Tuesday, October 22, 2019

विश्लेषक आणि मतदार

exit poll maharashtra के लिए इमेज परिणाम

गेले दोन आठवडे विविध माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूकीचे विश्लेषण व चर्चा होत राहिल्या आहेत. कालच प्रचाराची मुदत संपल्यामुळे राजकीय पक्षांनी करायचा प्रचार थांबला असला, तरी माध्यमे व अन्य साधनांनी निवडणूक प्रचार वा अपप्रचार चालूच आहे. उद्या मतदान होईल आणि गुरूवारी मतमोजणीने हा निवडणूक मोसम संपुष्टात येईल. तेव्हा कुठल्या पक्ष व नेत्यांनी केलेल्या वल्गना खर्‍या ठरल्या वा कोणाचे बार फ़ुसके ठरले, त्याचा खुलासा दिवाळीपुर्वीच होऊन जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांश माध्यमे व राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पडावे लागलेले आहे आणि याहीवेळी अनेकजण पुन्हा तोंडघशी पडायला पुढे सरसावलेले आहेत. अशी विश्लेषणे व त्यातून व्यक्त केलेले अंदाज कशामुळे फ़सतात, हे मात्र सामान्य वाचक वा श्रोता प्रेक्षकाला कधी उलगडत नाही. त्याला बिचार्‍याला एक प्रश्न पडतोच. आपण सामान्य माणूस वा मतदार असताना आपल्याला दिसणारे सत्य अभ्यासक वा विश्लेषक कशाला बघू शकत नाहीत? त्यांना दिसलेले मान्य कशाला करता येत नाही? तिथेच सगळी गफ़लत होऊन जाते असते. कारण सामान्य माणुस सामान्य बुद्धीचा असतो आणि सत्याकडे पाठ फ़िरवून त्याला जगता येत नसते. पण अभ्यासकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना सत्याशी कसलेही कर्तव्य नसते. म्हणूनच त्यांना सत्याशी सामना करता येत नाही आणि कल्पनांचे झोके घेताना घसरगुंडी अपरिहार्य असते. म्हणूनच प्रत्यक्ष मतदान करून निवडणूकीचा निकाल निश्चीत करणारा मतदार आणि विश्लेषक, नेते व अभ्यासक यांच्यातला फ़रक समजून घेतला पाहिजे. तर गफ़लतीचे खरे कारण लक्षात येऊ शकेल. नेते दिशाभूल करतात, की विश्लेषकच लोकांची फ़सवणूक करतात? की दोघेही भोळेभाबडे असतात? मतदार नेमके अभ्यासकांना झुगारून लावणारे मतदान कशाला करतो? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणूनच अगत्याचे आहे. कुठे गफ़लत होते?

