मुंबई महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापुर्वी प्रथमच ओवायसी ह्यांनी राजकारणात चंचूप्रवेश केला होता. पुर्वी निझामाच्या संस्थानाचा भाग असलेल्या मराठवाडा भागातल्या नांदेड महापालिका क्षेत्रात हा प्रवेश झाला. तिथे महापालिकेच्या निवडणूकीत आजवर समाजवादी वा कॉग्रेस पक्षाचा मतदार मानल्या जाणार्या मुस्लिम वस्त्यांमध्ये हा प्रवेश झाला. तिथे मोजक्या जागा लढवून नऊदहा नगरसेवक निवडून आणत ओवायसी यांचा एम आय एम हा पक्ष महाराष्ट्रात अवतीर्ण झाला. स्वातंत्र्यानंतर ज्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला होता, त्यात निझामाच्या संस्थानाचा समावेश होता. त्यांना पाकिस्तानात जायचे होते आणि त्याला विरोध होताच मुस्लिमांची सशस्त्र फ़ौज उभी करून ज्यांनी सार्वत्रिक बिगर मुस्लिमांची कत्तल सुरू केली, त्यांचे हे आजचे वंशज. ज्याने रझाकार म्हणून तेव्हाच्या हिंसेचे नेतृत्व केले, त्याच्या म्होरक्याचा हा राजकीय पक्ष होता. पुढे तोच पाकिस्तानला पळून गेला आणि त्याने पक्षाची धुरा ओवायसी बंधूंच्या आजोबाकडे सोपवली. मात्र दक्षिणेत मुस्लिम लोकसंख्या असली, तरी तिथले मुस्लिम प्रामुख्याने प्रादेशिक राजकारणातच रमलेले आहेत. भाषिक अस्मितेच्या आहारी गेलेल्या त्या मुस्लिमांकडून ओवायसी यांच्या राजकारणाला फ़ारसा प्रतिसाद मिळू शकला नाही आणि अखिल भारतीय मुस्लिम राजकारणातही त्यांना कोणी दाद दिलेली नाही. म्हणूनच त्यांची वाढ हैद्राबाद या महानगराच्या पलिकडे फ़ारशी होऊ शकली नाही आणि खासदार होऊनही त्यांना राष्ट्रीय मुस्लिम राजकारणात स्थान मिळू शकले नाही. मुस्लिम लीग वा जमाते इस्लामी यांचा उत्तरेतील मुस्लिमांवर मोठा प्रभाव असल्याने ओवायसींची तिथे डाळ शिजू शकली नाही. दक्षिणेतला मुस्लिम धार्मिक राजकारणाला प्रतिसाद देत नाही आणि उत्तरेतला देत असला, तरी तिथे ओवायसींना स्थान नाही, अशी त्यांची समस्या होती.
