Tuesday, October 29, 2019

बुद्धीजिवी अंधश्रद्धा

abhijit banerjee modi के लिए इमेज परिणाम

कालपरवा नोबेल पारितोषिक मिळालेले अभिजित बानर्जी भारतात आलेले असताना त्यांना अगत्याने आमंत्रण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून घेतले आणि त्याचे खास अभिनंदन केले. बानर्जी वंशाने भारतीय असले तरी आज भारताचे नागरिक नाहीत. पण त्यांच्या कार्याचा गौरव करणे मोदींना आवश्यक वाटले. मात्र तेच बानर्जी कधी भाजपाच्या वा संघाच्या विचारांशी सहमत होणारे विचारवंत अभ्यासक नाहीत. म्हणूनच मग इथल्या तथाकथित डाव्या विचारवंतांना बानर्जी यांचे कौतुक असले तर नवल नाही. कारण बानर्जी यांचे कार्य किंवा अभ्यास यापेक्षाही इथल्या विचारवंत डाव्यांसाठी त्यांचे कौतुक हे ते संघ विचारांचे विरोधक असल्यानेच अधिक आहेत. किंबहूना आजकाल आपल्या देशात संघाला उगाच उथळ विरोध करून वा शिव्याशाप देऊन कोणालाही विचारवंत म्हणून प्रमाणपत्र मिळवता येत असते. सहाजिकच बानर्जी यांचे कौतुक स्वाभाविक आहे. मोदींची गोष्ट वेगळी आहे. त्यांना कोणी आपल्या विचारांचा वा समर्थक असण्यापेक्षाही व्यक्तीच्या गुणवत्तेची महत्ता वाटते. म्हणून त्यांनी बानर्जींचा गौरव केलेला आहे. पण अशा प्रसंगातून आपल्या देशातील वैचारिक दिवाळखोरीचे पुरावे मिळत असतात आणि त्याचेच सार्वत्रिक परिणामही बघायला मिळत असतात. आता कालपरवा आलेले एक्झीट पोल व त्यावरील चर्चा बघितल्या, तरी अशा दिवाळखोरीची साक्ष मिळतच असते. देशासमोर इतके भेडसावणारे प्रश्न व समस्या असतानाही सामान्य मतदार भाजपाला, मोदींना वा फ़डणवीसांना मते कशाला देतो? याचेही उत्तर ज्याला शोधता येत नाही, त्याची गणना आपल्या देशात अभ्यासक विचारवंतामध्ये होत असते. असे बहुतांश विचारवंत बौद्धीक अंधश्रद्धेचे बळी असतात. ते समजुतीच्या जगात जगत असतात. म्हणूनच चुकून कधी वास्तव जगात आले, तर त्यांना जगातले वास्तव भयभीत करून सोडते. निवडणूकीचे निकाल किंवा एक्झीट पोल ही तशीच एक वास्तविकता आहे.

