गेल्या काही दिवसापासून समविचारी कार्यकर्ते व संघटनांनी एकत्र यायला हवे, अशी भाषा पुन्हा ऐकू येऊ लागली आहे. म्हणजे ती नवी भाषा नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ही भाषा बोलली जाते आहे. पण त्याचा अर्थ ते शब्द बोलणार्यांना तरी कितपत समजला आहे, याबद्दल शंका आहे. कारण असे समविचारी एकत्र येऊन करणार काय? ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या? तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते? पण इतकी दुरावस्था होऊनही यापैकी कोणाला आपल्या कोषातून, बिळातून बाहेर पडून वास्तविक जगाला उघड्या डोळ्यांनी बघायची हिंमत झालेली नाही.
आसाराम किंवा तत्सम बुवाबाजीचे परिणामही दिसत असतात. कोण असतात असे बुवा महाराज? आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झालेली दिसणार नाही. कशी कमी होईल? त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना? त्या झुंडीला स्वत:चा विवेकी विचार करण्याची क्षमता नसतेच. बुवा किंवा त्याच्या हस्तकांनी डोक्यात जे भ्रम जोपासलेले असतात, त्यात मशगुल रहाण्याला असे समविचारी सुरक्षित जागा मानत असतात. त्यातून त्यांना बाहेर काढायचा प्रयास केलात, तर ते तुमच्यावरच गुरगुरू लागतील. कारण त्यांच्या ज्या अंधश्रद्धा वा समजुती असतात, तेच त्यांच्यासाठी अगाध ज्ञान असते. त्याला छेद देणारे कुठलेही वास्तव त्यांच्या समोर आणून उपयोग नसतो. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्यच नसते. ते समजूतीच्या जगात सुखी असतात. मग असे भक्तगण आसारामचे असोत किंवा कुणा सेक्युलर बुवाबाबाचे अनुयायी असोत. त्यांना वास्तवाचे भय खुप भेडसावत असते. समजुतीचे भ्रामक जग त्यांच्यासाठी भूतबंगलाच असतो. विवेकबुद्धीशी त्यांचा ३६ चा आकडा असतो. म्हणूनच असे लोक बुद्धीमान म्हणून मिरवत असले, तरी व्यवहारात पक्के अंधश्रद्ध भक्तच असतात.
एक साधी गोष्ट घ्या, कुठला बुवाभगत सांगतो, की अमूक रोग झाला असेल, तर देवाचा कोप झाला आहे. त्याचे भक्तगण जितक्या आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यापेक्षा समविचारी पुरोगामी तसूभर वेगळे असू शकतात का? इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन पोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय? आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना? याला समविचारी वा भक्तगणांचे घोळके म्हणतात. समोरचा आपल्यातला नाही वा तसा वाटत नाही म्हटल्यावर त्याच्यावर तुटून पडण्याची झुंडशाही तशीच असते. दुसर्या धर्माचा वा जातीचा व विचारांचा असला, की त्याच्यात शत्रू शोधण्याला समविचारी नाव दिले म्हणून त्यातली झुंडशाही संपत नसते की लपत नसते. कारण दोन्हीकडले परिणाम सारखेच असतात.
समविचारी या शब्दातच भिन्न विचारांसाठी दरवाजा बंद करण्याची पुर्वअट सामावलेली असते. आणि नेमके असेच लोक वैचारिक सहिष्णूता व वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. पण हसण्यावारी न्यावी अशी ही बाब सोपी नाही. जेव्हा असा भ्रम प्रभावी व शक्तीशाली होतो, तेव्हा तो अमानुष कृत्येही करू लागतो. म्हणूनच हिटलर, स्टालीन वा चे गव्हेरा आपल्या सहकार्यांकडून हिंसक हत्याकांड करून घेऊ शकले. भारतातून इसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या तरूणांची मानसिकता त्यापेक्षा भिन्न नाही. ते कुणाच्या रक्ताला आसूसलेले नाहीत. आपण इस्लामच्या धार्मिक कर्तव्यासाठी इराकला जावे, असे त्यांना वाटत असेल, तर त्यामागे समविचारी धारणाच असते. शेवट चांगला व उदात्त असल्याने त्यांना हिंसा गैरलागू वाटेनाशी होते. सामान्य घरातली ही मुले भारावली म्हणून त्यात सहभागी व्हायला निघालेली असतात. इस्लामचा जो अर्थ कोणीतरी त्यांच्या डोक्यात भरवलेला असतो, त्यालाच सत्य मानल्यावर अशा तरूणांची विवेकबुद्धी, सारासार विचारशक्ती नेस्तनाबूद होत असते. त्यांना समविचारी कोषात डांबून टाकले, की वास्तविक जगातले संदर्भ जाणवेनासे होतात आणि तिथून मग एखाद्या वस्तुप्रमाणे, हत्याराप्रमाणे त्यांना कुणाच्याही विरोधात वापरता येत असते. समविचारी म्हणवून घेण्यात आपण आपलीच विवेकबुद्धी गमावून बसतोय, याचेही भान त्यांना रहात नाही. समोर दिसणारे वास्तव बघायची हिंमत त्यांच्यात उरत नाही. कोणी दाखवायचा प्रयास केल्यास त्यांना सत्याची भिती वाटू लागते. त्या भितीपोटी सत्यच खोटे असल्याचा आक्रमक आरोप त्यांच्याकडून सुरू होतो. अंधश्रद्धा देवधर्माची असो किंवा समविचारी निष्ठा असोत, ती एकप्रकारची धुंदी असते आणि तिच्याच आहारी गेलेल्या व्यक्तीकडून कुठल्याही विवेकी कृतीची अपेक्षा करता येत नाही.
उलट्या कोनातून विचार केला तर जाणवते कि श्री आसाराम बापूंवर अन्याय झाला व होत आहे. कशाच्या आधारावर त्यांना बंद करून ठेवलेय ?? एकाच बाजूने ( विरोधातील ) विचार करणाऱ्यांच्या बहुमतात असे लिहणे सुद्धा विचित्र वाटते. पण ते सत्य आहे.
ReplyDelete