Friday, April 17, 2015

राणेंचा केजरीवाल झाला; की वांद्रे झाली वाराणसी?



गेले दोन आठवडे ज्या वांद्रे-पुर्व पोटनिवडणूकीने माध्यमांना गुंतवून ठेवले होते, तिचा निकाल आता समोर आलेला आहे. त्यात कॉग्रेसचे झुंजार उमेदवार नारायण राणे यांचा पराभव झाला आहे. वास्तविक ज्यांना त्या मतदारसंघांचा अंदाज असेल, ओळख असेल, तो कोणीही राणे जिंकू शकतील अशी अपेक्षा करणार नाही. किंबहूना म्हणूनच आपल्या दारातली निवडणूक असूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्धास्त होते आणि अखेरच्या दोन दिवसपर्यंत प्रचारातही उतरले नव्हते. मात्र आपल्या सहकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गाजावाजा न करता त्यांनी रणनिती आखलेली होती. तिचे फ़लित समोर आल्यावर राजकीय जाणत्यांना धक्का बसला आहे. कारण माध्यमातल्या बातम्या राणेंना जिंकण्यापासून शिवसेनेला लढत कठीण असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्या होत्या. प्रत्यक्षात मतमोजणीच्या पहिल्या फ़ेरीपासून राणे पिछाडीवर पडले, ती त्यांना नंतर अजिबात भरून काढता आली नाही. प्रत्येक फ़ेरीतून विजयाचे मताधिक्य वाढत गेले. मग त्याचे विवेचन करणार्‍यांची तारांबळ उडाली होती. असे झाले कारण माध्यमे हल्ली राजकीय प्रक्रियेचा अर्थ लावण्यापेक्षा प्रत्यक्ष राजकारणात खुपच हस्तक्षेप करू लागली आहेत. घडते त्याचे विश्लेषण करण्यापेक्षा घडवण्याचा उतावळेपणा त्याला कारणीभूत होऊ लागला आहे. राणे यांच्या ‘धक्कादायक’ पराभवाचे तेही एक कारण आहे. तीस वर्षांनी राणे प्रथमच मुंबईत निवडणूकीला सामोरे जात होते आणि जागा अतिशय प्रतिकुल होती. म्हणूनच तिथे विजय अशक्य होता. पण लढत किती जिद्दीने द्यावी, त्याचा वस्तुपाठ राणेंनी घालून दिला. मात्र माध्यमांनी हवा केली म्हणून राणेंनी जिंकलेच पाहिजेत, असा एक सूर लावला गेला. तो अधिक धक्कादायक आहे.

कुठलाही उमेदवार अपक्ष असला तरी तो निकाल लागेपर्यंत आपण पडायला उभे आहोत, असे कधी म्हणत नाही. मग झुंजायला उभे असलेले नारायण राणे पराभवाचे कशाला बोलतील? जिंकायलाच उभा आहे असेच म्हणणार. त्याच्या शक्यतेचा विषय जाणत्यांनी तपासून बघायला हवा. म्हणूनच माध्यमांनी राणे यांच्या उमेदवारीने ‘सेनेला घाम फ़ुटला वा सेनेचा घामटा काढला’ अशी अवास्तव भाषा करण्याचे काही कारण नव्हते. जणू माध्यमेच राणे यांच्या वतीने प्रवक्ता असल्यासारखी बोलत होती. ते दावेच निराधार होते आणि तसे प्रथमच घडले, असेही मानायचे करण नाही. साधारण वर्ष सव्वा वर्षामागे जाऊन बघितले, तर दिल्लीत अनपेक्षित यश संपादन केलेल्या आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माध्यमांनी हीच स्थिती करून टाकली होती. मुंबई इतकीच व्याप्ती असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकले, अशा केजरीवाल यांना किती हरभर्‍याच्या झाडावर चढवण्यात आलेले होते? आता नरेंद्र मोदी यांचा विजयरथ कॉग्रेस रोखू शकत नाही, तो फ़क्त केजरीवाल रोखू शकतील, असा किती गवगवा करण्यात आला होता? बिचारे केजरीवालही त्यात इतके फ़सत गेले, की त्यांचे वस्तुस्थितीचे भान सुटत गेले आणि देशभर पाचशे उमेदवार त्या इवल्या पक्षातर्फ़े उभे करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तिथेच न थांबता त्यांनी मोदींना पाडायचे आव्हान आपल्या माथी घेऊन वाराणशीला धडक मारली. ‘मोदीको हराना है’ असे त्यांचे घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य होऊन गेले. पुढले परिणाम इथे सांगायची गरज नाही. दिल्लीतही त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला होता. त्यातून केजरीवाल लौकर सावरले म्हणून पुन्हा दिल्लीत आले आणि दिल्लीबाहेर निवडणूका लढवायच्या नाहीत, म्हणून कानाला खडा लावून बसले आहेत.

