Tuesday, April 14, 2015

मोदी-भाजपाची लाट ओसरली काय?

Image result for bandra east by election

कुठल्याही निवडणूकीचे अंदाज बांधणे किंवा त्याविषयीचे विश्लेषण करताना कुठला पक्ष आघाडी घेईल वा मागे पडेल, असे त्याचे स्वरूप असते. मग तसे घडण्यामागचा तर्क मांडला जात असतो. पण हे काम नुसत्याच तर्काने चालत नाही. त्याला आधीच्या निवडणूकांचे निकाल, त्यातले आकडे व आताची राजकीय परिस्थिती, याचेही आधार घेतले जात असतात. बांद्रा-पुर्व या पोटनिवडणूकीचा जो एक्झीटपोल एबीपी माझा वाहिनीने केला, त्याचे विश्लेषण करताना वा मांडताना, त्याविषयीचे कुठलेही भान राखले गेले नाही. म्हणूनच शिवसेनेला ३८ टक्के आणि नारायण राणे यांना ३४ टक्के, याच्या भोवती गाडी फ़िरत राहिली. पण त्या जागीचा राजकीय इतिहास बघितला गेला नाही की मतांची विभागणी तपासली गेली नाही. म्हणून मग राणे पडणार की जिंकणार इथेच विश्लेषण घुटमळत राहिले. वास्तवात राणे कितीही आक्रमक नेता व उमेदवार असले तरी जिथे लढत होती, तिथे बाहेरून मतदार आणायची सवलत कोणालाच नव्हती. म्हणूनच आजवर तिथे झालेले मतदान व त्याची विभागणी मोलाची आहे. संदर्भच घ्यायचा तर प्रकाश बाळा सावंत यांनी प्रथम ही जागा जिंकली २००९ सालात तिचा घेता येतो. तेव्हा भाजपाचा पाठींबा असताना सावंत यांनी जवळपास ४६ हजार मते मिळवली होती आणि सहा महिन्यापुर्वी शिवसेना एकटी लढली, तेव्हा सावंत यांनी ४१ हजार मते मिळवली होती. म्हणजेच या भागात भाजपाची फ़ारशी मदत त्यांना पुर्वीही नव्हती आणि सहा महिन्यापुर्वीही मिळालेली नाही. म्हणूनच त्याला सेनेचा किंवा सावंत यांचा बालेकिल्ला म्हणता येईल. भाजपाचा पाठींबा नसल्याने सेनेला अवघी पाच हजार मते कमी पडली होती. पण दुसरीकडे विभक्त होऊन लढताना भाजपाने २४ हजार मते मिळवलेली होती. ही बाब विसरता कामा नये. मग ती सहा महिन्यापुर्वी वाढलेली भाजपाची मते आधी कुठे होती आणि आता कुठे गेली?

एक वर्षापुर्वी लोकसभेसाठी मतदान झाले, तेव्हा याच विधानसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी ६२ हजार मते मिळवलेली होती. विधानसभेत दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास ६५ हजार मते पडलेली होती. इथे काहीसा चमत्कार दिसतो. मोदी लाट म्हणून लोकसभा विधानसभा अशा दोन्ही वेळी भाजपाला मिळालेली मते आजवर कधी मिळाली नव्हती इतकी अधिक होती आणि त्याचे प्रतिबिंब निवडून आलेल्या जागांमध्येही पडले आहे. मात्र अजून भाजपा ती लोकप्रियता टिकवून आहे काय, त्याचा पडताळा यायचा आहे. विधानसभा मतदानात सगळ्या जागा लढवूनही भाजपाला लोकसभा मतदानाचा युतीत सेनेकडे गेलेला वाटा हिसकावून घेता आलेला नव्हता. दिल्लीतही विधानसभा निवडणूकीत लोकसभेची मते भाजपाला टिकवता आलेली नाहीत. ही राजकीय वास्तविकता लक्षात घेऊन बांद्रा-पुर्व पोटनिवडणूकीकडे बघणे योग्य ठरेल. सहा महिन्यापुर्वी युती नसताना सेनेला ४१ हजार म्हणजे ३३ टक्के मते होती, तर भाजपाला २४ हजार म्हणजे २० टक्के मते होती. एबीपी माझाची चाचणी खरी मानली तर युती म्हणून तृप्ती सावंत यांना ५३ टक्के मते मिळायला हवीत. त्याऐवजी एक्झीटपोल ३८ टक्के मते दाखवतो आहे. म्हणजेच सेनेला अधिक पाच टक्के मते मिळाली आहेत. ती भाजपाची असतील तर भाजपाने सहा महिन्यात १५ टक्के मते गमावली असा अर्थ होतो. किंवा मनसेचा उमेदवार नसल्याने त्यांची ५ टक्के मते सेनेकडे आली असतील तर भाजपाने आपली सर्व २० टक्के मते गमावली आहेत. म्हणूनच हे मतदान भाजपासाठी इशारा असू शकतो. विधानसभा जिंकल्यावर जे काही राजकारण वा घडामोडी घडल्या, त्याचा जनमानसावर कोणता परिणाम झाला, त्याचे हे प्रत्यंतर असू शकेल काय? निकालानंतरच त्याचा उहापोह करता येईल. पण नारायण राणे यांना ३४ टक्के कुठून मिळू शकतात, तेही तपासायला हवे.

