Friday, February 13, 2015

आमदारांच्या ‘संपर्कात’ राहू नका



(गजू तायडे या मित्राने केलेले दिल्ली निकालांचे नि:शब्द विश्लेषण)


दिल्लीच्या विधानसभा निकालांनी दिलेला एक इशारा अजून तरी भाजपा नेतृत्वाने समजून घेतलेला दिसत नाही. दिल्लीत कशामुळे पराभव झाला, त्याचा अभ्यास आम्ही करणार व झालेल्या चुका दुरूस्त करणार; असे पक्षाचे प्रवक्ते मंगळवारपासून सांगत आहेत. ते खरे असते, तर पक्षाच्या नेते व प्रवक्त्यांची भाषा प्रथम बदलली असती. पण उर्मट भाषेत कुठलाच बदल होताना दिसलेला नाही. त्याचा अर्थच असा, की चुका सुधारणे दूरची गोष्ट. चुकले कुठे तेच जाणून घ्यायची इच्छा अजून भाजपाला झालेली नाही. म्हणून की काय, मागल्या विधानसभा निवडणुकीत जितकी मते होती त्यात एक टक्का मतांची भरच पडली, असे केविलवाणे खुलासे देण्यात धन्यता मानली जात आहे. अधिक मुख्यमंत्री वा अन्य नेत्यांची विधाने थक्क करून सोडणारी आहेत. जेव्हा तुमचा पराभव होतो, तेव्हा त्यासाठी टपून बसलेले जखमेवर चोची मारणारच. मीठ चोळणारच. त्यांच्या नावाने शिमगा करण्याने काहीही साधले जात नसते. त्यापेक्षा आपल्या जखमा चाटल्या, तरी खुप दिलासा मिळत असतो. पहिली गोष्ट म्हणजे असे जखमेवर मीठ चोळणारे शत्रू निर्माण करायचे नसतात, तर राजकरणात शक्य तितके हितचिंतक जमा करायचे असतात; हा धडा आहे. लोकसभेत मोठे यश मिळवल्यापासून भाजपाने असलेल्या हितचिंतक मित्रांना शत्रू बनवण्याचा विडा उचलला होता. मित्र पक्षांना तोडण्याचा सपाटा लावला. त्याच्याच बरोबर ज्या मतदाराने हात दिला, त्यालाही ओळखायला भाजपाचे नेते विसरून गेले. दिल्लीतल्या भाजप नेत्यांची लोकसभेनंतरची भाषा काय होती? ‘आप’चे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे अशा फ़ुटणार्‍या वा फ़ोडलेल्या आमदारांच्या मदतीने आपण दिल्लीत सरकार बनवू शकतो, असाच इशारा दिला जात होता ना? किती आमदार गेल्या आठ महिन्यात भाजपा जोडू शकला?

नेमकी हीच भाषा आक्टोबर महिन्यापासून महाराष्ट्रातही ऐकू येत होती आणि अजून ऐकू येते आहे. कालपरवाच भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अमूक इतके आमदार आमच्या संपर्कात असल्याचे छाती ठोकून सांगत होते. मात्र आपण शिवसेनेच्या आमदारांना त्यात आणणार नाही, असेही विधान त्यांनी केलेले आहे. अशा वक्तव्यांचा काय अर्थ होतो? सत्ता असल्याने कुठल्याही पक्षाचे आमदार आम्ही फ़ोडू शकतो आणि अशा फ़ोडलेल्यांच्या बळावर सत्ता चालवू शकतो. अथवा सत्ता टिकवू शकतो. यापेक्षा दानवे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ होऊ शकतो काय? त्याचा दुसरा तितकाच गंभीर अर्थ असा, की शिवसेनेच्या पाठींब्याची आम्हाला गरज नाही. इतर पक्षातून वा सेनेतूनही फ़ुटू शकणार्‍या आमदारांच्या मदतीने महाराष्ट्रातले भाजपा सरकार चालू शकते, कायम राहू शकते. शिवसेनेच्या मैत्रीची भाजपाला गरज नाही. अशा वक्तव्यातून दानवे यांना काय सुचवायचे असते? ही मैत्रीची भाषा असते काय? नसेल तर मित्राने संकटकाली डिवचू नये, असे मुख्यमंत्र्यांनी कशाला म्हणावे? त्यांच्याच प्रदेशाध्यक्षाची भाषा मित्राला डिवचणारी असेल, तर मित्राने जखमेवर गुलाबपाणी फ़वारण्याची अपेक्षा करता येईल काय? ज्यांना आठ महिन्यात दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार फ़ोडून विधानसभा टिकवता आली नाही, त्यांनी ‘संपर्कात’ ही भाषा वापरण्यातून काय साधले? उलट अशा भाषेतून त्यांनी सेनेला नव्हेतर मतदाराला डिवचण्याचा अतिरेक केला होता. कुठेही आमदार फ़ोडणार असे तुम्ही म्हणता, तेव्हा मतदाराने दिलेला कौल पायदळी तुडवून सत्तेवर कब्जा करायला बघता, असा अर्थ होतो. तेव्हा तुमच्या विरोधकापेक्षा आमदार निवडणारा मतदार संतापत असतो. पुढल्या मतदानाची तो प्रतिक्षा करतो आणि तुम्हाला लोळवत असतो. दिल्लीत मतदाराने दिलेला तोच धडा आहे. पण शिकतोय कोण?