उदाहरणार्थ देशाच्या अर्थव्यवस्थेत येऊ घातलेली मंदी किंवा विकासदरात झालेली घसरण, वाढती बेरोजगारी किंवा शेती व्यवसायाची झालेली दैना; ह्या खोट्या वा कपोलकल्पित समस्या अजिबात नाहीत. त्या अभ्यासकांनी मांडल्या व कुठल्या आकडेवारीतून सादर केल्या, म्हणून खोट्या बिलकुल नाहीत. त्या खर्‍याच आहेत. पण त्या समस्या जोपर्यंत जनतेला भावत नाहीत वा भयभीत करीत नाहीत, तोपर्यंत सामान्य जनता त्यावर प्रतिसाद देत नसते. मुंबईच्या गजबजलेल्या वस्त्या व गलिच्छ वस्त्यांमध्ये निम्मेहून अधिक जनता नित्यजीवन मुठीत धरूनच जगत असते. तिला पर्यावरण व त्याचा आरेमधल्या जंगलातील झाडांशी असलेला संबंध समजत नाही. कारण ज्याला असे जाणकार मुंबईचे फ़ुफ़्फ़ूस म्हणतात. त्याची कल्पनाही कधी सामान्य लोकांना जगायला मिळालेली नसते. मानखुर्द वा आणिक अशी चेंबूरच्या पलिकडली जुनी गावे आता वस्त्यांनी गजबजली आहेत. अनेक गलिच्छ वस्त्या हटवताना किंवा जुन्या चाळी सपाट करताना, तिथल्या लाखो लोकांना तिकडे नेऊन टाकलेले आहे. त्यांना कचर्‍याचे ढीग वा तेलशुद्धी कारखान्याच्या परिसरात जगावे लागते. तो परिसर चोविस तास धुराने माखलेला असतो आणि शुद्ध हवा कशाशी खातात, तेही तिथला रहिवासी जाणत नाही. मग त्याला आरेमधील २७०० झाडांमध्ये वसलेले फ़ुफ़्फ़ूस कसे समजावे? त्यामागचे विज्ञान वा शास्त्र ज्याला ठाऊकही नाही, त्याला ती झाडे तोडण्याने होणारे नुकसान समजू शकत नाही. पण मेट्रोमुळे वाहतुकीचे साधन विस्तारले तर प्रवासात होणारी घुसमट कमी होऊ शकेल, इतकेच विज्ञान समजू शकते. कारण ते त्याच्या नित्य जगण्याला भिडणारे असते. म्हणून पर्यावरणाची शुद्धता चुकीची वा खोटी अजिबात नाही. पण अशा विषयात सामान्य माणूस मनाने व शरीराने बधीर झालेला असतो आणि सुखवस्तु स्थितीत नुसते अभ्यास करणारा संभाव्य परिणामांच्या कल्पनेनेही भयभीत होऊन जातो. ही दोन जगातली तफ़ावत आहे.

तफ़ावत कुठे व कशी आहे? दोघेही आपापल्या जागी योग्यच आहेत आणि खरेही आहेत. पण एकाला प्रसिद्धीचा झोत मिळतो आणि म्हणून त्याला विचारवंत वा संवेदनशील मानले जाते. उलट ज्याला प्रसिद्धीच मिळत नाही, त्याचे मत दबलेले रहाते. कारण दोघांच्या आयुष्यातील वस्तुस्थिती भिन्न असते. पण यातला अधिक वास्तववादी सामान्य माणुस असतो. तो वास्तव अनुभवातून आपल्या समस्या निश्चीत करतो आणि त्याचे प्राधान्य निवडून त्यानुसार निर्णय करीत असतो. उदाहरणारर्थ मेट्रोमुळे त्याला गाडीतली गर्दी कमी होईल आणि वाहतुकीची सुविधा अधिक सुटसुटीत होईल हा दावा लौकर पटतो. एकूण मुंबईची हवा शुद्ध असण्यापेक्षाही त्याच्या जगण्याशी संबंधित असलेल्या परिसरातील हवा घुसमटण्यासारखी नसली, तरी त्याच्या पर्यावरणाची शुद्धता पुर्ण होत असते. कारण त्याचे जग जगण्यात असते आणि अभ्यासक किंवा त्यांच्या अहवालाने भारावून जाणार्‍यांचे जग कागदोपत्रात सामावलेले असते. घुसमटलेल्या व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला तरी वातावरण शुद्ध झाले असेच वाटणार. उलट ज्यांना घुसमटणेच ठाऊक नाही, त्यांना नुसते अहवाल किंवा अभ्यासाचा डेटा बघूनही गुदमरल्यासारखे वाटणार. ही दोन समाज घटकातील खरी तफ़ावत आहे. त्यामुळे दोघांना भेडसावणार्‍या समस्या एकदम भिन्न आहेत. एकदा हा भेद समजून घेतला, मग मतदान करणारा सामान्य नागरिक कसा विचार करून आपले मत बनवतो आणि कशा कलाने दान करतो, त्याचा अंदाज येऊ शकेल. त्याला भिडणार्‍या समस्यांचा उहापोह भाजपा करीत असेल आणि बाकीचे पक्ष व त्यांचे नेते केवळ अहवालाचे आधार घेऊन समस्यांचा गदारोळ करीत असतील, तर मतांचा कौल विरोधातच जाणार ना? या विधानसभा निवडणुकीत खर्‍या भेडसावणार्‍या प्रश्नांची चर्चाच झाली नाही, असे आता विविध संपादक. अभ्यासक व विरोधी नेतेच सांगत आहेत. पण ती चर्चा करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? त्यांनी जे प्रश्न वा समस्या लोकांसमोर मांडल्या किंवा ज्याप्रकारे मांडल्या, त्यांचा सामान्य जनतेच्या जीवनाशी काडीमात्र संबंध नव्हता ना?

