून येतील.

    ReplyDelete
  7. छान अभ्यास आहे भाऊ तुमचा , तुम्ही भाजपाची भविष्यातील वाटचाल अचुक हेरली ,नव्या पिढीच्या पत्रकारांनी खरच़ आपल्या कडून धडे घ्यायला हवेत अशी तुमची पत्रकारिता सखोल व अचुक आहे.धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  8. मनसे ला मते मिळतील हे पटत नाही,
    आपण अनेक दिवसांपासून हे सांगत आहात,
    पण मनसे ने काहीही काम केलेले नाही, त्यांना मते कुठल्या आधारावर मिळतील?

    ReplyDelete
  9. त्यात आज घोषित नसलेली एक मोठी अट आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचीही आहे. ती मान्य केल्यावर .......
    गेल्या पाच वर्षात एकही महत्वाचे खाते सेनेला द्यायला भाजप तयार नव्हता .आपण म्हणता आता भाजप अधिक प्रबळ झाला आहे मग आतापर्यंतन निर्माण केलेले उपमुख्यमंत्रीपद कशाला त्यानी मान्य केले असेल असा प्रश्न कोणत्याही वाचकाला पडेल त्याचे उत्तर काय ?

    ReplyDelete
  10. अंती सुक्ष्म निरीक्षण

    ReplyDelete
  11. अतिशय सखोल विवेचन !
    संपूर्ण सहमत !

    ReplyDelete
  12. Though initially it would appear to be a bit far fletched,careful study convinces you that it has to be absolutely right not only in short time but in the long time to come as well, subject, of course, to the fact that the BJP continues to remain in a commanding position to set the course.My sincere thanks for this piece

    ReplyDelete
  13. घराणेशाहीचा वारंवार धिक्कार आणि तिटकारा करणारे घराणेच आज आदित्य यांना स्पॉन्सर करत आहे
    This is really puzzling .Times have changed!

    ReplyDelete
  14. 'आज घोषित नसलेली एक मोठी अट आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचीही आहे.'

    आदित्य मुख्यमंत्री आणि देवेंद्र केंद्रात! ही शक्यता कितपत आहे? इतिहास पाहिला तर यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात जाताना मारोतराव कन्नमवार व शरदराव पवार यांनी सुधाकरराव नाईक असे कमकुवत मुख्यमंत्री नेमले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. आज लगेच नाही तरी येत्या दोन तीन वर्षांत!

    ReplyDelete
  15. पटेल असेच अगदी, निःसंशय!!!!

    ReplyDelete
  16. Excellent analysis Bhau. On the contrary, I feel that BJP is having it's eyes on upcoming BMC elections. They will surely crack Mumbai once and for all.

    ReplyDelete
  17. भाजपची अधःपतनाकडे चाललेल्या परिस्थितीला नेमकी काय कारणं आहेत याचं बरोबर उलट्या मानसिकतेने तुम्ही शब्दरूप दिलंय भाऊ .
    अर्थातच याची खात्री तुम्हाला २४ तारखेला होईल .

    ReplyDelete
  18. भाजपची अधःपतनाकडे चाललेल्या परिस्थितीला नेमकी काय कारणं आहेत याचं बरोबर उलट्या मानसिकतेने तुम्ही शब्दरूप दिलंय भाऊ .
    अर्थातच याची खात्री तुम्हाला २४ तारखेला होईल .

    ReplyDelete
  19. या सर्व अंकगणितात जनता कुठेय? राष्ट्रवादीची मेगाभरती माझ्यासह अनेक लोकांना पटलेली नाही. दुसरे कोणी नाही म्हणून किंवा पारंपरिक मतदार म्हणून कितीकाळ लोक पाठीशी राहतील..
    आघाडीच्या बेलगाम कारभाराची चीड येऊन लोकांनी मोदींवर विश्वास टाकला त्याच माणसांना तुम्ही पुन्हा आमदार बनवून ठेवणार.
    जिंकण्याची इतकी खात्री होती तर मेगा भरती नंतर तिकीट नाकारायची हिम्मत दाखवायची होती फडणवीसांनी. छतीठोकपणे सांगायचे होते कि आधी ५ वर्षे पक्षाचे काम करा. आमचा जो जुना कार्यकर्ता व नेता आहे त्याचा प्रचार करा आणि मगच काही मिळेल.
    पुष्कळ गोष्टी असतात देण्यासारख्या. विधानपरिषद आहे, वेगवेगळ्या समित्या आहेत, जिल्हा-परिषद, नगरपरिषद आहे.
    भारतीय जनता पक्षाचे काहीही काम न करता, संघ विचारांशी, हिंदुत्ववादाशी काहीही बांधिलकी न दाखवता, त्यांच्या लॉयल्टीची परीक्षा न घेताच त्यांना तिकीट का दिले? ५ वर्षांपूर्वी यांच्याच पवारांनी हिन्दुदहशतवादाचे भूत उभे केले, तेव्हा पक्षातील कोणी एका शब्दाने विरोध केला नाही, २६/११ च्या हल्ल्यावर आर आर पाटील जे बोलले तेव्हाही हेच लोक मूग गिळून गप्प बसले होते, सुप्रिया ताई बोलतात कि महाविद्यालयनमध्ये सत्यनारायण पूजा कशाला हवी पण कोणीच ठामपणे तिला विरोध केला नाही. पक्षाशी सोडाच, पण देव, देश, धर्म, राष्ट्रहित या पैकी कशाशी यांची बांधिलकी त्यांनी सिद्ध केली कि पक्षात येताच त्यांना पावन केले आणि तिकीट दिले? याला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही म्हणत जिंकण्यासाठीची लाचारी म्हणतात. आणि लाचार पक्ष, सरकार जास्ती काळ टिकू शकणार नाही. फडणवीस हुशार आहेत आणि तडफदार आणि कर्तबगारही आहेत पण या मेगाभराटीचं डाव त्यांच्यावरच उलटू नये आणि ज्या कारणासाठी लोक भाजपच्या पाठीशी पुन्हा एकदा ठामपणे उभे राहिले ते कारणच या सत्तेच्या लाचारीत हरवून जाऊ नये म्हणजे मिळवले.

    ReplyDelete