माळेवाडी साखर कारखान्याच्या निवडणूकीत अजितदादा यांच्या गटाचा दारूण पराभव झाल्याचा सध्या खुप गवगवा सुरू आहे. त्याची कारणे अनेक आहेत. पहिली बाब म्हणजे पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या बारामतीतला हा सहकारी कारखाना आहे आणि मागली काही वर्षे शरद पवारांचे वारसदार म्हणून अजितदादांच्या इच्छेशिवाय तिथले पान हलत नव्हते. नाराजी खुप असेल, पण साहेबांच्या इच्छेपुढे लोकांनी माना तुकवल्या होत्या. पण लोकसभेपाठोपाठ विधानसभेत राष्ट्रवादी कॉग्रेसचा धुव्वा उडाला आणि बालेकिल्ल्यालाही खिंडारे पडू लागली आहेत. आज ज्या पॅनेलकडून अजितदादांचा पराभव झाला, तेही मुळातले पवारनिष्ठ अशीच त्यांची ख्याती. पण मागल्या दहापंधरा वर्षात अजितदादांनी काकांचा वारसा चालवायला घेतला, तेव्हा आपले एकनिष्ठ गोळा करताना पवारांच्या जुन्या निष्ठावंतांना एकामागून एक खड्यासारखे बाजूला करण्याचा सपाटा लावला होता. त्यातून दुखावलेले लोक आता एकत्र येऊन वचपा काढत आहेत म्हटले तर वावगे ठरू नये. ज्या अजितदादांना आपल्या विधानसभा मतदारसंघात अर्ज भरला, मग अखेरच्या एकदोन दिवसात ठाण मांडले तरी जिंकता येत होते; त्यांना माळेगावसाठी कित्येक दिवस मुक्काम ठोकावा लागला, यातच समस्येचे विवेचन होऊ शकते. मागल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या सहकाराला ग्रहण लागले आणि अनेक कारखाने कवडीमोलाने खाजगी मालकांना विकण्यात आले. माळेगावही त्याच वाटेवर होता. म्हणून जुन्या पवारनिष्ठांना सहकार बचाव पॅनेल बनवावे लागले. त्याचा दुसरा अर्थ अजितदादा हटाव असा होतो. राष्ट्रवादी पक्ष वा पश्चिम महाराष्ट्रातील पवारांच्या प्रभावक्षेत्राला कुठे कशामुळे खिंडारे पडली, त्याचे उत्तर या पॅनेलच्या नावातच दडलेले आहे. ही नुसती सुरूवात आहे. परिणाम पुढल्या स्थानिक निवडणुकात दिसून येतील.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून सहकाराच्या मार्गाने ग्रामिण भागाचा उद्धार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी किरकोळ शेतकरी भागभांडवल गोळा करून सरकारच्या अनुदानावर साखर व इतर सहकारी उद्योग संस्था उभ्या राहिल्या. त्यातून रोजगार व विकासाला गती मिळाली, हे नाकारता येणार नाही. पण लौकरच सहकार हे कॉग्रेस पक्षाचे व क्रमाक्रमाने स्थानिक नेत्यांचे संस्थान बनत गेले. लूटमार, भ्रष्टाचार याच्याच बरोबरीने सामान्य शेतकर्याचे शोषण, यासाठी सहकार हे सर्वात प्रभावी हत्यार बनले. सहकार सम्राट उदयास आले. पण त्या सम्राटांनीही निदान मुठभर सहकारी कार्यकर्त्यांना समाधानी राखण्याची चतुराई दाखवली होती. तर अजितदादांनी त्यालाही तिलांजली देऊन ह्या उद्योग कारखान्यांना डबघाईला नेऊन खाजगीकरणाचा घाट घातला. कर्जबाजारीपणा व दिवाळखोरीच्या खाईत लोटून हे कारखाने विकले गेले. जे कारखाने डबघाईला आलेले होते, तेच खाजगीकरणानंतर नफ़्याने चालू लागले. मग सहकारात कुठला दोष होता? त्याबद्दलही कोणाची तक्रार असायचे कारण नाही. जेव्हा यातले बहुतांश कारखाने दिवाळखोरीत नेऊन राष्ट्रवादीच्याच बगलबच्च्यांनी खरेदी केल्याचे नजरेत भरू लागले, तेव्हा लोकांची धाबी दणाणली तर नवल नव्हते. शेतकरी संघटना व अन्य संस्थांनी त्याकडे लक्ष वेधले, तेव्हाच शरद पवार यांनी सावध व्हायला हवे होते. त्यांचे वारसदार सोन्याची सगळी अंडी एकदमच मिळवायला कोंबडीच कापत असल्याचे दिसत होते. तरी पवारांनी तिकडे काणाडोळा केल्याचा हा परिणाम आहे. मागल्या लोकसभा विधानसभा मतदानात आपल्या प्रभावक्षेत्रातच पवारांना दणका त्यामुळेच बसला. तरीही त्याचे चिंतन शिबीरातही मनन झाले नाही. सहाजिकच सावरासावर होऊ शकली नाही आणि आता त्याचे दणके कारखाने व संस्थामध्ये बसू लागले आहेत.