मंदी वा बंद पडणारे कारखाने किंवा उद्योग यांचा जनतेच्या प्रत्यक्ष जीवनावर होणारा परिणाम कितीसा उलगडून समजावला गेला? इतके हजार वा इतके लाख रोजगार गेले वा आत्महत्या झाल्या, असे आकडे फ़ेकून चालत नाही. त्याला थेट जीवनातील अनुभवाशी जोडायला हवे. ते काम सत्ताधारी पक्ष करीत नसतो. खरी ती विरोधकांची जबाबदारी असते. जिथे तुम्ही प्रचाराला जाता, तिथल्या आसपासच्या गावातील आत्महत्या, बेरोजगारी वा उपासमारी यांची उदाहरणे देऊन असे प्रश्न मतदाराच्या मनावर बिंबवले; तर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्या उलट मेट्रोचे हायवेचे सर्वत्र उभे रहाणारे जाळे किंवा काही हजार लाख लोकांपर्यंत पोहोचलेल्या सरकारी योजनांचे लाभ; सत्ताधारी सांगत गेले. त्यातला कोणीतरी लाभार्थी आसपास असेल, तर तो मुद्दा प्रभावी ठरत असतो. पण हे लक्षात यायला जनतेशी संपर्कात रहावे लागते आणि तिच्या सुखदु:खात सहभागी व्हावे लागते. तिथूनच खरी माहिती मिळते आणि ती प्रभावी ठरू शकते. उलट विविध अहवाल, आकडे यातून जनतेशी फ़ारकत होऊन जाते. त्या अंधश्रद्धा असतात. कारण ती माहिती कितीही दाहक असली तरी जनतेला भावणारी नसते, तर विचारवंत अभ्यासकांना चिंतीत करणारी असते. असे जाणकार त्यावर भानाविवश होऊन बोलतात आणि त्यांना ज्या समस्या वाटतात, त्याच जनतेच्या समजून बोलतात, मांडतात. त्यातून एक तुटलेपण येत असते व हळुहळू असे पक्ष, विचारवंत किंवा चळवळी सामान्य जनतेपासून दुरावत जातात. त्यांचा अभ्यास वा आकडेवारी ही अधश्रद्धा असल्याप्रमाणे काम करू लागते आणि सामान्य जनता मतदार त्यांच्यापासून चार हात दुर होतो. कारण त्यांनी कथन केलेले सत्य असले तरी ते सामान्य जनतेच्या नित्य जीवनातील वास्तव नसते आणि म्हणूनच लोक त्यांच्यापासून अलिप्त होत जातात. त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून राजकारण करणारेही मग अंधश्रद्ध असल्यासारखे एकाकी पडत जातात, फ़सत जातात.


12 comments:

  1. वास्तव हे आहे कि विरोधी पक्षातील तेच मग्रूर स्युडोसेक्युलर
    जुनाट खोटारडे भ्रष्टाचारी बुद्धीस वाळवी लागलेले तेचतेच
    घीसेपीटे कल्पना कवटाळून जातीय राजकारण करणारे लोक
    नको म्हणून लोक bjp ला मत देतात.

