Wednesday, February 18, 2015

‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो?


सोमवारी सकाळी कोल्हापुरात वर्दळ नसलेल्या जागी एकाकी गाठून कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यात त्यांना ठारच मारायचे होते. पण हल्लेखोरांना ते शक्य झाले नाही आणि आयुष्यभर प्रतिकुल परिस्थितीशी झुंजलेला हा शेलारमामा, मृत्यूशीही दोन हात करत खंबीरपणे या संकटाला सामोरा गेला. पण त्याने जी झुंजारवृत्ती आयुष्यभर दाखवली, त्याचे किती कौतुक करायचे आणि किती अनुकरण करायचे, याचे ताळतंत्र असायला नको काय? आपल्यासाठी लढणारा कोण आहे, अशी प्रतिक्षा करत पानसरे यांच्यासारखी माणसे बसली असती, तर समाजातले परिवर्तनाचे लढे कधी उभेच राहिले नसते. म्हणूनच त्यांच्या लढ्याचे व धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा, त्यांचे अनुकरण करणे अगत्याचे ठरावे. दिड वर्षापुर्वी असाच हल्ला पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर झाला होता. त्यातून ते बचावले नव्हते. निदान त्यानंतर तरी असा हल्ला करायची कोणाची हिंमत व्हायला नको होती. पण त्यांच्या हौतात्म्याचे कौतुक करताना आपण झुंजायचे मात्र विसरून गेलोत. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली गेली. पण खर्‍या अर्थाने अशा खुनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यापेक्षा नुसतेच मिरवण्यात वेळ गेला. त्यातूनच मग अशा हल्लेखोरांची भीड चेपत असते आणि पुढले हल्ले होत असतात. पानसरे त्याचेच शिकार झाले. दुर्दैव इतकेच, की आपण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच सोमवारी तिथे पानसरे मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांच्या चहात्यांनी मात्र ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवण्यात पुढाकार घेतला. अशा घोषणांचा अर्थ नेमका काय असतो आणि त्यातून काय साधले जाते? आपण सगळे झाडलेल्या गोळ्यांची शिकार व्हायला पुढे सरसावलेले असतो काय? खरेच असा कोणी माथेफ़िरू बेछूट गोळ्या झाडत सामोरा आला, तर आपले हे फ़लक किती शाबुत असतील?

अशा घोषणा वा फ़लक मिरवण्याचा एक खेळ झाला आहे. म्हणूनच त्याला कुठलाच मारेकरी दाद देत नाही आणि मनचाही हत्याकांडे करू शकतो. मनात येईल तसे हल्ले करू शकतो आहे. म्हणूनच आपण सर्वांनी दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा दक्ष नागरिक म्हणजे अघोषित पोलिस होण्याची गरज आहे. आपल्या अवतीभवती जे गुन्हे घडत असतात आणि आपल्या साक्षीने गुन्हेगार सोकावत असतात, त्यांना निदान हटकण्याचे धाडस आपण अंगी बाणावले पाहिजे. ज्यांच्यावर असे हल्ले झालेत, त्यांच्या अशा धाडसालाच खरी गोळी घालण्यात आलेली आहे, हे विसरता कामा नये. त्यांनी जागरुक नागरिक म्हणून अन्यायाला वाचा फ़ोडण्यात पुढाकार घेतला नसता आणि अन्यायाला वाचा फ़ोडण्याचे धाडस केले नसते, तर कोणीही त्यांच्यावर गोळ्या झाडायला पुढे सरसावला नसता. गोळ्या त्यांच्या शरीरावर झाडल्या गेल्या हे वास्तव नाकारता येत नाही. पण त्यांच्याच देहावर अशा गोळ्या झाडल्या, ते देहापेक्षा त्यातून प्रदर्शित होणार्‍या हिंमतीवर व धाडसावर झालेला तो हल्ला आहे. म्हणूनच पानसरे वा दाभोळकर होणे दाखवले जाते, तितके सोपे नाही. नुसता फ़लक हाती मिरवून कोणी पानसरे होत नाही. उलट ती त्यांच्या धाडसाची विटंबनाच असते. असे फ़लक घेऊन चौकात घोषणा देणार्‍यांवर कोणी तसाच बेछूट गोळ्या झाडत आला, तर किती जण फ़लक तसाच हाती धरून तिथेच ठामपणे उभे राहतील? गरज तशा हिंमतीची आहे. ती हिंमत असते, तिला दाभोळकर वा पानसरे म्हणतात. त्यासाठी त्यांच्यासारखी व्यासंगी भाषणे देता येण्याची गरज नाही, किंवा नेतृत्वाचे गुण अंगात असायची आवश्यकता नाही. गरज असते त्यांच्यातल्या जिद्दी धाडसाची. हे धाडसच हल्लेखोर वा समाजाच्या शत्रूंना भयभीत करत असते. म्हणूनच त्यांच्यावर भेकड हल्ले होतात. त्यांच्या मदतीला कोणी धावून येणार नसल्याच्या खात्रीमुळे असे हल्ले होऊ शकतात.

