Sunday, February 1, 2015

नटराजन यांनी पोस्टमार्टेमच केलेय



कॉग्रेसच्या माजी मंत्री जयंती नटराजन यांनी पक्षाचा राजिनामा दिल्यावर माध्यमातील प्रतिक्रिया आणि कॉग्रेस नेते समर्थकांच्या प्रतिक्रिया भिन्न आहेत. माध्यमांनी नेहमीप्रमाणेच कॉग्रेसला एक आणखी धक्का, अशी साळसूद प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती अर्थातच बोगस आहे. कारण नटराजन कॉग्रेसच्या अशा कोणी लोकमान्य नेत्या नव्हत्या, की त्यांच्या बाहेर पडण्याने कॉग्रेसला दणका बसावा. अधिक ज्या राज्यातून ही महिला कॉग्रेसचे प्रतिनिधीत्व करते, तिथे अर्धशतकापुर्वीच कॉग्रेस नामशेष होण्याची प्रक्रिया आरंभ झालेली होती. यावेळच्या लोकसभेत ती जवळपास पुर्ण झाली म्हणायची. कारण दहा वर्षे केंद्रात कॉग्रेसचे अर्थमंत्री व गृहमंत्री अशी महत्वाची पदे भूषवलेले पी. चिदंबरम यांनी तिथून लोकसभा लढवायलाही नकार दिला होता. पक्षाचा कुठला उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकला, हा संशोधनाचा विषय आहे. सहाजिकच जिथे कॉग्रेसची इतकी दुर्दशा आधीच झालेली आहे, तिथे नटराजन यांच्यासारखी महिला नेता बाहेर गेल्याने पक्षाला काय फ़रक पडणार आहे? म्हणूनच कॉग्रेसला या राजिनाम्याने दणका बसण्याची बातमी निव्वळ बिनबुडाची आहे. दुसरीकडे पक्षाचे नेते-प्रवक्ते आणि समर्थकांच्या प्रतिक्रिया दुसर्‍या टोकाच्या आहेत. त्यांना अशा राजिनाम्याने काहीच फ़रक पडणार नाही याची पुरेपुर खात्री दिसते. त्याच्याही पुढे जाऊन या समर्थकांनी नटराजन यांच्यावर नेहमीप्रमाणे सत्तालोलूपतेचा आरोप करून टाकला आहे. भाजपाने वा अन्य कुणी कसले आमिष दाखवले व त्त्याला बळी पडून नटराजन अशा वागल्याचा आरोप नुसता हास्यास्पद नाही, तर आत्मघातकी आहे. कारण नटराजन यांनी आपल्या कृतीचा सविस्तर खुलासा केला असून, त्याची केलेली मिमांसा कॉग्रेस कुठल्या संकटात आहे, त्याचेच पोस्टमार्टेम आहे. त्याची खिल्ली उडवणारे सोनिया-राहुल यांचे भाट असू शकतात. पण कॉग्रेस पक्षाचे हितचिंतक नक्कीच असू शकत नाहीत.