वर्षभरापुर्वी पवारांनी एक खोचक शेरेबाजी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली होती. उद्धवना शिवसेनेचा म्हणजे पक्षाचा वारसा आयता पित्याकडून मिळाला आणि राजला नव्याने आपला पक्ष उभारावा लागला. असे पवार म्हणाले होते. थोडक्यात मिळाले आहे त्याचा उद्धव संभाळ करू शकत नाही असे त्यांना सूचवायचे होते. मात्र असली विधाने करताना आपण ज्यांना वारसा दिलाय, त्यांचे काय दिवे लावणे चालू आहे; त्याकडे दुर्लक्ष होतेय याचे भान पवारांना नसावे. अन्यथा लोकसभेपासून माळेवाडी कारखान्यापर्यंत पराभवाची मालिका तयार झाली नसती. लोकसभा निवडणूकीत मोदींनी सुप्रिया विरोधातल्या उमेदवाराच्या प्रचाराला येऊ नये, असे साकडे खुद्द पवारांना घालायची तरी वेळ कशाला आली असती? त्याचा अर्थच आपले वारसदार आपण घातलेल्या सामाज्याचा पायाच खोदत आहेत, याची जाणिव पवारांना झालेलॊ होती. पण ती थांबवण्याची बुद्धी त्यांना झाली नाही. त्याचे परिणाम आता थेट घरापर्यंत येऊन भिडायला लागले आहेत. मुद्दा एका माळेवाडी साखर कारखान्याचाही नाही. मागल्या काही वर्षात अजितदादांनी ग्रामिण भागातल्या आर्थिक कणा असलेल्या अनेक संस्थाचा बोर्या वाजवला आहे. तेव्हा साहेबांकडे बघून गप्प बसलेल्यांना आता किंमत मोजावी लागते आहे. त्यातूनच चंद्रकांत तावरे किंवा इतर लोकांनी वेगळे मार्ग चोखाळले आहेत. पंचवीस वर्षापुर्वी देशाचा पंतप्रधान व्हायला दिल्लीकडे कुच केलेला ग्रेट मराठा, आज आपल्याच बारामतीच्या गढीत असा कोंडला गेलेला बघणे, मराठी माणसाला आवडणारे असेल का? जाणता राजा अशा शब्दात पवारांचे समर्थक त्यांचा उल्लेख करतात, त्याने आपल्या वारसाला इतके मोकाट होऊ दिले, की बघता बघता बारामतीचा बालेकिल्लाही धोक्यात आलेला आहे. माळेवाडीचा पराभव म्हणून गंभीर आहे. धोक्याचा इशाराही आहे.
जेव्हा अशा येऊ घातलेल्या वादळाचा झंजावात घुमत होता, तेव्हाच त्याला सामोरे जाण्याची हिंमत पवारांनी दाखवायला हवी होती. कोल्हापुरच्या शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी हजारो शेतकर्यांचा मोर्चा थेट बारामतीत घेऊन जाण्याचे धाडस दाखवले होते. तिथेच न थांबता त्यांनी कारखाने मुद्दाम तोट्यात आणून चाललेल्या खाजगीकरणाचे पितळ उघडे पाडण्याचेही काम हाती घेतले होते. तेव्हा जैन-वैश्य समाजाच्या हाती असलेल्या कारखान्यांची कोंडी केली जात नाही, असे म्हणत पवारांनी त्या आंदोलनाला जातीय वळण लावण्याचा धोका पत्करला होता. पण सवाल कारखान्याच्या मालकीचा असण्यापेक्षा दिवाळखोरीत कर्जबाजारी झालेल्या सर्वजात धर्माच्या शेतकर्यांचा होता. तोच मतदार होता आणि तोच पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्याचा पायाही होता. तोच ठिसूळ होत गेला आणि आजची दुर्दशा समोर आली आहे. दिल्लीवर पताका लावायला गेलेल्या ग्रेट मराठ्याच्या बारामतीतही विरोधकांचा झेंडा फ़डकू लागला आहे. पण शुद्धीवर येण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका बाजूला लोकसभा विधानसभा व राज्यातील सत्ता गेलेली आहे आणि आता स्थानिक संस्था व उद्योगातील सत्तास्थाने गमावली, तर काय स्थिती होईल? नुसत्या चतुराईच्या खोचक बोलण्याने वा देखावे उभे करून खर्या राजकीय लढाया जिंकता येत नाहीत, की कसोटीच्या वेळी टिकताही येत नाही, हे जाणत्या राजाला कधी उमगणार आहे? घड्याळात दहा वाजलेले दाखवून राजकारणात वाजलेले बारा लपवता येतील अशा भ्रमात कोणी असेल, तर बघायला नको. अन्यथा येत्या निवडणूकात गावोगावी एकच गाणे वाजू लागेल.
लोकसभेची गाडी गेली
विधानसभेचीही हुकली
आता माळेवाडीही गेली
त्यांना जाऊ ना घरी
आता वाजले की बारा
No comments:
Post a Comment