Thursday, April 9, 2015

हिला म्हणतात, अभिजनांची राखी सावंत

 

राज्यातील नव्या भाजपा सेना सरकारने मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात मराठी चित्रपटांसाठी संध्याकाळी सहा वाजताची वेळ सक्तीने देण्याची घोषणा केल्यावर अनेकांच्या पोटात गोळा उठणे स्वाभाविकच आहे. ज्यांना मराठी भाषा व संस्कृतीचा द्वेषच आहे, त्यांना तसे वाटल्यास नवल नाही. पण जे जन्माने व नावाने मराठी आहेत, त्यांना अशा सरकारी धोरणाचा पोटशूळ कशाला असावा? तर त्याचे उत्तर शोभा डे असे आहे. या महिलेची मुळात कोणी कशाला दखल घ्यावी, असा एक प्रश्न आहे. आपल्या उमेदीच्या काळात मॉडेलिंग केले आणि देखणेपणाने मिरवणे, ह्याला गुणवत्ता म्हणतात काय? याखेरीज त्यांना उत्तम इंग्रजी लिहीता बोलता येते, ही आणखी एक गुणवत्ता मानायची काय? त्या बोलण्या लिहीण्यात कुठलाही गंभीर आशय नसलेल्या चमचमित गावगप्पांना तिखटमीठ लावण्याची कला अवगत असण्याला अभिजात लेखन समजावे काय? यापैकी काहीच प्रतिष्ठेचे लक्षण मानता येत नसेल, तर मग शोभा डे यांना आपल्या माध्यमांकडून इतकी जागा व प्रसिद्धी कशाला मिळते, ह्या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे लागेल. कारण आधुनिक भारताच्या सांस्कृतिक बौद्धिक वा शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नेमकी कोणती भर घातलेली आहे, की त्यांना कुठल्याही गंभीर विषयात त्यांचे मत विचारले जाते? कशाला विचारले जाते व त्याला प्रसिद्धी दिली जाते, ह्याचे उत्तर आधी माध्यमांनी दिले पाहिजे. जी माध्यमे साध्वी प्राची, महंत अवैद्यनाथ वा अकबरूद्दीन यांच्या विधानावर कल्लोळ माजवतात, तीच शोभा डे नामक व्यक्तीच्या तत्सम बालीशपणाचे कौतुक कशाला करत बसतात? शोभा डे ज्याप्रकारचे बोलतात वा लिहीतात, तशा प्रतिक्रिया-विधाने नित्यनेमाने कुठल्याही गर्दीच्या जागी गेलात तर शेकडो लोक बोलताना दिसतील. मग त्यांची दखल माध्यमे कशाला घेत नाहीत?

त्याचे एकमेव उत्तर असे, की बाजार गर्दीच्या ठिकाणी बालीश निरर्थक बोलणारे लोक सामान्य वर्गातले आहेत किंवा तथाकथित अभिजन वर्गातले नाहीत. शोभा डे यांचा त्या अभिजन वर्गात वावर-उठबस असते. हा अभिजन वर्ग म्हणजे कोण व त्याची उठबस कुठे असते? तर समाजातील श्रीमंती थाटाची जी संमेलने होतात, तिथे जी गर्दी जमवली जाते, त्याला अभिजनवर्ग म्हणतात. ज्याच्या खिशात भल्याबुर्‍या मार्गाने मिळवलेला पैसा उधळण्यासाठी असतो. त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची असली, मग त्यातला सोपा मार्ग म्हणजे अशा अभिजनांच्या पार्ट्या योजणे. त्यात दोनचार डझनपासून शेदोनशे फ़ुकटे आमंत्रित केले जातात. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मानल्या जाणार्‍यांशी जवळीक साधणे, त्यांच्यासोबत फ़ोटो काढून घेणे, असा तमाशा त्यातून चालतो. नवखे लेखक, कलावंत, प्रज्ञावंत यापासून खुप दूर असतात. या घोळक्यात त्यांना मुद्दाम आमंत्रित केले जाते. खेळात, कलेत वा साहित्यात नव्याने उदयास येणार्‍यांना त्या झगमगाटात आणून त्यांचे डोळे दिपवून टाकले जातात. त्या गर्दीत शोभा डे यांचा समावेश होतो. मग त्याच गर्दीत घुटमळणार्‍या टिव्ही-वृत्तपत्राचे संपादक पत्रकार यांच्याशी जवळीक होत असते आणि आपोआप शोभा डे माध्यमांसाठी ‘दखलपात्र’ विदुषी होऊन जाते. सहाजिकच अशा विदुषीने कशाविषयी काय म्हटले त्याची बातमी होत असते. मराठी चित्रपटांची सक्तीच नव्हे आजवर अनेक विषयात शोभा डे यांनी आपली अक्कल अशीच पाजळली आहे. त्याची मुळातच दखल घेण्याचे कारण नव्हते. पण माध्यमांना कुठल्याही विषयाची खळबळ माजवण्यात धन्यता वाटत असल्याने, अशी माणसे त्यात उड्या घेत असतात. एकूणच शोभा डे यांनी ताज्या विषयात काय अकलेचे तारे तोडले त्याचा उहापोह इथे करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. पण त्यांची लायकी काय ते सांगणे भाग आहे.