मराठीतल्या एका वृत्तवाहिनीने विविध जिल्ह्यात बाजार वा चौकात रस्त्यावर फ़िरणार्‍या फ़ेरीवाल्यांशी चर्चा करून त्यांचे विविध राजकिय पक्षांवर मत आजमावले आणि कुठे कुणाचा जोर आहे त्याचा अहवाल प्रेक्षकांसमोर जसाच्यातसा सादर केला. त्या़च वाहिनीने विविध जिल्ह्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एका सभागृहात बसवून सत्ताधारी व विरोधी मतांची सरबत्ती घडवून आणली. त्याकडे बघितले तर आपल्याला लगेच वाटले, आपल्या देशातील व राज्यातील मतदार खुपच सुबुद्ध झालेला आहे. त्याला राजकीय पक्ष, त्यांचे नेते किंवा सत्ताधारी व विरोधक यांच्या धोरणांविषयी पक्के ज्ञान आहे. त्याने आपापल्या हिताशी संबंधित अशा विषयांचा अभ्यास केलेला आहे. त्या कॉलेज युवकांच्या हमरातुमरीवर येऊन केलेल्या चर्चा वा वादातील आरोप प्रत्यारोप थोडे बारकाईने तपासले, तर बहुतांश मुलांनी आपण माध्यमातून वा अन्यत्र कुठून काही ऐकलेले असते, त्याचीच पुन्हा पोपटपंची केलेली होती. मंदी, आर्थिक घसरण वा जलशिवार कर्जमाफ़ी असल्या माध्यमातुन व्यक्त झालेल्या मतांच्या पलिकडे जाऊन बहुतांश मुलांना नवे काही खरेखुरे आपल्याला भिडणारे मुद्दे कथन करता आले नाहीत. पढवलेले पोपट म्हणतात, तशी ही मते होती. म्हणूनच मतमोजणी होते, त्यादिवशी अशा सर्व गोष्टी खोट्या पडतात. त्यातून व्यक्त झालेला संताप किवा कौतुक यांचे कुठलेही प्रतिबिंब मतमोजणीत पडत नाही. पण याच ओघात दुसर्‍या एका वाहिनीचा कार्यक्रम मला आवडला. त्यांच्या कार्यक्रमात कॉलेज बाहेर रेंगाळलेल्या वा पुस्तके मोबाईल चाळत बसलेल्या मुलांना एका वार्ताहर मुलीने विविध राजकीय प्रश्न विचारून तोंडी परिक्षाच घेतली. त्यामध्ये ९० टक्के मुलांना राज्याचा मुख्यमंत्री कोण, तेही सांगता आले नाही आणि एकदोघांनी तर नरेंद्र मोदीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचे अडखळत सांगून टाकले. बाजारगप्पा किंवा यातही अनेकांना अशी आपल्या राज्यकर्त्यांची नावे माहित नाहीत. किंबहूना अनेकांना मंदी म्हणजे काय तेही ठाऊक नाही. पण पोपटपंची करताना अशीच मुले माणसे अगत्याने बंद पडलेले कारखाने, वाढती बेरोजगारी किंवा जलशिवारचे यश वगैरे ठामपणे सांगतात.

मुळात अशा कार्यक्रमातून सामान्य लोकांचे मत आजमावता येऊ शकते का? जितके राजकीय खुमखुमी असलेले मुठभर लोक राजकारणाविषयी तावातावाने बोलतात, त्याच्या पलिकडल्या ९५ टक्के लोकांना त्याचा गंध नसतो, की त्यावर चर्चा चघळण्याची इच्छा नसते. तरीही त्यांना त्यावरच प्रश्न विचारले जातात. त्यांच्या जगण्यातले प्रश्न विचारले जात नाहीत. कारण अशा प्रश्न समस्यांचा पत्रकार माध्यमांनाही थांगपत्ता नसतो. त्यांनाही कोणी अर्थशास्त्री वा राजकीय विश्लेषकाने मांडलेले मुद्देच सामान्य माणसाच्या जगण्याचे विषय वाटतात आणि मग त्यावरच जनतेचे मत समजून घेण्याचे कार्यक्रम योजले जातात. गेले दोनतीन महिने अतिवृष्टीने महाराष्ट्रात धुमाकुळ घातला आहे. पण त्या महापुराने बुडालेली जनता वा त्यांचे उध्वस्त झालेले जीवन याची कितीशी चर्चा अशा मिमांसेतून आली? मुंबई वा अन्यत्रच्या रस्त्यातले खड्डे किंवा आरे कॉलनीतील तोडलेल्या झाडांचा प्रचंड उहापोह झाला. पण पुराने उध्वस्त झालेल्या अंदाजे दहावीस लाख घरे म्हणजे किमान पन्नास लाख पुरग्रस्तांच्या निवडणूक विषयक मतांचा उहापोह कुठे किती झाला? कारण मुंबई दिल्लीच्या वातानुकुलीत केबिनमध्ये बसून पुरग्रस्त जनतेची कल्पना करता येऊ शकते. पण त्यामधली दाहकता भीषणता समजूही शकत नाही. मग त्यावरून चर्चा उहापोह करण्याचा मुद्दा येतोच कुठे? त्यापेक्षा दिल्ली मुंबईतल्या अर्थशास्त्र्यांनी मंदी म्हणून केलेला कल्लोळ माध्यमांचा अजेंडा बनून जातो. त्यावरून लोकमत आजमावल्याच्या गर्जना होतात. पण मतदार मात्र आता भेडसावणार्‍या विषयावर आपले मत बनवित असतो आणि त्या संकटाच्या क्षणी कोणी काय हात दिला वा मदत केली, त्यावरून आपले मत बनवित असतो. इथेच सगळी खरी गफ़लत होऊन जाते. चर्चांमधून बातम्यातून उपस्थित केलेले प्रश्न वा समस्या खोट्या नसतात. पण त्यावर कोण उपाय करू शकेल किंवा त्यावर दिलासा देण्याची क्षमता कोणामध्ये आहे, त्यानुसार मतदानातला प्रतिसाद मिळत असतो. ज्याचे निकाल मतमोजणीच्या दिवशी मिळत असतात. केबिनमधून जन्माला आलेल्या समस्यांचे प्रतिबिंब त्यात पडत नाही.