दोन्ही बाबतीत गोळ्या झाडल्यानंतर आसपासचा समाज आपल्याला जिवंत सोडणार नाही, अशी खात्री असेल वा भय असेल, तर कोण हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करू शकला असता? कितीही बंदुका वा पिस्तुले घेऊन आलेल्या हल्लेखोराचा दारूगोळा काही वेळाने संपणार असतो आणि त्यानंतर आपण लोकांच्या हाती लागलो, तर आपण सुखरूप सुटणार नाही, असे भय असते. मग कुठला हल्लेखोर गोळ्या झाडण्याचे धाडस करू शकेल? इवलासा मुंगी हा प्राणी बघा. त्याच्या वारूळावर कुणाचा हल्ला झाला, तर इतक्या संख्येने शत्रूवर तुटून पडतो, की हत्तीलाही मुंग्या बेजार करू शकतात. आपल्या हजारो पटीने मोठ्या आकाराच्या प्राण्यालाही मुंग्या ठार मारून टाकतात. म्हणूनच वारूळ उठले, की भले भले प्राणीही तिथून पळ काढतात. मुंग्यांच्या वाट्याला मोठे प्राणी जात नाहीत. आपल्यात तितकी हिंमत आहे? दाभोळकर वा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यावर आसपासचे लोक सामोरे येऊ शकत नाहीत, ते भित्रे असतात, हीच अशा हल्लेखोरांची खरी हिंमत असते. कसाबच्या दहा जणांच्या टोळीने एक कोटी लोकसंख्येच्या मुंबईला ५० तास ओलीस ठेवून त्याची साक्ष दिली. त्यात फ़लक मिरवणार्‍यांचाही समावेश होतो. किती फ़लकवाले त्या बंदुकधार्‍यांना सामोरे जायला धजावले होते? एका तुकाराम ओंबाळेने ते धाडस केले आणि कसाबचा खेळ संपला. आपण सारे ओबाळे होऊ शकलो होतो काय त्या दिवशी? कितीजण तेव्हा ‘आम्ही सारे तुकाराम ओंबाळे’ म्हणत त्यावेळी पुढे सरसावले होते? कारण हल्लेखोर कसाब कुठे पळाला नव्हता, तर राजरोस मुंबईत किडामुंगीप्रमाणे नागरिकांना ठार मारत फ़िरत होता. यातला कोणी आपल्याला सामोरा येण्याची हिंमत बाळगत नाही, हेच त्याचे सर्वात मोठे भेदक शस्त्र होते आणि तेच दाभोळकर पानसरे यांच्या हल्लेखोरांचे मुख्य शस्त्र आहे. त्याचे उत्तर कॅमेरापुढे मिरवण्याचे फ़लक असू शकत नाही.

कुणी कुठल्या गावात, शहरात, नाक्यावर, धावत्या वहानात, मुलीमहिलांवर अन्याय करत असतो. छेड काढत असतो, तेव्हा आपण कोण असतो? आपण कितीजण अशावेळी पुढाकार घेऊन त्याला रोखायला हस्तक्षेप करतो? अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाकडे मागावे. तिथे दाभोळकर वा पानसरे असते, तर त्यांनी अशा घटनाक्रमात हस्तक्षेप केला नसता काय? मुलीवर हल्ला वा अत्याचार होताना, तिची छेड काढली जात असताना, दाभोळकर-पानसरे बघत बसले असते काय? त्यांनी तिथून काढता पाय घेतला असता काय? नसेल, तर दाभोळकर पानसरे असण्याचा अर्थ काय होतो? हातात फ़लक मिरवणे असा होतो काय? अशा व्यक्ती असणे म्हणजे त्यांच्या इतकी हिंमत असणे. अन्याय अत्याचाराच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचे धाडस म्हणजे पानसरे किंवा दाभोळकर असणे होय. हे मान्य असेल, तर मग नुसते फ़लक मिरवण्याला विंटंबना म्हणायचे की सन्मान म्हणायचा? कसाबच्या हल्ल्याप्रसंगी जीव मुठीत धरून पळणारे, सगळा धोका संपला तेव्हा असेच फ़लक व मेणबत्त्या घेऊन गेटवेपाशी जमलेले होते. त्यांच्यात आणि आता ‘आम्ही सारे’ फ़लक घेऊन मिरवणार्‍यात कितीसा फ़रक असतो? सवाल शिकार झालेल्या धाडसी लोकांच्या सन्मानाचा नसून, त्यांच्या अनुकरणाचा आहे. दाभोळकर वा पानसरेच नव्हेत, तर तुकाराम ओंबाळेही नंतर मिळणार्‍या सन्मानासाठी काहीही करत नसतात. आपल्या धाडसाचे व कृतीचे अनुकरण समाजात व्हावे, म्हणून आदर्श निर्माण करत असतात. त्या आदर्शाचे पालन आवश्यक व अपेक्षित असते. त्याची नक्कल नको असते. म्हणूनच असे फ़लक घेऊन दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा त्यांची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी जागरूक कृतीशील नागरिक होऊन आसपासच्या अन्याय अत्याचारात हस्तक्षेप करण्यात पुढाकार आपण घेऊ शकलो, तर खरेच फ़लकाशिवायही आपण पानसरे होऊ शकतो. व्हायची तयारी आहे?


