Friday, April 17, 2015

ओवायसी: सेक्युलर पक्षांपुढले मोठे आव्हान



वांद्रे पुर्व निकालात पदरी आलेली निराशा झटकून एम आय एमचे ओवायसी बंधू सध्या मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिका क्षेत्रात तळ ठोकून आहेत. तिथे त्यांच्या पक्षाने मुस्लिम बहुल भागात आपले काही मोजके उमेदवार उभे केलेले आहेत. यातून त्यांना जागा जिंकण्यापेक्षा आपला प्रभाव मुस्लिम क्षेत्रात निर्माण करायचा आहे, याची स्पष्टता व्हावी. कुठल्याही निवडणूकीत हा पक्ष सर्व जागा लढ्वत नाही, तर दलित मुस्लिम लोकसंख्या लक्षणिय असेल, अशाच भागात उमेदवार उभे करत असतो. म्हणूनच नवी मुंबईचीही पालिका निवडणूक असताना ओवायसी बंधू थेट औरंगाबादेत तळ ठोकून बसले आहेत. कारण त्यांना निवडणूकीतले यश नको असून त्याच माध्यमातून मुस्लिम मतांवरच विसंबून राजकारण करणारा एकमेव मुस्लिमांचा पक्ष, अशी प्रतिमा उभी करायची आहे. मुस्लिम लीगच्या मर्यादा आणि बाबरी कांडानंतर मुस्लिम नेत्यांच्या हातून राजकारण निसटत गेले. विविध सेक्युलर पक्षांनी इतकी मुस्लिमधार्जिणी भूमिका घेतली, की मुस्लिम पक्षातच अडकून पडलेला मुस्लिम मतदार क्रमाक्रमाने सेक्युलर म्हणवून घेणार्‍या व हिंदूत्ववादाला विरोध करणार्‍या पक्षांच्या आहारी गेला. पर्यायाने निव्वळ मुस्लिम पक्ष व मुस्लिमच नेतृत्व ही गोष्टच इतिहासजमा झाली. मुस्लिम लीग केरळपुरती मर्यादित झाली आणि आसामसारख्या अलिप्त पडलेल्या राज्यात मुस्लिमांचा कुठला पक्ष उभा राहिला. त्याला अपवाद होता ओवायसींचा हैद्राबादेतील एम आय एम. त्यांनी आता महाराष्ट्राच्या मार्गाने उत्तर भारतातल्या मुस्लिम बहुल भागात आपला जम बसवण्याचा डाव योजला आहे. त्यांना तिथे कितीसा प्रतिसाद मिळू शकतो? कशामुळे मिळू शकतो, याचेही बारकाईने अवलोकन करणे उपयुक्त ठरू शकेल. ओवायसींचे उत्तरेत जाणे कसे शक्य आहे, ते कोणाला त्रासदायक व हानिकारक असू शकते? त्यांना तिथे का प्रतिसाद मिळू शकेल?

उत्तरप्रदेश, बिहार आणि बंगाल हे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांचे प्रांत आहेत. पण तिथे कोणीच राष्ट्रीय वा राज्यपातळीचा एकमुखी मुस्लिम नेता नाही. तिथल्या मुस्लिम मतांचा प्रभाव लक्षात घ्यायचा तर उत्तरप्रदेशचे उदाहरण घेऊ. २०१२ सालात तिथे विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि अवघ्या २७ टक्के मतांवर चौरंगी लढतीमध्ये मुलायमच्या समाजवादी पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. चार टक्के फ़रकामुळे मायावतींनी सत्ता व बहुमत गमावले. हे समिकरण सर्वश्रूत आहे. पण मुलायमच्या पक्षाचे जे दोनशेहून अधिक आमदार निवडून आले, त्यात बहुसंख्य मुस्लिम आमदार आहेत. चारशे आमदारात सर्व पक्षांचे मिळून ६८ आमदार मुस्लिम आहेत. त्याचा अर्थ असा, की उत्तरप्रदेश विधानसभेत प्रत्येक सहा आमदारापैकी एक मुस्लिम आमदार आहे. तेही कॉग्रेस, समाजवादी व बसपा अशा तीन पक्षात मुस्लिम विभागले गेले असताना. हे सर्व मुस्लिम मतदार शक्य तितके एक गठ्ठा मतदान करतील, तर कोणता चमत्कार घडू शकेल? मूळात मोठ्या संख्येने मुलायमच्या पाठीशी मुस्लिम मतदार गेला, म्हणूनच त्यांना सत्ता मिळू शकली. पण जिथे ज्या पक्षाचे प्राबल्य होते, तिथे त्याच पक्षाच्या मुस्लिम उमेदवाराला एकत्रित मते देण्याची हुशारी मुस्लिम मतदाराने दाखवल्याचा तो परिणाम होता. त्याचा गंभीर विचार कुठल्याच पक्षाने केला नसला, तरी सामान्य मतदार आणि नरेंद्र मोदी यांनी त्याचा हिशोब धुर्तपणे नक्की मांडलेला असावा. म्हणूनच तीन वर्षांनी तिथेच झालेल्या मतदानाने दुसरा चमत्कार घडवला. जिथे ६८ मुस्लिम आमदार निवडून आलेले होते, तिथेच लोकसभेला ८० पैकी एकही मुस्लिम खासदार निवडून येऊ शकलेला नाही. भाजपाने एकही मुस्लिम उभाच केला नव्हता. पण मुलायम. मायावती व कॉग्रेसनी उभ्या केलेल्यापैकी एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत पोहोचू शकला नाही.