उदाहरणार्थ गेल्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान मतचाचणी व मतदानानंतर एक्झीट पोल अनेकांनी सादर केलेले होते. त्यात सर्वाधिक नेमका आकडा एक्सीस नावाच्या संस्थेने दिलेला होता. इंडियाटूडे या वाहिनीवरून तो प्रक्षेपितही झालेला होता. त्याचे म्होरके प्रदीप गुप्ता यांनी जे आकडे सांगितले, त्यांची खुप हेटाळणी झालेली होती. त्यांच्यावरही मोदीभक्त असल्याचे आरोप करण्यात आले. भाजपाला विकला गेलेला पत्रकार म्हणूनही टिका झाली. पण त्याचे आकडे खरे ठरल्यावर त्यामागची संकल्पना समजून घेण्याचा किती प्रयास झाला्? बेरोजगारी, मंदी. बंद पडणारे कारखाने, किंवा डबघाईला आलेला शेती व्यवसाय; असे प्रश्न सामान्य लोकांसाठी जिव्हाळ्याचे असतात आणि त्यावर उपाययोजना झालेली नसली मग लोक सत्ताधारी पक्षाला शिव्याशाप देतच असतात. पण त्याचा अर्थ तेवढ्यासाठी ती जनता सरकारला सत्ताभ्रष्ट करत नाही. त्या समस्या विरोधी पक्षाकडून सोडवल्या जाण्याची खात्री नसेल, किंवा विरोधक नाकर्तेच असतील, तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक त्याच सत्ताधार्‍यांना कायम करतात. हेच प्रदीप गुप्ताने मोदींच्या दुसर्‍या यशामागचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. पण कोणाला समजून घेण्याची इच्छा आहे? तोच एक चाचणीकर्ता नाही. यशवंत देशमुख हे सी-व्होटर नावाची एक संस्था चालवितात. जनतेची मतचाचणी कशी घ्यावी त्याचे, नेमके मार्गदर्शन त्यांनी केले आहे. ते दर महिन्याला देशव्यापी मत आजमावत असतात. फ़ेब्रुवारी मार्च महिन्यात मतदाराला पुलवामा आणि बालाकोटचा हवाईहल्ला महत्वाचा ज्वलंत प्रश्न वाटत होता. पण एप्रिल उजाडण्यापर्यंत बेरोजगारी हा सर्वात ज्वलंत प्रश्न असल्याचे निष्कर्ष हाती आले आणि त्याचा आधार घेऊन मोदी विरोधकांनी सत्तापरिवर्तनाची भाकिते करायला सुरूवात केली. पण असा प्रश्नच अर्धवट असतो, ह्याकडे देशमुख यांनी लक्ष वेधलेले होते. बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न २९ टक्के मतदाराला वाटत होता, म्हणून तो सगळा मतदार मोदी विरोधात मतदान करत नाही. त्यालाच विचारले, तो प्रश्न कोण समर्थपणे सोडवू शकतो? तर त्यातले ९० टक्के लोक मोदी असे उत्तर देतात, तेव्हा मतांचा खरा कौल मिळत असतो.

