म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो, अशी उक्ती मराठी भाषेत सर्वश्रुत आहे. आम आदमी पक्षाच्या दिल्लीत जंतरमंतर येथील मेळाव्यातील गळफ़ासाच्या घटनेनंतर त्याच दृष्टीने ‘आप’कडे बघणे अगत्याचे झाले आहे. कोणा एका गजेंद्र सिंग नावाच्या व्यक्तीचा तिथे गळफ़ासाने मृत्यू झाला, ही बाब व्यक्तीगत पातळीवर महत्वाची आहे. पण ज्या शंकास्पद रितीने ही घटना घडली वा घडवून आणली गेली, ते येऊ घातलेल्या भीषण वास्तवाचे इशारे असू शकतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याबद्दल माफ़ी मागितली आहे आणि आपली चुक कबूल केली आहे. तितकेच नाही, तर हा विषय उगाच अतिरंजित करू नये, असेही आवाहन केले आहे. त्यांची भाषा व तिर्हाईताप्रमाणे दिलेली प्रतिक्रीया मृत्यूपेक्षा गंभीर बाब आहे. एक माणूस आपल्या राजकीय तमाशाचा बळी ठरला, याची किंचितही खंत त्यामध्ये दिसत नाही. पहिली बाब म्हणजे दोन दिवस त्याबद्दल या माणसाने प्रतिक्रीयाही दिली नाही आणि तिसर्या दिवशी प्रकरण गळ्याशी आल्यावर चुक कबुल केली. मग त्यासाठी आपण दु:खी झालो, दोन दिवस झोप लागली नाही, ही निव्वळ मखलाशी आहे. दोन दिवस झोप लागली नसती, तर हा माणूस जाहिर माफ़ी मागायला पन्नास तास थांबला असता काय? याचा अर्थच त्यांना शांत झोप लागली होती. प्रकरण चिघळत चालले आणि मृताच्या कुटुंबियांनीच शंका-संशय घ्यायला आरंभ केला, तेव्हा केजरीवाल व आपनेत्यांची झोप उडालेली आहे. पहिल्याच दिवशी झोप उडाली असती तर या माणसाने इतकी बेधडक गुन्ह्याची कबुली देण्याची हिंमत केली नसती. केजरीवाल यांचे माफ़ीविषयक विधान काळजीपुर्वक वाचले, तर ती चुकीची कबुली वा माफ़ी नसून गुन्ह्याचा कबुलीजबाब असल्याचे ध्यानी येऊ शकते. किंबहूना त्या मृताचे कुटुंबिय शंका घेतात ते विश्वासार्ह वाटते.
गळफ़ास लावून घेतला गेल्यावर आपण भाषणे देत बसायला नको होते आणि भाषणे थांबवून त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घ्यायला हवी होती, असेच केजरीवाल म्हणतात ना? इतका हा माणुस बुद्दू आहे काय? गळफ़ास घेतलेला बघूनही ते भाषण करत राहिले, म्हणजेच सदरहू व्यक्ती गळफ़ासाने मरणार नाही, याची केजरीवाल यांना खात्री होती. त्यांनाच नव्हेतर व्यासपीठावर विराजमान प्रत्येक आपनेत्याला फ़ासात मान अडकवलेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका नसल्याची खात्री होती. म्हणून गळफ़ासाची घटना दिसलेली असूनही त्यांनी सभेचे कामकाज चालू ठेवले. अन्यथा माणूस मरेल असे वाटले असते, तर विनाविलंब सभा गुंडाळून त्यांनी फ़ासात मान अडाकलेल्या व्यक्तीला वाचवायला धाव घेतली होती. पण तो मरणार नाही अशीच खात्री होती. कारण आपनेते वा त्यांचा पक्ष इव्हेन्ट मॅनेजमेन्ट या तंत्रामध्ये कुशल आहे. ते अनेक घटना घडवून आणत असतात. मिरवणूकीत यांच्या अंगावर शाई फ़ेकली जाते. पत्रकार परिषदेत वा धरण्याच्या जागी तोंडाला काळे फ़ासले जाते. कोणी हार घालायला येऊन थोबाड फ़ोडतो. नंतर चौकशीत हे तमाम लोक त्यांच्याच पक्षाचे वा संघटनेचे कार्यकर्ते असल्याने निष्पन्न होते. मोठ्या मनाने केजरीवाल व आपनेते अशा गुन्हेगारांना माफ़ करतात. याचा अर्थच त्या घटनाही इव्हेन्ट मॅनेज केल्यासारख्या होत्या. आजवर कोणी या गुन्हेगारी मानसिकतेतून घडवल्या गेलेल्या घटनांचा पाठपुरावा केलाच नाही, म्हणून ती नाटके पचून गेली होती. पण त्या पचत गेल्या म्हणून आपनेते सोकावले आणि अधिकच नाट्यमयता आणू लागले. त्यातून ही ताजी ‘इव्हेन्ट’ योजलेली असावी. त्याचे संपुर्ण नियोजन केलेले असेल, तर जो मरणारच नाही, त्याच्यासाठी सभा व भाषण सोडून धाव घेण्याची कोणतीच गरज नव्हती. म्हणून भाषण चालू ठेवले ही चुक नव्हती, ती पुर्वनियोजित कृती होती.
