Thursday, February 5, 2015

हातच्या कांकणाला आरसा कशाला?



भारतीय माध्यमात बोकाळलेल्या विकृतीविषयी कालच विवेचन केले आणि त्याला विनाविलंब खुद्द जगातल्या महाशक्ती अमेरिकेने दाद दिलेली आहे. अलिकडेच भारताच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यात सहभागी व्हायला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा इथे आलेले होते. सात दशकांच्या कालखंडात अमेरिकेचा अध्यक्ष प्रथमच भारतीय सोहळ्याला अगत्याने उपस्थित राहिला आणि त्याने मनमोकळ्या पद्धतीने भारतीयांशी संवाद साधण्याचा प्रयास केला. माध्यमांनी पर्वणी असल्याप्रमाणे त्याचा खुप गाजावाजाही केला. पण या दौर्‍याच्या अखेरीस ओबामा यांनी धार्मिक सलोख्यावर जे मतदर्शन केले, त्यावरून इथल्या माध्यमांनी जो गदारोळ केला. त्यावर आता अमेरिकेने खुलासा केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने भारतीय माध्यमांनी उठवलेल्या अफ़वांचे समोर येऊन खंडन केले आहे. धार्मिक सौहार्द किंवा धार्मिक कट्टरता या विषयात आपण मोदी सरकारला कुठल्याही कानपिचक्या दिलेल्या नाहीत असाच हा खुलासा आहे. जर तसा कुठलाही उद्देश ओबामा यांच्या शब्दात नव्हता, तर त्यांच्यावर असा खुलासा करण्याची वेळच कशाला यावी? तर भारतीय माध्यमात त्यांनी योजलेल्या शब्दांचा अनर्थ केला गेला. तो तसा अनर्थ केला गेला नसता, तर व्हाईट हाऊस प्रवक्त्याला इतक्या अगत्याने खुलासा करण्याची गरज नव्हती. कारण ओबामा यांच्या विधानावर भारत सरकार वा त्याच्या कुणा प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केली नव्हती वा वक्तव्य केलेले नव्हते. असे असूनही व्हाईट हाऊसने अशा अपप्रचाराची दखल घेऊन त्यांच्या अध्यक्षाच्या शब्दांना भारतीय माध्यमांनी चिकटवलेला हेतू पुसून काढला आहे. यातून भारतीय माध्यमांच्या एकूण वर्तनाची ‘गुणवत्ता’ कळते. देशासाठी कोणी कुठलेही चांगले भल्याचे काही करू बघत असेल, तर त्याला अपशकून करण्याची ही वॄत्ती नाही काय?

'ओबामा यांचे निरोपाचे भाषण हे पूर्णत: अमेरिका आणि भारतातील 'लोकशाहीची तत्वे आणि मूल्ये' यांच्यावर आधारीत होते. कोणत्याही दृष्टीने त्यातून इशारा देण्यात आला नव्हता. आपल्या सारख्या मोठ्या लोकशाहीवादी देशांनी काय करायला पाहिजे हा संदेश राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणातून दिला होता,' असे व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दक्षिण आशिया विभागाचे वरिष्ठ संचालक फिल रीनर यांनी म्हटले आहे. याचा अर्थ काय होतो? ओबामा यांनी लोकशाही देशातील जनता व सरकारने कसे वागावे याविषयी ते मतप्रदर्शन होते. तो कुणावर केलेला आरोप नव्हता की कुणाला दिलेल्या कानपिचक्या नव्हत्या. अमेरिका तर अशा कानपिचक्या देऊ शकत नाही. ज्या देशामध्ये आजवर अनेक भारतीय विद्यार्थी वा नागरिकत्व पत्करलेल्या भारतीयांची निव्वळ वर्णद्वेषापोटी हत्या झालेली आहे, त्या देशाच्या अध्यक्षाने भारताला असले डोस पाजण्याचे प्रयोजनच असू शकत नाही. कधी गुरूद्वारावर हल्ले, तर कधी कृष्णवर्णिय विद्यार्थी म्हणून भारतीयाची एखाद्या विद्यापिठामध्ये हत्या, असे डझनावारी प्रसंग अलिकडल्या कालखंडात होऊन गेले आहेत. ज्या अमेरिकेला वा तिथल्या सरकारला त्या भारतीयांना वाचवता आले नाही, त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कुठल्या तोंडाने इथे येऊन भारतीयांना धार्मिक सौहार्दाचे प्रवचन देऊ शकतो? उलट तिथे वा भारतात ज्या अशा घटना घडत असतात, त्या टाळण्याचे आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत असे आवाहन करू शकतो. किंबहूना ओबामा यांना तेच तर सांगायचे होते. पण अर्थाचा अनर्थ करून भारताविषयी परदेशात व मायदेशात गैरसमज निर्माण करणे व त्यातून अपराधगंड जोपासणे; हेच तर आजकाल भारतीय माध्यमांचे मुख्य काम होऊन बसले आहे. त्यातून मग ओबामांनी इथे येऊन मोदी व भाजपाला कानपिचक्या दिल्याच्या अफ़वा पसरवण्याचा उद्योग झाला.