उत्तरप्रदेशात २५ टक्केहून अधिक मुस्लिम मतदार असतानाही लोकसभेत त्यांचा एकही खासदार होऊ शकला नाही. पण त्याच उत्तररदेशात सर्वाधिक धर्मनिष्ठ मुस्लिम आहेत. मग हा चमत्कार कशा घडला? विधानसभेच्या निकालात इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम आमदार निवडून आल्याने बाकीच्या जातीपातीत विभागल्या गेलेल्या बिगर मुस्लिम मतदारात सुप्त अस्वस्थता होती. ती हेरूनच भाजपाचे रणनितीकार अमित शहांनी हिशोबी पद्धतीने प्रचार केला होता. त्याला हिंदूत्वाचा प्रचारही म्हणता येणार नाही. पण आझम खान यांच्यासारखे बेताल वागणारे-बोलणारे मुस्लिम नेते सामान्य बिगर मुस्लिमांना अधिकच अस्वस्थ करत होते आणि अमित शहांच्या प्रचारशैलीने त्यालाच खतपाणी घातले होते. म्हणून भाजपाने ४२ टक्के मते गोळा केली आणि उत्तरप्रदेशात कुठल्याही पक्षाचा एकही मुस्लिम उमेदवार लोकसभा गाठू शकला नाही. याचा सल तिथल्या मुस्लिम मतदार व मुस्लिम कार्यकर्त्यात नसेल का? ओवायसी यांना त्याच उत्तर भारतीय मुस्लिम मतदार कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायचे आहे. मात्र त्यासाठी प्रारंभिक मशागत करण्याइतकेही तिथे एम आय एमचे बळ नाही. पण उत्तरप्रदेश बिहार वा बंगालमध्ये आपापल्या गावाशी सततचा संपर्क ठेवून इथे मुंबई महाराष्ट्रात वास्तव्य करणारे लाखो मुस्लिम कामगार व कार्यकर्ते आहेत. इथे मुंबईत राहुन आपल्या राज्यातही राजकीय लुडबुड अबु आझमी, कपाशंकर सिंग असे लोक करतच असतात. ओवायसींना त्यांचाच शोध घ्यायचा आहे. अलिकडल्या निवडणूकीत त्यांच्यातर्फ़े निवडणुका लढवणारे बहुतांश उमेदवार तसेच कॉग्रेस, समाजवादी वा बसपातून आलेले दिसतील. अशा लोकांना महाराष्ट्रातून उत्तर भारतात एम आय एम घेऊन जायला सज्ज करणे हे ओवायसींचे उद्दीष्ट आहे. तसे झाल्यास तथाकथित सेक्युलर पक्ष म्हणून आजवर मुस्लिम मतांवर गुजराण करणार्‍यांचे काय होईल?

गेल्या दोनतीन वर्षात मुस्लिम विषय निघाला, मग ओवायसी यांना वृत्तवाहिन्यांनी चर्चेत सहभागी करून घेतलेले आहे. ती संधी साधून भाजपापेक्षा असद्दीन ओवायसी यांनी सातत्याने तथाकथित सेक्युलर पक्षांच्या मुस्लिम विषयक धोरणे व भूमिकांवर ताशेरे झाडण्याचा एकही मोका चुकवला नाही. त्यातून ते देशभरच्या मुस्लिमांना एकच संदेश रितसर देत आले, की सेक्युलर पक्ष आपले म्हणजे मुस्लिमांचे तारणहार नाहीत. केवळ मुस्लिमांच्या बळावर उभा राहुन मुस्लिम हिताची जपणूक करणारा एकच पक्ष आमचा आहे. आपणच एकमेव लढवय्या मुस्लिम नेता आहोत. बाकीचे मुस्लिम नेते कुठल्यातरी बिगर मुस्लिम पक्षांचे गुलाम आहेत. ही भूमिका ओवायसी सातत्याने मांडत आलेले आहेत. त्यातून आणि तिथे मशागत करायला स्थानिक परिस्थितीशी जुळणारे लोक हवेत. ते मुंबई, भिवंडी, मालेगाव, औरंगाबाद वा नांदेडमध्ये मिळू शकतात. जिथे म्हणून महाराष्ट्रभर औद्योगिक वसाहतीत उत्तर भारतीय मुस्लिम वसला आहे, तिथून ओवायसी त्याची भरती करीत आहेत. त्याच्या माध्यमातून उद्या त्यांना (लोकसभेत मुस्लिम टक्का कमी झाल्याने अस्वस्थ झालेल्या) उत्तर भारतीय मुस्लिमा्ना आपल्या मागे आणायचे आहे. त्यांचा एकमुखी नेता व्हायचे आहे. तसे होऊ शकले तर मुस्लिम केंद्रित राजकारण खेळण्यात गर्क असलेल्या तमाम सेक्युलर पक्षांचा उरलासुरला मतदारांचा पाया ओवायसी खिळखिळा करू शकतील आणि दुसरीकडे पर्यायाने भाजपा वा हिंदूत्वाच्या राजकारणालाही बळकटी येऊ शकेल. सेक्युलर पक्षांच्या खच्चीकरणाने विथरणारा बिगर मुस्लिम भाजपाकडे आकर्षित होईल आणि मुस्लिमांप्रमाणेच तोही मतदार सेक्युलर पक्षांपासून दुरावत जाईल.ते उत्तर भारतातील विविध राज्यात विस्कळीत पसरलेल्या मुस्लिम लोकसंख्या व मतदाराला थेट आवाहन करीत राहिले आहेत. आता तिथेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे

2 comments:

  1. भाऊराव,

    एकदम अफलातून विशेषण आहे. पार पटलं. लेखातली काही वाक्यं हिंदूंना इशारा आहेत. उदा. :

    १.
    >> कारण त्यांना निवडणूकीतले यश नको असून त्याच माध्यमातून मुस्लिम मतांवरच विसंबून राजकारण
    >> करणारा एकमेव मुस्लिमांचा पक्ष, अशी प्रतिमा उभी करायची आहे.

    हिंदूंना इशारा : जिनाच्या मुस्लिम लीगने हेच केलं. आपणच मुस्लिमांचे एकमेव तारणहार आहोत अशी प्रतिमा उभी केली. त्याचबरोबर काँग्रेस हिंदूधार्जिणी आहे अशीही हवा पसरवण्यात जिना यशस्वी झाले. प्रत्यक्षात १९२१ सालापासून आजपर्यंत काँग्रेस हिंदूविरोधी म्हणजेच सेक्युलर आहे.

    २.
    >> पर्यायाने निव्वळ मुस्लिम पक्ष व मुस्लिमच नेतृत्व ही गोष्टच इतिहासजमा झाली.

    हिंदूंना इशारा : निव्वळ मुस्लिम पक्ष कधीच बलशाली नव्हता. अगदी मुस्लिम लीगला जरी १९४६ च्या प्रांतीय सार्वत्रिक निवडणुकांत मुस्लिमबहुल प्रांतांत भरघोस यश मिळालेलं असलं तरी प्रांतिक सरकारे चालवण्याइतकं बहुमत कुठेही नव्हतं. संदर्भ :
    http://en.wikipedia.org/wiki/Indian_provincial_elections,_1946#Results

    तर मग यात हिंदूंना इशारा कसला? तर अवघी २६ % मतं मिळवून मुस्लिम लीग ने पाकिस्तान ओरबाडून घेतला. तो दंगलींच्या जोरावर. अकबरुद्दीन औवश्याची भाषा तशीच हिंस्त्र आहे. त्याच्यापासून सावध राहायलाच हवं. त्याला भारताचा पाकिस्तान बनवायचा आहे.

    ३.
    >> इथे मुंबईत राहुन आपल्या राज्यातही राजकीय लुडबुड अबु आझमी, कपाशंकर सिंग असे लोक करतच
    >> असतात. ओवायसींना त्यांचाच शोध घ्यायचा आहे.

    हिंदूंना इशारा : पाकिस्तानची चळवळ चालवली ती अलीगड, लखनौ आणि मुंबईच्या मुस्लिमांनी. त्यांना पाकिस्तान मिळाला तो सिंध, बलुचिस्थान , पश्चिम पंजाब, वायव्य सीमा प्रांतआणि पूर्व बंगाल या मुस्लिमबहुल प्रांतांचा. या प्रांतातल्या मुस्लिमांचा या मुस्लिम चळवळ्यांशी कसलाही संबंध नव्हता.

    जर हिंदूंनी औवश्यांना कमी लेखले तर हेच पुन्हा हिंदूंच्या डोक्यावर बसतील. याच मार्गाने दुसरा पाकिस्तान उत्पन्न करतील. पाकिस्तानची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा तत्कालीन हिंदूंनी अव्यवहार्य म्हणून झटकून टाकली. आता हिंदूंनी मुस्लिमांची दूरस्थ लुडबूड अतिशय गांभीर्याने घ्यायलाच हवी.

    असो.

    महमंदअली जिनाचा व्यूह धोपटमार्ग ( = tried and tested) आहे. हा मार्ग औवेशी परत चोखाळणार हे नक्की.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. भाऊ. गामा पाहिलवान यांच्या comment बद्दल आपण विवेचन करावे ही विनंती आहे.. Plz

    ReplyDelete