तवलीन सिंग या महिला पत्रकाराचा एक स्तंभ मागली तीन दशके ‘इंडीयन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकात नियमित प्रकाशित होत असतो. त्याच स्तंभातून तिने मागल्या वर्षी जयंती नटराजन यांच्या पर्यावरणमंत्री म्हणून वेदांत प्रकल्पाला स्थगिती देण्यावर झोड उठवली होती. त्यात अशा सरकारी निर्णयामागे निव्वळ राजकारण नव्हेतर किती मोठे कारस्थान आहे त्याचाही बोभाटा केला होता. पण अन्य माध्यमे तिच्या त्या गौप्यस्फ़ोटाची दखलही घेत नाहीत. अन्यथा कुणा नगण्य वेबसाईटने इंटरनेटवर मोदी वा अमित शहा यांच्यावर कुणा महिलेची पाळत ठेवल्याचा आरोप केल्यास, हीच माध्यमे किती गदारोळ करतात ना? अशा सनसनाटी माजवणार्या माध्यमांना तवलीनच्या त्याच खळबळजनक आरोपावर रान उठवावेसे कशाला वाटले नव्हते? समजा ज्या दैनिकात तो स्तंभ प्रकाशित होतो, त्याविषयी वावडे असेल, म्हणून माध्यमांनी वाहिन्यांनी तवलीनच्या स्तंभाकडे काणाडोळा केला असेल काय? तसेही म्हणता येत नाही. कारण त्याच म्हणजे इंडीयन एक्सप्रेस दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या एका लष्करी तुकडीच्या दिल्लीकडे कुच करण्याच्या कुचकामी बातमीचा कल्लोळ माध्यमांनी केलेला होता. म्हणजेच दैनिकाबाबतीत वाहिन्यांचा आक्षेप नक्कीच नसावा. असेल, तर तो तवलीन सिंग नामक महिलेविषयी असावा. दिल्लीची इतकी जुनीजाणती पत्रकार असून तवलीन आपल्याला आजकालच्या वाहिन्यांच्या चर्चेत सहसा दिसत नाही. चुकून कधीतरी तिला वाहिन्यांच्या चर्चेत आमंत्रित केले जाते. अन्यथा अत्यंत उथळ वा बिनबुडाच्या अनेक पत्रकार व महिलांना सातत्याने वाहिन्या झळकवत असतात. इथेच पाणी मुरते म्हणायला लागते. कारण वाहिन्यांचा वा तिथल्या संपादकांचा अजेंडा असतो, त्याप्रमाणे तवलीन बोलत नाही वा त्यांच्या उथळ चर्चेत होयबाचे काम करीत नाही. आपली मते व माहिती अतिशय ठामपणे मांडत असते.
आणखी एक चमत्कारीक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तवलीनचे लिखाण वाचले, तर आजकालच्या प्रस्थापित तथाकथित सेक्युलर अजेंड्याला झुगारणारे तिचे लिखाण असते. किंबहूना त्यातून अनेकदा प्रस्थापित सेक्युलर अजेंड्यातल्या त्रुटी ठळकपणे मांडलेल्या असतात. त्यामुळे तवलीनला वाहिन्या व सेक्युलर माध्यमे बहिष्कृत करत असतील, तर आश्चर्य नाही. मात्र गमतीची गोष्ट अशी, की तवलीनचे अनेक दावे किंवा मुद्दे पुढल्या काळात खरे ठरत असतात आणि तिला बहिष्कृत करणार्यांचे हिरीरीने मांडलेले दावे साफ़ खोटे पडत असतात. वेदांत प्रकल्प, जयंती नटराजन, पर्यावरण खात्याने दिलेली स्थगिती व त्यातील राहुल गांधीचा सहभाग, याविषयी तवलीनने तेव्हाच केलेले आरोप आज खरे ठरले आहेत. पण कुणा वाहिनी वा संपादकाने तिची पाठ थोपटली आहे काय? उलट दिड वर्षे ज्या पत्रकाराच्या खोट्या अफ़वेने माध्यमात रान उठवले होते, त्याचा