आज जशी प्रसिद्धी शोभा डे यांना मिळते आहे आणि ज्या कारणास्तव मिळते आहे, त्यापेक्षा मागल्या काही वर्षात राखी सावंत यांनी मिळवलेला प्रसिद्धीचा झोत किंचित तरी वेगळा आहे काय? पाचसहा वर्षापुर्वी कोल्हापूरच्या कुठल्या जाहिर कार्यक्रमात अंगप्रदर्शन केल्यामुळे राखी सावंत प्रथम बातम्यात आली. मग तिच्यावरील पोलिस खटल्याच्या बातम्या येत राहिल्या. त्याचे पुढे काय झाले माहित नाही. पण त्या निमीत्ताने माध्यमांची जादू उमगलेल्या राखीने सतत काहीतरी कुरापत काढून बातम्यात रहाण्याचा सपाटा लावला होता. तिला मिळणारी प्रसिद्धी व त्यासाठी वाटेल ते करण्याची ‘तयारी’ बघून स्वयंवर नावाचा एक टेलिव्हीजन कार्यक्रमही तयार झाला. मध्येच कधी एका पार्टीत कुणा पंजाबी गायकाने तिचे चुंबन घेतल्याचे प्रकरण गाजले. विपरीत प्रसिद्धी व हास्यास्पद ठरण्याची संधीच राखी शोधत असावी असा सगळा प्रकार होता. त्यात आपली बाजू मांडताना प्रचलित सभ्यता भाषा यांना झुगारण्याची तिची हिंमत खरे भांडवल होते. बाकी राखीच्या विधानात वा बोलण्यात कुठलेही तथ्य कधीच नव्हते. पण असे खुळचट बोलले म्हणजे प्रसिद्धी मिळते आणि लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधले जाते, इतके राखी जाणून होती. तिने त्यापेक्षा अधिक अपेक्षा कधीच बाळगली नाही. तिच्या बाबतीत जी काही टिंगल होत राहिली, त्याबद्दल तिने कधी तक्रारही केली नाही. पण माध्यमातल्या संपादक पत्रकार वा बुद्धीमंताने कधी राखीच्या बाजूने लढायची तत्परता दाखवली नाही. कारण उघड होते. राखी सावंत अभिजन वर्गातली नाही. उच्चभ्रू वर्गाच्या अब्जाधीशांच्या पार्टीतली चमचमणारी ती आजीमाजी तारका नाही की विदुषी नाही. मग तिच्या बाजूने कोण उभे रहाणार? तिची खिल्ली उडवली गेली आणि कोणी कधी तिचे समर्थन केले नाही. राखीपेक्षा शोभा डे किती वेगळ्या वा गुणवान आहेत?

