Sunday, October 13, 2019

राफ़ेल, लिंबू आणि गंधपुष्प

Image result for rajnath rafale

विजयादशमीचा मुहूर्त साधून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी फ़्रान्सला जाऊन ताब्यात मिळणार्‍या पहिल्या राफ़ेल लढावू विमानाचे रितसर पूजन केले. तात्काळ आपल्या देशातील उथळ पुरोगामी विज्ञानवादी बुद्धीमंतांच्या व राजकारण्याच्या अकलेला चालना मिळाली. सध्या महाराष्ट्रात निवडणूका लागलेल्या असल्याने, इथे बारीकसारीक गोष्टींना अतिशय प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे सिंग यांनी फ़्रान्समध्ये राफ़ेल विमानाची केलेली पुजा, चर्चेचा किंवा टिंगलीचा विषय करण्यात आला. बुद्धीमंत लोक एकवेळ समजू शकले असते. पण कॉग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही त्यावर टिप्पणी करावी, याचे नवल वाटले. अर्थात त्यात कुठलीही नवलाई नाही. वहात्या गंगेत हात धुवून घेण्यालाच धुर्तपणा समजणार्‍यांच्या जगात असे विज्ञानवादी असंख्य प्रमाणात जन्माला येत असतात. त्यामुळे विमानाच्या चाकापाशी चिरडायला ठेवलेली लिंबे आणि विमानाच्या वर ठेवलेला नारळ; अनेकांना खुपला तर योग्यच होते. पण अशा बाबतीत टिव्हीच्या कॅमेरासमोर येऊन टवाळी करणार्‍यांच्या प्रतिक्रीया टिपणार्‍यांची बुद्धी कुठे चक्कर येऊन पडली होती, त्याचे नवल वाटते. कारण ज्या राजकीय नेत्यांनी राफ़ेलच्या पूजेसाठी नाके मुरडली, त्यापैकी कोणत्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराने पित्रूपक्ष चालू असताना उमेदवारी अर्ज कशाला भरलेले नव्हते? असा प्रतिप्रध्न एकाही पत्रकार शहाण्याला कशाला सुचला नाही? महाराष्ट्रात २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली. पण २९ तारखेपर्यंत पितॄ पंधरवडा चालू होता, तोपर्यंत कुठल्या मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज का दाखल केला नाही? महाराष्ट्रात पितृपक्ष हा कालावधी कुठल्याही शुभकार्यासाठी अपशकुनी मानला जातो. ही अर्थातच श्रद्धा किंवा पुरोगामी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञानवादाची खुमखुमी आहे, त्या पुरोगामी पक्षांनी तरी आपल्या उमेदवारांना त्याच कालखंडात अर्ज दाखल करण्याची सक्ती करायला काय हरकत होती?

भाजपा किंवा शिवसेना हे हिंदूत्ववादी पक्ष असल्याने त्यांनी हा अशुभ काळ पथ्य म्हणून पाळला तर समजू शकते. ते अंधश्रद्धेचेच भगत आहेत. पण ज्यांना राफ़ेल विमानाच्या पुजेची वा चाकाखाली लिंबू ठेवण्याची लाज वाटली; त्यांना पितृपक्षात अर्ज भरायची भिती कशाला वाटली असावी? त्याचे कारण राजनाथ यांना जे वाटले त्यापेक्षा किंचीतही वेगळे नाही. आपल्या बाबतीत असे काही नसल्यावर कोणीही हाडाचा पुरोगामी अथवा विज्ञानवादी असतो. पण विषय आपल्या घरातला वा जीवनातला असल्यावर मात्र बहुतांश विज्ञानवादी अंधश्रद्ध होऊन जातात. त्याचा कुठलाही गाजावाजा होऊ दिला जात नाही. किंबहूना गुपचुप आपापल्या अंधश्रद्धा जपल्या जातात. त्याचे चित्रण कुठल्या कॅमेराने होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली जात असते. त्यामुळे त्यांची झाकलेली मूठ सव्वा लाखाची असते. पण अधूनमधून कुठे छुपा कॅमेर समोर आला, मग त्यांची झाकली मूठही उघडी पडते. याचे शेकडो किस्से सांगता येतील. आज उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ नावाचा धार्मिक पथ्ये पाळणारा मुख्यमंत्री आहे आणि त्याला मुहूर्त व धर्मकर्मकांड करण्याची बिलकुल लाज वाटत नाही. पण धर्माच्या शास्त्रापलिकडे ज्याला निव्वळ समजुती व अंधश्रद्धा मानले जाते, त्याला मात्र योगी कवडीचीही किंमत देत नाहीत. त्यानी मुख्यमंत्री असताना नॉयडाला जाण्याची हिंमत केलेली आहे. मात्र त्यांच्या आधी जे दोन पुरोगामी मुख्यमंत्री उत्तरप्रदेशाला लाभलेले होते, त्यांना कधी अशा अंधाश्रद्धेला आव्हान देण्याची हिंमत झालेली नव्हती. गेल्या दोन तीन दशकापासून उत्तरप्रदेशच्या राजकारणात अशी ठाम समजूत आहे, की जो मुख्यमंत्री नॉयडा नामक औद्योगिक परिसराला भेट देतो वा कार्यक्रम तिथे करतो, त्याची सत्ता जाते. म्हणून मायावती वा अखिलेश यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात चुकूनही त्या भागात कुठला कार्यक्रम योजला नाही वा तिकडे फ़िरकले नाहीत. अर्थात त्यामुळे त्यांना सत्तापद गमावण्यापासून सवलत मिळाली नाहीच.