लोकशाहीत मतदार राजा असतो आणि त्याच मतदाराने निवडलेले आमदार-खासदार प्रतिनिधी हंगामी राजे असतात. त्यांच्याशी संपर्क साधून औटघटकेचे राज्य मिळवता वा टिकवता येत असते. पण त्याला स्थैर्य कधीच लाभत नाही. उलट जितके मतदाराच्या संपर्कात रहाल, तितके तुमचे यश व सत्ता भक्कम पायावर उभी रहात असते. त्या सत्तेला वा सत्ताधारी पक्षाला कुणाच्या पाठींब्यासाठी ओशाळे रहावे लागत नाही. लोकसभा निकालानंतर व पुढल्या काळात भाजपाला त्याचाच पुर्ण विसर पडला आणि त्यांनी मतदाराशी संपर्क तोडून ‘आमदारांशी संपर्क’ अभियानात स्वत:ला झोकून दिले. मग त्या मतदाराने तरी भाजपाच्या संपर्कात कशाला रहावे? जो कोणी दुसरा संपर्कात आला, त्याच्याशी त्या मतदाराने जुळवून घेण्यात गैर ते काय? दिल्लीत भाजपाचा कारभार कोण चालवतो व निर्णय कोण घेतो, याचाच पत्ता कोणाला नव्हता. किरण बेदी यांना पक्षात आणताना किंवा कृष्णा तिरथ या कॉग्रेसच्या माजी मंत्रीणबाईंना पक्षात घेऊन दुसर्‍या दिवशी उमेदवारी देताना, भाजपा नेतृत्व कोणाच्या संपर्कात होते? स्थानिक वा प्रादेशिक पक्ष नेते कार्यकर्त्यांच्या संपर्कात तरी नेतृत्व होते काय? पर्यायाने भाजपाचा मतदाराशीच संपर्क संपला होता. दिल्लीतला दारूण पराभव त्यातूनच झाला. पण ते सत्य स्विकारण्यापेक्षा इथे महाराष्ट्रात तीच भाषा बोलली जाते आहे. अमूक इतके आमदार संपर्कात आहेत, या भाषेनेच सगळा घात केला आहे. दिल्लीत लोकांनी केजरीवाल व त्यांच्या पक्षाला सत्ता सोपवण्यापेक्षा भाजपाचे उमेदवार ठामपणे पराभूतच झाले पाहिजेत; असे निर्णायक मतदान केले आहे. त्यांनी तसे कशाला करावे, याची गंभीरपणे दखल घेऊन सुधारण्याची गरज आहे. अशावेळी पुन्हा आमदार फ़ोडायची भाषा दानवे बोलतात, तेव्हा ते सामान्य मतदाराला डिवचत असतात. कुठल्याही पक्षाचा उमेदवार निवडा, आम्ही फ़ोडून त्याला भाजपात आणू; असाच त्याचा अर्थ नाही काय?

अशी भाषा व अशा कृतीने इतर पक्षांना डिवचले जाते अशा भ्रमात कोणी राहू नये. त्यातून सामान्य मतदार दुखावला जात असतो. ज्या मतदाराकडे राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार संपवायला मते मागितली, त्याची फ़सगत अल्पावधीत त्याच राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन करण्याला मतदार माफ़ करील, अशी कोणाची समजूत आहे काय? असेल तर त्यांनाच दिल्लीकरांनी धडा शिकवलेला आहे. लोकशाहीत मतदार राजा असतो आणि ज्या पक्षाला यश व सत्ता मिळवायची आहे, त्याने निवडून आलेल्या नव्हेतर निवडून देणार्‍यांच्या संपर्कात रहायचे असते, असा तो धडा आहे. लोकसभेच्या यशानंतर भाजपा तितक्याच आस्थेने दिल्लीकर मतदाराच्या संपर्कात राहिला असता, तर त्याच्यावर इतकी नामुष्की आज कशाला आली असती? जो मतदार तुम्हाला सर्व सात लोकसभेच्या जागा बहाल करतो, त्याच्याकडे पाठ फ़िरवून शाझीया इल्मी वा कृष्णा तिरथ अशा अन्य पक्षातल्या नेत्यांच्या संपर्कात भाजपा नेतृत्व राहिले. उलट लोकसभेच्या वेळी दिल्लीकरांना टांग मारून केजरीवाल वाराणशीला पोहोचले, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली होती. त्यातला धडा शिकून केजरीवाल यांनी मागल्या आठ महिन्यात पुन्हा दिल्लीकरांशी संपर्क साधला. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्ते, नेते यांच्यापेक्षाही त्यांनी मतदाराशी संपर्क साधण्याला अधिक वेळ दिला. उलट भाजपा मात्र इतके यश देणार्‍या मतदाराकडे व आपल्याच कार्यकर्त्याकडे पाठ फ़िरवून, अन्य पक्षातल्या आमदार नेत्यांच्या संपर्कात राहिला. दिसत आहेत, ते त्याचेच परिणाम. ते पुसायचे असतील, तर फ़ुटणार्‍या अन्य पक्षाच्या आमदारांच्या संपर्कात रहाण्यापेक्षा भाजपा नेतृत्वाने आपलेच कार्यकर्ते व मतदाराच्या संपर्कावर लक्ष केंद्रित करावे. मित्र जोडावेत व संभाळावेत. दिल्लीकरांनी हाच धडा शिकवला आहे, तो शिकायचा नसेल, तर कॉग्रेस व्हायला वेळ लागत नाही.


1 comment:

  1. खरच, भाऊ नेहमी भाजपच्या विरोधात लिहितात म्हणणाऱ्या भाजप भक्तांनी हा लेख जरूर वाचवा. किती पोटतिडकीने लिहिले आहे. आत्ताच एक कॉंग्रेस संपत आलीये , परत भाजप नावाची दुसरी कॉंग्रेस उभी राहता कामा नये.

    ReplyDelete