अशा या पक्षाला मागल्या काही वर्षात महाराष्ट्रात मात्र चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रामुख्याने ओवायसी बंधूंनी महाराष्ट्राच्या शहरे व औद्योगिक भागात येऊन स्थायिक झालेल्या उत्तरेतील मुस्लिमांच्या वस्त्यांना आपले लक्ष्य केलेले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फ़ारसा रस नाही. कारण इथे मुस्लिमांची लोकसंख्या लक्षणिय नाही आणि त्यातून इथल्या राजकारणावर प्रभावही पाडता येत नाही. म्हणूनच मुस्लिम राजकारणीही अन्य सेक्युलर म्हटल्या जाणार्या पक्षांच्या वळचणीला जाऊन बसतात. त्यांची समाजवादी, राष्ट्रवादी, कॉग्रेस वा मुस्लिम लीग अशा पक्षात येजा चालू असते. १९७२ सालात मुंबईत बनातवाला व बुखारी असे दोन आमदार निवडून आले आणि नंतर महापालिकेत लीगचे ११ नगरसेवकही जिंकले होते. तिथून मुस्लिम राजकारणाचा वेगळा चेहरा दिसू लागला. मग बाबरी प्रकरण घडल्यावर मुंबईतले मुस्लिम लीगचे कार्यकर्ते मुलायमच्या आहारी गेले आणि इथल्या मुस्लिम लीगचे रुपांतर समाजवादी पक्षात झाले. पण त्याचा प्रभाव कमी होताच त्यातले बहुतांश लोक पुढे राष्ट्रवादी पक्षातही सामील झाले. आता त्याच लोकांचा ओढा ओवायसी बंधूंच्या पक्षाकडे दिसतो आहे. गेल्या चारपाच दशकातल्या या मुस्लिम राजकारणाचे बारकाईने अवलोकन केल्यास, त्यांची शक्ती फ़ारशी वाढताना दिसत नाही. पण नवनव्या पक्षातून मुस्लिम राजकारण थिजलेले दिसते. समाजवादी पक्षाने दोन दशकापुर्वी भिवंडी व गोवंडी, अधिक दक्षिण मुंबईत आमदार निवडून आणले होते आज ओवायसींच्या पक्षाचे आमदार भायखळा व औरंगाबाद अशा ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपल्या किमान पण एकगठ्ठा मतांच्या बळावर त्यांना यश मिळालेले आहे. मतविभागणीचा लाभ त्यांना मिळत असतो. ओवायसींना त्यापेक्षा अधिक अपेक्षाही नाही. त्यांना उत्तर भारतात शिरकाव करून घेण्यासाठी तेवढे यश हवे आहे.
उत्तर भारतात १६२ खासदार लोकसभेत निवडून पाठवणार्या उत्तरप्रदेश, बिहार व बंगाल अशा तीन राज्यात मुस्लिम मतदारांची लोकसंख्या लक्षणिय आहे. २२ ते २८ टक्के अशी ती संख्या आहे. म्हणूनच तिथल्या कुठल्याही पक्षाला सतत मुस्लिमांचे लांगुलचालन करावेच लागते. एखाद दोन मुस्लिम नेत्यांना पक्षात मंत्रीपदावर ठेवावे लागते. नितीश लालू मुलयम वा मायावती मुलायम यांच्यासह कॉग्रेस व डावे पक्ष भाजपाच्या हिंदूत्वावर त्यासाठीच सतत तोफ़ा डागत असतात. मात्र त्यामुळेच २० टक्केहून अधिक मते असलेल्या मुस्लिमांचा स्वतंत्र पक्ष तिथे अजून पुढे येऊ शकलेला नाही. मुस्लिम लीग वा जमाते इस्लामी अशा पक्षांना तिथे पाय रोवून उभे रहाता आलेले नाही. कारण तितक्या ताकदीचा आक्रमक मुस्लिम नेता तिथे समोर आलेला नाही. त्यासाठीच ओवायसी धडपडत आहेत. त्यांच्या आक्रमक आगखावू भाषणाला प्रतिसाद देऊ शकेल, असा मुस्लिम उत्तर भारतात मुबलक आहे. पण त्याच्या बळावर स्वतंत्रपणे मुस्लिमांचे राजकारण करण्याची हिंमत बाळगणारा नेता कोणी नाही. रामपूरचे आझम खान वा सलमान खुर्शीद असे नेते सत्तेला चटावलेले आहेत. म्हणूनच धाडसाचे राजकारण त्यांना नको असते. ते अन्य पक्षांच्या वळचणीला जातात. ओवायसींना तीच पोकळी भरून काढायची आहे. मात्र त्यासाठी उत्तर भारतात त्यांना स्थान नाही. ते मिळवायचे असेल तर तिथपर्यंत घेऊन जाणारे उत्तर भारतीय मुस्लिम कर्यकर्ते हवेत. असे मुस्लिम महाराष्ट्राच्या नव्याने विस्तारलेल्या औद्योगिक परिसरात येऊन वसलेले आहेत. त्यासाठीच ओवायसी बंधूंनी मागल्या तीन वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातल्या औद्योगिक शहरातल्या मुस्लिम वस्त्यांना लक्ष्य बनवून घुसखोरी केली आहे. तेवढ्याच मोजक्या जागी आपली शक्ती केंद्रित करून लढाई आरंभली आहे. त्यांची भाषाही म्हणूनच समजून घेण्यासारखी आहे.