माध्यमांनी केजरीवाल यांना वाराणशीत नेऊन उभे करणे आणि राणे यांचे वांद्रे पुर्व येथे मातोश्रीच्या अंगणात येऊन धडकणे, यात कितीसा फ़रक होता? आजवर अनेक बड्या नेत्यांनी वा धाडसी व्यक्तींनी असे हिंमतीचे प्रयोग केले आहेत. पण त्यात त्यांचे बळीच गेलेले आहेत. इंदिराजी-सोनिया अशा नेत्यांनी बालेकिल्ला सोडून लढती दिल्या आहेत. पण त्यांच्या पक्षाचे बालेकिल्ले असलेले ते मतदारसंघ होते. वाराणशी केजरीवाल यांच्यासाठी व वांद्रे-पुर्व राणेंसाठी तसे पक्षाचे बालेकिल्ले अजिबात नव्हते. मग तिथे जाऊन आव्हान उभे करणे एक गोष्ट झाली. पण तिथे दांडग्या पक्षाला पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद नाही काय? कॉग्रेसने तिथे राणेंना उभे करण्याची रणनिती योग्य होती. मुंबईत शिवसेनाच कॉग्रेससाठी मोठे आव्हान आहे आणि त्याला थेट जाऊन भिडण्यासाठी राणे यांच्यासारखा अन्य उमेदवार असू शकत नाही. झुंजणारा असा उमेदवार मातोश्रीच्या दारात उभा करणे, कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्यासाठी उपयुक्तच होता. वाराणशीत केजरीवाल उतरले, त्यातून त्यांच्या पक्षाला उभारी द्यायला मदत जरूर होते. पण दिल्लीत शीला दिक्षीतना पराभूत करणे आणि वाराणशीत मोदींना हरवणे यात काडीचे साम्य नव्हते. पण ते साम्य इतके अतिशयोक्त रंगवले गेले. की त्याचा विचका झाल्यावर केजरीवाल यांना तोंडघशी पडायची वेळ आली. इथेही राणे वा कॉग्रेस यांच्यापेक्षा माध्यमांनी उतावळेपणा केला आणि जणू राणे जिंकणार, असा आभास उभा केला गेला. सहाजिकच वांद्रा मतदारसंघाची वारणशी होऊन गेली. मात्र राणे हा सावध नेता असल्याने त्यांनी आपला केजरीवाल होऊ दिलेला नाही. पराभवाची शक्यता नव्हे, खात्री असतानाही त्यांनी उद्धव ठाकरे याच्या दाराशी येऊन आपण आव्हान देवू शकतो; हे सिद्ध केले. किंबहूना राणे यांचा तोच खरा हेतू होता. पण तो साधताना त्यांनी मुंबईत वा अन्यत्र पक्षाची हुकमी मुस्लिम मते एम आय एम या नवख्या पक्षाकडे गेलेली होती, ती माघारी फ़िरवण्याची किमया करून दाखवली आहे. त्याचबरोबर भाजपाचा शिवसेनेला पाठींबा असल्याचा लाभ उठवत, मागल्या दोन निवडणूकीत कॉग्रेस पक्षापासून दुरावलेली अमराठी मते माघारी आणण्यातही मोठे यश राणे यांनी मिळवले आहे. भाजपाचे मागल्या दोन निवडणूकातील यश व शिवसेनेवर केलेली कुरघोडी त्याच अमराठी मतांमुळे शक्य झाली होती. राणेंनी ती मते माघारी फ़िरवली असतील, तर तो भाजपासाठी गंभीर इशारा आहे.

एका अर्थाने नारायण राणे हा आक्रमक वृत्तीचा केजरीवालच आहे. तितकाच अस्वस्थ, उचापतखोर, सक्रीय पुढाकार घेणारा असा माणुस कधी थांबत नसतो. संधी किंवा प्रसंग आपल्याकडे येण्याची प्रतिक्षा करत बसणे, हा त्यांचा स्वभाव नसतो. तो स्वत:च काळाला गाठायला धावत सुटणारा असतो. म्हणूनच अशा लागोपाठच्या पराभवाने राणे यांचे राजकारण संपणार नाही. सेनेविषयीचे भूत त्यांनी डोक्यातून काढून टाकले, तर नजिकच्या काळात हा माणुस पुन्हा केजरीवाल यांच्यासारखा धमाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात धमाल उडवताना दिसू शकेल.


मी मराठी (खुसपट) १८/४/२०१५

1 comment:

  1. भाऊ, एकदम सही म्हणालात..
    <<< एका अर्थाने नारायण राणे हा आक्रमक वृत्तीचा केजरीवालच आहे. तितकाच अस्वस्थ, उचापतखोर, सक्रीय पुढाकार घेणारा असा माणुस कधी थांबत नसतो. संधी किंवा प्रसंग आपल्याकडे येण्याची प्रतिक्षा करत बसणे, हा त्यांचा स्वभाव नसतो. तो स्वत:च काळाला गाठायला धावत सुटणारा असतो. म्हणूनच अशा लागोपाठच्या पराभवाने राणे यांचे राजकारण संपणार नाही. सेनेविषयीचे भूत त्यांनी डोक्यातून काढून टाकले, तर नजिकच्या काळात हा माणुस पुन्हा केजरीवाल यांच्यासारखा धमाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात धमाल उडवताना दिसू शकेल.>>>
    -कदमांचा दुर्गेश.

    ReplyDelete