    ReplyDelete
  2. पण लक्षात कोण घेतो ?

    ReplyDelete
  3. भाऊ, सामान्यांचे आणि उच्चभ्रु लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. त्याची काही उदाहरणे अलीकडे पाहण्यात आली ती अशी:

    - मुंबई मध्ये वरळीहून वाशीकडे टॅक्सीमधून निघालो होतो. जाताना रस्त्यात जिकडे तिकडे मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी अनुभवायला मिळत होती आणि त्यावरून उच्चभ्रु लोक ज्याप्रकाराने तावातावाने टीका करतात ते सगळेच जाणतात. चालकाशी गप्पा मारता मारता त्याला मुद्दाम प्रश्न विचारला: "ह्यामुळे तुमचे किती हाल होत असतील नाही?" त्याच्याशी झालेले संभाषण: "साब, हम इलाहाबादसे यहाँआये। इलाहाबादमे कभी कभी एक दिन में बहुत बिझनेस होता था तो कभी दो दिन कुछ होता नाही था. हमने एक रात सोचा, बम्बई जानेका. दुसरे दिन सुबह सुबह उठा, सीधा रास्तेपे लगा, जो हाइवे ये मोदी सरकारने बनाया है उसपे सात घंटेमें नागपुर पंहुचा. वहां दो हफ्ते निकले, और फिर यहाँ आया. अब यहाँ पे ठीक चल रहा है. अब मेरे जैसा आदमी इलहाबादमे बैठके बम्बई आनेका सोच भी सकता है तो ये हाईवे के कारण। कुछ अच्छा होना चाहा तो थोड़ा तो बर्दाश्त करना पड़ेगा है के नहीं?"

    - पुण्यात एका डेक्कन जिमखान्यावरच्या दुकानात तिथल्या स्टाफशी बोलत असताना त्यांचे म्हणणे: "मी चिंचवडला राहते, आणि रोज इथे स्कूटर चालवत येते. कधीकधी पाऊस, अपघात यामुळे घरी जायला उशीर होतो, आठ - साडेआठ वाजतात. सरकार म्हणते की मेट्रो सुरु झाली की १८ रुपया तिकीट पडेल. तसं झालं तर माझा वेळ आणि पैसे कितीतरी वाचतील. म्हणून मी तर फडणवीस सरकारला मत देईन. दुसऱ्या कुठल्या सरकारनी हे काम करून दाखवला का? मी तर वाट पाहतेय मेट्रो चालू होण्याची. "

    कुठेही गेले तरी सामान्यांशी बोलल्यावर कळते की त्यांना मोदी सरकारने केलेली कामे दिसतात कारण त्यांची सोय होते. पण जे स्वतःच्या गाड्या काढून दररोज प्रवास करतात त्यांना मेट्रोच्या कामामुळे त्रास होतो कारण त्यांच्यासाठी मेट्रोचे महत्त्व तेवढे नाही कारण तसेही ते मेट्रोतून प्रवास करणार नाहीत. थोडक्यात, जेव्हा आपला लाभ नसतो तेव्हा पर्यावरण वगैरे दिसू लागतात.

    आपल्या बुद्धीमंतांनी स्वतःच्या हस्तिदंती मनोऱ्यांमधून जरा खाली उतरण्याची गरज आहे. सामान्य माणूस फायद्यासाठी त्रास सहन करायला तयार आहे. स्वार्थी आहेत ते सुशिक्षित आणि उच्चभरू, आणि त्यांना स्वतःचे "प्रिव्हिलेज" कसे जपायचे हा प्रश्न भेडसावतोय.