तो उद्योग भाजपाच्या प्रवक्ते व सरकारने खोडून काढण्याचा प्रयास केलाच. पण त्यातून भारत अमेरिका संबंधांना सुरूंग लावण्याचा जो डाव भारतीय माध्यमातून खेळला गेला, त्याकडे काणाडोळा करता येईल काय? मोदी असोत किंवा ओबामा असोत, त्यांनी भवितव्याच्या दृष्टीने हा दौरा योजला होता. त्याला अपशकून करायचा हेतू किती पद्धतशीर राबवला गेला, त्याचाच हा पुरावा आहे. मात्र त्यात एकट्या भारताचे वा भाजपाचे नुकसान असते तर गोष्ट वेगळी. अमेरिकेलाही भारताशी दोस्ती हवी आहे. तर त्यात ही बाधा नको म्हणून त्यांनी खुलासा केला. पण बाधा येत होती तर ती कोणी कशाला आणावी? भारताच्या लाभामध्ये बाधा आणायची भारतीय माध्यमांना गरजच काय? त्यामागचा बोलविता धनी कोण असावा? ओबामा दौरा संपता संपता या विषयावरून ज्या अफ़वांचे रान उठवण्यात आले, त्याचवेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव सुजाता सिंग यांनी तडकाफ़डकी राजिनामा दिला आहे. तत्काळ त्यांच्या जागी शिवशंकर यांची नेमणूक झाली. राजिनाम्यानंतर सुजाता सिंग यांनी आपण कोणते पाप केलेले नाही, असा खुलासा करण्याची तरी काय गरज होती? राजिनामा दिला, तर गप्प बसायचे होते. पण आपली हाकालपट्टी झालीय व आपण राजिनामा सुखासुखी दिलेला नाही, हेच सिंग यांना उघड करायचे होते. त्यांचा राजिनामा आणि ओबामांच्या भाजपाला कानपिचक्या, अशा दोन घडामोडी एकाच वेळेस घडाव्यात यात काहीच संबंध नसतो काय? सिंग यांचा आकस्मिक राजिनामा बघता ओबामांच्या शब्दावरून उठलेले काहुर त्यामागचा बोलविता धनी स्पष्ट करतो. त्याच अधिकार्‍याने माध्यमातले आपले हस्तक हाताशी धरून मोदी सरकारच्या परराष्ट्र वा अमेरिकन धोरणाला अपशकून घडवण्याचा डाव खेळलेला नसेल काय? ओबामांच्या कानपिचक्यांचे काहुर माजल्यावरच सुजाता सिंग यांचा राजिनामा कशाला आला?

इथे अनेक संदर्भ व धागेदोरे स्पष्ट होऊ शकतील. चीन व पाकिस्तानसह काही देशांना भारताची अमेरिकेशी चाललेली जवळिक आवडलेली नाही. चीनने तर खुलेआम अमेरिकेपासून भारताने सावध असावे, असा इशाराच देऊन टाकला आहे. दुसरीकडे त्याच दरम्यान भारतीय माध्यमातले जाणते मुखंड ओबामांच्या यशस्वी भारतीय दौर्‍याचा विचका उडवायला आपली सगळी शक्ती पणाला लावतात. या वेगवेगळ्या घटना असतात काय? राईचा पर्वत करून भारतीय हिताला वा भारत सरकारच्या धोरणाला सुरूंग लावण्यात माध्यमांचा होत असलेला मोकाट वापर, इथे स्पष्ट होत नाही काय? जो हेतू नाही व ज्याचा अर्थ तसा नाही, तसेच घडले आहे, हे पटवायला भारतीय माध्यमांनी मागल्या आठवड्याभरात किती वेळ व शक्ती खर्ची घातली? ती शक्ती काय हेतू साधण्यासाठी खर्ची घातली गेली? ओबामा इथे येऊन भारतीय पंतप्रधानाला कानपिचक्या देशात, सत्ताधारी पक्षाला खडे बोल ऐकवतात, असा प्रचार करण्यातून भारतीय माध्यमे जगासमोर भारताची प्रतिष्ठा वाढवत असतात काय? नसेल तर ही माध्यमे भारतीय कशाला म्हणायची? पाकिस्तानी सैनिकांकडून सीमेवर नागरिक व जवान मारले जात असताना, पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे, पाकच्या कलावंतांचे भारतात कार्यक्रम योजावेत, असा आग्रह धरणारे कोणासाठी काम करत असतात? उलट पाकिस्तानी घुसखोरी दहशतवाद याबद्दल जाब विचारण्याच्या प्रसंगी दडी मारून बसणारे असे माध्यमकर्मी कोणाचे हितचिंतक व हस्तक असू शकतात? कधीतरी याचा विचार व्हायला नको काय? जेव्हा असा विचार सुरू होईल तेव्हाच या माध्यमात कोणाचा पैसा गुंतला आहे आणि कोणत्या हेतूने तो पैसा इथे गुंतवला गेला आहे, त्याचे धागेदोरे समोर येऊ शकतील. पण ओबामांच्या वक्तव्यावर काहूर व  सुजाता सिंग यांची उचलबांगडी हे दोन संदर्भ जोडले तर पंचमस्तंभ म्हणजे काय ते उलगडू लागेल. हातच्या कांकणाला आरशा कशाला?

No comments:

Post a Comment