अशा घटना गंमत नसते. जितकी घटना नाजूक तितकी धोकदायक असते. कसरती वा जीवघेणे खेळ करणारे पुर्ण नियोजन करून धोका पत्करत असतात. त्यात तसूभर चुक झाली तरी जीवाशी खेळ होतो. पण जे व्यावसायिक धोके उचलतात, ते बेफ़िकीर असतात. बघणार्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो, तितका खुद्द धोका पत्करणारे वा त्याचे आयोजन करणारे निश्चींत असतात. जंतरमंतरच्या याही घटनेत आपनेते व संयोजक अगदी निश्चींत होते. जगाला व टिव्हीच्या कॅमेराला भयभीत करण्याचे तर नाटक होते. त्यात गळफ़ास लावायचा, पण मरायचे नव्हते. अल्पावधीत गजेंद्रसिंगला वाचवले जाण्याची पक्की योजना असेल, तर त्यानेही धोका पत्करला. आयोजकांच्या भरवश्यावर त्याने जीवावरचा धोका पत्करलेला असावा. मात्र आयोजनात काही चुका राहिल्या आणि गजेंद्रला कबुल केले असेल, त्याप्रमाणे ठिक वेळी त्याला वाचवण्याची वेळ साधली गेली नाही. किंवा पहिलाच प्रयोग असल्याने गजेंद्रकडूनही गळफ़ास घेताना काही चुक झालेली असावी. लगेच पाणघातक ठरेल असा फ़ास त्याच्याकडून घेतला गेलेला असावा. तिथे सगळी गफ़लत झाली असावी. ते पुर्वनियोजनात नसल्याने त्याला सोडवण्याची घाईगर्दी झाली नाही. कोणीतरी झाडावर चढून गळफ़ास घेतोय, याची हुल्लड झाल्यावर म्हणूनच व्यासपीठावरून कुठलीच धावपळ झाली नाही. इतकेच नव्हेतर अर्धमेला अवस्थेत गजेंद्रला झाडावरून खाली आणल्यावर, त्याला उपचारासाठी न्यायला विलंब होऊ शकला. कारण नाटकच असेल, तर त्यात रंजकता आणायला अधिक वेळ दिला गेला आणि उपचारासाठी जाण्यास विलंब झाला. याचा अर्थच गजेंद्र मृत्यूशी खरोखर झुंजत होता, तरी ते ठरलेले नाटक असल्याने समजून आपनेते व व्यासपीठ शांत होते. ते गळफ़ासाचे नाट्य अधिक परिणामकारक बनवण्यात गर्क होते. त्यात गजेंद्रचा बळी गेला.
अशा शंका मृत गजेंद्रच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत आणि त्या वास्तव वाटतात. शिवाय माध्यमांच्या कॅमेराने प्रत्येक क्षण अनेक कोनातून टिपलेला आहे. त्यात आपनेत्यांचा हलगर्जीपणा नव्हेतर बेपर्वाई साफ़ नजरेत भरणारी आहे. म्हणूनच केजरीवाल माध्यमांवर तोडसुख घेऊ लागले आहेत. त्याचे कारण साफ़ आहे. घडवलेली आजवरची नाटके गंभीर वा कुणाच्या जीवाशी खेळणारी नसल्याने खपून गेली व पचली होती. त्याचा बारीक तपास कोणी केलेला नव्हता. आकस्मिक घटना म्हणून त्यातले हेतू व तपशील दुर्लक्षित राहिले. यावेळची इव्हेन्ट हाताबाहेर गेली आणि एका माणसाच्या जीवाशी खेळ झालेला आहे. दुसरीकडे योगायोगाने त्याचे डझनावारी कॅमेरे चित्रण करत होते. म्हणून हजारो लोकांच्या गर्दीतही सर्व बाजूंनी घटना टिपली गेली आहे. त्यामुळेच तपासकामाला उपयुक्त असे प्रत्यक्षदर्शी चित्रणच उपलब्ध आहे. त्या कॅमेरे वा त्यांनी केलेल्या चित्रणासाठी कुठल्या अन्य पक्ष वा माध्यमांना जबाबदार धरता येणार नाही. थोडक्यात इव्हेन्ट घडवणार्यांनी हे नाटकच रचलेले असेल, तर त्याचा पुरता विचका झालेला असून, त्याचे धागेदोरे अनेक ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. ही खरी समस्या आहे. त्यामुळेच केजरीवाल व त्यांचे सहकारी कमालीचे भयभीत झाले आहेत. त्यांचा आवाज सौम्य झाला आहे आणि तारांबळ उडालेली आहे. मृत गजेंद्रला यापैकी कोणा नेत्यांनी दोनचार दिवस आधी फ़ोन केले असतील, तर त्याने गळफ़ास लावून घेतल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका तो अनोळखी व्यक्ती उरत नाही. उलट दुर्लक्ष करणे नाट्याचाच भाग ठरू शकतो. म्हणजेच आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप आपनेत्यांवर होऊ शकतो. किंबहूना गजेंद्रच्या कुटुंबियांनी तशी शंकाही घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी विलंबाने चुक मान्य करण्याचे कारण लक्षात येऊ शकते. ते माफ़ी मागणे असण्यापेक्षा गुन्ह्याची कबुली ठरू शकते. त्याकडे गंभीरपणे बघणे व शोध घेणे अगत्याचे आहे, कारण गजेंद्र मेल्याचे दु:ख नाही, आपनेते सामान्य माणसाच्या जिवाशी खेळायला ‘सोकावत’ चाललेत.
"आप" मध्ये नौटंकी करणाऱ्या महामूर्ख लोकांची रांग लागली आहे...मनात विचार येतो कि ह्यांच्यापेक्षा लालू, मुलायम बरे म्हणायचे का... "आप" हा पक्ष तसाही लोकशाहीला घातक बनत चालला आहे... "आम्ही म्हणू तेच खरे" असा ह्यांचा पवित्रा आहे... आणि ह्या अशा रडक्या(ते सुद्धा नाटकी) लोकांच्या हातात आपण सत्ता द्यावी....?
ReplyDelete