स्नुपगेटचा दावा कोर्टातच खोटा पडल्यावरही आशिष खेतान याला वाहिन्या अगत्याने आमंत्रित करत असतात. हा फ़रक आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. कारण माध्यमांना व पत्रकारितेला लोकशाहीत चौथा खांब म्हणून ओळखले जात असते. सत्ताधारी वा राजकारण्याकडून लोकशाही धोक्यात आली तर तिच्या रक्षणाचा स्वयंभू लहवय्या; अशी त्यामागची कल्पना आहे. पण तेच काम अतिशय निष्ठेने करणार्या तवलीनसारख्या पत्रकाराला आजचा चौथा खांब बहिष्कॄत करतो. उलट ज्यांच्या लोकशाहीनिष्ठा वा पत्रकारिताही सत्याच्या कसोटीला उतरू शकत नाही, त्यांना इथे चौथा खांब म्हणून प्रतिष्ठीत केले जात असते. यातले कितीजण किमान राष्ट्राशी जनहिताशी निष्ठा बाळगून असतात, त्याचीही शंका आहे. किंबहूना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांच्या विधानावर गदारोळ करणार्यांनी आपल्या देशनिष्ठाही शंकास्पद करून ठेवल्याचे पुरावे इथे यापुर्वीच दिलेले आहेत.
अलिकडल्या कालखंडात चौथा खांब किंवा पत्रकारितेचे सातत्याने ढोल पिटले जात असतात. त्यातच निष्ठेने काही दशके कार्यरत असलेल्या तवलीन सिंगच्या ‘इंडीयन एक्सप्रेस’ दैनिकातल्या स्तंभाचे नाव मात्र भलतेच चमत्कारिक आहे. ‘फ़िफ़्थ कॉलम’ असे इंग्रजी नाव आहे, त्याला मराठीत ‘पंचम स्तंभ’ असे संबोधन आहे. त्याचा अर्थ पाचवा खांब. ही इंग्रजी संकल्पना आहे. पाचवा स्तंभ म्हणजे दगाबाज घातकी वा घरभेदी अशी त्याची व्याख्या आहे. किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? आज देशाच्या हितावर निखारे ठेवणारे चौथा स्तंभ म्हणून उजळमाथ्याने मिरवत असतात आणि त्यातून झगडत देशाशी इमान राखणार्या तवलीनसारख्या राष्ट्रनिष्ठ पत्रकाराला आपले लिखाण ‘पंचम स्तंभ’ अशा नावाने करावे लागते आहे. इंग्रजीतून मराठीत आलेल्या या दोन्ही विशेषणांची माहिती कितीजणांना आहे? मुंबईच्या समारंभात पर्रीकर ज्यांना डीप असेट म्हणाले, त्यांची गणना पंचमस्तंभीय अशी होत असते. जे आपल्या देशाशी गद्दारी करून शत्रूशी हातमिळवणी करतात आणि मोक्याचा क्षणी मायदेशाशी दगाफ़टका करतात, त्यांनाच पंचम स्तंभ म्हटले जाते. आपल्या आजच्या नामवंत संपादक वा पत्रकारांची गणना कशात होऊ शकते, ते त्यांच्या वक्तव्यातून व लिखाणातून लक्षात येऊ शकते. सातत्याने पाकिस्तान वा चीनसारख्या देशाच्या शत्रूंना लाभदायक ठरेल अशी भुमिका राबवणार्या संपादकांची नामावळीच आम्ही यापुर्वीच्या लेखातून दिलेली आहे. ते चौथा खांब म्हणून मिरवत असतात आणि व्यवहारात मात्र पंचमस्तंभिय म्हणून देशाला इजा पोहोचेल असे काम इमानेइतबारे पार पाडत असतात. ज्यांना कोणाला याचा अधिक तपशील हवा असेल, त्यांनी तवलीनचे लेख व बरखा दत्त हिच्या पत्रकारितेची तुलना करून बघावी. निव्वळ पाकिस्तानात गेल्याने आम्ही बरखावर असा आरोप करीत नाही. त्याचेही किस्से जाहिर आहेत.