कॉग्रेसला सहा महिन्यांपुर्वी १२ हजार म्हणजे १० टक्के, तर (आता राणे यांना पाठींबा देणार्‍या) राष्ट्रवादीला १० हजार म्हणजे साडे आठ टक्के मते होती. त्यांची एकत्रित मते १८ टक्के होतात. मग राणे यांना ३४ टक्के व्हायला अधिकची १६ टक्के मते कुठून मिळाली असतील? तृप्ती सावंत यांना भाजपाच्या पाठींब्यामुळे ५३ टक्के मते मिळायला हवीत. त्यातली ३८ टक्केच मिळत असतील, तर घटणारी १५ टक्के मते राणे यांच्या पारड्यात पडली, असाच सरळ अर्थ निघतो. असे तर मनसेच्या पाच टक्के मतांचे काय झाले? एम आय एम पक्षाचीही १९ वरून २२ टक्के मत वाढलेली एबीपी पोल दाखवतो आहे. ती मनसेची असावीत काय? कुठल्याही मार्गाने गेलात, तरी भाजपाच्या मतांचा हिशोब लागत नाही. राणे यांची कॉग्रेस उमेदवार म्हणून वाढणारी २४ टक्के मते हा पोलमधला सर्वात गहन प्रश्न आहे. त्याचे उत्तर खुप मोलाचे आहे. कारण खरेच एबीपी पोल नेमका ठरला, तर राणे व कॉग्रेस यांच्याकरीता तो सुखकारक असेल, पण भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. भाजपाने लोकसभा विधानसभा निवडणूकीत मिळवलेले यश ही लाट होती आणि ती टिकवून धरण्यावर त्या पक्षाचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. अन्यथा मतदार काय चमत्कार घडवू शकतो, त्याची प्रचिती दिल्लीत आलेली आहे. लोकसभेत ४६ टक्के मजल मारणारा भाजपा विधानसभेत आपल्या जागी म्हणजे ३३ टक्केपर्यंत खाली घसरला आणि असलेल्या जागाही गमावून बसला. म्हणून वांद्रे-पुर्व येथे राणे यांना मिळणारी ३४ टक्के मते, ही भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. कारण भाजपाने आजवर स्वबळाने ही जागा लढवलेली नव्हती आणि म्हणूनच त्याच्या पारड्यात सहा महिन्यापुर्वी पडलेली मते कुठून आली वा परत कुठे गेली, हा गंभीरपणे अभ्यास करण्याचा विषय आहे. राणे व सावंत ह्यांचे निकाल म्हणूनच दुय्यम महत्वाचे ठरतील.