    ReplyDelete
  4. Yach basis war Ravishkumaranche Abhinandan (bhale virodhak asale tari) reet mhanun karayla harakat navhate BJPne...ulat na kelyane virodhakanchya haataat kolit milate...(ki Ravishkumaranche welchi chook yaweli Banerjee na bolawun sudharli??)¢

    ReplyDelete
  5. भाऊ, संपूर्ण बुद्धिवादी, विचारवंत, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, पर्यावरणवादी भाजपाच्या विरोधात का आहेत ते कळतं नाही आणि सामान्य मतदार सध्या भाजपाला मतदान का करतोय हे या सर्वांना कळत नाही, त्यामुळेच ते EVM वर घसरत आहेत. भाऊ, आजच्या ब्लॉग मध्ये सामान्य मतदार भाजपाला गेली ५ वर्षे सतत मतदान का करत आहे याचे उत्तर तुम्ही छानच दिलेत.
    हे वरिल सर्व भाजपा विरोधात का आहेत याचे कारण आपण सांगितले आहू ते बरोबरच आहे पण मला शंका आहे की, एकाचवेळी हे सर्व का विरोधात गेलेत याची अजूनही काही कारणे असू शकतील का? कारण भाजपाची विशेषतः मोदी आणि शहा यांची कोणतीही गोष्ट क्रुती यांच्या पचनी पडत नाही देशाच्या द्रुष्टीने कितीही चांगली असली तरीही, असे का?

    ReplyDelete
  6. "घुसमटलेल्या व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला तरी वातावरण शुद्ध झाले असेच वाटणार. उलट ज्यांना घुसमटणेच ठाऊक नाही, त्यांना नुसते अहवाल किंवा अभ्यासाचा डेटा बघूनही गुदमरल्यासारखे वाटणार. ही दोन समाज घटकातील खरी तफ़ावत आहे. त्यामुळे दोघांना भेडसावणार्‍या समस्या एकदम भिन्न आहेत"
    100% मान्य...👌👌👌

    ReplyDelete
  7. नेहमीप्रमाणेच मोजक्या शब्दांत अप्रतिम मांडणी.

    ReplyDelete
  8. संजय नाईकOctober 29, 2019 at 9:49 PM

    आयुष्यभर व चोवीस तास 'लोकांचे विज्ञान, लोकांसाठी विज्ञान' असा धोशा लावणाऱ्या, 'वैज्ञानिक दृष्टीकोन' या विषयावर खल करणाऱ्या विज्ञानप्रसारकांनी व पर्यावरणवाद्यांनी हा लेख रोज वाचावा इतका महत्वाचा व मूलभूत आहे !! काच, पत्रा ई. कचरा उचलणाऱ्या श्रमजीवी लोकांसाठी विज्ञानाची शिबिरे, व्याख्याने घेणे, त्यांच्या वस्तीत जाऊन विज्ञानाचे प्रयोग करणे व ही आत्मवंचना आहे हे न समजल्याने व त्यातून अंधश्रद्धा निर्मुलन, विज्ञान प्रसार झाल्यासारखे स्वतःला धन्य मानून त्यात मशगुल रहाणाऱ्यांसाठी, हा लेख आहे. भाऊ, अत्यंत आभारी आहे या लेखाबद्दल...

    ReplyDelete
  9. खर तर सत्ताधारी काय किंवा विरोधी पक्ष काय सामान्य जनतेच्या वाट्याला आलेल्या वास्तवाबाबत सारखेच अनभिज्ञ असतात .आपणच जनतेचे हित जाणतो हा त्या दोघांचा समज असतो .त्यापैकी कोणाचा दावा लोकाना किती प्रमाणात खरा वाटला हे निवडणूक निकाल काही प्रमाणात दर्शवतात.काही प्रमाणात एवढ्यासाठी म्हणायचे की मतदान शंभर टक्के झालेले नसते . तथाकथीत बुद्धिजिवी लोकाना विनोबांनी बुद्धिविके म्हटलेले आहे.

    ReplyDelete
  10. भाऊ, एक ट्विटर अकाउंट काढा आणि प्रत्येक नव्या लेखाची तिथे घोषणा करा. तुमचा कॉमन सेन्स अजून खूप लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लागलं तर मी वेळ द्यायला तयार आहे

    ReplyDelete