2 comments:

  1. राजेश कुलकर्णीFebruary 20, 2015 at 1:08 AM

    पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो.

    बकासुराची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. त्याचे भोजन म्हणून त्याला दररोज एक माणूस लागे. ते त्या गावातील लोकच मिळून दुस-या दिवशी कोणाचा नंबर हे ठरवत असत. असे सर्व सर्वसंमतीने चाललेले असताना तो भीम उगाचच मध्ये पडला आणि बकासुराच्या त्रासापासून त्या गावाला वाचवले. यातून दोन निष्कर्ष: १) त्या गावातील लोकांनी संघटीत प्रतिकार केल्याचे ऐकिवात नाही, तेव्हा त्या गावातील लोक मानसिकदृष्ट्या षंढ होते आणि २) असे अत्याचार थांबवायला बाहेरूनच कोणी तरी यावे लागते.

    आपल्याकडे फरक एवढाच की हा बकासुर त्याचे बळी स्वत: निवडत आहे. त्यात त्याला राजकीय पक्ष आणि पोलिस यांचे मनापासून सहकार्य मिळत आहे. आपल्याकडील बकासुराने अलीकडे लक्ष्य केलेले काही जण पुढीलप्रमाणे.

    क्र. १: सतीश शेट्टी
    क्र. २: दाभोळकर
    क्र. ३: पानसरे उभयता: दोघांचीही प्रकृती लवकरात लवकर सावरो ही इच्छा.
    क्र. ४: कोण?
    क्र. ५: कोण?

    सतीश शेट्टी आणि दाभोलकरांना त्यांच्या खुन्यांच्या मागे असलेल्यांनी पचवलेले आहेच. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे हिंदुत्ववादींकडे बोट दाखवणे, पण त्यातून काहीही निष्पन्न न होणे, भलत्याच गुन्हेगारांवर या खुनाची जबाबदारी टाकल्यावर ते प्रकरण अंगलट येणे, असे सर्व प्रकार होऊनही यामागचे गुन्हेगार मोकाटच आहेत. आज पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध करणा-यांमध्येही ते असतील याचीही मला खात्री आहे. याचा अर्थ सरकार, राजकीय पक्ष आणि पोलिस यांनी मिळून तयार केलेले ‘Perfect Murder’चे नवीन तंत्र अंमलात आणण्यात येत आहे, असे स्पष्ट दिसते.

    आता तातडीने एक करा. जातीयतेच्या विषारी विळख्यात सापडलेल्या, राज्य भिकेला लागेपर्यंतचा भ्रष्टाचार निमुटपणे सहन करणा-या, राजकीय पक्ष व संघटीत गुन्हेगारी यांचे उघडउघड दिसणारे संबंध खपवून घेणा-या आणि वरचेवर भली माणसे मारली जात असेलेले उघड्या डोळ्यांनी पाहणा-या महाराष्ट्राला आता ‘पुरोगामी’ म्हणणे तातडीने बंद करा. ‘सर्वधर्मसमभाव’ यासारखाच हा शब्दही केवळ अशा प्रसंगीच वापरायचा इथपर्यंत बेगडी बनलेला आहे आणि तेवढाच भेसूर विनोदी झाला आहे. शिवाय महाराष्ट्राचा बिहार – उत्तरप्रदेश होऊ देऊ नये म्हणणा-यांनी ते तसे केव्हाच झालेले आहे हे वास्तव ध्यानात घ्यावे.