आपल्या देशातीलच नव्हेतर जगभरच्या अभ्यासक व विश्लेषकांची आज ती दुर्दशा झालेली आहे. त्यांचा सामान्य जनतेशी कुठलाही संबंध उरलेला नाही. तर त्यांना जनतेच्या मनाचा सुगावा लागणार कसा? सामान्य जनतेच्या समस्या भावना यापेक्षाही त्याविषयी विविध अभ्यास अहवाल किंवा जाणकारांनी व्यक्त केलेली ‘अभ्यासू’ मते; हाच आधार झालेला आहे. सहाजिकच त्यांची विश्लेषणे किंवा मिमांसा पुर्णपणे निराधार असतात अथवा वल्गना होऊन गेल्या आहेत. जनतेला खर्‍याखुर्‍या भेडसावणार्‍या समस्या प्रश्न आणि माध्यमातून उडवले जाणारे फ़टाके, यातली तफ़ावत मग मतमोजणीतूनच समोर येत असते. राज ठाकरे यांच्या ‘लावरे तो व्हिडीओ’ने माध्यमे प्रभावित झाली होती आणि त्याचे प्रतिबिंबच बातम्यात उमटत होते. पण त्याचा कुठलाही प्रभाव मतदानात दिसला नाही, त्याचे हेच कारण आहे. राफ़ायल खरेदीतला घोटाळा, सुप्रिम कोर्टापर्यंत गाजला आणि माध्यमांनाही सत्तापरिवर्तनाची स्वप्ने पडलेली होती. परिणामी माध्यमे व अभ्यासकांचा ‘राहुल गांधी’ झाला. याचा अर्थ विषय चुकीचे नव्हते, किवा त्या समस्या प्रश्न गैरलागू नव्हते. पण तेवढ्यावरून जनमत बनत नाही किंवा निर्णायक मतदान होत नाही. याचे संबंधितांना भान राहिलेले नव्हते. आता शरद पवार यांच्या इडीला खुप महत्व मिळाले, पण माध्यमांसह विरोधकांनी अतिवृष्टी वा त्यातून उध्वस्त झालेल्या पुरग्रस्तांना ढुंकून पाहिले नाही. उलट ज्याची तितकीशी अनुभूती सामान्य जनतेला येत नाही वा आलेली नाही, त्या आर्थिक मंदी व बेरोजगारीचे प्रचंड ढोल पिटले गेले. मग त्यात मतदाराच्या मताचे व मनाचे प्रतिबिंब कशाला पडावे? सगळी निवडणूक विषयक चर्चा व उहापोह आणि विश्लेषकांची मिमांसा मतमोजणी होईल त्या दिवशी जुन्या जीर्ण इमारतीसारखी म्हणूनच कोसळून पडणार आहे. फ़ार वेळ नाही, येत्या गुरूवारी संध्याकाळपर्यंतच आपल्याला ह्याची प्रचिती येईल. कारण निकाल त्याच दिवशी आहेत ना?

9 comments:

  1. भाऊ, तुमचा अंदाज सांगा ना.

    ReplyDelete
  2. कॉलेजच्या मुलांच्याबद्दल लिहिले सत्य शहरात रहाणार्‍या, गावाशी विशेष संबंध नसणाऱ्या व उगाच समतेचा आव आणणाऱ्या लोकांनाही लागू होतो. यांचे वाचन म्हणजे फार फार तर पेपर.. बाकी माहिती टिव्हीवरच्या विविध माध्यमातून.. समतेचा आव आणल्याने मेणबत्तीवाले हे आदर्श विचारवंत.. मी असे म्हणत नाही की प्रत्येकजण दहा ठिकाणी फिरून माहिती करून घेऊ शकतात पण दहा विविध मते ऐकून, गावाला जाऊन येणाऱ्या मोलकरीणी कडूनही ऑथेंटिक माहिती मिळू शकते. हे लोक ही काम करतात ते तशी परीस्थिती आहे म्हणून पण त्यांना बरीच अनुभवातून मिळालेली माहिती असते. त्यानुसार मते आधारली असली तर त्याला खरे व्यक्तिगत 'मत' म्हणता येईल.
    बाकी माध्यमातून काम करणाऱ्यांना नोकरी करायची असते आणि टिकवायची असते त्यामुळे ते यु यु आणि भू भू पैकी असतात बिचारे.. गळ्यातील मालकाचा पट्टा तोडून गेल्यास भटक्यां प्राण्यांची अवस्था व्हायची!

    ReplyDelete
  3. Bhau, Tumhi BJP 140 + and BJP + SS che 230 -240 bola aata.