एबीपी पोलवरील चर्चा त्याच दिशेने व्हायला हवी होती. कारण जी मते सहा महिन्यापुर्वी भाजपाला भरभरून मिळाली, ती आजवर कधी शिवसेनेला या भागात मिळालेली नव्हती. बारकाईने अभ्यासले तर लोकसभा विधानसभेला मिळाली ती आजवर कॉग्रेसला जाणारी परप्रांतिय अमराठी अशी मते आहेत. वर्ष सहा महिन्यापुर्वी कॉग्रेसला सोडून भाजपाकडे आलेला हा मतदार पुन्हा राणे यांच्या निमीत्ताने कॉग्रेसच्या बाजू्ला झुकलेला असेल, तर तो शिवसेनेसाठी चिंतेचा विषय असू शकणार नाही. कारण ती मते कधीच सेनेला पक्ष म्हणून मिळालेली नव्हती. २००९ किंवा २०१४ दोन्ही विधानसभेतील बाळा सावंत यांचे आकडे त्याची ग्वाही देतात. कॉग्रेसचा अस्त होत असताना ज्या अमराठी मतदाराने नवी कॉग्रेस म्हणून भाजपाचा स्विकार केला होता, तो माघारी वळला तर नुकसान त्या पक्षाचे होऊ शकते. वांद्रे-पुर्वची आकडेवारी म्हणून निकालानंतर गंभीरपणे अभ्यासावी लागणार आहे. पोलमध्ये दिल्लीची लक्षणे दिसत आहेत. दुर्दैवाने एबीपी वाहिनीने त्याला स्पर्शही केला नाही. बुधवारी निकाल लागतील, तेव्हा म्हणूनच ह्या पोलचे तथ्य किती, ते भाजपाने अभ्यासले पाहिजे. कारण मुंबई-ठाणे व पुणे-नाशिक या परिसरात १०५ विधानसभेच्या जागा असून तिथेच भाजपाला मोठे यश मिळालेले आहे. तिथलाच हा जुना कॉग्रेसचा मतदार माघारी फ़िरणार असेल, तर भाजपाच्या महत्वाकांक्षी राजकारणाला तो मोठा शह ठरू शकतो. अर्थात याच्या पाठोपाठ नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेचे मतदान व्हायचे आहे आणि त्यात सेना-भाजपा युती म्हणून लढत आहेत. त्यातले मतदान कशी विभागणी करते, त्याचाही आढावा घ्यावा लागेल. तरच सहा महिन्यातल्या राजकारणाने काय किती बदलले, त्याचा नेमका अंदाज येऊ शकेल. मात्र एबीपी पोलने समोर आणलेला हा मोठा मुद्दा किंवा इशारा आहे, ज्याचा उहापोह त्यांच्या चर्चेत झालाच नाही. काही तासातच वास्तविक आकडे मतमोजणी होऊन समोर येतील. तेव्हाच हा संभाव्य धोका आहे की नुसताच तर्क; त्याचाही निकाल लागून जाईल.

3 comments:

  1. भाऊराव, नेमकं विवेचन आहे. भाजपला इशारा गांभीर्याने घ्यावाच लागेल.
    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. भाऊ, मला असे वाटते की प्रत्येक पक्षाचा नेमका ठरलेला मतदार असतो. काहीच मतदार हे फिरणारे असतात. ज्या पक्षाचे उमेदवार उभे नाहीत, त्यातील बराचसा मतदार मतदानाला बाहेर पडत नाही. तरीही मागच्या विधानसभेच्या मतदानाची आणि आताच्या मतदानाची टक्केवारी जवळजवळ सारखीच आहे. मला तर असे वाटते की यावेळी शिवसेनेचाच मतदार अधिक असावा. आणि सेनेच्याच मतांची टक्केवारी यावेळी वाढलेली असेल. यावेळी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील वादावादी पाहता भाजपचीच मते काँग्रेसला मिळाली असावीत असे माझे मत आहे. मोदींची लोकप्रियता ओसरली आहे हेच खरे आहे. भाजपचा अमराठी मतदार नक्कीच काँग्रेसच्या वळचणीला गेलेला दिसतोय.

    ReplyDelete
  3. ह्यो ग्यामा पैलवान कोन हायेत ?

    ReplyDelete