नटराजन यांना सत्तास्वार्थासाठी पक्ष सोडायचा असता, तर त्यांना लोकसभा निकालानंतर इतके दिवस थांबायची गरज नव्हती. पराभूत कॉग्रेस नेतृत्वावर विनाविलंब खापर फ़ोडून त्यांना बाहेर पडता आले असते. पण तसे न करता त्यांनी सहा महिने प्रतिक्षा केली आणि तरीही कुठल्या हालचाली होत नाहीत, म्हणून कॉग्रेस श्रेष्ठींना प्रदिर्घ पत्र लिहून आपल्यासारख्या कार्यकर्त्यावर कसा अन्याय होतो त्याची जंत्रीच सादर केलेली होती. पक्षाच्या भवितव्यावर लागलेले प्रश्नचिन्ह ठळकपणे दाखवायचा प्रयास त्यांनी अशा पत्रातून केला होता. त्यांच्या पत्राची पोचवापतीही मिळाली नाही, तर उत्तर मिळायची गोष्ट दूर राहिली. पत्र पाठवून अडीच महिने उलटेपर्यंत नटराजन शांत होत्या. त्यानंतर संयम शब्दाला अर्थच उरला नाही. कारण पक्षात त्यांच्यावर नुसता अन्यायच झाला नव्हता, तर पद्धतशीर कोंडीही करण्यात आलेली होती. ती कोंडी फ़ोडून आपली प्रतिष्ठा जपण्याचा अन्य कुठलाच मार्ग उरला नाही, म्हणून त्यांना जगासमोर यावे लागले आहे. अशा व्यक्तीवर स्वार्थाचे आरोप करणारे नेमके काय साधत असतात? ज्या पक्षाच्या यशावर लोकांनी आजवर आपल्या पोळ्या भाजून घेतल्या, अशा लोकांना डबघाईला आलेला तोच पक्ष सावरण्याची इच्छा नाही. की तो बुडवण्याचा त्यांचा घाट आहे? ज्याप्रकारे नटराजन यांना मंत्रीपद सोडावे लागले आणि पुढल्या काळात अपमानित व्हावे लागले, तेच कॉग्रेसच्या इतक्या मोठ्या पराभवाचे मूळ कारण आहे. या शतायुषी पक्षात आज कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही आणि त्याचे निर्णय कोण कशासाठी घेऊन लादतो, त्याचा थांग कोणाला उरलेला नाही. असा नटराजन यांच्या पत्राचा मतितार्थ आहे. आजाराचे ते निदान आहे, त्यानुसार उपचार करण्यापेक्षा निदान करणार्‍यालाच गुन्हेगार ठरवण्यात काय हंशील आहे? काय साधले जाणार आहे?

ओडीशात प्रचाराला गेलेल्या राहूलनी तिथल्या आदिवासींना पर्यावरण जपण्याचे आश्वासन दिले आणि त्यानुसार तिथे विस्तारणार्‍या उद्योगांना लगाम लावायचे आदेश या मंत्रीणबाईला दिले. त्याचे तिने पालन केल्यावर उद्योगपतींचा रोष झाला. तर सगळे खापर तिच्याच माथ्यावर फ़ोडून तिला हटवण्यात आले. मात्र त्याविषयी तिला गाफ़ील ठेवून राजिनामा घेण्यात आला आणि पक्षकार्यासाठी राजिनामा घेतल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्ष पक्षात कुठली नवी जबाबदारी देण्यापेक्षा असलेले साधे प्रवक्तेपदही हिरावून घेण्यात आले. त्याच्याही पुढे जाऊन ह्या बाई पर्यावरणासाठी फ़ायली अडवून ‘जयंती टॅक्स’ वसुल करायच्या, अशा अपप्रचार पक्षातलेच सहकारी करीत होते. त्यांना कोणी रोखले नाही. तर राहुलचे सवंगडी त्याला चालना देत असल्याचेही दिसून आले. नटराजन यांनी त्याच बाबतीत सोनिया व राहुल यांच्याशी संपर्क साधला. आपली बाजू ऐकून घेण्य़ाची व न्याय देण्याची मागणी सातत्याने केली. त्यांच्या वाट्याला दुर्लक्षच आले. निदान पक्षाचा दारूण पराभव झाल्यावर तरी अशा तक्रारींची दखल घेतली जायला नको का? प्रत्यक्ष भेट होत नाही, म्हणून नटराजन यांनी सविस्तर पत्रातून आपली फ़िर्याद मांडली. अडीच महिने त्याची पोचपावती सुद्धा मिळू शकली नाही. मग त्यांनी काय करायला हवे होते? कोणी कॉग्रेस प्रवक्ता वा नेत्याने त्याचे उत्तर दिले आहे काय? की श्रेष्ठींच्या इच्छेनुसार निमूट बळी जावे आणि सवालही विचारू नये अशी अपेक्षा कार्यकर्त्याकडून असते, त्याला कॉग्रेस पक्ष म्हणतात? जो पक्ष आपल्या अशा प्रमुख नामवंत कार्यकर्त्याची इतक्या थराला जाऊन गळचेपी करीत असेल, त्याच्याकडून सामान्य जनतेने कुठल्या न्यायाची अपेक्षा करावी? गेल्या पाचदहा वर्षात कॉग्रेस पक्ष कसा चालविला जात होता, याची ही चुणूक आहे. सोनिया राहुलच्या नावावर कोण प्रत्यक्ष निर्णय घेतो, हा म्हणूनच गंभीर प्रश्न आहे.