    ReplyDelete
  4. भाऊ आज खूप वाईट वाटलं... कुठेतरी आशा होती भाजप स्वबळावर जिंकेल आणि सेना पायात पाय घालणार नाही आता परत तेच ते आणि तेच ते... सेना काम करू देणार नाही आणि भाजप पायात पाय अडकून पडल्यामुळे जोरात धावू शकणार नाही

    ReplyDelete
  5. सत्तेची मस्ती आणि सत्ता-पिपासू वृत्ती लोकांनी नाकारली
    त्याच वेळी युतीला दुसऱ्यांदा संधीही दिली पण लगामही घातला.
    पाऊस आणि पुराने थैमान घातले असता तिथल्या सत्तारूढ आमदार, खासदार, नगरसेवकांनी लोकांच्या मदतीसाठी झोकून द्यायला हवं होतं, लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल संवेदनशीलता दाखवायला हवी होती.. सत्तारूढ पक्षांच्या सर्व यात्रा थांबायला हव्या होत्या पण जल्लोष चालूच राहिला त्यामुळे लोक नाराज झाले.. त्याचे प्रतिबिंब पश्चिम महाराष्ट्रात दिसले.. लोकांना आर आर पाटील, पतंगराव कदम यांची आठवण झाली.
    मेगा-भरतीमुळे जशी पक्षबदलूंची सत्ता पिपासा दिसत होती तशीच भाजपाची सत्ता मिळवण्यासाठी हतबलातही दिसत होती. असे वाटत होते कि यांच्या विना जिंकण्याचा विश्वास नाही. मतदाराला गृहीत धरले. त्यापेक्षा त्यांना पक्षात घ्यायला नको होते किंवा ते जरी पक्षात आले तरी त्यांना लगेच तिकीट न देता हे सांगण्याची हिम्मत दाखवायला हवी कि आत्ता आमच्या ठरलेल्या उमेदवाराचा प्रचार करा, ५ वर्षे पक्षासाठी काम करा मग तिकीट देऊ. हे करण्याची हिम्मत केली असती तर तेव्हाच गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या, बंडखोरी झाली नसती. भाजपच्या विचारांची समर्थक आहे आणि म्हणूनच वैचारिक बांधिलकी शिवाय केलेली हि मेगा-भरती मला अजिबातच पटली नाही. मला त्यात फडणवीसांचा आत्मविश्वास नाही तर परावलंबित्व दिसलं. विशेष करून उदयन राजेला छत्रपती म्हणून लोटांगण घातलेलं मला अजिबातच आवडलं नाही.
    मित्रपक्षवर सतत दबाव आणि कुरघोडी करण्याचं सेना-भाजपचं राजकारण नाही पटलं. शेवटपर्यंत भारंभार माणसं जमवून आम्ही स्वबळावर सत्ता मिळवू शकू हे दाखवण्याची खुमखुमी नडली. हे बदललं नाही तर ५ वर्षांनी विचार करावा लागेल.
    तरी ४-६ जागा वाढल्याचा इतका उन्माद करण्यासारखं यश विरोधकांनीही नाही मिळवलेलं. ६०-७० वर्षे राज्य केलेल्यांनी आणि त्यांच्या समर्थक माध्यमांनी ४-६ जागा वाढल्याचा इतका उन्माद करणं बरं दिसत नाही. स्वतःला तरुण म्हणवून घेत असले तरी तो तरुणपणा नाही तर राहुल गांधींसारख्या पोरकटपणा वाटतोय. कारण जनतेने सरसकट भाजपला नाकारलेले नाहीये.
    अजूनही काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे + एम आय एम + वंचित आघाडी < भाजप आहे .
    फक्त विरोधक उरणारच नाहीत हि जी भीती विरोधकांना वाटत होती ती खोटी ठरली यातच त्यांचा आनंद आहे.
    मतदार म्हणून आपण लगाम घालण्याचे काम चोख केले याचा मात्र अभिमान आहे.

    ReplyDelete
  6. India Today चाच अंदाज खरा ठरला

    ReplyDelete
  7. Bhau, this time neither BJP 150 , nor NDA 220. What's the matter...

    ReplyDelete
  8. भाऊ निकालानंतरचा ब्लॉग कधी लिहिणार

    ReplyDelete
  9. India today exit poll is almost correct,

    ReplyDelete