थोडक्यात सांगायचा मुद्दा इतकाच, की पुरोगामी म्हणून मिरवणारे अधिक अंधश्रद्ध असतात. किंबहूना पुरोगामीत्व मिरवायचे म्हणून असल्या इतरांच्या वागण्याला नाके मुरडणे, ही आजकाल फ़ॅशन झालेली आहे. तसे नसते, तर रामलिला मैदानार मनमोहन सिंग किंवा सोनिया राहुल तरी रावणाला बाण मारायला कशाला गेले असते? त्यांच्या प्रतिकात्मक बाण सोडण्याने कुठला रावण मेला नाही, किंवा दिल्लीतल्या रावणवृत्तीला वेसण घातली गेली नाही. पण त्यांनाही मतांसाठी असली लाचारी करावी लागली. लोकसभा निवडणूकीत मते हवी म्हणून राहुल गांधी जनेयुधारी ब्राह्मण असल्याचा डंका पुरोगाम्यांनीच कशाला पिटला असता? असे लोक अधिक भंपक विज्ञानवादी असतात. राजनाथ यांनी राफ़ेल विमानाची विधीवत पुजा केली असेल आणि लिंबूमिरची त्याला बांधली असेल, तर बिघडत नाही. निदान त्यांची असल्या भोंदूगिरीवर श्रद्धा तरी असेल. पण राहुल किंवा त्यांच्या ब्राह्मण्याचे कौतुक सांगणार्‍यांचे काय? नुसता ब्राह्मण नाही, तर जनेयुधारी ब्राह्मण असल्याचे कौतुक करणारेच आता राफ़ेल विमानाच्या पायाशी असलेल्या लिंबासाठी नाक मुरडतात ना? हा सार्वत्रिक प्रकार असतो. किती पुरोगामी निवडणूका जिंकण्यासाठी तिरूपती वा तत्सम देवस्थानाच्या पायर्‍या झिजवित असतात? तेव्हा यापैकी कितीजणांनी नाके मुरडलेली असतात? अर्थात अशा वादाला तोंड फ़ुटले, म्हणजे त्याला काटशह देणार्‍या अंधश्रद्धांचेही पुरावे समोर आणले जातात. सोशल मीडियात लगेच अवकाशयानात भ्रमण करणार्‍या अंतराळवीरांच्या अंगावर होलीवाटर शिंपडले जाण्याचेही व्हिडीओ तात्काळ शोधून टाकलेले आहेत. तोही मुर्खपणाच आहे. कारण जशी ज्यांची श्रद्धा किंवा समजूत असेल, तसेच कुठल्याही देशातील व समाजातील लोक वागत असतात. ज्यांना कुठल्याही श्रद्धा चुकीच्या वाटतात, तेही एकप्रकारे श्रद्धाळूच लोक असतात. देव नाही म्हणणारे सुद्धा देव नसल्याचा कुठला पुरावा देऊ शकत नसतात. अमूक नसल्याचा दावा फ़क्त करतात. तीही एक अंशध्रद्धाच असते ना? भाजपा किंवा संघ जातीयवादी असल्याची एक अंधश्रद्धा कितीकाळ आपल्या बौद्धिक प्रांतामध्ये बोकाळलेली आहे?

गेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागल्यावर मायावतींनी मतदान यंत्रावर शंका घेतली आणि तमाम पुरोगामी अंधश्रद्धाळूंनी त्यांना उचलून पालखीत बसवले ना? ते यंत्र हॅक होऊ शकते किंवा त्यात घोटाळा करता येतो, हे शास्त्रशुद्ध रितीने सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाने आव्हान यापैकी एक पुरोगामी विज्ञानवादी स्विकारू शकला आहे काय? पण त्याचा गवगवा किती जोरात चालू आहे? कुठलाही पुरावा नसताना किंवा कुठेही सिद्ध झालेले नसतानाही छातीठोकपणे इव्हीएम वाद उकरून काढणारे थोडे आहेत? कोणीतरी सांगितले, कुठेतरी ऐकले अशा गावगप्पांच्या आधारे इव्हीएम यंत्राविषयी गावगन्ना अफ़वा पिकवित सुटलेले शरद पवार विज्ञानवादी आहेत? असतील तर राफ़ेल विमानाच्या पायाशी लिंबू ठेवणारे राजनाथही विज्ञानवादीच असतात. कारण पवार किंवा तत्सम लोक ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि राजनाथसिंग यांनी ऐकलेल्या अपशकूनाच्या वा अशुभाच्या संकेतांना मानलेले आहे. हातात फ़लक घेऊन कोणी दाभोळकरांच्या खुन्याला पकडण्यावर आंधळा विश्वास ठेवत असेल, किंवा सेमिनार भरवून कलबुर्गी वा अन्य कुणाला न्याय मिळत असेल, तर लिंबू चिरडल्याने राफ़ेल विमानाला वाईट नजर लागणार नाही, यावर विश्वास कशाला ठेवायचा नाही? श्रद्धा तुमची असली मग खरी आणि आमची असली, मग आंधळी; असे कुठल्याही शास्त्रात किंवा विज्ञानात सांगितलेले नाही. ज्यांना साधे पितृपक्षात निवडणूकीचे अर्ज भरण्याची किंवा आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर करण्याची हिंमत होत नाही, त्यांनी राजनाथ यांच्या पूजेला किंवा लिंबांना नाक मुरडण्याची गरज नाही. मदर तेरेसांच्या भोंदूगिरीवरचा संपादकीय लेख शेपूट घालून मागे घेणार्‍या बुद्धीमंत व संपादकांना तर मुरडायला नाकसुद्धा असू शकत नाही. असते तर त्यांची अशी केविलवाणी परिस्थिती कशाला  झाली असती? जे पितरांच्या आत्म्याला घाबरून जगतात, त्यांनी लिंबाला हसायचे कारण आहे काय?

10 comments:

  1. अगदी मार्मिक.... सौ सोनार की एक लोहार की

    ReplyDelete
  2. super bhau.shewatach vakya tar ekadam bhannat.

    ReplyDelete
  3. श्री भाऊ तुम्ही अगदी मर्मावर घाव घातला लय भारी

    ReplyDelete
  4. Very true analysis. Slap on the face of liberals ,leftist , Congress and likes of Gupta ,Sardesai ,Roy ,Dua , eagle , Choudhury ,and bunch of like minded ladies like Ghosh ,De ,Razdan ,bharkhas ,

    ReplyDelete
  5. मला वाटते भाऊ कि हा पण एक सापळा असावा आणि विरोधक त्यात पूर्णपणे सापडले. आयुध पूजा हा हिंदू संस्कृतीचा भाग असून, दसरा, वायू सेना दिवस आणि राफाल एव्हडा सारा एकत्र आलेला संयोग वाया कसा जाऊ देणार? घरी सायकल जरी खरेदी केली तरी पूजा करणाऱ्या जनतेला राफाल ची पूजा करण्यात काय वावगे वाटणार होते? भाजप हाय कमांड ने हि सुवर्ण संधी साधली आणि रक्षा मंत्री राजनाथ यांनी सीमोल्लंघन केले. कांग्रेस ने दुर्लक्ष्य केले असते तर हा विषय इतका मोठा झालाच नसता. पण राफाल कांग्रेस च्या जिव्हारी लागणारा बाण आहे हे तर उघड आहे. सापळ्यात अडकण्यात कांग्रेसला काय आनंद होतो हे न सुटलेले कोडे आहे. कांग्रेसची हिंदू-विरोधी भूमिका परत एकदा दाखवण्यात भाजप मात्र कमालीचा यशस्वी ठरला.

    ReplyDelete
  6. बाकी ठीक आहे पण फलक घेऊन न्याय मागणाऱ्यां बद्दल केलेली टिप्पणी किंवा त्याला लिंबू प्रकरणाला जोडणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी चे लक्षण आहे , तुमचं काय म्हणणं आहे न्याय मागण्यासाठी सरकारला जागं कसं करावं बंदूक घेऊन ?? डोकी फोडून की घरात बसून माळ जपत ??? तुमच्याकडे एखादा जालीम तीलसमी तोडा असल्यास सांगावा

    ReplyDelete
  7. व्वा, झकास भाऊ! तुमचा हा लेख अतिशय वस्तुनिष्ठ, समतोल व समयोचित असा आहे! या लेखाने ढोंगी, दुटप्पी, दिखाऊ अशा पुरोगाम्यांचे खरे रूप आम जनतेसमोर नेमकेपणाने आणले आहे म्हणून तुमच्या या लेखाशी १००% सहमत आहे.

    ReplyDelete
  8. सडेतोड विश्लेषण

    ReplyDelete