याच प्रश्नाच्या उत्तरावर त्या शतायुषी पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ महिला मंत्री, प्रवक्ता वा कार्यकर्त्याला दिडदोन वर्षे श्रेष्ठी म्हणवणार्‍यांची साधी भेट मिळू शकत नाही. ही अर्थात नटराजन यांचीच तक्रार नाही. लोकसभेपुर्वी भाजपात दाखल झालेल्या जगदंबिकापाल या उत्तरप्रदेशी नेत्याचीही हीच तक्रार होती. त्याच्याही आधी लालूंचे मेहूणे व बिहार कॉग्रेसचे नेते साधू यादव यांनी भाजपात येण्याचे प्रयास केले आणि गुजरातमध्ये मोदींची भेट घेतली, तेव्हा हेच सांगितले होते. साडेतीन वर्षे राहुलना भेटायची वेळच मिळू शकली नाही, असे यादव म्हणाले होते. दोन वर्षानंतर नटराजन काय वेगळे सांगत आहेत? आणि आपल्याच जाणत्या कार्यकर्त्यांना न भेटणारे राहुल भाषणात मात्र अमूकतमूक नागरिक, तरूणांना भेटल्याचे हवाले नेहमी देत असतात. थोडक्यात पक्षातले अंतिम निर्णय घेणार्‍या राहूल वा त्यांच्या सवंगड्यांना सामान्य वा वरीष्ठ कार्यकर्त्यांनाही भेटायला सवड नाही. मग त्यांना सामान्यजनांच्या भावना व समस्यांवरची जाण कशी यावी? निवडणूकपुर्व विविध समाजाघटकांना राहुल थेट भेटतात व त्यांना समजून घेतात, असा तमाशा थेट प्रक्षेपणातून रंगवण्यात आला होता. पण वास्तव किती उलटे होते, त्याची साक्षच नटराजन यांच्या पत्राने दिलेली आहे. मुद्दा राहुल, सोनिया वा नटराजन यांच्यापुरता नाही. श्रेष्ठींच्या मेहरबानीवर मजा करणार्‍या त्यांच्या मुठभर चमच्यांपुरता हा विषय नाही. भाजपाशी झुंज देऊ शकेल असा कॉग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने हा विषय लोकशाहीचे मूल्य जोपासण्यासाठी अगत्याचा आहे. पण त्याची फ़िकीर खुद्द कॉग्रेसजनांना तरी किती आहे? सत्तेत मशगुल असतानाची झिंग अजून कुठे ओसरली आहे? म्हणूनच नटराजन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा उलट त्यांच्यावरच दोषारोप करण्यात धन्यता मानली जात आहे.

6 comments:

  1. खुपच छान विश्लेषण भाऊ!

    ReplyDelete
  2. फारच चांगला लेख. एक प्रश्न असा पडतो तो हा की या सोनिया बाइना हे सारे शिकवणारा किंवा शिकवणारे नक्की कोण लोक आहेत? देशी आहेत की परदेशी? शरद पवारांसारखा धूर्त ,स्वार्थी आणि लबाड राजकारणी सुद्धा त्यांच्यापासून बाजूला निघून वेगळा पक्ष काढून परत काही झालेच नाही अशा निर्लज्जपणे त्यांच्याच पायाशी बसतो ते कुणाच्या सान्गण्यावरुन वा कुणाला घाबरून?? सोनिया बाईंचा इतका मोठा दरारा का आहे??? त्यांची शक्ति नेमकी कशात आहे?

    ReplyDelete
  3. योग्य विश्लेषण !

    ReplyDelete