राखी व शोभा यांच्या मागल्या तीनचार वर्षातल्या विधाने व वादांची तुलना केली, तर दोघींमध्ये तसूभर फ़रक आढळणार नाही. तितकाच निर्बुद्धपणा व विपरीत प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास, सख्ख्या बहिणी म्हणाव्यात इतका समान आहे. फ़रक केवळ उच्चभ्रू अभिजनात असणे व नसणे इतकाच आहे. कदाचित राखीला शोभा इतके अस्खलीत इंग्रजी बोलता लिहीता येत नाही, हा आणखी एक मोठा फ़रक सांगता येईल. ते शक्य असते तर कदाचित एव्हाना राखी सावंत अरुंधती रॉयला मागे टाकून बुकर पारितोषिकाची मानकरीही होऊ शकली असती. तिच्यात शोभा-अरुंधतीचे सर्व गुण ठासून भरलेले आहेत. त्रुटी आहे ती इंग्रजी बोलण्या लिहीण्यातली आणि अभिजन वर्गाच्या आतल्या कडेकोट बंदिस्त जगात प्रवेश नसण्याची. मराठीच्या निमीत्ताने असे काही विषय निघाले, म्हणजे खुळचट पोरकट विधाने करून मराठीजनांना हिणवायला शोभाचा उपयोग आहे, म्हणून तर तिला अशा अभिजन वर्गात प्रवेश मिळतो. बाकी कुठल्या महत्वपुर्ण घडामोडीत तिचे मत कोणी विचारतही नाही. स्पष्टच सांगायचे तर शोभा डे ही उच्चभ्रू अभिजन वर्गाची राखी सावंत आहे. जे कोणी स्वत:ला शहाणे व संयत विचार करू शकणारे समजतात, ते सामान्य लोक राखीच्या मते वा विधानाकडे गंभीरपणे बघतात तरी काय? नसतील तर शोभा डेच्या बालीश बेअक्कलपणाची तरी दखल कशाला घ्यायची? ज्यांनी तिला भुंकण्यासाठीच अभिजन पार्ट्यामध्ये पोसली आहे, त्यांच्याशी तिचे इमान तिने रुजू केले, इतके समजून त्याकड दुर्लक्ष करावे. आपण तिकडे दुर्लक्ष करू लागलो आणि तिला मराठी लोक किंमत देत नाहीत दिसले, तर पार्ट्यांमधला अभिजन वर्गही तिला दारात उभा करणार नाही. तिच्या गळ्यात पट्टा बांधणारेच शेवटी मातोश्रीच्याही पायर्‍या झिजवत होतेच ना? यावरून शोभाची लायकी ओळखावी. तिच्यापेक्षा राखी सावंतची अधिक दखल घ्यावी. टाईमपास तरी होईल.

9 comments:

  1. "..तर कदाचित एव्हाना राखी सावंत अरुंधती रॉयला मागे टाकून बुकर पारितोषिकाची मानकरीही होऊ शकली असती....." :-):-):-):-)
    पेज 3 ढोंगी पणावर मस्त प्रहार.

    ReplyDelete
  2. भरून आले आसमंत
    रडू लागले संत
    महाराष्ट्राची खंत
    राखी सावंत

    त्यात शोभा डे(वास्तविक शोभा "डब"डे) पण आलीच

    ReplyDelete
  3. सिद्धू सारखी क्रॅक आहे

    ReplyDelete
  4. बर झाल हाणल हिल एक नंबरची उटवळ बाई आहे हि .१० नवरे करून हि चालली हज ला

    ReplyDelete
  5. "डे बाय डे" या बाय"डे"चा मूर्खपणा व छचोरपणा वाढतोच आहे !

    ReplyDelete
  6. Shobha Dey such a chatacter she is.😂😂 I recently read her article in The Times of India. It was about bollywood prodigy Dangal girl Zaira Wasim who declared to renounce from bollywood by giving the reason "Allah ki rah pe chalna hai". she was trying to endorse and defend Zaira Wasim's decision by giving the viewpoint of freedom of choice. Had such decision been taken by any Hindu girl with the same religious sentiments she would have lashed her and the influencing forces behind the decision. Such a biased columnist she is.

    ReplyDelete
  7. तुमची लेखणी या फालतु बायांसाठी कशाला बरे झीजवली?

    ReplyDelete
  8. "शो भाडे" एव्हढे म्हंटले तरी पूरे !

    ReplyDelete
  9. शोभा डे असो किंवा अरुंधती रॉय यांनी नेमकं त्यांच्या लिखाणातून समाजासाठी काय केलं वा कोणाला न्याय दिला नाहीतर त्यांच्यामुळे सामान्यांच्या जीवनामध्ये कोणते बदल झाले हे समजायला मार्ग नाही पण फक्त उच्चभ्रू लोकांसोबत फोटो काढून, संबंध असल्याचं दाखवून त्यांनी जी माया कामवाली आहे त्याबद्दल जर कळाल असत तर चांगलं झालं असत

    ReplyDelete