दोन वर्षापुर्वी राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीसाठी अनेक राष्ट्रप्रमुख न्युयॉर्क-अमेरिकेत जमा झालेले होते. तिथे पाकिस्तानविषयी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी खुप तक्रारी केल्या होत्या. त्याविषयी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी अत्यंत हिणकस मतप्रदर्शन केले होते. ‘पाणवठ्यावर रडगाणे सांगणारी गावठी महिला’ अशी शरीफ़नी भारतीय पंतप्रधानांची हेटाळणी केली होती. त्यावरून पाक वाहिन्यांवर खुप खिल्ली उडवली गेली. पण इथे कोणी चकार शब्द उच्चारला नाही. मग आपल्या एका सभेत नरेंद्र मोदी यांनी अशा जागी भारतीय पत्रकार चहापानाला गेलेच कशाला आणि गेले असतील, तर निषेध करून निघून का आले नाहीत, असे सवाल विचारले होते. त्यात त्यांनी कुणाचे नाव घेतलेले नव्हते. पण खायी त्याला खवखवे म्हणतात, तशी बरखा फ़णफ़णली आणि तिने आपण तिथे तेव्हा नव्हतोच, असा ट्वीट केला होता. कारण बरखा ही एकमेव पत्रकार शरीफ़ यांनी पाक पत्रकारांसाठी योजलेल्या चहापानाला गेलेली होती. इतर कुठल्याही गैरलागू विधानावर काहूर माजवणारी बरखा, शरीफ़ यांच्या त्याच विधानावर पुढले काही महिने गप्प कशाला होती? त्यातून तिच्या निष्ठा कुणीकडे आहेत त्याचा तपशील देण्याची गरज आहे काय? अशा बरखाला चौथा खांब म्हणून युपीए सरकार पद्मश्री देते आणि भारताच्या हिताला बाधा आणणार्या कुठल्याही बाबतीत तुटून पडणारी तवलीन माध्यमातून बहिष्कृत असते. याचा अर्थच आपल्या देशातला चौथा खांब देशहितासाठी पंचमस्तंभ झाला आहे ना? आणि व्यवहारातून चौथ्या खांबाला पंचमस्तंभीय ठरवून बहिष्कृत केले गेलेले नाही काय? शेकडो तुकड्यात येणार्या विविध बातम्यांची सांगड घातली तर एकूणच भारतीय समाजाला व राष्ट्रहिताला किती बाजूंनी किड लागली असेल त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. त्यातून मग संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या मनातली व्यथा नेमकी ओळखता येऊ शकेल.
bhau amchyahi manatli khadkhad mandlit aapan....
ReplyDeletetathakathit aplya chavthya stambhala jegyava kase anta yeyil bar...
---Sachin
bhau tumhi kiti spashta bolta hech midiawale tumhalahi bahishkrut kartil.spshta bolnyabadhal dhanyawad.
ReplyDeleteसर्वच वाहिन्यावर सध्या फारच उठल्पणे वाह्यात चर्चा चालू असतात. सातत्याचा विपर्यास करणारी टोळी असे स्वरूप त्याला आले आहे. त्यामुळे अशा गोष्टी दाबल्या जाणारच. त्यांची हेतालानी होणारच.
ReplyDeleteनेहमी प्रमाणे सड़ेतोड़, स्पष्ट, निर्भीक विवेचन. सलाम आपणाला व आपल्या लेखनीला
ReplyDeleteयोग्य
ReplyDelete