    आता यापुढे प्रत्येक वेळी अशी घटना घडल्यावर काडीचाही उपयोग न होणारा निषेध करण्यापेक्षा आपल्याकडे कोप-या-कोप-यावर दिसणारी बेकायदेशीर व गुन्हेगारी कृत्ये, या गोष्टींना मिळणारा राजकीय आश्रय, वर्षानुवर्षे या आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देणारे पोलीस दल यांना जनतेनेच वठणीवर आणणे आवश्यक आहे हे पटते काय? मला वाटते, याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही. पण मग हे अंमलात कसे आणायचे यावर विचार कोण करेल?

    कारण कोणी भीम येऊन आपल्याला वाचवेल अशी अपेक्षा असेल, तर मग बोलणेच खुंटले. मग वर लिहिलेली प्रश्नचिन्हे काढून यादीमध्ये पुढची नावे लिहावीत.

    ReplyDelete
  2. Loksatta

    दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कायद्यास सर्व धर्मातील कट्टरपंथीयांचा विरोध होता. त्यातही िहदू अधिक. त्यामुळे त्यांच्या हत्येमागे या उजव्या विचारांच्या शक्ती असाव्यात असे गृहीत धरून पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या बोलघेवडय़ांनी दाभोलकरांच्या हत्येनंतर जवळपास मारेकरी कोण हे सांगण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. यातील काहींना- यात काही बांधीलकीवाले संपादकही होते- तर इतका चेव आला होता की त्यांच्या अभिव्यक्तीतील िहसा ही प्रत्यक्ष हल्लेखोरांच्या कृत्याशी जवळीक सांगणारी होती. हा हल्ला झाला त्या वेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. नरेंद्र मोदी यांच्या धडका केंद्र सत्तेवर बसायला सुरुवात होण्यास अवधी होता. तेव्हा काहींना वाटत होते त्याप्रमाणे दाभोलकर यांच्या हत्येमागे खरोखरच प्रतिगामी शक्ती असत्या तर त्यांना उजेडात आणण्यात राज्यातील आणि केंद्रातीलही सत्ताधीशांना आनंद वाटला असता. परंतु ते झाले नाही. कारण या मंडळींना वाटत होते तसे काही आढळले नसावे. वास्तविक अशा वेळी या बुद्धिजीवींनी आपण प्रतिक्रिया देण्यात जरा घाईच केली, अशी कबुली दिली असती तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि वैचारिक निष्ठांचा सच्चेपणा दिसून आला असता. आताही नेमकी तीच गल्लत अनेकांकडून होताना दिसते. िहसा ही वाईट आणि िनदनीयच. मग ती डाव्या विचारींविरोधात झालेली असो वा उजव्या. आज कॉम्रेड पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी प्रसृत होताच जणू आपल्याला त्यांच्यावरील हल्ल्यामागे कोण आहेत हे ठाऊकच आहे, अशा थाटात प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. देशात प्रतिगामी शक्तींची वाढ होत असून त्याचमुळे पानसरे यांच्यावर असा हल्ला झाला असे मेधा पाटकर म्हणाल्या. सध्या प्रतिगामी शक्तींचा सुळसुळाट झाला आहे, हे मान्यच. परंतु तसा तो व्हायच्या आधीही आपल्याकडे िहसाचार होताच, हे कसे विसरणार? दाभोलकर यांच्या कन्येच्या मते पानसरे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित होता. आता हे उघडच आहे. हल्लेखोर पानसरे यांच्याशी चर्चाविनिमय करावयास गेले आणि निघताना त्यांना सहज म्हणून गोळ्या घातल्या, असे तर झाले नसणार. अशा प्रकारचे हल्ले हे पूर्वनियोजितच असतात.
    तेव्हा महाराष्ट्राने ही निवडक नतिकता आता सोडायला हवी. याचे कारण सत्तेवर पुरोगामी म्हणवून घेणारे असोत वा प्रतिगामी. सत्तेमुळे येणाऱ्या राजकीय ताकदीचा आधार घेत आपली साम्राज्ये वाढवणाऱ्या शक्ती समानच असतात. त्यामुळे सरकार बदलले तरी ते चालवणाऱ्यांच्या आसपास घोंघावणारे दलाल बदलले जातात असे होत नाही. सत्तेमागील आर्थिक हितसंबंध तेच असतात. दाभोलकर, शेट्टी यांची हत्या, कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागेदेखील हे आर्थिक हितसंबंध असू शकतात. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या कालबाहय़ आणि निष्फळ चर्चात आपण रमतो. अशा परिस्थितीत विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्वानीच एकत्र यावयास हवे. कारण दाभोलकर, शेट्टी यांचे मारेकरी, कॉम्रेड पानसरे यांचे हल्लेखोर या महाराष्ट्राला इशारा देत आहेत : खबरदार.. विचार कराल तर..

    ReplyDelete