बांद्रा-पुर्वच्या निकालावरील विश्लेषणात भाग घेताना त्या पक्षाचे प्रवक्ते आमदार वारीस पठाण वा इम्तियाज जलील यांनी ही भूमिका अतिशय स्वच्छपणे मांडलेली आहे. आम्हाला स्वत:च्या बळावर उभे रहायचे आहे आणि किंगमेकर व्हायचे आहे. त्याचा नेमका अर्थ असा, की आम्ही मुस्लिमांच्या बळावर बहूमत मिळवू शकणार नाही. पण इतक्या मते व जागा मिळवायच्या, की आमच्याशिवाय सत्तेचे बहूमताचे गणित जमता कामा नये. याचा नेमका अर्थ काय? देशात १७-१८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे असे म्हणतात. त्याच प्रमाणात मतदान होत असेल तर किमान १५-१६ टक्के मते मुस्लिमांची होतात. ती जिथे केंद्रित झालेली आहेत, अशा जागी मतविभागणीच्या बळावर यशही मिळवता येऊ शकते. म्हणजेच ज्या दिडशे जागी मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत तिथे पन्नासपर्यंत मुस्लिम निवडून आणणे शक्य होऊ शकेल आणि १५ टक्के मतांपैकी ५-६ टक्के मते जरी या पक्षाला गठ्ठा म्हणून मिळवता आली, तरी अन्य सेक्युलर पक्षांचे उमेदवार मोक्याच्या जागी पाडायला पुरेशी आहेत. तेच ओवायसी बंधूंचे गणित आहे. उत्तरप्रदेश बिहार व बंगालमध्ये १६२ जागा आहेत आणि तिथल्या पक्षांना उमेदवार पडण्याचे भय घालून आपल्यामागे आणायचा त्यांचा डाव आहे. तितके बस्तान उत्तर भारतात बसवण्यासाठी महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय मुस्लिमांच्या मार्गाने वाटचाल करायचा मार्ग खुला होऊ शकतो. आज इथे नगरसेवक आमदार होणार्यांना उद्या आपल्या जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा लढवायचे प्रलोभन दाखवून माघारी उत्तरभारतीय राज्यात नवा पक्ष बांधायला पिटाळणे शक्य आहे. त्याचा पाया महाराष्ट्रातल्या निवडणूकातून घातला जात आहे. त्यासाठी महापालिका व पोटनिवडणूकात मुस्लिम लोकसंख्येचे बळ बघून शक्ती पणाला लावली जात आहे. किंगमेकर व्हायचा असा अर्थ आहे. त्यात किती तथ्य आहे, ते उद्या वाचू.
भाऊ. तुम्ही अगदी बरोबर !!!!
ReplyDeleteUnknown dimension . wonderful. Want more on this topic
ReplyDeleteउत्तरेतील जिथल्या मुस्लिमांनी पाकिस्तान घडवला तिथलेच मुसलमान आज महाराष्ट्रात घुसले आहेत . त्यामुळे आगखाऊ भाषणे त्यांच्याच साठी आहेत, आणि थेट तिथे जाण्याआधी त्यांच्या नातेवाईकांकडून तिथे आपल्या स्वागताची व्यवस्था करण्यासाठीच ओवैसी बंधु महाराष्ट्रात घुसले. जसा मोदीनी गुजरात मध्ये राबणारे उप्र - बिहारच्या कामगारांचा उपयोग केला तसाच ओवैसी महाराष्ट्रात राहणारया तिथल्या मुसलमानाचा करतोय .
ReplyDelete